जात नाकारली : जात्यांताच्या दिशेने एक पाऊल!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जात नाकारली : जात्यांताच्या दिशेने एक पाऊल!
महापरिनिर्वाण दिन अर्थात निर्धार दिन : येत्या जनगणनेत ‘धर्म : बुद्ध, जात : नाही, वर्ग : धार्मिक अल्पसंख्याक’ करणार नोंद
मला माझ्या मुलाची चिंता नाही असे नाही. आजच्या स्पर्धेत टिकण्याइतका त्याला सक्षम बनविले आहे. यादृष्टीने आम्ही आता तयार झाले पाहिजे. राहिला विषय आरक्षणाचा, तर तो धार्मिक अल्पसंख्याक म्हणूनही घेता येईल. त्यासाठी लढा उभारावा लागेल. अनुसूचित जातीच्या सवलती बौद्धांना मिळाव्यात, यासाठी संघर्ष करावा लागेल. तर ‘संपूर्ण भारत बौद्धमय करीन’ हे बाबासाहेबांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल. मी हा निर्णय घेतलाय. आपणास योग्य वाटला तर घेऊ शकता..! बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण हा कठोर निर्धाराचा दिवस आहे. चला तर आजपासून एकच निर्धार करूया...मी जनगणनेत ‘धर्म : बुद्ध, जात : नाही, वर्ग : धार्मिक अल्पसंख्याक’, अशीच नोंदणी करणार आहे.
खाली बहुजन शासकमधील अग्रलेख अवलोकनार्थ पुन्हा देत आहोत. अॅड. दिलीप काकडे यांचा ‘धर्मांतरीत बौद्धांचा संविधानिक दर्जा: अनुसूचित जात की धार्मिक अल्पसंख्याक?’ हा लेख त्यांच्या ‘धर्मांतरित बौद्धांचा संविधानिक दर्जा अनुसूचित जात की धार्मिक अल्पसंख्याक : एक ऐतिहासिक संघर्ष’ या पुस्तकातून कुशलकुमार जयभिम जंगलबाग यांनी संकलित केला आहे.
जणगणना आयोगाकडे नोंदणी : धर्म : बुद्ध, जात : नाही, वर्ग : धार्मिक अल्पसंख्याक :
जनगणनेच्या वेळी बौद्धांनी आपली नोंद करताना ‘धर्म : बौद्ध, जात : नाही आणि वर्ग : धार्मिक अल्पसंख्याक’ अशी करावी असेच अनुमान निघते. जनगणनेच्यावेळी अथवा इतर कोणत्याही नोंदणीच्या वेळी बौद्धांनी याबाबतीत गोंधळून जाण्याची काहीही आवश्यकता नाही. बौद्धांनी कधीही विचलित व्हावयाचे नसते. जे विचलित होतात ते दोन दगडांवर पाय ठेवणारे असतात. डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेवर ठाम व स्थीर असलेल्यांना धार्मिक अल्पसंख्याक हा संविधानिक दर्जा घ्यावा लागेल.
डॉ. आंबेडकरांच्या 1935, 1950 व 1956 बदललेल्या भूमिकेनुसार बौद्ध हे अल्पसंख्याक :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्धांच्या सवलतीचा विषय मार्गी लावण्यासाठी वेळ मिळाला नाही, ती जबाबदारी अनुयायांवर आली. अनुयायांच्या विस्कळीतपणामुळे विषय अनिर्णित व लोंबकळत राहिला आहे. बाबासाहेबांची या विषयाची 1956 नंतरची स्वतःला शेड्युल कास्ट म्हणवून न घेण्याची ठाम भूमिका आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या भूमिकेनुसार 1956 नंतर बौद्धांचा संविधानिक दर्जा अनुसूचित जातीचा असण्याचा प्रश्नच येत नाही. बौद्धांचा धार्मिक अल्पसंख्याक असाच दर्जा असला पाहिजे, यात शंका असण्याचे काहीच कारण नाही. बाबासाहेबांची 1924 ते 1935 या काळात हिंदु धर्मात राहून सुधारणा करण्याची भूमिका होती. 1935 ते 1956 हिंदू धर्म सोडण्याची भूमिका होती. 1956 पासून बुद्ध धम्म प्रवासाची भूमिका आहे. 1956 पर्यंत धार्मिक अल्पसंख्याकांबाबत विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण 1956 पूर्वी हिंदू धर्मातच होतो. अस्पृश्यांना अनुसूचित जात असे संबोधून 1935 च्या घटना कायद्याने सवलती दिल्या. याच वेळी धर्मांतराची घोषणा झाली. धर्मांतरच्या घोषणेला, धर्मांतराची मानसिकता निर्माण करण्याच्या प्रचाराला, प्रत्यक्ष धर्मांतराला आणि धर्मांतरानंतरच्या प्रवासाला एकमेव अडथळा सवलतीच्या विषयाने केलेला आहे. सवलतीचा विषय आजही बौद्धांना आकर्षित करून धम्मक्रांतीच्या यशस्वीतेला अडथळा करीत आहे.
बौद्ध म्हणून सवलती मिळवण्याची बाबासाहेबांची भूमिका :
1956 साली धर्मांतर केल्यामुळे सवलतींचा प्रश्न निर्माण झाला. त्याबाबत बाबासाहेब दोन मुद्दे मांडतात. एक ते स्वतः शेड्युल्ड कास्ट म्हणून घेण्यास नकार देतात व दुसर्यांनीही तसेच करावे असे सांगतात, शेड्युल्ड कास्ट संघटनेचा सभासद होण्यास नकार देतात, शेड्युल्ड कास्ट असे संघटनेचे नाव ठेवण्यास विरोध करतात. दुसरा मुद्दा म्हणजे धर्मांतरानंतर अनुसूचित जातीच्या गेलेल्या सवलती परत मिळविण्याबाबत ते म्हणतात की, सवलती माझ्या खिशात आहेत. बौद्धांना बौद्ध म्हणून सवलती मिळवून देण्याबाबत त्यांना विश्वास होता. अनुसूचित जातीच्या गेलेल्या सवलती मान्य करून त्याच सवलती पुन्हा बौद्ध म्हणून मिळवून देण्याबाबत बाबासाहेबांना कोणतीही अडचण वाटत नाही.
धर्मांतराचे उद्दिष्ट ‘संरक्षण’ आणि ‘सन्मान’:
डॉ. बाबासाहेबांचा धर्मांतराच्या भूमिकेचा जर अभ्यास केला तर आपल्याला स्पष्टपणे असे आढळते की, सन्मानाचे व सुरक्षिततेचे जीवन जगण्यासाठी धर्मांतराची भूमिका आहे. अस्पृश्यांना हिन जीवनातून, गुलामीतून, अन्याय अत्याचारातून, अमानुष छळातून सुटका करण्यासाठीच बाबासाहेबांचे धर्मांतर होते. 1924 पासून बाबासाहेबांनी पहिले पर्व सुरू केले. या पर्वात त्यांनी अस्पृश्य समाजाच्या हक्काचा व दर्जाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
बुद्धधम्मीय ओळख काळाची गरज
बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी सांगितले होते की, तुम्ही परदेशी बौद्ध राष्ट्रांची मदत घ्यावी. त्यासाठी आता आम्ही तयार झाले पाहिजे. स्वत:ची बुद्धधम्मीय म्हणून ओळख निर्माण केली पाहिजे. जोपर्यंत बुद्धधम्मीय म्हणून ओळख निर्माण होणार नाही, तोपर्यंत तुमच्याकडे बौद्ध राष्ट्र वळणार नाहीत. आता अनुसूचित जातीची पांघरलेली झूल फेकण्याची वेळ आली आहे. येणार्या जनगणनेत ‘धर्म : बुद्ध, जात : नाही, वर्ग : धार्मिक अल्पसंख्याक’, अशी नोंद करणे हेच बाबासाहेबांना खर्या अर्थाने अभिवादन ठरणार आहे.
अनुमान :
डॉ. बाबासाहेबांची 1935 पर्यंतची भूमिका अस्पृश्यांना हिंदू धर्मात राहून अधिकार मिळविण्याची होती. 1935 च्या कायद्याने अस्पृश्यांना अनुसूचित जातीच्या नावाने राखीव जागा बाबासाहेब मिळवतात. याच वेळेला धर्मांतराची घोषणा होते आणि राखीव जागांना प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. बाबासाहेब 1935 च्या कायद्याने मिळालेल्या सवलतीचे पूर्णपणे संरक्षण करतात. या सर्व सवलतींना 1950 च्या संविधानात समाविष्ट करून संरक्षण देतात. 1956 सालापर्यंत अनुसूचित जातीच्या सवलतीबाबत त्यांची हीच भूमिका आहे. 1956 साली धर्मांतरानंतर बाबासाहेब स्वतः अनुसूचित जातीबाबतची भूमिका बदलतात. 13 ऑक्टोबर 1956 ला मी अनुसूचित जातीच्या समितीचा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा सभासद राहू इच्छित नाही. कारण यापुढे मला अनुसूचित जात म्हणून घ्यावयाचे नाही. यापुढे मी स्वतःला बौद्ध म्हणून घेणार आहे. उद्यापासून मी बौद्ध आहे, शेड्युल्ड कास्ट नाही. 1956 पर्यंत बाबासाहेब स्वतःला अनुसूचित जातीचे सभासद म्हणवून घेतात व धर्मांतरानंतर अनुसूचित जातीऐवजी ते बौद्ध असल्याची भूमिका जाहीर करतात. संरक्षण आणि सन्मान हे त्यांच्या धर्मांतराचे उद्दिष्ट आहे. धर्मांतराच्या उद्दिष्टातून जातीअंत करण्याचा मार्ग सांगतात. जातीअंतासाठी हिंदूना शास्त्रप्रामाण्य नष्ट करणे हा मार्ग सांगतात. तर बौद्ध धम्माचा स्वीकार अस्पृश्यांना मार्ग दाखवितात. महत्वाचा मुद्दा म्हणजे हिंदू धर्मात राहून जातीचा अंत होऊ शकत नाही. जातीचा अंत करण्याचा एकमेव यशस्वी मार्ग बुद्ध धम्माचा स्वीकार करणे हाच असल्याचा स्पष्ट करतात. म्हणजेच बाबासाहेब प्रथम धम्मक्रांती करायला सांगतात. धम्मक्रांती झाल्याशिवाय राजकीय व आर्थिक क्रांती घडून येत नाही. बाबासाहेबांच्या या सिद्धांताप्रमाणे निर्णय घ्यायचा असेल तर जातीचा दर्जा स्वीकारता येणार नाही. बाबासाहेब स्पष्ट म्हणतात, ‘मी शेड्युल्ड कास्ट नाही, मी बौद्ध आहे’. या बाबासाहेबांच्या स्पष्ट भूमिकेनुसार धर्मांतरित बौद्धांचा संविधानिक दर्जा हा धार्मिक अल्पसंख्याकांचा आहे.
(टीप : लोकसंख्येच्या आधारावर अल्पसंख्याकांना शिक्षण, सत्ता, संपत्ती, नोकरी यात वाटा द्यावाच लागेल. भारतात तो अल्पसंख्याकांना दिला जात आहे. बाबासाहेबांनी म्हटले आहे की, तुम्ही जिथे जाल तीथे आरक्षण मिळेल.)
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक' नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
Very good
उत्तर द्याहटवाSonal pawar
उत्तर द्याहटवाKnowledgeable, real fact.
Khup khari Aani Mahatavachi Mahiti wachaila Milali And Thought of Dr BABASAHEB Ambedkar regarding Castism We are the Buddhist as Dr BABASAHEB Ambedkar Said we Not Scheduled cast Still .why we called as Scheduled cast. JAI Bhim Namo Buddhay.
उत्तर द्याहटवाआपले मंगल हो
उत्तर द्याहटवा