दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

महात्मा फुलेंचा ‘एकमय लोक’, अस्पृश्यतेचा प्रश्न व र. वा. दिघेंचं वारकरी साहित्य!

 महात्मा फुलेंचा ‘एकमय लोक’, अस्पृश्यतेचा प्रश्न व र. वा. दिघेंचं  वारकरी साहित्य!




लेखांक-7 : वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध

आपला भारत हा विविध संस्कृतींनी नटलेला देश आहे. त्याचबरोबर तो जेवढा शेतीप्रधान आहे, तेवढाच जातीप्रधान देश आहे. याशिवाय खूप मोठ्या प्रमाणावर भौगौलिक


विविधता आहे व त्या अनुषंगाने अवतरली वा लादलेली भौगौलिक विषमताही आहे.

येथेचं ही विषमतेची कहाणी संपत नाही. यात शैक्षणिक विषमता, प्रादेशिक विषमता, जात-जमातीय विषमतेचे सुक्ष्म पैलू अदृष्य स्वरूपात कार्यरत  असल्याने साहित्य क्षेत्रातही नागर, ग्रामीण, दलित व आदिवासी असे भेदही कार्यरत होत आले आहेत.

महात्मा फुले म्हणायचे की, यातले सारे भेद नाहिसे केले तर, म्हणजेच हे सर्व भेदान्वित लोक एकमय झाले तर भारत एक राष्ट्र म्हणून खर्‍या अर्थाने विकसित होईल! एक राष्ट्र होईल!! 

तथापि, हे कसे शक्य आहे?

यासाठी महात्मा फुलेंनी त्याच्या काळातील प्रस्थापित राष्ट्रीय सभा, सार्वजनिक सभा व ग्रंथकार सभा या सभा विसर्जित करायला सांगितल्या होत्या. त्यांच्यावर टिका केली होती. महात्मा फुले यांचे म्हणणे होते की, शूद्रातिशूद्र समाजाचे कोणतेही प्रतिबिंब या सभांमध्ये व त्यांच्या ग्रंथकार सभांमध्ये आढळत नाही, दिसत नाही, त्या विसर्जित करा.

पुढे.....,   

महात्मा फुले यांनी दाखवलेल्या दिशेने प्रवास करून काही जाती-जमातीतून लेखक निर्माण झालेत. विविध साहित्यप्रवाह निर्माण झालेत. पुढे आलेत. त्यांनी आपापल्या जातिजमातींची सुख-दुःखे व अनुभव साहित्यात मांडून, त्या त्या जाती-जमातीय साहित्याचे प्रतिनिधित्व केले होते.

मात्र, महात्मा फुले यांचा मूळ प्रश्न कायम होता! एकमय लोक व एकमय राष्ट्र निर्माण कसे निर्माण होणार? हा तो प्रश्न होता.

वरील सर्व जाती-जमातींना आत्मभान प्राप्त होऊन, त्यांची सामाजिक अस्मिता जागृत होऊन, त्यांनी आपापल्या वाजवी हक्कांसाठी भांडणे व ते हक्क पदरात पाडून घेणे, हा त्यांच्या ऐतिहासिक अपरिहार्यतेचा एक भाग होता व हा सुध्दा जोतीरावांना अभिप्रेत असलेला एक टप्पा होता. पहिला टप्पा होता.


तथापि,.....

काही वर्णांना कायमचे वंचित करून, उर्वरित जाती आणि वर्ग राष्ट्र म्हणून मिरवू शकत नाही हे सार्वत्रिक सत्य होते.  एक जमात दुसरी जमातीवर सर्व प्रकारचे हिंसक व अमानवीय हल्ले करत असेल, तर 1947 साली आपल्या देशाने  फक्त राज्यकर्ते बदलले आहेत; चरित्र नाही!, असा त्याचा अर्थ निघतो.

आजही आपण सर्व तर्‍हेने विभक्त आहोत. भौगौलिक, शैक्षणिक, मानसिक व प्रादेशिक बाबतीत खंडप्राय आहोत. एक राष्ट्र म्हणून कुठेही उभे राहिलो नाहीत, हे मणिपूरच्या ताज्या घटनांनी पुन्हा सिध्द केले आहे. मग आमचा देश एकमय कसा होईल? पर्यायाने साहित्यही सर्वसमावेशक कसे होईल?

हिंदी राष्ट्रभाषेबाबतची दादागिरी, प्रादेशिक भाषांची गळचेपी, उत्तर विरुध्द दक्षिण हा राजकीय संघर्ष, प्रत्येक दोन राज्यांमधला सीमावाद, जलविवाद, प्रकल्पांची पळवापळवी, गुजरात विरुध्द महाराष्ट्रचा शाश्वत वाद, यात मुंबईवर वर्चस्व कोणाचे? गुजरात्यांचे का मराठी माणसांचे?  हा वाद! अल्पसंख्यांक विद्यापीठाचा दर्जा प्राप्त केलेल्या मुस्लिम, शिख, जैन व वैदिक विद्यापीठांची आरक्षण धोरण राबावण्याबाबतची दुटप्पी भूमिका!..असे अनेक वाद आपण राजकारणासाठी निर्माण केलेत!; परंतु संपवू शकलो नाही.  

कारण जात-वर्णिय मानसिक विभक्तता व त्या अनुषंगाने आलेले सर्वंकष भेद!

त्यामुळे एक राष्ट्र म्हणून आपण कधीच उभे राहिलो नाहीत. हीच परिस्थिती सर्वत्र आहे. तसे तिचे प्रतिबबिंब साहित्यातही पडले आहे. म्हणून येथे आपले साहित्य हेच खरे साहित्य हा अहंकारही निर्माण होतो आणि तो बरोबर नाही!

प्रस्थापित साहित्याची कोंडी फोडणे ही काळाची गरज होती. ते ऐतिहासिक कार्य दलित, ग्रामीण व विद्रोही साहित्याने जरूर केले होते व ते आवश्यकही होते; परंतु एकदा का ही कोंडी फुटल्यावर प्रस्थापित साहित्याची हकालपट्टी करून त्यांची जागा इतरांनी घ्यावी, ही साहित्यातील सामंती भूमिका महात्मा फुले यांना अभिप्रेत नव्हती, मान्य नव्हती. एकमयतेच्या प्रवासातील तो एक टप्पा जरूर होता; परंतु ते गंतव्य स्थान नव्हते..साहित्यापुरते बोलायचे म्हणजे या विविध समूहातील सामंजस्य, सरमिसळ आणि सामरस्य हा पुढचा टप्पा आहे. या ठप्प्यावरही साहित्याचे कोणतेही भेद उरू नयेत, असे सर्वसमावेशक साहित्य निर्माण झाले पाहिजे.

म्हणून वारकरी साहित्य हे खर्‍या अर्थाने वारकरी भारतीय साहित्य आहे. महात्मा फुलेंच्या कसोटीला टिकणारे साहित्य आहे. शिवाय त्याला वैश्विक मानवतावादाचे परिमाण आहे. म्हणून र. वा. दिघेंनी आपले साहित्य वारकरी अंगाने लिहिले होते. त्यातून त्यांनी तीच ‘एकमयता’ व्यक्त केली होती. 

महात्मा फुलेंनी वेगवेगळे धर्म पाळणार्‍या कुटुंबाची कल्पना केली होती. मात्र, ती कुटुंबांतर्गत धर्मभिन्नता कुटुंबातील व्यक्तींनी आपखुशीने, विचारपूर्वक वेगवेगळ्या धर्माचा स्वीकार केल्याने होऊ शकते. तशी दुसर्‍या धर्मातील व्यक्तीशी विवाह केल्यामुळेही होऊ शकते. दुसर्‍या पर्यायाचा संकेत महात्मा फुलेंनी स्पष्ट दिला नसला तरी त्यांना त्याची हरकत नसावी. 

इथेही दिघे टिकतात. नाटकाची त्यांची बैठक मुळची वारकरी होती. त्यांचा चित्रसेन चित्रे हा नायक एक आदिवासी तरुणीशी विवाहबद्ध होतो. आदिवासी जीवनाशी एकरुप होतो. दिघेंचा हा नायक फुलेंना अभिप्रेत असलेल्या एकमय लोक या संकल्पनेतला असून, पर्यायी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी लागणारी तात्विक भूमिका घेऊन विवाह करणारा नायक आहे. 


अस्पृश्यतेचा प्रश्न व वारकरी! :

मुंबईत त्याकाळी कोकणातून व देशावरून खूप सारी अस्पृश्य कुटुंबे खेड्यातील वर्ण-जातीव्यवस्थेची बंधने तोडून स्थलांतरीत होत होती. र. वा. दिघे हे ठाणे , रायगड व देशाच्या विभाजन रेषेवर वास्तव्य करून रहात होते. अस्पृश्यतेची समस्या त्यांना लहान वयापासून अस्वस्थ करीत होती. सात कोटी धर्मबांधवांची, समाजबांधवांची, देशबांधवांची अस्पृश्यता ही हिंदूंच्या र्‍हासाला मुख्य कारण आहे आणि ही अस्पृश्यता प्रथम राजकारणात निर्माण झाली. नंतर वेड्या समजूतीमध्ये पोसली गेली, असे त्यांनी कार्तिकीच्या प्रस्तावनेत लिहिले आहे.

आर्य-अनार्याचा झगडा व येथील दलितांची सामाजिक गुलामगिरी याचा सुतोवाच फुलेंच्या साहित्यातून दिघेंना झाला होताच. मात्र, त्याची खोली राजाराम शास्त्री भागवत अभ्यासल्यावर दिघेंना जाणवली होती. त्या जाणिवेला व आपल्या आतील भाव-भावनांना शब्दात पकडण्यासाठी त्यांनी कार्तिकी  लिहिली. कार्तिकीचे कथानक लिहिताना दिघेंना महात्मा फुले, राजाराम शास्त्री भागवत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही सारी एकाच सुत्राने चालणारी माणसे तुकोबांच्या वारीत चालणारी व वारकरी संप्रदायाने पछाडलेली भासत होती.

भारतीय वर्ण-जातीव्यवस्थेने शूद्रातिशूद्र समाजाला सामाजिक गुलामगीरीने बेमौत मारले होते. त्यांचे दैनंदिन जीवन नकोसे केले होते. विविध बंधनांनी त्यांचे स्वातंत्र्य बंदिस्त केले होते. त्यांच्या माणुसकीची पावलोपावली विटंबना होत होती. तरीही ही माणसं जगू कशी शकतात? हा प्रश्न जेव्हा जेव्हा पडायचा, तेव्हा तेव्हा दिघेंच्या डोक्यात तुकोबांचे ब्रिदवाक्य, ‘जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे ’ हे तरळत असे!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणित धर्मांतरापूर्वीचा महार समाज हा मुख्यत्वे वारकरी पंथात होता. त्याला जो काही अध्यात्मिक अवकाश उपलब्ध झाला तो वारकरी पंथामुळे झाला होता. या समाजाच्या मुखी कायम चोखोबा व तुकोबा यांचे अभंग असत. धर्मांतराच्या काळात वारकरी व धर्मांतर चळवळ यात काही मानसिक ताणतणाव निर्माण झाले होते. ह्या तणावांचे चित्रण दलित साहित्यात कुठेही आले नाही. र. वा. दिघेंनी मात्र हा धागा अचूक पकडला.   कार्तिकीमधील कान्हू वारकरी हा वारकरी संप्रदाय सोडून बौध्द व्हायला कसा अजिबात तयार नाही, याचे मानसिक ताणतणावाचे व्यवस्थित चित्रण केले. त्याच्यावर समाज बांधवांचे दडपण येते. गावकरी त्याच्या विरोधात जातात. कान्हू खंबीर रहातो. 

‘वारकर्‍याला बौध्द व्हायची गरज नाही!’ असं कान्हू नम्रपणे पण निश्चयाने सांगतो.  त्यावेळी कान्हूची भाची कार्तिकी कान्हूचं सांत्वन करून म्हणते, ‘मामा, बाबासाहेब म्हणतात, पांडुरंग तोच बुध्द...हे खरं आहे ना! 

त्यावर कान्हू म्हणतो, ‘हो...त्यात नवल काय? 

तुकोबाराय हेच सांगतात बघा....

‘बौध्द अवतार माझिया अदृष्टा। मौन्यमुखे निष्ठा धरियेली।

लोकांसाठी झाला शाम चतूर्भुज। संतासवे गुरु बोलतसा॥

कान्हू म्हणतो, ......

बुध्दाने सांगितलेले गुण घेऊन वैष्णव धर्म झाला. भागवत धर्म झाला. वारकरी संप्रदाय झाला . 

‘जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे आपुले॥

तो चि साधु ओळखावा। देव तेथेची जाणावा॥’

यासारखे सुंदर तत्व जगाच्या कोणत्याही धर्मात नाही. ऐवढी उदात्तता वारकरी संप्रदायात व भागवत धर्मात कायम राहिल्याने वारकऱ्यांना इतर धर्म-पंथात जाण्याची गरज भासली नाही. मुगलांचे धार्मिक आक्रमणही तेथेच थांबवले गेले!’.

-राजाराम सूर्यवंशी

(क्रमशः .. पुढील लेखांक-8 मध्ये वाचा.... बळीराजा, वारकरी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?