दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

इतिहासात झाकोळलेले स्त्रीरत्न : जोती-सावित्रीला घडविणार्‍या सगुणाबाई क्षीरसागर!

इतिहासात झाकोळलेले स्त्रीरत्न : जोती-सावित्रीला घडविणार्‍या सगुणाबाई क्षीरसागर!


एकोणिसाव्या शतकातील एक झाकोळलेले स्त्रीरत्न व सावित्रीबाई फुलेंची किंगमेकर असलेल्या सगुणाबाई क्षीरसागर यांची आज दि. 6 जुलै रोजी 169 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने सगुणाबाईंना त्यांच्या कार्याला शतशः अभिवादन!

मित्रांनो, सावित्रीबाईंचे नाव उच्चारताच सावित्रीबाईंना घडविणार्‍या तीन व्यक्ती कायम डोळ्यासमोर येतात. 1) महात्मा जोतीराव फुले, 2) अमेरिकन मिशनच्या मिसेस फरार व 3) सगुणाबाई क्षीरसागर! 

होय, सगुणाबाई क्षीरसागर! 

हे नाव फारसे एकिवात नाही किंवा त्यांची कोणी दखलच घेतली नाही. त्यामुळे त्या ओळखीच्या वाटत नाही. हे खरं आहे; परंतु आपणा सर्वांना हे चांगले ज्ञात आहे की, कोणतेही काम एकखांबी तंबू नसते. त्याला बर्‍याच जणांचा हातभार लागलेला असतो. तसेच महानायक व महानायिका तयार होताना अनेक जणांनी त्यासाठी खस्ता खाल्लेल्या असतात. आपला समाज अजूनही व्यक्तीपूजक आहे, समुहपूजक नाही. आपण समुहपूजक बनल्याशिवाय सहकाराचे तत्त्व आपल्यात भिनणार नाही.

सावित्रीबाई फुले आता आपणाला चांगल्याप्रकारे ज्ञात झाल्या आहेत; परंतु नायगावच्या खंडोजी नेवसे पाटीलांची सावित्री हिला हेरून, तिला युगस्त्री सावित्रीबाई फुले बनवण्यात सर्वात मोठा वाटा होता तो सगुणाबाई क्षीरसागर यांचा! शतकानुशतके मुक्तीसाठी झगडणार्‍या भारतीय स्त्रीच्या सामूहिकरूपाने त्या पुढे आल्या व शेकडो वर्षांच्या मुक्तीसाठी आसुसलेल्या तमाम संत कवयित्रींपासून ते जिजाऊ, सईबाई, अहिल्याबाई या मध्ययुगीन मुक्तीदात्यांना अनुसरुन महाकाव्य कालखंडातील सीता, द्रोपदी यांचा संघर्ष साठवून, त्यांचा अर्क बनवून तो सगुणाबाईंनी सावित्री खंडोजी नवसे पाटील या चुणचूणीत मुलीला पाजला! सार्‍या पुराणेतिहासातील संघर्ष त्यांच्यात कुटकूटून भरवला व तयार केली सावित्रीबाई जोतीराव फुले नावाची युगस्त्री!

‘स्व’च्या शोधासाठी चाललेल्या सावित्रीबाईंच्या रूपाने झालेला संघर्ष समजून घेताना इतिहासात कोणीतरी डोकवावे लागते. त्या इतिहासातून बोध घेवून काय करायचं व काय नाही करायचं, याचा विचार कोणाला तरी करावा लागतो. सावित्रीबाईंना घडवताना हा सर्व विचार सगुणाबाईंनी केला होता. 

प्रत्येक स्त्री शिकली पाहिजे, त्याशिवाय हा रसातळाला गेलेला समाज उद्धारणार नाही! शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे, पण स्त्रीशिक्षण हा महिलांच्या समस्त मुक्तीचा पाया आहे! हा विचार लहानग्या जोतीच्या मनात लहानपणापासून रुंजी घालत होता. समस्त ऐतिहासिक स्त्रीसंघर्षाचे साररूपाने उभ्या असलेल्या सगुणाबाईंना लहान जोतीच्या मनाच्या पिंजर्‍यातील धडपड दिसत होती. म्हणून तिने गफ़वारबैन मुन्शी व लिजिटसाहेब यांना भेटून जोतीची ‘शाळा’ पूर्ण करून घेतली होती.

कोण होत्या या सगुणाबाई? :

सगुणाबाई या धनकवडीच्या. धनकवडीच्या झगडे पाटलांची एकुलती एक मुलगी. त्यांना भाऊ-बहीण कोणी नव्हते. त्या गोविंदराव फुले यांच्या मावसबहीण होत्या. त्यांचा विवाह बालपणीच झाला होता. पुण्यातीलच क्षीरसागर या शेतकरी कुटुंबात त्यांना दिले होते. दुदैवाने पतीचे निधन झाले व या लहान सगुणाला त्याकाळच्या रितीरिवाजाप्रमाणे माहेरी यावे लागले. लवकरच मुलीच्या दुःखाने सगुणाचे आई-वडिलांचे थोड्या थोड्या अंतराने निधन झाले.

मि. जॉनमुळे मिळाली नवी दिशा :

त्याकाळी पुर्नविवाहाची प्रथा ही रूढ झाली नव्हती. त्यामुळे सगुणाबाईंना एकाकी जीवन कंठावे लागत होते. त्यावेळी त्यांच्या शेजारच्या शेतात एक जॉन नावाचा इसाई मोठा बंगला बांधून रहायला आला व थोड्याच दिवसात त्याने पुणे व आसपासच्या गावात फिरून 20-25 अनाथ मुले गोळा करून आणली व त्यांना आपल्या बंगल्यात आश्रय देवून, तेथे अनाथालय काढले व त्या अनाथांचे संगोपण व शाळा बंगल्याच्या आवारात सुरु केली. 

सगुणाबाई आपल्या वडिलोपार्जीत शेतात कष्ट करून जीवन कंठत होती. बालपणीच विधवा झाल्यामुळे तीच्या मनात या लहान लहान मुलांना पाहून प्रेमाचा उमाळा येई व ती तासन् तास त्या मुलांकडे मातृत्वाच्या मायेने पहात राही. जॉन फादरच्या लक्षात ही गोष्ट यायला वेळ लागली नाही. एक दिवस फादर जॉन यांनी सगुणाबाईंना विचारले...

‘सिस्टर सगुणा, तुम्ही जर या लहान लहान मुलांना सांभाळण्याचे काम करणार असाल, तर या मुलांना आनंद होईल, तुमची सेवा प्रभु चरणी रुजू होईल. प्रभु तुमचे दुःख नाहिसे करेल. मी प्रभु येशुकडे तुमचे दुःख निवारण्याची व तुम्हाला सुखी करण्याची प्रार्थना करेल..!’

सगुणाबाईंना क्षणभर आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. मूर्तीमंत मातृत्वाच्या प्रतीक असलेल्या सगुणाबाईंना जेव्हा फादर जॉन वारकरी पध्दतीने साष्टांग नमस्कार करू लागला, तेव्हा सगुणाबाई भानावर आल्या व जॉन फादरला वारकरी पध्दतीने उलट सिरसाष्टांग नमस्कार करून लगबगीने म्हणाल्यात,‘व्हय साहेब...आलीच मी मुलांना सांभाळायला...तुम्ही व्हा पुढं....मुलं वाट बघतं असत्याल....? 

अनाथांच्या देवदूत :

इसाई जॉनसुध्दा मोठ्या समाधानाने मुलांच्या शाळेत आला व मुलांना म्हणाला, ‘मुलांनो, तुमच्यासाठी प्रभुने देवदूत पाठवला आहे. तो तुमची सेवा करेल. तुम्हाला खावू घालेल, तुमची काळजी घेईल... मुलांनी हे ऐकून एकच गलका केला. तेवढ्यात सगुणाबाई तेथे आल्यात...जॉन फादर मुलांना म्हणाले, या आहेत तुमच्या देवदूत! त्यांना नमस्कार करा..बालसुलभ स्वभावाने मुलांनी सगुणाबाईं भोवती घेर केला व नाचत कुदत त्यांना बिलगलेत! सगुणाबाईंना आपला जीवनाचा उद्देश व दिशा सापडल्याची पुसटशी जाणीव झाली. पुढे हा अनाथाश्रम मि. जॉन यांनी पुण्यात हलवला.

अशा या इतिहासालाही अपरिचित, सावित्रीबाई व जोतीरावांना सगुणाबाई क्षीरसागर या महान स्त्रीरत्नाची माहिती जनसामान्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचली नाही. त्यामुळे त्यागी, अनुभवी, दूरदृष्टी असलेली बहुजनांतील एकमेव महिला व तिचे कार्य कालौघात गडप झाले; परंतु इतिहासाचे कोंबडे काही काळ झाकता येते, सदासर्वदा नाही.

सगुणाबाई क्षीरसागर या फुले दांपत्याला अखंड प्रेरणादायी होत्या. जोतीराव व सावित्रीबाई यांच्या हातून तत्कालिन परिस्थितीत जे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्रांतिदर्शी कार्य घडले, त्यास सगुणाबाईंची प्रेरणा, आशीर्वाद व मार्गदर्शन कारणीभूत होते. बहुजन समाजातील एक सामान्य स्त्री संधी मिळाली तर आपल्या उपजत गुणांनी व दूरदृष्टीने समाजाला दिशा देण्याचे केवढे कार्य करू शकता हे सगुणाबाईंकडे पाहिल्यावर दिसून येते.

सगुणाबाईंनी केला जोतीरावांचा सांभाळ :

जोतीराव फुलेंची आई चिमणाबाई यांचे जोतीच्या जन्मानंतर आठ-नऊ महिन्यांनी दि.25 डिसेंबर 1827 रोजी निधन झाले. लहान जोतीचे मायेचे छत्र हरवले. सगुणाबाई या गोविंदरावांची मावसबहीण. ती धनकवडीच्या झगडे पाटलांची मुलगी. दुदैवाने सगुणाबाईंच्या माहेरी कोणी उरले नाही. पुढे नवराही मेला. दोन्हीकडचा आधार नाहीसा झाला. अशा अधांतरी अवस्थेत त्या पुण्यात आल्या. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मि. जॉन नावाच्या ख्रिश्चन मिशनर्‍यांनी सुरु केलेल्या अनाथालयातील मुलांना सांभाळण्याचे काम करू लागल्या. मिशनर्‍यांच्या सेवाभावी, सत्वशील वातावरणाचा त्यांच्यावर अनुकूल प्रभाव पडला. त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते. अनाथ व गोर्‍या मुलांचा सांभाळ करता करता त्या इंग्रजी बोलू व समजू लागल्या. मुळातच घरची गरिबी व आधारहीन अवस्था. त्या सालस, प्रेमळ व दयाळू होत्या. त्यांच्या देखरेखीखाली जॉन साहेबांची दोन गोरी मुलं व इतर पाच अनाथ मुलं सुरक्षित वाढू लागली.

गोविंदरावांच्या विनंतीवरून मातृहीन जोतीबाळाचे सांभाळ करण्याचे अवघड काम त्यांनी 1 मे 1829 पासून मोठ्या प्रेमाने व जिव्हाळ्याने स्वीकाराले. त्यांनी लहानग्या जोतीस आईची उणीव भासू दिली नाही. सगुणाबाईंच्या पदराखाली गोर्‍या व अनाथ मुलांसमवेत बाळ जोतीही वाढू लागला. गोविंदरावांची फार मोठी चिंता सगुणाबाईंनी दूर केली.

जोती-सावित्रीच्या जीवनकार्याची बनवली योजना :

सगुणाबाई या निराधार विधवा; परंतु त्या हुशार व चाणाक्ष होत्या. त्यांच्या ठायी कल्पकता व दूरदृष्टी होती. त्या जोतीबास शिकून खूप मोठे होण्याचा वारंवार उपदेश करीत. जोतीराव व सावित्रीबाईंच्या ठिकाणी जे अलौकिक सुप्त गुण होते त्या गुणांचा त्यांनी कल्पकतेने विकास घडावून आणला. त्यांनीच जोतीराव व सावित्रीबाई यांच्या जीवनकार्याची योजना निश्चित केली.

स्त्री-मुक्तीच्या नव्या युगाचा प्रारंभ :

भारतातील समाजसुधारणा चळवळीचा शुभारंभ स्त्री-शूद्रांच्या दास्यविमोचनाच्या प्रेरणेतून झाला. ही प्रेरणा एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी बुद्धीवादावर आधारलेल्या इंग्रजी शिक्षणामुळे वैचारिक स्वातंत्र्य प्राप्त झालेल्या भारतीय सुशिक्षितांना लाभली. त्यांचा विचार बंधमुक्त झाला. त्यातून विचारस्वातंत्र्याचे आंदोलन निर्माण झाले. अशा सुशिक्षितांमध्ये महाराष्ट्रातून जोतीराव फुले हे प्रज्ञावंत पुढे आले. मात्र, जोतीरावांना प्रेरणा देण्याचे कार्य सगुणाबाई व मिसेस फरारबाई या दोन महिलांनी केले.

कोणत्याही सुधारणेचा पाया म्हणजे शिक्षण, हे त्यांनी बरोबर ताडले होते. भारतासारख्या मागासलेल्या राष्ट्राला पुढे आणण्यासाठी शिक्षणाचा सार्वात्रिक प्रसार होणे गरजेचे आहे, ते त्यांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा प्रारंभ स्त्रीशिक्षणापासून केला. हा प्रारंभ करण्यास सगुणाबाई प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या. फरारबाईंच्या आवाहनाला साद देऊन सगुणाबाईंनी आपल्याबरोबर सावित्रीबाईंनाही शिकवण्याचा आग्रह जोतीरावांकडे धरला. येथूनच स्त्री-मुक्तीच्या नव्या युगाचा प्रारंभ झाला. पुढे मिचेलबाईंच्या नार्मल स्कूलमध्ये सावित्रीबाईंनी जे शिक्षिकेचे प्रशिक्षण पूर्ण केले, तेही सगुणाबाईंच्या आग्रहावरुनच.

जोतीरावांनी फादर बनावे ही आऊची इच्छा! :

जोतीरावांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ‘आई सारखे दुसरे दैवत नाही, जिने मला जन्म दिला ती आई आठवत नाही. ही उणीव माझ्या आऊने भरून काढली. तिला वाटे मी मोठा फादर व्हावे. का कोणास ठाऊक, पण ती मला ज्ञान बोध करी. माझी तिने लहानपणी फारच काळजी घेतली. तिने मला कधीही न कमी पडणारी ज्ञानसंपत्ती दिली, धन्य माझी आऊ’.

सगुणाबाई व सावित्रीबाईंनी शिक्षणास वाहून घेतले. जोतीरावांनी 15 मे 1848 रोजी पुणे महारवाड्यात जी शाळा सुरु केली होती तीत सगुणाबाईंनी आनंदाने शिक्षिकेचे काम केले. मिशनरी विचारांच्या प्रभावामुळे सेवासुश्रुषा आणि शिक्षण असे दुहेरी कार्य त्या आवडीने करीत, तेही विनामोबदला. आपली तुटपुंजी मिळकतही त्या जोतीरावांच्या शाळेच्या खर्चासाठी देत.

आऊचे जीवन लागले सार्थकी! :

फुले दांपत्याच्या शैक्षणिक कार्याचा विश्रामबागवाड्यात इंग्रज सरकारतर्फे भरजरी शाल देऊन जो गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या पहिल्याच ऐतिहासिक समारंभात पुण्यातील व पुण्याबाहेरील सर्व नामवंत मंडळींसह गोविंदराव व सगुणाबाईही उपस्थित होत्या. त्या सत्कारानंतर फुले दाम्पत्यांनी गोविंदराव व आऊ सगुणाबाई यांना मोठ्या आदरपूर्वक पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यावेळी सगुणाबाईंचा आनंद गगणात मावेनासा झाला. जोतीराव मोठे व्हावे असे नेहमी त्यांना वाटे. त्यांना हे स्वप्न साकार झाल्याचा आनंद झाला होता. त्यांना आपले जीवन, कष्ट सार्थकी लागल्याचे समाधान लाभले होते.

सगुणाबाई जोती-सावित्रीच्या किंगमेकर! :

जोतीराव व सावित्रीबाईंनी सगुणाबाईंना मातेचा दर्जा दिला होता. गोविंदरावांनाही सगुणाबाई मोठ्या बहिणीप्रमाणे होत्या. सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून उंबरठ्याबाहेर पाऊल टाकताना सगुणाबाईंनी त्यांना भक्कम मानसिक आधार दिला होता. सगुणाबाई आपल्या सुनेबरोबर आहेत असे म्हटल्यावर गोविंदरावांनीही सुरुवातीला विरोध केला नव्हता. उलट गोविंदरावांचा मुलाच्या सामाजिक कार्याला जो पाठिंबा होता तो सगुणाबाईंमुळेच होता. कारण सगुणाबाई काळाची पावले ओळखणारी, दिव्यदृष्टी लाभलेली, असामान्य, करारी महिला होती. एकोणिसाव्या शतकातील ते एक झाकोळलेले अद्वितीय भारतीय स्त्रीरत्न होते. त्याकाळाच्या समकालीन ब्राह्मण महिलांच्या यशाचा आलेख आपल्यासमोर नेहमी गाजावाजा करून सांगितला जातो; परंतु त्यापैकी एकाही ब्राह्मण महिलेला सगुणाबाईंची सर नव्हती. त्या खर्‍या अर्थाने किंगमेकर होत्या!

किंगमेकर! मार्गदर्शक! आणि तीही बहुजन महिला? हे आश्चर्य नाही. हाच खरा तेजस्वी बहुजनी वारसा आहे. सगुणाबाई, सावित्रीबाई, तान्हीबाई बिर्जे, जनाबाई रोकडे, ताराबाई शिंदे, अहिल्याबाई होळकर अशी देदीप्यमान तेजोमालिका या समाजात आहे.

जोती-सावित्रीचा आधारवड पडला उन्मळून :

या दरम्यान जोतीराव सावित्रीबाईंचे यांचे अखंड प्रेरणास्त्रोत असलेल्या या सगुणाबाईंचे 6 जुलै 1854 रोजी फुरसुंगी, पुणे येथे एका नातेवाईकाच्या घरी कॉलर्‍याच्या साथीच्या आजाराने निधन झाले. जोतीराव व सावित्रीबाईंना सगुणाआत्या उर्फ आऊच्या निधनाने जबरदस्त धक्का बसला. या घटनेने त्यांचे मन द्रवले. दुःखावेग दाटून आला. आऊंचे असे जाणे फुले दाम्पत्याला पोरके करून गेले. त्यांच्या कार्याचे कौतुक करणारे शब्द आता मुके झाले होते. आईच्या ममतेने डोक्याखांद्यावरून फिरणारे हात आता अचल झाले होते. जोतीराव व सावित्रीबाईंचा आधारवड उन्मळून पडला होता. या घटनेविषयी कवयीत्री सावित्रीबाईंनी आपल्या भावना खालील शब्दात व्यक्त केल्या होत्या. 

‘आऊ आमची फार कष्टाळू 

प्रेम तैसी होती दयाळू 

सागर वाटे उथळ पाणी 

आभाळ ठेंगणे तिच्याहूनी 

आऊ आमच्या घरी आली 

टाक होऊनी पाहा बसली 

मूर्तीमंत जणू विद्यादेवी 

ह्रदयी आम्ही तिला साठवी’.

सगुणाबाईंना आपला स्वतःचा विकास करण्यासाठी विशेष अवकाश नव्हता. म्हणून त्यांनी जोतीराव सावित्रीबाईंवर आपल्या विचारानुरुप प्रयोग केले. त्यासाठी त्यांनी फुले दाम्पत्यांमध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण केली. अखंड कार्य करण्याची प्रेरणा दिली व फुले दाम्पत्याला त्यांनी आपल्या हयातीतच आपल्या कार्यात यशस्वी करून दाखवले. हा योगायोग नव्हता. यामागे कार्यकारणभाव होता. निश्चित ध्येयासाठी जाणीवपूर्वक निवडलेली ती वाट होती. आपले ध्येय गाठण्यासाठी लागणारी व्यवहारकुशलता, बुद्धिचातुर्य, अविचल ध्येयनिष्ठा, समाजातील दीनदुबळ्यांप्रती अपार करुणा, या सार्‍या बाबी सगुणाबाईंमध्ये होत्या. म्हणून त्या आपल्याला हवी ती कृती फुले दाम्पत्यांकडून करून घेऊ शकल्या. 

‘निर्मिकाचा शोध’ सगुणाबाईंना अर्पण :

महात्मा फुलेंनी ‘निर्मिकाचा शोध’ हे आपले लहानसे पुस्तक सगुणाबाईंना अर्पण केले होते. त्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेच्या मजकूरावरून सगुणाबाईंचे महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनातील स्थान, आपल्याला स्पष्ट होते. ती अर्पणपत्रिका पुढील प्रमाणे होती,

‘सत्यस्वरुप सगुणाबाई भ्रतार खंडू क्षीरसागर हिस.. तुम्ही मला नुसते जगविलेच नसून माणूस बनविले. दुसर्‍यांच्या मुलांवर प्रेम कसे करावे? हे मी तुमच्याकडून शिकलो. याबद्दल कृतज्ञतापूर्वक हे पुस्तक तुम्हांस ग्रंथकर्त्याने नजर केले असे’ .

अशा या प्रेरणारुपी आऊ सगुणाबाईंच्या स्मृतीस आपल्या ह्रदयात जतन करून फुले दाम्पत्याने आयुष्यभर समाजसेवा करण्याची करण्याची शपथ घेतली होती. इतिहासातील अशा झाकोळलेल्या स्त्रीरत्नास आपणही आठवणींचा उजाळा देऊन त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून फुले दाम्पत्यांच्या कार्याचा महिमा सर्वदूर पोहचू या!

-राजाराम सूर्यवंशी

मो. नं.9112146752, 9503867602

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?