दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

मणिपूर : फुलनच्या धगधगत्या निखार्‍यांनो...

 मणिपूर : फुलनच्या धगधगत्या निखार्‍यांनो...



जाती उच्चत्व, लैंगिक अत्याचार्‍यांना ठेचणार्‍या आणि बुद्धाच्या धम्मपथावरून चालता चालता-लढता लढता शहीद झालेल्या फुलनदेवीचा आज (25 जुलै) शहीद दिन. आज मणिपूरमधल्या कुकी जमातीच्या स्रियांनाही फुलन देवीसारख्याच अत्याचारांना सामोरे जावे लागतेय. त्यांच्या नग्न धिंडीचीही पाठीराखी सत्ता आणि व्यवस्था पत्थरदिल झाली असताना फुलनच्या धगधगत्या अंगार्‍यांना पेटते करायचे काम 25 जुलै 2021 ला पत्रकार रवी भिलाणेंनी केले होते. संदर्भ जुना असला तरी मणिपूरच्या पुरुषी मानसिकतेवर अचूक बोट ठेवणारा आहे. फुलनच्या हौतात्म्याला क्रांतिकारी जयभीम करताना रवी भिलाणेंच्या लेखणीने पेटवलेले हे निखारे काळीज असलेल्या आपल्या सार्‍यांसाठी...

शहाणी राणी फुलनदेवी... 

‘‘... फुलन देवी, जीने तिच्यावर बलात्कार करणार्‍या उच्चवर्णीयांच्या गावात घुसून दिवसाढवळ्या 22 मुडदे पाडले होते. चंबळच्या खोर्‍यातील डाकुराणी फुलनदेवी. बँडीट क्वीन!

 ...1996 ला जरी ती खासदार म्हणून निवडून आली असली तरी 1998 ला मुंबईत आली तेव्हा ती खासदार नव्हती. अर्थात 1999 ला ती पुन्हा खासदार म्हणून निवडून आली. चंबळची डाकू ते दोन वेळा लोकसभेत खासदार होण्यापर्यंतचा फुलन देवी यांचा प्रवास रोमांचक होता. फुलनदेवी जाती व्यवस्थेच्या विरुध्द होत्या. जाती व्यवस्थेमुळे त्यांचे व त्यांच्या निषाद (नावाडी/मल्लाह) समाज बांधवांचे अतोनात शोषण झाले होते. त्या निडर व धाडसी स्वभावाच्या होत्या. त्यांनी अन्यायाशी कधीच तडजोड केली नाही. दुसर्‍यांचं दुःख समजून घेणार्‍या प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्या म्हणत, ‘गरिबांना आर्थिक मदत करताना मला फार आनंद होतो’. जनसामान्यात त्या प्रंचड लोकप्रिय असल्या तरी त्यांच्या नेहमीच्या वागण्यात नम्रता कायम होती.सुनील त्याला भेटलेल्या फुलनदेवीबद्दल सांगत होता, पण इकडे मला मात्र एक वेगळीच फुलन उमजू लागली होती. 

14 फेब्रुवारी 1981 ला उत्तर प्रदेशातील बेहमई गावात 22 ठाकूरांचे हत्याकांड झाले आणि ही बातमी वार्‍यासारखी जगभर पसरली आणि अवघ्या 17 वर्षाच्या फुलनदेवी यांचे नाव बॅन्डीट क्वीन म्हणून जगासमोर आले.

उत्तर प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री व त्यानंतर जनता दलाचे सरकार असताना पंतप्रधान राहिलेले व्ही. पी. सिंग यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. केंद्रातील इंदिरा गांधी सरकारही हादरून गेलं. या हत्याकांडामागचं कारणही भीषण होतं. याच गावात ठाकुरांनी फुलनदेवीला नग्न करून तिच्यावर सतत तीन आठवडे बलात्कार केला होता. त्या अपमानाचा सूड तिने बेहमई हत्याकांडातून घेतला होता. एका सतरा वर्षाच्या, चार साडेचार फूट उंचीच्या किरकोळ मुलीने दबंग समजल्या जाणार्‍या चाळीसेक ठाकूरांना त्यांच्याच गावात रांगेत गुडघ्यावर बसवून ठोकून काढलं होतं. 22 मेले, कित्येक जखमी झाले. विशेष म्हणजे गावातील एकही बाई माणूस, लहान मूल किंवा वयस्कराला साधा ओरखडाही काढला नाही तिने. मात्र जात, जमीन, जवानी यांच्या गुर्मीत असलेल्या मिजासखोर पुरुषातील एकालाही सोडलं नाही. या चिमण्या शरीरात रागाचा इतका दारुगोळा कसा काय साठला होता? अचानकपणे एका दिवसात तर नक्कीच नाही.

फूलन देवी (10 ऑगस्ट 1963-25 जुलै 2001) चा जन्म उत्तर प्रदेशातील गोराहा या छोट्याशा गावात झाला. मागासवर्गीय परिवारात जन्मजात दारिद्र्याशिवाय काय असणार? त्यात महिलेचा जन्म. ब्राम्हणी पितृसत्ताक संरजामी समाजात तिच्याकडे सामूहिक लुटीचा माल म्हणूनच हक्काने पाहिलं जातं. तिच्या विरोधाची तर सुतराम शक्यता नसते. अशात एखादीने जर विरोध केला तर...? तर ती सतावली जाते, नासवली जाते, वापरून फेकली जाते आणि गरज संपली तर किड्या मुंगीसारखी चिरडून संपवलीही जाते. मात्र, इतकं होऊनही पुन्हा उभी ठाकली तर..?

तर ती फुलन देवी असते.

फुलन विद्रोहाचा अंगार सोबत घेऊनच जन्माला आली असावी बहुतेक.तिच्या काकाने बापाची जमीन हडपली म्हणून ती काकाला नडायची. वीटभट्टी चालकाने मजुरीचे पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्या घराच्या विटा तिने खिळखिळ्या करून टाकल्या. तिचं बंड शमवण्यासाठी म्हणून वयाच्या अकराव्या वर्षी तिच्यापेक्षा तीस पस्तीस वर्ष थोराड बाप्याबरोबर तिचं लग्न लावून देण्यात आलं. त्याचा अत्याचार सहन न होऊन ती आई बापाकडे पळून आली.इथे आल्यावर गावातल्या दबंग झुंडीने तिची शिकार केली, पण तिने प्रतिकार सोडला नाही. म्हणून तिला अद्दल घडवण्यासाठी पोलिस ठाण्यात डांबण्यात आलं. पोलिस ठाण्याबाहेर तिचे आई-वडील तिच्या सुटकेसाठी गयावया करत होते आणि आतमध्ये पोलिस तिच्यावर बलात्कार करत राहिले. अखेर तिसर्‍या दिवशी तिला सोडून देण्यात आलं. मात्र, इतकं होऊनही फुलन त्या व्यवस्थेला शरण जायला तयार झालीच नाही. मग दबंगांच्या सांगण्यावरून ठाकूर श्रीराम आणि लालाराम यांच्या डकैत टोळ्यांनी तिचं अपहरण केलं. भोगदासी बनवलं, पण इथे तिला डाकू विक्रम मल्लाह भेटला. तिच्या बाजूने उभा राहिलेला पहिला डाकू माणूस. कदाचित एकाच जातीचे असल्यामुळे सूर जुळले असावेत. त्यांनी टोळीत राहूनच लग्न केलं. तिच्यावर बलात्कार करू पाहणार्‍या डाकू बाबू गुज्जरची हत्या केली विक्रमने. एव्हाना फुलननेही हातात बंदूक घेतली होती. मात्र, बलात्कारी झुंड तिची पाठ सोडायला तयार नव्हती. तिच्यामुळे आपला बाबू गुज्जर मेला म्हणून ठाकूर श्रीराम आणि लालाराम यांच्या टोळीने तिला गाठलं. विक्रमला ठार केलं. तिला नग्न करून होडीत बसवून बेहमई या ठाकुरांच्या गावात नेलं. विहिरीवरनं नागव्याने पाणी आणायला लावलं. सरळ ऐकत नाही म्हणून तिला विहिरीत फेकलं. तीन तास ती विहिरीत पडून होती. पुन्हा बाहेर काढण्यात आलं आणि एका खोलीत कोंडलं गेलं. पुढचे तीन आठवडे डाकू आणि गावातील लोकं तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत होते, त्या पंधरा सोळा वर्षाच्या पोरीवर! कोणत्या शब्दात मांडावा हा जुलूम? जिथं शब्द, भाव, नाती गोती, माणुसकी, देव, धर्म, काळ वेळ ...सार्‍यांच्या सीमा संपल्या होत्या.

तिच्या काही सहकार्‍यांनी केलेल्या मदतीमुळे अखेर एकवीस दिवसांनी ती स्वतःची सुटका करून घेऊ शकली. तिने स्वतःची टोळी बनवली. 14 फेब्रुवारी (व्हॅलेंटाईन डे) 1981 ला ती पुन्हा त्याच गावात परत आली, आपल्या फौज फाट्यासह. ठाकूर श्रीराम आणि लालारामच्या शोधात. आणि मग तिनं जे काही केलं तो इतिहास तर जगजाहीर आहे.



बेहमई हत्याकांडानंतर दोन वर्षे उलटली तरी उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश पोलीस तिला पकडू शकले नाहीत. फुलनच्या नावावर आतापर्यंत अपहरण, दरोडे अशा तब्बल 48 गुन्ह्यांची नोंद झाली होती. शेवटी इंदिरा गांधी सरकारच्या विनंतीवरून तिने आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला. यावेळेस, फूलन आजारी होती आणि तिच्या टोळीतील बहुतेक सदस्य मरण पावले होते, काहींना पोलिसांनी मारले होते, तर काहींना प्रतिस्पर्धी टोळ्यांनी मारले होते. 

फेब्रुवारी 1983 ला, मध्य प्रदेशातील भिंड येथे मुख्यमंत्री अर्जुनसिंग आणि लाखभर लोकांच्या साक्षीने तिने महात्मा गांधी आणि देवी दुर्गा यांच्या प्रतिमांसमोर आपली बंदूक खाली ठेवली. तशी तिची अटच होती. ती पोलिसांना शरण जाणार नव्हती. गेली नाही. लोकांनी डाकुराणी फुलन देवीचा जयजयकार केला. देशविदेशात फुलनदेवी नावाच्या डाकू राणीची चर्चा झाली. मात्र, इथेच बहुतेक इतिहासाची गफलत झाली.

फुलनदेवी डाकू राणी नव्हती, तर शहाणी राणी होती. शरणागतीवेळी ती फक्त 19 वर्षांची होती. अशिक्षित, बलात्कारित, हत्यारीन अशी ही मुलगी पोलिसांसमोर नव्हे तर अशा प्रतिकांसमोर शरणागती पत्करते, ज्यातील एक अहिंसेचा पुजारी आणि राष्ट्रपिता म्हणून ओळखला जातो, तर दुसरी दुर्जनांचा नाश करणारी मातृदेवता मानली जाते. एखाद्या डाकूने असे माता पिता निवडावेत ही काय अनवधानाने केलेली सहज साधी कृती होती? आणि जुलमी व्यवस्थेचे पाईक समजल्या जाणार्‍या पोलिसांसमोर नव्हे तर आपल्या ‘लोकांच्या साक्षीने बंदूक खाली ठेवणं हे शहाणपण काय सांगून जातं?’ 

तिच्या शहाणपणाची कमाल मर्यादा तर पुढेच आहे. फुलन देवीला पुढील अकरा वर्षे तुरुंगात काढावी लागली. 1993-94 मध्ये उत्तरप्रदेशच्या मुलायमसिंग यादव सरकारने तिच्यावरील खटले मागे घेतले आणि तिला तुरुंगातून मुक्त केले. आयुष्याची 20 वर्षे जुलूम, अन्याय, अत्याचार सहन करण्यात आणि त्यांचा प्रतिकार करण्यात तर पुढची अकरा वर्षे तुरुंगात काढून आलेली निषाद किंवा मल्लाह नावाच्या, लोकांना नावही माहीत नसलेल्या मागासलेल्या नावाडी जातीच्या त्या निरक्षर बाईने तुरुंगातून बाहेर आल्याबरोबर एका झटक्यात बुद्ध धम्म स्वीकारला. इथं बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकरांचं उठता बसता नाव घेणारे, त्याचा फायदा उपटणारे प्रगत-अप्रगत जात वर्ग समूहातले बुद्धिजीवी, विचारवंत, राजकारणी, प्रस्थापित स्त्री पुरुष हे आयुष्य संपत आलं तरी बुद्धाच्या वाटेला जायची हिम्मत करत नाहीत, अन् ही बाई कोणाला काही कळायच्या आत ते सगळं करून मोकळी होते. आजपासून पंचवीसेक वर्षांपूर्वी! म्हणून म्हणतो...डाकू राणी नव्हे, ती तर शहाणी राणी! बुद्धाच्या ज्ञान मार्गावर निघालेली.



25 जुलै 2001 रोजी दिल्ली येथील निवासस्थानी फुलनदेवीचा खून करण्यात आला. पितृसत्ताक ब्राम्हणी संरजामी व्यवस्थेच्या खुनशी औलादीने नागपंचणीच्या दिवशी, फुलनच्या घरातील दुधाची खीर खाऊन तिलाच गोळ्या घातल्या.

खरं तर या धरतीवर फुलनला फुलूच द्यायचं नाही असा प्रयत्न अविरत केला जात असतो. फुलन तुरुंगात आजारी असताना तिला न विचारता तिच्या गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्यात आली. वर या गोष्टीचं समर्थन करताना तो डॉक्टर दात विचकत म्हणाला, ‘आता हिच्या पोटी एखादी फुलन जन्माला येण्याचा प्रश्नच उरला नाही’.

त्यांची व्यवस्था फुलनदेवीला टरकून असते.

फुलन डाकू राणी असते म्हणून नव्हे, तर व्यवस्थेला आव्हान देणारी शहाणी राणी असते.. स्मृती दिनानिमित्त विनम्र आभिवादन!!!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?