महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार! : मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंच्या विधानाने खळबळ
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार! : मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंच्या विधानाने खळबळ
देशाला भेडसावणार्या समस्यांवरून देशवासियांचे लक्ष विचलित करण्यासाठी आरएसएस प्रणित अतिरेकी संघटना वा व्यक्ती कायम वादग्रस्त विधानं करत असतात. मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंनी महात्मा गांधी यांचे वडीलच बदलण्याचे धाडस करताना त्यांच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून अजूनही मनोहर कुलकर्णी मोकाट कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
‘महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत’, असे खळबळजनक वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंनी अमरावतीत एका कार्यक्रमात केले आहे. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडेच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
भिडे म्हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही संभाजी भिडेंनी केला.
देशामध्ये सर्वधर्मसमभावाचा उपदेश नकोच. अशा प्रकारचा उपदेश देणार्या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करा. हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंचे शौर्य अफाट आहे; परंतु हिंदू स्वतःचा धर्म, कर्तव्य, जबाबदार्या विसरला. हिंदुस्थानची फाळणी होऊन देश षंढ पुढार्यांच्या हाती गेला आणि हिंदूंची व हिंदुस्थानची अधोगती झाली, असे ते म्हणाले.
दरम्यान, शुक्रवारी (28 जुलै) विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेच्या अटकेची मागणी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, संभाजी भिडे नावाच्या गृहस्थाने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणार्या व्यक्तीला कलम 153 अंतर्गत अटक केली पाहिजे. अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ते करत आहेत.
राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर हा माणूस बाहेर कसा फिरू शकतो. यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे? त्यामुळे कलम 153 अंतर्गत या व्यक्तीला अटक केली पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन सरकारने उचित कार्यवाही करावी. तर, याची नोंदी घेतली आहे. चौकशी करून योग्य ती कार्यवाही करू, असे एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे.
अनुसूचित जाती-जमातींचे बनावट जात प्रमाणपत्र काढून नोकर्या बळकावणार्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी उत्तराखंड विधान सभेवरील तरुणांचा नग्न मोर्चा, देशाची मान खाली घालायला लावणारी मणिपुरातील महिलांची नग्न धिंड, खनिज संपत्तीवर डोळा ठेवून सरकार पुरस्कृत भांडवली हिंसाचार, केंद्रातील भाजप सरकारवर विरोधी पक्षांनी आणलेला अविश्वास ठराव, यावरून भाजपचे पितृसत्ताक हिंसात्मक चरित्र उघडे पडले आहे. या घटनांवरून लक्ष विचलित करण्यासाठी मनोहर कुलकर्णीने हा डाव खेळला असावा, असा कयास आहे.
नेहमीच वादग्रस्त विधानं करून समाजात दुही निर्माण करणार्या मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंना सरकार कधी अटक करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा