अजित पवारांचे बंड! : पंचगव्याने धुतली जातील का पापं?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अजित पवारांचे बंड! : पंचगव्याने धुतली जातील का पापं?
भास्कर सरोदे, औरंगाबाद (रविवार, दि. 2 जुलै 2023) :
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपनेते अजित पवार यांनी पुन्हा बंड करत दुसर्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 30-40 राष्ट्रवादीचे आमदार असल्याचा दावा केला जातो आहे. ‘ते गेलेत का त्यांना पाठविले’, हा संभ्रम कायम आहे. तथापि, अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ हे चार नेते ईडीच्या चौकशीच्या फेर्यात अडकलेत. आता धुतल्या तांदळासारख्या असलेल्या भाजपबरोबर गेल्याने त्यांचे पंचगव्याने शुद्धीकरण होईल! त्यांची सारी पापं धुतली जातील! पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर समाजाचे चरित्र अधोरेखित करणारा आहे!
अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीत अजित पवारांवर टांगती तलवार आहे. प्राप्तिकर विभागाने अजित पवारांच्या बहिणींच्या घरांवर छापा टाकला होता. कारवाईची सतत टांगती तलवार ठेवून अजित पवारांसाठी भाजपने गळ टाकलेला होता. छगन भुजबळ यांना अटक झाली होती. प्रफुल्ल पटेल यांचीही चौकशी झाली आहे.
हसन मुश्रीफ हे साखर कारखाना घोटाळ्यात अडकले आहेत. त्यांचीही ईडीची चौकशी झाली. भाजपबरोबर गेल्याने पंचगव्याने भ्रष्ट नेत्यांचे शुद्धीकरण होईल का? त्यांची सारी पापं धुतली जातील का? तसे झाले, तर जनतेने निवडून दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि शिवसेनेतून फूटून गेलेले ‘ते’ 40 आमदार, या सर्व गद्दारांना जनता निवडून देणार का, हाच खरा प्रश्न आहे. यावरच महाराष्ट्रातील जनतेचे सामाजिक चरित्र ठरणार आहे!
शरद पवारांची भूमिका काय? :
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपली भूमिका मांडताना ते म्हणाले, ‘दोन दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. राज्य सहकारी बँक व सिंचनासंदर्भात त्यांनी उल्लेख केला. हा उल्लेख करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे ते म्हणाले. मला आनंद आहे की आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातल्या काही सदस्यांना शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप हे काही सत्य नव्हते. त्यांनी केलेल्या आरोपांमधून सगळ्यांना मुक्त केलं, त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानतो’. पक्षाची भूमिका मांडताना एक-दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल, असा दावाही शरद पवार यांनी केला आहे.
छगन भुजबळांचा गौप्यस्फोट :
नव्याने मंत्रीपदाचे शपथ घेतलेले ओबीसी तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना एक गौप्यस्फोट केला, तो असा....
‘अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही सगळेच सहमत आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक म्हणून सामील झालो आहोत. आम्ही पार्टी सोडलेली नाही. महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न, शेतकर्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सकारात्मक काम करणं गरजेचं आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आम्ही अनेक वेळा टीका करतो, पण ते अतिशय मजबुतीने देशाचं नेतृत्त्व करत असून त्यांच्या हातात देश सुखरूप आहे. महाराष्ट्र सरकार, भारत सरकार विकासाच्या कामाला ताबडतोब निर्णय घेऊन जनतेच्या प्रश्नांचं समाधान करण्याचा प्रयत्न करत आहेत. ओबीसींचे अनेक प्रश्न आहेत, भारत सरकारच्या सहकार्याशिवाय हे प्रश्न सोडवता येणार नाहीत. खरं सांगायचं तर काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी सांगितलं की, 2024 मध्ये पुन्हा मोदी साहेबच येणार आहेत. असं असताना सकारात्मक विचार केला पाहिजे. जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. सरकारची मदत घेतली पाहिजे, सरकारला मदत केली पाहिजे, जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राहणार आहे’.
शरद पवार यांचे प्रधानमंत्र्यांचे आभार मानणे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हणणे, यातच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट होत आहे. लोकशाहीत जनता सार्वभौम आहे...
महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांच्या रयतेचा आहे. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचारांनी सिंचित झालेला आहे. महाराष्ट्राची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी जनतेलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला विचारावेच लागेल की, मी हे किती दिवस सहन करायचं?
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा