शिक्षक, पालक, विद्यार्थी असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शिक्षक, पालक, विद्यार्थी असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे
-सामान्य असल्याचे किंचितही मनात आणू नका; मुख्याध्यापकास लिहिलेल्या पत्रात ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे आवाहन
तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारच्या हेलिकॉप्टर अपघातात संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह 12 असामान्य वीरयौद्ध्यांना वीरमरण आले. भारतीय सैन्यदलातील ते सर्वजण असामान्य होते. या अपघातात एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह बंगळुरूच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी असामान्य झुंज देत बुधवार, दि. 15 डिसेंबर 2021 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्याबाबतीत मृत्यू जिंकला, झुंज हारली, एवढेच म्हणावे लागेल. असे असले तरी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी खास संदेश मागे ठेवला आहे.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी जीवनाच्या अनेक कठीण पायर्या यशस्वीपणे चढल्या आहेत. त्यांची चित्तथरारक जीवनगाथा प्रेरणेचा स्त्रोत आहे. मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात वरुण सिंह म्हणतात, ‘बारावी बोर्डच्या गुणांवरून कुणाचे मूल्यमापन करू नका…मी, खेळ व अभ्यासात तितकाच सामान्य होतो, मात्र मला विमाने उडविण्याची आवड होती’. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे हे पत्र परीक्षेतील गुणांच्या मागे धावणारे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिक दृष्टिकोनावर बोट ठेवणारे आहे. तसेच जे विद्यार्थी सामान्य असल्याचा न्यूनगंड बाळगतात, त्यांना हे पत्र समर्पित आहे.
धैर्य आणि बुद्धिमत्तेचे अचाट दर्शन :
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे शौर्य पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांनी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी हा प्रेरणादायी संदेश दिला होता. गेल्या वर्षी, वरुण सिंग तेजस विमान उडवत असताना त्यामध्ये एक मोठी तांत्रिक अडचण आली होती. भीषण अपघात टाळण्यासाठी वरुण सिंह यांनी धैर्य आणि बुद्धिमत्तेचे अचाट प्रदर्शन करत अपघात टाळला होता. या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना ऑगस्टमध्ये शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्यातील असामान्यतेचा हा सन्मान होता.
काय आहे पत्रात..?
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी 18 सप्टेंबर, 2021 रोजी हरयाणातील चंडीमंदिर येथील आर्मी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांना एक प्रेरणादायी पत्र लिहिले, जे एक विद्यार्थी म्हणून त्यांच्या जीवनावर प्रतिबिंबित आहे. या पत्रात ते म्हणतात, ‘सामान्य असणे ठीक आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी उत्कृष्ट असेलच असे नाही. प्रत्येकजण 90 टक्के गुण मिळवू शकणारही नाही. जर मिळालेच तर ती आश्चर्यकारक उपलब्धी असेल आणि प्रशंसेस पात्र असाल. जर तुम्ही ते मिळवू शकला नाही, तर तुम्ही सामान्य आहात, असा विचारही करू नका. तुम्ही शाळेत सामान्य असू शकता; पण ते आयुष्यात येणार्या गोष्टींचे मोजमाप नाही. तुमच्या हृदयाचा आवाज ऐका. तो कला, संगीत, ग्राफिक डिझाइन, साहित्य इत्यादींना साद देणारा असू शकतो. तुम्ही कोणतेही काम कराल, समर्पित व्हा, सर्वोत्तम करा. मी आणखी प्रयत्न करू शकलो असतो, असा विचार करून कधीही झोपू नका’.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह पुढे म्हणतात, ‘कधीच आशा सोडू नका. तुम्हाला जे करायचे, त्याबाबत तुम्ही सक्षम नाहीत, असा विचारही करू नका. कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नसते. त्यासाठी कठोर परिश्रम लागतात. शिवाय वेळ आणि आरामाचा त्याग गरजेचा आहे. मी सामान्य होतो. मात्र, आज मी माझ्या करिअरमधील मैलाचा दगड गाठला आहे. बारावी बोर्डचे गुण तुमच्या जीवनाचे मूल्यमापन करू शकत नाहीत. स्वत:वर विश्वास ठेवा. त्यासाठी काम करा’.
मुख्याध्यापकांना ते म्हणतात की, माझी प्रामाणिक इच्छा आहे की, माझी ही कथा विद्यार्थ्यांबरोबर शेअर करा, विशेषत: तारुण्याकडे झुकलेल्या विद्यार्थ्यांना. जे सामाजिक दबाव, शैक्षणिक आव्हाने आणि काहीवेळा अनिश्चित आणि भीतीदायक भविष्याची गुंतागुंतसह जगत असतात. याद्वारे त्याला/तिला, त्याच्यात अथवा तिच्यात विश्वास निर्माण करण्यास एखाद्या विद्यार्थ्याला प्रेरणा मिळाली तर मी माझा उद्देश सफल झाला असे समजेल. मी हे सारे माझी पाठ थोपटून घेण्यासाठी सांगत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गु्रप कॅप्टन वरुण सिंग यांनी शौर्य चक्र पुरस्कार मिळाल्यावर अभिमान व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रतिष्ठित पुरस्काराचे श्रेय शाळेत, एनडीए आणि त्यानंतर हवाई दलाशी संबंधित असलेल्या सर्व शिक्षकांना दिले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा