र. वा. दिघे : अस्सल मराठी मातीतला वारकरी-शेतकरी कादंबरीकार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
र. वा. दिघे : अस्सल मराठी मातीतला वारकरी-शेतकरी कादंबरीकार
लेखांक 6 : वारकरी संत साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध
महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा, कुणबी व बहुजन समाज हा वारकरी आहे. आज तो शिक्षण व साहित्यातही आपले योगदान देत आहे. तथापि, त्याला जे साहित्य सहज उपलब्ध होते ते ब्राह्मणी साहित्य आहे. जे कपोलकल्पित कथा, कादंबर्यांनी ओतप्रोत भरलेले आहे. या नवशिक्षित शेतकरी-वारकरी तरुणाला त्यात त्याचे शेतकर्याचे, वारकर्याचे प्रतिबिंब दिसत नाही. त्या साहित्यात त्याला वारकरी हिरो-नायक सापडत नाही.
डॉ. आनंद यादव यांची ओळख महाराष्ट्रातला ग्रामीण साहित्यिक अशी झाली आहे; परंतु त्या आनंद यादवांच्या साहित्यातही वारकरी हिरो आढळत नाही.
आपल्या ग्रामीण साहित्याची ओळख वारकरी साहित्य अशी झाली पाहिजे. ती तशी नाही, म्हणून आजचे सर्व ग्रामीण साहित्यिक हे आतून पंडित साहित्याशी नाळ जोडू पहात आहेत, असा जर कोणी निष्कर्ष काढला तर तो वावगा म्हणता येणार नाही.
खर्या अर्थाने म्हटले तर ग्रामीण जीवनातून वारकरी वजा केला तर त्याचे उत्तर शून्य हे येते. असा हा सर्वार्थाने ग्राममय जीवन जगणारा वारकरी शेतकरी व त्याची स्पंदणे, वारकरी म्हणून जगताना त्याच्या जीवनाचे गाणे व तत्वज्ञान ग्रामीण व मराठी साहित्यात उतरले नाही? हा खूप महत्त्वाचा ग्रामीण जीवनाचा व वारकरी शेतकर्याचा सांस्कृतिक अविष्काराच्या संबंधीत प्रश्न आहे.
अशा निराशजनक साहित्यिक विश्वातही एक छोटीशी आशेची, उत्साहाची साहित्याची झुळुक हळूच दूर कुठेतरी विहंगतांना दिसते व ती असते, कर्जत-खोपोलीच्या, तुकाराम महाराजांचे गाडीतळ असलेल्या परिसरात जन्मलेल्या व संत तुकोबांचे साहित्य ज्या भूमिच्या, परिसरात बहरले, त्या परिसरात जन्मलेल्या, एकमेव ग्रामीण-वारकरी साहित्यिक र. वा. दिघे यांचे साहित्य होय!
साहित्यिक र. वा. हे कर्जत-खोपोलीचे रहाणारे. शिवाजी महाराजांच्या काळात कोकणातील व्यापारासाठी दोन गाडीतळ होते. 1)खोपोलीचा व दुसरा 2)भिवंडीचा. देशाचा कोकणाशी व्यापार या दोन गाडीतळांवरुन चालत असे.तेथे बैलगाड्या सुटून व्यापारी मालाची देवाण-घेवाण, आदान-प्रदान चाले. श्री तुकोबाराय देशावरून अन्न-धान्य घेऊन घाट उतरून खोपोलीपर्यंत येत व परत जातांना मसाल्याचे पदार्थ व इतर जिन्नस घेऊन देशावर जात. जाता-येताना त्यांच्या मुखी विठ्ठलाचे नाम व जीवनाभुवाचं गाणं असे. कधी कधी ते वडाळ्यापर्यंत जात. वडाळ्याच्या गाडीतळावर उतरत. तेथे एका वृक्षाखाली विठ्ठलाची आराधना व जमलेल्या गाडीवालांना वारकरी धर्माचे वर्म शिकवत असत. त्यामुळे देहू ते खोपोली-कर्जत-पनवेल-डोंबीवली-वडाळा हा सर्व परिसर तुकोबारायांच्या वास्तव्याने, अस्तित्वाने नि संस्काराने पावन व वारकरी शिस्तीत बहरलेला परिसर होता. सहाजिकच र. वा. दिघेंसारख्या संवेदनाशील व तरल बुध्दिमत्तेच्या भूमिपुत्राला तुकोबा समजायला व कळायला फार काळ लागला नाही.
जशी लेखणी त्यांनी हाती घेतली तशी पानकळा, सोनकी, पडा रे पाण्या, कार्तिकी, आई आहे शेतात, अशा अस्सल ग्रामीण ढंगाच्या व वारकरी अंगाच्या साहित्याची रास त्यांनी उभी केली होती. त्यांच्या कादंबर्यांतील कथानक व वातावरण ग्रामीण शेतकरी वारकर्याचे होते. म्हणून त्यांच्या कादंबर्या आशयाने सकस व ग्रामीण सौंदर्याने परिपूर्ण अशा ग्रामीण साहित्याचे सर्व निकष पूर्ण करणारे ग्रामीण साहित्य होत्या.
ग्रामीण साहित्य कसे असावे? :
यासाठी आपण तुकाराम महाराजांचे उदाहरण घेऊ शकतो. कारण तुकाराम महाराज हे पेशाने वाणी व पिंडाने शेतकरी होते. तसेच महाराष्ट्राचा बराच मोठा भूभाग हा ग्रामीण व शेतीप्रधान असल्याने या भागावर व तेथील शेतकर्यांवर तुकोबा व इतर संतांच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव आहे. तसाच प्रभाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावरही पडलेला आहे. मात्र, असे असूनही मराठी कथा, कादंबर्यांत वारकरी कथानक, वारकरी नायक दिसत नाही. ही ग्रामीण साहित्यिकांची बौध्दिक उणीव आहे की त्यांचे भटाळलेपण आहे, याचे समाधानकारक उत्तर कोण देऊ शकणार आहे?
यात र. वा. दिघे हे ऐकमेव असे साहित्यिक आहेत, ज्यांनी धाडसाने वारकरी कथानके निवडून त्यात शेतकरी-वारकरी नायक रंगविले आहेत आणि त्यांच्या मुखातून ग्रामीण शेतीचे तत्त्वज्ञान उभे केले आहे. जे निसर्ग व शेतकरी यांच्या परस्परसंबंधातून तयार झालेले तत्त्वज्ञान आहे.
‘पानकळा’ या कादंबरीचा नायक आहे भुजबा. तो वारकरी आहे. जेवण झाल्यावर तुकोबाचे अभंग गातो. वाचतो. तो देहू-आळंदी व पंढरपूरच्या वार्या चुकवत नाही. शेतीचे कर्म व विठ्ठल भक्तीचे मर्म तो जाणतो. आपल्या शेतात पंढरपूर व उभ्या पिकात विठ्ठल डोलतांना पहातो.
र. वा. दिघेंनी या भुजबा वारकरी शेतकर्याचे देहयष्टी व मनसृब्टी या दोघांचे वर्णन केले आहे. दिघे म्हणतात, ‘तो दिसतो दैत्यासारखा. शरीराने भक्कम!; परंतु मनाने नवजात अभ्रकाप्रमाणे कोवळा! तो संकटसमयी कोणाच्याही मदतीला धावून जातो आणि कुठे अन्याय व असत्य दिसले तर उफाळून उठतो. असे असले तरी तो मनाने क्षमाशील आहे. अपराध्याला एका क्षणी जसा रागावतो, तसा दुसर्या क्षणी क्षमा करतो आणि पोटाशीही धरतो.
भागवतधर्म व वारकरी संप्रदाय अंगी भिनलेल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात असे कितीतरी भुजबासारखी उदंड माणसं आपल्याला खेडोपाडी पहायला मिळतात.
या कथेत दुसरे एक पात्र आहे; आनंदराव नावाचं!
हा सुशिक्षित, वैज्ञानिकदृष्टी असलेला तरुण शेतकरी आहे. शहरात रहाणारा. तो भुजबाच्या गावी येतो व भुजबाच्या घरी उतरतो. या आनंदरावास भुजबा सांगतो...
‘...नुसत्या शास्त्रीय ज्ञानाने समाजाचे कल्याण होणार नाही, तर वडिलोपार्जित शहाणपण आलं पाहिजे....भागवत धर्म बुडेल कसा? तो बुडेल त्या दिवशी मनुष्य जात नाहीशी होईल आणि बरं पाव्हणं, ज्या दिवशी भागवत धर्म मनुष्याच्या ह्रदयात जन्मला तो दिवस मनुष्य जातीच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवला पाहिजे, इतके त्याचे महत्व आहे. त्या धर्मापासून सारी समाजशास्त्रे व नितीबंधने निर्माण झाली व तीच मनुष्याला एके ठिकाणी बांधून ठेवित आहेत’
एवढा दूर्दम्य आशावाद व तेवढीच दूर्दम्य निष्ठा शेतकर्यांची विठ्ठल व वारकरी पंथावर होती. वडिलोपार्जित शहाणपण या गोष्टीला समाजस्वास्थ्य व समाज नियमनासाठी खूप महत्त्व आहे. घरातला वडिलधारा माणूस जसा घराचा सुकाणू असतो व घरातील सर्व लहान-थोरांना सर्वांना सांभाळत बरोबर घेऊन चालत असतो. संकटाच्यावेळी स्वतः.खंबीर राहून, योग्य-अयोग्यतेचा निर्णय घेवून मार्ग काढत असतो. अशाप्रकारचे शहाणपण असलेली माणसं समाजात असणे गरजेचे असते. शास्त्रीयज्ञानाने व भौतिक सुखाने मानव अनियंत्रित होतो,तर वडिलोपार्जित शहाणपणाने माणूस नियंत्रित रहातो, असा याचा अर्थ होतो.
येथे हे शहाणपण दिघेंचा वारकरी हिरो भुजबा याला वारकरी पंथातून प्राप्त झालेले असते. म्हणून भुजबा म्हणतो, ‘भागवत धर्माची निकड आजही तेवढीच आहे जेवढी ज्ञानोबा-नामा-तुकोबांच्या काळात होती व निर्धाराने तुकोबांचा अभंग गाऊ लागतो....सांगतो....
‘मढे झाकुनीया करितो पेरणी
कुणाबियाचे वाणी लवलाहे॥
संत तुकाराम महाराज स्वतः शेतकरी होते. त्यांना बळीराजाच्या व्यथा चांगल्या अवगत होत्या. शेतकर्याची अगतिकता व त्यातला ओलावा चांगला माहीत होता. हा असा शेतकरी तुकोबांनी पाहिला होता, जो उन्हाळ्यानंतर पेरणीसाठी जमिनीची मशागात करून जो पावसाची वाट पहात आभाळाकडे डोळे लावून बसला आहे...पावसाची आतुरतेने वाट पहात आहे....अशावेळी जर घरात एखादी प्रिय व्यक्ती मरण पावली व त्याच वेळेस पाऊस आला, तर त्यावेळी हा शेतकरी आपले दुःख गिळून, मढे घरात झाकून आगोदर शेतात पेरणीला जातो.., शेतातील कामांना त्याक्षणी प्राधान्य देतो.., मग पेरणी उरकल्यावर आपले ह्रदयातील व घरातील दुःख बाहेर काढतो...दुःख गिळून, मढं घरात झाकून शेतीला वेळच्या वेळी अत्यावश्यक असणार्या कामांना प्राधान्य देणारा बळीराजा हा जगातील एकमेव कर्तव्यदक्ष सेवाभावी राष्ट्र कर्मचारी आहे. अशा या कर्मकठोर शेतकर्याचे वर्णन तुकोबांनी अवघ्या सात शब्दात केले आहे.कारण हा तुकोबांचा शेतकरी, बळीराजा, वारकरी हा बोलण्यापेक्षा कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मितभाषी आहे; परंतु तो मानवी जीवन, निसर्ग, शेती व विठ्ठल यांच्याशी एकरूप झाला आहे.
र. वा. दिघेंची दुसरी एक कादंबरी ‘पड रे पाण्या’त ही दिघेंचा नायक हा वारकरी आहे. संतू!
हा संतू तुकोबांच्या भाषेत बोलतो. शेतकर्याची सेवा पांडुरंगाला रुजू आहे असं म्हणतो.....’आज शंभर हिस्से ती एक सेवा केली की, देव धनधान्न्याच्या रूपात शेतकर्याच्या घरी येतो’, असं तो म्हणतो.
हा वारकरी संतूवर कितीही संकटे आली व शेतीची कामे बाकी असतील तर संतू ती संकटे निवारण्याऐवजी शेतीच्या कामाला प्राधान्य देतो व आपला शेतकरी धर्म निभावतो.
संतूची आई कोयनाबाई. ती जलदेवता, सात आसरा व मातृदेवतेचे प्रतीक आहे. ती खंबीर आहे, धोरणी आहे, मोठी हिम्मतीची बाई आहे. या आई कोयनाबाईला संतू म्हणतो,...
‘आई तुकाराम म्हणतात, एका मुडद्याच्यामागे शेतकर्याने वेळ घालविला तर, जग उपाशी मरेल!, अन् लाखो मुडदे पडतील! शेतकरी हा मढं घरात झाकून पेरण्या करणार्या कठोर कुणब्याचे वंशज आहेत!
महाराष्ट्रातील तमाम शेतकर्यांप्रमाणे शेतात घाम गाळून काळीआईची सेवा करणे हा संतूचा धर्म आहे. शेतीची कामे करताना दिघेंच्या कादंबरीचे नायक भुजबा व संतू तुकोबांचे अभंग गातात...
देव मजूर देव मजूर।
नाही उजूर सेवेपुढे॥
देव तर काई देव तर काई।
तुका म्हणे मोठी तरी राई॥
अशाप्रकारे महाराष्ट्रातील शेतकरी व त्याची विठ्ठलनिष्ठा ही अतुलनीय आहे. ही निष्ठाच शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या माणुसकी धर्माला कारणीभूत झाली आहे. महाराष्ट्रातील संप्रदायाने महाराष्ट्राला काय नाही दिले..! माणुसकीधर्म दिला, शिवरायांचे स्वराज्य दिले, म.फुलेंची समतावादी चळवळ व सत्यशोधक समाज दिला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले माधुर्य, एकात्मताभाव, शेजारधर्म, मानवतावाद दिला. त्याशिवाय प्राणीमात्राविषयी करुणा दिली. हे सर्व वारकरी संप्रदायाने दिले. हे वारकरी संप्रदायाचे श्रेय आहे. हीच महान संत साहित्याची शिकवण आहे. देणगी आहे. या वारकरी स्कूलमुळे महाराष्ट्रातला सामान्यातला सामान्य शेतकरीही तत्वज्ञ बनला आहे. वारकरी साहित्य व संप्रदायाची एकतानता, एकमयता आपल्याकडी शहरी लेखक व विचारवंतांना उमगू नये?, त्यांच्या लेखनात ती उतरु नये? त्या अंगाने ते साहित्य निर्मिती करु नयेत ? हे न सजण्यासारखं कोडे आहे, नव्हे ही महाराष्ट्र सारस्वताची शोकांतिका आहे.
दुसरीकडे समाज परिवर्तनवाद्यांनी वारकरी वारी, पंथ, संप्रदाय व साहित्याला धार्मिक कोषात कोंडल्यामुळे ते सुध्दा याचा यतार्थ अर्थ लावू शकले नाहीत.म्हणून महात्मा फुले व क्रांतिसिंह नाना पाटलांनंतर दिंडोरीच्या दादासाहेबांचा अपवाद वगळता, नंतरच्या तमाम परिवर्तनवादी चळवळी या वरवरच्या, बेगडी, उथळ व अपरिपक्व ठरल्या आहेत. त्या शहरी व फॅशनेबल बनल्या आहेत. गांव-खेड्यांकडे त्याचे लक्ष नाही. त्या ग्रामीण भागातील तळागळाच्या माणसांच्या मनातील ठाव घेऊ शकल्या नाहीत. त्यांना आपल्यात सामावू शकल्या नाहीत. ही पोकळी धोकेदायक आहे व प्रतिगाम्यांची रॉ मटेरियल बनायच्या मार्गावर आहे. ही पोकळी भरुन काढायची असेल व आपली व्याप्ती वाढवायची असेल, तर तमाम परिवर्तनवादी लेखक, साहित्यिक व कलावंत-कार्यकर्त्यांनी वारकरी साहित्य व संप्रदायाचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे.
-राजाराम सूर्यवंशी
( क्रमशः पुढील लेखांक 7 वा यात वाचा....महात्मा फुलेंचा ‘एकमय लोक’)........
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा