दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

लेखांक-4 : वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध

 लेखांक-4 : वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध 



वारकरी संप्रदायात सर्वांना समान दर्जा होता. समान स्थान होते. संत नामदेव, संत तुकाराम, संत नगाजी महाराज आदी शूद्रवर्णिय संतांकडूनही काहींनी शिष्यत्वाची दीक्षा घेतली होती. संत तुकाराम शिष्या बहिणाबाई या जातीने ब्राह्मण होत्या. तसेच संत नगाजी महाराज व वाठारचे संत वाग्देव महाराज यांच्याकडूनही बर्‍याच ब्राह्मणांनी शिष्यत्वाची दीक्षा घेतली होती. 
सर्वात महत्वाचे म्हणजे चक्रधर-ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकाराम व नगाजी महाराजांपर्यंत सर्व संत डिकास्ट झाले होते. समाजातील जाती-वर्ण-लिंगभेदाला या संतांनी तिलांजली दिली होती. खुद्द ज्ञानेश्वरांना प्रेरणा मुक्ताबाईपासून मिळाली होती. ज्ञानेश्वरांआगोदर मुक्ताबाई अभंग-ओव्या रचू लागल्या होत्या. तसेच ज्ञानेश्वरांनंतर ज्ञानेश्वरी ही सच्चिदानंद बाबांनी लिहून काढली होती. चोखोबांचे अभंग अनंत भट नावाचा ब्राह्मण लिहून देत होता. त्याकाळीही काही सुज्ञ ब्राह्मण स्वतःहून पुढे येऊन शूद्रांना अभंग लिहिण्यात साथ देत होते. या गोष्टीला फार मोठे सामाजिक महत्त्व आहे. ही किमया वारकरी संप्रदायाची होती. कारण त्याकाळी या संप्रदायाने जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद यावर मात केली होती. म्हणून तुकोबाराय म्हणत,
अठरापगड याती। सकळहि वैष्णव।
दुजा नाही भाव पंढरीसि॥ 4427.3
संस्कृत देवाची भाषा : 
वारकरी संप्रदायाची महती सांगताना हे स्पष्ट केले पाहिजे की, जसे संस्कृतच्या ‘पंत’ कवींनी संस्कृत ही देवांची भाषा आहे अशी प्रौढी मिरविली, तशी प्रौढी वारकर्‍यांनी मराठी भाषेबद्दल मिरवली नाही. ती सर्वसामान्यांची भाषा आहे म्हणून ती श्रेष्ठ आहे, अशी वारकर्‍यांची मांडणी होती. सर्वसामान्य माणसाला वारकर्‍यांनी श्रेष्ठ मानले. म्हणून वारकर्‍यांची कामगिरी श्रेष्ठ ठरते.
मराठी ही संस्कृतच्या तोडीची भाषा आहे, अशी भूमिका कोणत्याही वारकरी संताने घेतली नाही. त्यांनी मराठीलाच श्रेष्ठ मानले व लिहिले. महानुभवांनीही मराठीतच लिहिले; परंतु त्यांनी मापदंड संस्कृतचे वापरले. 
‘शिशुपालवध’, ‘रुक्मिनी स्वयंवर’ लिहिताना महानुभवांच्यासमोर संस्कृतचे प्रारुप स्वरुप होते. तसे ज्ञानदेवांची व सर्व वारकरी संतांची साहित्यकृती स्वतंत्र होती. भाष्य लिहिण्याची वेगळी वेगळी शैली होती. या संतांनी एक खास वैशिष्ट्य निर्माण केले होते. म्हणून ज्ञानोबा म्हणत,
माझा मराठीचिया बोलु कौतुके।
परि अमृतातेही पैजा जिंका॥
हिंदू पुराणकथेनुसार अमृताचा संबंध देवांशी दाखवला जातो, तर विष हे असूर अर्थात सर्वसामान्य जनतेशी संबंधीत मानले गेले. या पार्श्‍वभूमीवर ‘आम्ही मराठीत लिहितो, ते संस्कृतचे अनुकरण नसून स्वतंत्र अभिव्यक्ती आहे, म्हणून ती स्वतंत्र निर्मिती ठरते. ही आमची माय-मराठी अमृताशीही म्हणजे देवांशीही पैजा जिंकू शकते’, असा आर्विभाव वारकर्‍यांनी मराठीत ओतला होता. 
येथे एक गोष्ट जाणण्यासारखी आहे, ती ही की ज्ञानेश्वरांपासून ते नंतरचे सर्व वारकरी नामदेव, चोखामेळा व त्यांचा शिष्य परिवार, सावता माळी, नरहरी सोनार आदी सर्व बहुतेक मंडाळीचे वारकरी साहित्य-लिखाण व निर्मिती तुर्क व मुघल राजवटीत झाली, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
चक्रधरांवर बहिष्कार घालणारे व त्यांचे जीवन यातनामय करणारे परकीय शासक नव्हते, तर हिंदू शासन व त्यांचा हिंदू पंडित हेमाद्री हे होते. ज्ञानेश्वर भावंडांच्या वडिलांना देहांताची शिक्षा सुनावणारे पैठणचे हिंदू-संस्कृत पंडित होते. परकीय तुर्क व मुघल शासकांनी हिंदू वारकरी पंथाच्या संताना त्रास दिल्याचे उदाहरण मध्ययुगीन कालखंडात दिसत नाही.
परकीय राजवटीत संत साहित्य निर्माण होण्याचे कारण काय?
रामदेवराय यादवाच्या हिंदू साम्राज्याने शूद्र व अतिशूद्रांना तिळतिळ तुडवून मारण्याचा विडा उचलण्याने चोखोबांसह कित्येक शूद्रातिशूद्रांना भिंतीत चिणून मरावे लागाले. हिंदू राजवटीमध्ये धर्म व कर्मकांड यांना ऊत येवू लागल्याने व सर्वसामान्य कष्टकरी जनतेला धर्मकायद्यांनी दंडित केले गेल्याने त्यांची निकोप वाढ होणे शक्य नव्हते. त्या तुलनेने परकीय राजवटी सुरुवातीला सुफी संतांच्या प्रभावाखाली असल्याने बर्‍याच प्रमाणात सहिष्णू होत्या. त्यांच्यावर सुफी संतांचा प्रभाव होता. सुफी संप्रदाय मानवतावादावर भर देणारा होता. त्यामुळे परकीय राजवटीत ब्राह्मण-सनातन्यांना शूद्रांना त्रास देण्याची हिंमत होत नसल्याने, शूद्रातिशूद्र व स्त्रीयांना होणारा हिंदू धार्मिक जाच कमी झाला. त्यांना ‘मोकळा’ श्वास घ्ययायला वेळ मिळाला, त्यांचा आवाज ‘बोलता’ झाला. व्यथा उमाळून आल्या. बंधुभावासाठी आसुसलेला समाज एकमेकांशी दुःखाची देवाण-घेवाण करून सहयात्री म्हणून आपापसात मिसळू लागला. म्हणून अशा मोकळ्या वातावरणात, परकीय राजवटीत संत साहित्य निर्माण होऊ शकले.
पुढे पेशवाई आल्यानंतर ते पुन्हा लुप्त झाले. साहित्य निर्मिती बंद होणे, संत निर्माण होणे बंद होणे हा योगायोग नव्हे. यामागे कार्यकारणभाव आहे. म्हणजेच इंग्रजांप्रमाणे मध्ययुगातही हिंदू राजवटीपेक्षा मुघल व तुर्कांच्या राजवटी भारतातील सर्वसामान्य शूद्रांतिशुद्रांना लाभदायक होत्या. 
वैदिक परंपरा व वारकरी परंपरा :
वैदिक परंपरा व वारकरी परंपरा यांतील मूलभूत धार्मिक भेद पुढिल प्रमाणे आहेत. 
1)वैदिक परंपरेमध्ये गीता व उपनिषदे ही प्रस्थाने असतात, तर वारकरी परंपरेमध्ये गाथा, ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत ही तीन प्रस्थाने असतात.
2) सर्व वैदिक महंत हे गीता व उपनिषादेवर भाष्य करतात, तर सर्व वारकरी कीर्तनकार तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवतावर भाष्य करतात. 
3) वैदिक महंत व शंकराचार्य हे फक्त ब्राह्मण जातीतून निर्माण होतात, तर वारकरी संत व कीर्तनकार बहुजन समाजातून निर्माण होतात. म्हणून सर्व बहुजनांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, वैदिक परंपरा म्हणजे ब्राह्मणी परंपरा होय. तथापि, वारकरी अथवा भागवत परंपरा म्हणजे बहुजन परंपरा होय! 
ब्राह्मणी वैदिक धर्म व वारकरी धर्म हे मुळतः भिन्न आहेत. हिंदुत्ववादी मंडळी हे दोन धर्म एकच आहेत असे भासविण्याचा प्रयत्न करतात.
हा मूलभूत भेद पुरातन काळापासून चालत आला असून तो ब्राह्मणी वर्चस्वासाठी उच्चवर्णियांना लपवायचा आहे. तर समतेसाठी आपल्याला तो भेद स्पष्ट करावयाचा आहे. त्याचा संदर्भ बहुजन समाजाशी जोडून या समाजाचा उत्कर्ष व उन्नतीसाठी आत्मभान करून देण्याचा आहे.
संत बहिणाबाई :
संत बहिणाबाई या तुकाराम महाराजांच्या शिष्या. जातीने ब्राह्मण. संत तुकाराम महाराजांच्या सांगण्यावरुन त्यांनी बौध्द वज्रयान पंथाचा संस्थापक व महाकवी अश्वघोष यांच्या वज्रसुची या महाकाव्याचे, जे मुळात संस्कृतमध्ये होते, त्याचे बहिणाबाईंनी मराठी भाषांतर केले. कारण संत बहिणाबाई या शाक्त घराण्यातील असल्याने त्यांनी संस्कृतचे ज्ञान आत्मसात केले होते. म्हणून त्या सतराव्या शतकातील संस्कृत पंडिता होत्या, असा स्पष्ट उल्लेख डॉ. रुपा कुलकर्णी यांनी त्यांच्या ताज्या ‘वज्रसुची’ या ग्रंथात केलेला आहे. ‘वज्रसुची’ नावाची ही काव्यकृती ‘ब्राह्मण’ या संकल्पनेला छेद देणारी आहे.
ब्राह्मण कुणाला म्हणावे? हा तिचा मुख्य प्रश्न होता. बहिणाबाई स्वतः जातीने ब्राह्मण होत्या. असे असूनही वारकरी संप्रदायाच्या समतावादी विचार-संस्कारांच्या प्रभावाखाली त्याही ‘डिकास्ट’ बनल्या होत्या. म्हणून ‘खरा ब्राह्मण कोण?’, असा प्रश्न उपस्थित करु शकल्या होत्या. तसेच आपली समतावादी दृष्टी आधोरेखित करू शकल्या होत्या.
यामागे नामदेव-ज्ञानोबा ते तुकोबापर्यंतची सर्व वारकरी संप्रदायाची समतावादी शिकवण कारणीभूत होती, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. जे जे टोकाचे कर्मठ सनातनी व कर्मठ आंबेडकरवादी जे हा बहुजनवादी, वारकरी संत व साहित्याचा आणि संप्रदायाचा सामाजिक समतावादी वारसा मान्य करीत नाहीत,त्यांना तुकोबा-जोतीबांच्या फुलेवादी दृष्टीकोनातून समर्पकपणे, बहु-अन्वेषणपध्दतीने यातला अब्राह्मणी वारसा समजावून सांगितला पाहिजे. तसेच शेतकरी व ओबीसी समाजाला त्याचे ‘भान’ प्राप्त करून दिले पाहिजे.
डिकास्ट व डिक्लास ही जरी ऐकोणिसाव्या शतकातील संकल्पना असली तरी  व फुले-आंबेडकर हे जरी वासाहतिक कालखंडातील सुधारणावादी प्रबोधनाची ‘माईल-स्टोन’ व अपत्ये असलेत तरीही नामा-ज्ञानोबा-तुकोबांपर्यंतची सर्व जाती-जमातीतील संत कसे अगोदरच डिकिस्ट झाले होते, हे समजावून घ्यावे लागते. सत्यशोधक हे सर्व संतांना आपले पुर्वसूरी का मानतात, याचे इंगित यात दडले आहे. यातच बहुजन समाजक्रांतीचे रहस्य दडले आहे.
सर्वसमावेशकता म्हणजे काय?, हे वारकर्‍यांकडून शिकावे. त्यातून बोध घ्यावा व जोतीबांच्या ‘एकमय लोक’-‘एकमय राज्य’ या या संकल्पनेचा उगम कसा यात दडला आहे, तसेच सार्वजनिक सत्यधर्माची तत्वे आणि वारकरी संप्रदायाची सर्वसमावेशक समतावादी तत्वे यांचा संगम कसा यात झालेला आहे,हे समजून घ्यावे लागते.
आपल्या बहुभाषिक व विविध सांस्कृतिक परंपरांनी नटलेल्या व विभिन्न भौगोलिक प्रदेशामध्ये विभागलेल्या समाज घटकांमध्ये सामाईकदुवा असणारी मातृसत्ता व स्त्रिसत्ता यांच्या कालखंडातील जी सार्वत्रिक समतावादी मूल्ये होती, त्यांना उजागर करून व आपण सर्व या मातृदेवतांच्या लेकरांच्या हिशेबाने, एकमेकांचे बंधु आहोत, भले आज आमची जात कोणतीही असो, तीला बाजूला सारून, आपण एकाच कुटुंबाचे घटक आहोत, ही भूमिका मध्यवर्ती ठेवून या लेकरांना एकत्र जोडण्याचे व ठेवण्याचे महान राष्ट्रीय कार्य हाती घ्यावे लागेल.
त्यासाठी आपल्याला पाश्चात्यांकडे पाहण्याची आवश्यकता नाही. आपल्या भूमीतच, आपल्या रक्तातच तो वारसा वसत आहे, याचे आत्मभान प्राप्त करून घ्यावे लागेल. कोणत्याही टोकाच्या विचारधारांना हे जमणारे नाही. संतुलीत मध्यममार्गी विचारवंतांना हे कार्य करावे लागणार आहे.
विचारांची, संस्कृतीची, साहित्याची सांधेजोड हे सर्जरी वर्क आहे. तेथे विचारांवर परिणामकारक कार्य करावे लागते. संपूर्ण बहुजन समाजाला जोडण्यासाठी लागणारे रसायन हे तसेच सर्वसमावेशक असावे लागेल, हे जेव्हा या देशातील सुज्ञांना कळेल तो दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीने सुदिन ठरेल ! 
(लेखक राजाराम सूर्यवंशी यांच्या ‘वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध’, या पुस्तकातून क्रमशः)
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?