लेखांक -5 : वारकरी साहित्य आणि संप्रदाय : शोध आणि बोध!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लेखांक -5 : वारकरी साहित्य आणि संप्रदाय : शोध आणि बोध!
वारकरी साहित्य व संप्रदायाची सामाजिक प्रबोधनाची भूमिका.
वारकरी साहित्याची भूमिका समतावादी, जीवनाकडे समग्रपणे पहाणारी भूमिका आहे. समग्रपणे म्हणजे सांसारिक, प्रापंचिक, पारमार्थिक, ऐहिक व भौतिक जीवनाच्या सर्व अंगांना व्यापणारी भूमिका आहे. कारण वारकरी हे सुधारकांप्रमाणे विवाहित-सांसारिक होते. त्यातून त्यांना जीवनाचे कडू-गोड अनुभवाचे चटके बसले होते. त्या अनुभवातून त्यांची एकंदर मानवजातीय समाजाबद्दल जी मनोभूमिका तयार झाली होती, त्यामुळे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व समग्र बनला होता.
याउलट आचार्य, महंत, शंकराचार्य हे ब्रह्मचारी होते. त्यांची भौतिक, ऐहिक व प्रापंचिक जीवनाबद्दलची भूमिका नकारात्मक होती. जगं मिथ्या, ब्रह्मं सत्यं अशी त्यांची भूमिका होती. म्हणजे ज्या जगात आपण सतत जगतो, ज्यात वावरतो, ज्याला अनुभवतो, ज्यातून जीवनातील सुख-दुःखाचा अनुभव होतो, ज्या सृष्टीच्या विशाल आविष्कारांनी माणूस मोहित होतो, पुलकित होतो असे वास्तविक जग मिथ्या म्हणजे भ्रम आहे, असा त्यांचा सतत उपदेश असायचा. ब्रह्मं सत्य म्हणजे तुम्ही जे कधी पाहिले नाही, अनुभवले नाही, जे मुळात अस्तित्वातच नाही असे जग अथवा ब्रह्म हे ब्रह्मसत्य आहे, असा मायावी उपदेश त्यांचा असायचा व आजही आहे.
असे का? याला कारण काय? याचे कारण असे की, बहुजन समाजातील सर्व जातीच्या सर्वसामान्य, गरीब दुबळ्या, कष्टकरी, सेवाधर्मी जातींना आपले दूःख, यातना, व्यथा या कळू नयेत. त्यांचा उगम, उग्रता व तीव्रता त्यांना उमजू नये. आपले कर्म, भोग, यातना, व्यथा व जातीय पारंपरिक कार्य, सेवाधर्मी यातनामय जीवन हे पूर्वजन्माच्या, पाप-पुण्याच्या व संचिताच्या गोळाबेरजेतून मिळाले आहे, ते भोगणे क्रमप्राप्त आहे. नाहीतर पुढील जन्म पुन्हा असाच प्राप्त व्हायचा! असा दैववाद व कर्मसिध्दांत जोपासला जावा व तो दृढ व्हावा या एकमेव वर्णवर्चस्ववादी भावनेतून व भूमिकेतून सनातनी पंथीय हे जग मिथ्या आहे, असे बहुजन समाजाच्या कानी-कपाळी सतत बिंबवत राहिलेत. जे जग मिथ्या, भ्रम असल्याने तुमचे दुःख, यातना, शोषण हे ही मिथ्या आहे. त्यामुळे तुमचा विद्रोह ही मिथ्या ठरतो. त्यापेक्षा आहे ते जीवन तुम्ही निमुटपणे जगा! असा जातीय अर्थ त्यामागे होता. तसेच मोठे अर्थकारण व समाजकारण ही यामागे कार्यरत होते.
कष्टकर्यांच्या घरात अंधार, शेती पिकविणारा, जोडे बनवणार्या, मडके घडवणार्या, रथाची व मठाधिपती, राजे-रजवाडे यांचे महाल बनवणारे कारागीर व सुतारांच्या घरात आणि झोपडीत ठणठणाट!, तर मंदिर, मठ व तळघरात अमाप संपत्ती! अशी आर्थिक विषमता या दैववादाच्यामागे व कर्मसिध्दांतांच्या अडून लपवायची होती व आपले वैभव व प्रतिष्ठा वाढवायची होती. बारा बलुतेदारांकडून सर्वप्रकारची सेवाधर्मी कामे अल्पशा मोबदल्यात अथवा जातीय हक्काने करवून घेण्यामागे मोठे जातीय अर्थशास्त्र कार्य करीत होते.
पंतकवी :
संतकवींच्या बरोबर समांतर अशी पंतकवींचीही परंपरा या समाजात मुलतत्ववाद पक्का करण्यासाठी झटत होती. पंतकवी हे सर्व उच्चवर्णिय होते.
आद्य इंग्रजी शिकणार्यांची पिढी ही पंतकवींची होती. हिच पिढी त्याआगोदर संस्कृत शिकत होती, वाचत होती आणि संस्कृतमध्ये लिहित होती. तीच आता इंग्रजी शिकू लागल्यामुळे त्यांना बहुजन समाजातील लोकांबद्दल, संतांबद्दल, वारकरी आणि त्यांचे साहित्याबद्दल तसेच लावणीकारांबद्दल आत्मियता नव्हती. त्यामुळे त्यांचा लिहिणारा आणि वाचणारा वर्ग सहाजिकच मर्यादित राहिला. त्यापरत्वे मराठी साहित्याचा विकासही मर्यादित अंगाने होत राहिला. पुढे अपरिहार्यपणे खुंटला.
या पंडित अथवा पंत कवींच्या पहिल्या पिढीने कधी अभंग लिहिले नाहीत. जे लिहिले ते एकतर ब्राह्मण देवतांवर स्तुतीसुमने अथवा शूद्रांतिशुद्रांवर धार्मिक व आर्थिक जटिल नियम लावणारी धार्मिक कायद्यांची जंत्री.
संस्कृत नाटकातही वर्णवर्चस्व अबाधित राहिल, ब्राह्मणवाद पोसला जाईल हा हेतू प्राधान्याने असायचा. संस्कृत नाटकातही वर्णवर्चस्व अबाधित राहण्यासाठी ब्राह्मण पात्रे संस्कृतमध्ये बोलायची तर इतर वर्णिय पात्रे प्राकृतमध्ये! हल्लीच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या टि. व्ही. सिरियलमध्येही विनोदाच्या बाबतीतही हाच वर्णवर्चस्वाचा देखावा दररोज दाखवला जातो. हा सांस्कृतिक-भाषिक भेद जाणून बुजून पोसला व बिंबवला जातो.
पूर्वीचे संस्कृत साहित्य फक्त साडेतीन टक्के लोकांसाठीच निर्माण केले जायचे.त्यात साडे शहाण्णव टक्के समाजाचे प्रतिबिंब नसायचे. आज साडे शहाण्णव टक्के, अर्थात बहुजन समाजाचा पाठिंबा मिळावा म्हणून इतर वर्णिय पात्रांना नाटकात घेतात, पण सादरीकरणात त्यांना दुय्यम दाखवून पुन्हा तोच जूना वर्णवर्चस्ववाद जोपासतात. म्हणजे इतर, बहुजन वर्णिय पात्रांना घेतात तेही उपहास म्हणून!
हे अगोदरचे संस्कृत व नंतरचे अभिजात मराठी साहित्य जसे संकुचित, मर्यादित तसेच अप्रवाही राहिले. त्यात जेव्हा पुढे वारकरी साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य व आदिवासी साहित्य येवून मिळाले, तेव्हाच ते खर्या अर्थाने सर्वसमावेशक, प्रवाही व संपूर्ण बहुजन समाजाचे प्रतिबिंब प्रतिबिंबीत करणारे साहित्य बनले आहे. येथेही बहुजन समाजातील संतांनी, वारकर्यांनी,साहित्यिकांनी व विचारवंतांनी मास्टरी-प्राविण्य-मिळवल्यावर त्यांच्याकडे कुत्सिकपणे पाहण्याचा डाव नेहमीप्रमाणे आजही खेळला जातो आहे.
इंग्रजी शिकणार्या दुसर्या पिढीत म.फुलेंसारखे बहुजन, समतावादी विचारवंत, बुध्दिवंत, प्रज्ञावंत जेव्हा निर्माण झालेत, तेव्हा त्यांनी आपले साहित्य अभंगाच्या अंगाने अखंडात लिहिले. हे म. फुलेंचे अखंड हे अभंगच आहेत.अभंगांमध्ये आधुनिकतेची क्षमता आहे हे म. फुलेंनी बरोबर ओळखले होते.तुकोबांचे ईश्वराशीसंबंधीत नसलेले कितीतरी अभंग आहेत हे म. फुलेंना माहित होते. म्हणून त्यांनी अखंडातून रचना केली होती.
महात्मा फुले यांच्या कविता या अभिनव ग्रंथाच्या प्रस्तावनेत लेखक श्री. दादा मोरे म्हणतात की, ‘केशवसुतांना आधुनिक कवितेचे जनक म्हणतात. केशवसुतांची कविता सामाजिक आशयाच्या दृष्टीने आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने वेगळी आहे, यात वाद नाही; परंतु केशवसुतांच्याही आगोदर म. फुले यांनी आपल्या अखंड काव्य रचनेत समाजातील विषमतेचे, अन्यायाचे आणि पिळवणुकीचे जे भयाण वास्तव चित्रिले होते याची नोंद मराठी समीक्षकांना का घ्यावीशी वाटली नाही, याचा खेद वाटतो...
‘अखंड म्हणजेच अभंग’ यासंबंधी श्री. कीर व मालशे म्हणतात, ‘मानवता, शब्दविवेक, सदाचार, समता यातून सार्वजनिक सत्य सांगणारा आपला वेगळा आशय स्पष्ट व्हावा म्हणून वेगळीक सुचविणारे अखंड असे अन्वर्थक अभिधान म. फुलेंनी योजलेले दिसते’. म्हणजेच संतांचे अभंग हे मानवता, सद्विवेक, सदाचार व समता यांचे उद्घोष करणारे काव्यच होते, हे यातून स्पष्ट होते.
महात्मा फुलेंनंतरला वारकरी परंपरेतील परंपरा सांगणारे कवित्व लुप्त झाले. अखंडाच्या रुपाने, अभंगाच्या अंगाने काव्य रचना करणारे म. फुले हे शेवटचे वारकरी ठरत असले तरी वारकरी परंपरेत व्यवहार करणार्याची यादी खूप मोठी आहे. त्यात कृष्णराव भालेकर, बहिणाबाई चौधरी, बा. सी. मर्ढेकर, र. वा. दिघे, दिलिप चित्रे, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ, दिनबंधू शेंगावकर, अरुण कोल्हटक व इंद्रजित भालेराव यांचा समावेश होतो.
महात्मा फुले वारकर्यामाध्ये वावरत. त्यांच्याशी म. फुलेंचा जवळचा संबंध होता. महात्मा फुलेंनी वारकरी भाषेतील साहित्याचा बारकाईने अभ्यास केला होता. वारकर्यांचे सुक्ष्म अवलोकन केले होते. त्यामुळेच त्यांचे अखंड तुकोबांच्या अभंगावर बेतलेले असे. म्हणूनच म. फुले व त्यांचा सत्यशोधक समाज तुकोंबांना आदर्श मानत होता.
-राजाराम सूर्यवंशी
(क्रमशः) पुढील लेखांकात वाचा : मराठी साहित्यावरील वारकर्यांचा प्रभाव!
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा