दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!
दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!
सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.
बोलकी अर्पण पत्रिका :
‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा.
निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो.
भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध :
जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधायचा प्रयत्न लेखकांनी केला आहे. फुले दांपत्याच्या जीवनात यशवंत याचा प्रवेश कसा झाला, त्यांचे संगोपन, संस्कार, शिक्षण आदी कार्य या जोडगोळीने कसे पार पाडले याचे सह्रदयी वर्णन लेखकांनी लिलया पद्धतीने केले आहे. महात्मा फुले व सावित्रीबाईंच्या यशवंतास दत्तक घेतल्यामुळे जोतीरावांच्या भावंडांप्रमाणे सावित्रीबाईंच्या भावंडांनी देखील फुले दाम्पत्याशी संबंध तोडल्यामुळे ओतूरचे भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील हेच त्यांना आपले मामा वाटू लागले. अखेरपर्यंत उभयतांचा स्नेह कमी झाला नाही.
वादळात लावला दिवा! :
ज्ञानोबा ससाने यांचा स्वतःचा विवाह सत्यशोधक पद्धतीने झाला होता. आपली मुलगी राधा ही त्यांनी यशवंतास कबूल केली व फुले दांपत्यांनी आपल्या शेकडो सत्यशोधकांच्या उपस्थितीत हा विवाह लावला. जात पंचायतीचे चटके भोगलेल्या ससाणेंनी पुन्हा एकदा धैर्य दाखवून फुले घराण्याला आपली कन्या देऊन वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न केला. राधा उर्फ लक्ष्मीबाई ही या उभयतांची सून झाली. 1890 साली पितृशोक, 1897 साली मातृशोकाचे आघात तसेच आपली प्रिय पत्नी राधा उर्फ लक्ष्मी हिने ही 6 मार्च 1895 रोजी जगाचा निरोप घेतला.
वाचकांच्या डोळ्याला लागतील धारा! :
लक्ष्मी उर्फ राधे राधाबाईंच्या मृत्यूने मोठी पोकळी यशवंतराव व सावित्रीबाई समोर निर्माण झाली. त्यात पुन्हा 1897 मध्ये आपल्या प्रिय आई सावित्रीबाईंच्या निधनाने तर डोंगरच त्यांच्यावर कोसळला; परंतु परिस्थितीशी डॉक्टर यशवंताने दोन हात करत कशी मात केली हे वाचता वाचता वाचकांच्या डोळ्याला धारा कधी लागतात हे कळत नाही.
![]() |
WHO KILLED KARKARE |
कृतघ्न महाराष्ट्र :
1897 मध्ये प्लेगच्या साथीत सावित्रीबाईं बरोबर डॉक्टर यशवंताने कसे काम केले?, नगरहून मिलिटरीतील नोकरीतून सुट्टी घेऊन आपल्या आईच्या प्लेगनिवारणार्थ कार्यात कसे झोकून दिले?, हा दैदिप्यमान इतिहास आज महाराष्ट्र विसरला आहे. महाराष्ट्राची ही कृत्घनताच म्हणायला पाहिजे.
महाराष्ट्राची अधोगती का झाली? :
कोविड-19 चा कालखंड अनुभवल्यामुळे संसर्गजन्य रोग किती भयाण असू शकतो याचे भान आम्हास आहे. अशाही कालखंडात मुंबई-पुणे येथे सत्यशोधकांनी केलेले कार्य; प्रसंगी सावित्रीबाई व रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे समर्पित जीवन व बलिदान आम्ही विसरलो आहोत, याची जाणीव हे चरित्र वाचतांना पानो पानी होते. मिलिटरीतल्या पहिल्या वर्षाचा संपूर्ण पगार प्लेग निवारणार्थ देणार्या डॉक्टर यशवंतरावास आम्ही काय दिले? याची उत्तरे समग्र महाराष्ट्राने द्यायची आहेत. त्याच बरोबर सावित्रीबाई फुले, डॉक्टर यशवंतराव फुले व नारायण मेघाजी लोखंडे यांची समग्र जीवन दर्शन करून देणारी स्मारके आम्ही का बांधू शकलो नाहीत? या प्रश्नांच्या उत्तरातच आजची अधोगती महाराष्ट्राची का झाली, याची उत्तरे आहेत. संवेदनशील मनाला चटका लावणारा इतिहास मान. राजाराम सूर्यवंशी यांनी मोठ्या ताकदीने उभा केला आहे.
‘संसार’ विकून चालविला संसाराचा गाडा :
सत्यशोधक चळवळीकडे दुर्लक्ष करून त्याचे ब्राह्मणेतर चळवळीत रूपांतर झाले. महात्मा फुलेंचा खरा वारसा विसरल्यामुळे पुढे डॉक्टर यशवंतराव फुले यांची दुसरी पत्नी चंद्रभागाबाई यांच्यावर समाजाने व काळाने कसा सुड उगवला, डॉक्टर यशवंताच्या मृत्युनंतर संसार विकून संसाराचा गाडा चालविण्याची वेळ चंद्रभागाबाईंवर का आली, ब्राह्मण्यग्रस्त माळी समाज व तत्कालीन समाज व्यवस्था याचा दुष्परिणाम फुले वंशजांवर कसा झाला, त्याचे चटके आजही त्यांचे वंशज कसे भोगताहेत याची करुण कहाणी म्हणजे मान. राजाराम सूर्यवंशी लिखित प्रस्तुत चरित्र होय. मुळातून हे चरित्र सर्वांनी वाचले पाहिजे, असा मी आग्रह धरतो.
-पुस्तक परीक्षण, प्रा. सुदाम चिंचाणे
8788164760, संभाजीनगर महाराष्ट्र.
ग्रंथासाठी संपर्क : 7875451080
ग्रंथाची पृष्ठसंख्या : 222
बाइंडिंग : पुठ्ठा बाइंडिंग
ग्रंथाची किंमत : 270 रुपये + 50 रूपये पोस्टेज चार्जेस = 320 रूपये
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा