दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

‘जिल्हा परिषद शाळेतील मुलं तहानलेली आणि उत्तम दर्जाचे शिक्षक’

 ‘जिल्हा परिषद शाळेतील मुलं तहानलेली आणि उत्तम दर्जाचे शिक्षक’

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद आयोजित काव्यसंग्रहाचे प्रकाशन, महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि कविसंमेलन उत्साहात

जिल्हा परिषद शाळा
जिजाऊ मंदिर : उद्घाटनीय विचार मांडताना ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, विचारमंचावर डावीकडून प्राचार्य डॉ. आर. एस. पवार, ज्येष्ठ साहित्यिक गेणू शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. लीला शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, कृषिसत्न विश्‍वनाथ चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्‍ता प्रा. डॉ. शिवानंद भानुसे, अर्थतज्ज्ञ डॉ. डी. एस. काटे, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, आदी.

अमिता सरोदे, औरंगाबाद :

आज शिक्षणाचे खासगीकरण, भांडवलीकरण आणि कॉर्पोरेटीकरण सुरू आहे. सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी शाळा मरणपंथाला टेकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय शाळा उभारणारा, राष्ट्रपती पुरस्कार विजेता उपक्रमशील आणि कृतिशील वाबळेवाडीचा दत्तात्रय वारे हा शिक्षक निलंबीत होतो. अशा परिस्थितीत सरकारी शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता मैलाचा दगड ठरली आहे, असे विधान धाडसाचे होईल. आणि हे धाडस ‘आनंदाचे झाड’ या कथेच्या लेखिका प्रा. लीला शिंदे यांनी केले आहे. त्या म्हणतात, ‘जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलं शिक्षणासाठी तहानलेली, तर शिक्षक बुद्धिमान, विचारशील आणि उत्तम दर्जाचे आहेत’. प्रा. लीला शिंदे यांचे हे अनुभवाचे बोल आहेत. त्या कायम जिल्हा परिषदेतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधतात. संवाद आणि अनुभवातून त्यांचे हे अनुमान खासगी शाळांच्या पुरस्कर्त्यांसाठी झणझणीत अंजन मानले पाहिजे.

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, औरंगाबाद आयोजित महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ, शिक्षक कवी-कवयित्री यांचे काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा आणि जिल्हास्तरीय शिक्षक कविसंमेलन बाबा पेट्रोल पंपजवळील म्हाडा कॉलनीतील जिजाऊ मंदिर येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. एस. पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक तथा इयत्ता चौथीच्या पुस्तकातील ‘आनंदाचे झाड’च्या प्रा. लीला शिंदे, इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील ‘रोपटे’ या पाठाचे लेखक गेणू शिंदे, औरंगाबाद जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, कृषिरत्न विश्‍वनाथ चव्हाण, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्‍ते प्रा. डॉ. शिवानंद भानुसे, अर्थतज्ज्ञ तथा उद्योजक डी. एस. काटे, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, अरुण गोर्डे, आदींची उपस्थिती होती.

प्रा. लीला शिंदे पुढे बोलता म्हणाल्या, माझ्या जीवनात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. शिक्षक शिक्षणव्यवस्थेचा आणि समाजाचा कणा तर विद्यार्थी पाया आहेत. विद्यार्थीकेंद्री शिक्षण असायला पाहिजे. शिक्षकाने काय करावे? ‘त्याने मुलांचे मन समजून स्वातंत्र्य द्यावे‘, ‘शिक्षकाने शिकवायचे नाही, तर मार्ग दाखवायचा’, ‘विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्याकडे करुणेने बघावे’. मला जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्ञानासाठी तहानलेली मुलं दिसतात. अत्यंत बुद्धिमान आणि विचारशील शिक्षक भेटतात. शिक्षकांनी लिहिण्याबरोबरच खूप वाचन करावे. जबाबदारी, प्रेमाने, करुणेने आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करून लिखाण करावे, असा मोलाचा संदेश प्रा. लीला शिंदे यांनी यावेळी दिला.

जीवनात मोठं होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज :

ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले की, विद्यार्थी हा देशाची संपत्ती आहे. त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. चांगल्या संस्कारासाठी शिक्षकांनी चांगले वाचन केले पाहिजे. शिक्षकांचे काम जबाबदारीचे आहे. दुर्दैवाने त्यांच्याकडे फार अनास्थेने पाहिले जाते, याविषयी त्यांनी खेद व्यक्‍त केला.

‘मी कसा घडलो?’, याविषयी सांगताना बाबा भांड म्हणाले, लेखक बनण्याचे मी सुरूवातीपासून स्वप्न पाहिले, ते होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मी नेहमी सांगत असतो की, स्वप्न पाहा, त्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. वाचन लेखणाचे संस्कार माझ्या गुरुवर्यांनी केले. त्यामुळेच माझ्या लेखणाची सुरूवात झाली. आयुष्यात उभं राहण्यासाठी खूप वाचन करावे, प्रामाणिक प्रयत्न करावेत, असा सल्‍लाही त्यांनी यावेळी दिला.

‘शेतकर्‍यांचा आसूड’मध्ये माझं जगणं दिसले…:

मी शाळेत असताना पुस्तकात काही मन रमलं नाही. मात्र, जेव्हा महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिलेले ‘शेतकर्‍याचा आसूड’ वाचलं, तेव्हा हेच माझं जगणं आहे, असे वाटायला लागले. त्यामुळे मला वाचनाची गोडी लागली. माणसाचं जगणं ज्यात आहे, असे साहित्य मला नेहमीच जवळचे वाटत आले आहे. मी पहिले पुस्तक लिहिले ते जोतीराव-सावित्रीबाई फुले यांना अर्पण केले आहे. कारण त्यांच्यामुळेच मी वाचायला आणि लिहायला लागलो, असे ज्येष्ठ साहित्यिक तथा ‘रोपटे’ या पाठाचे लेखक गेणू शिंदे यांनी सांगितले. 

पिढ्या घडविण्यासाठी पुढाकार घ्या :

जिल्हा परिषद शाळेत प्रवेश संख्या वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे. यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. याबरोबरच काही टीका-टिप्पणीही होतात. मुलांना वाचता येत नाही, शिक्षकांची मुलं खासगी शाळेत जातात, यावर चिंतन केले पाहिजे. अभियंत्याकडून एखाद्या पुलाचे काम खराब झाले तर ते दुरूस्त करता येते; पिढीचे तसे नसते. पिढ्या घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. ऑनलाईन शिक्षणामुळे समाजात अनेक प्रश्‍न उभे आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी सांगताना शिक्षकाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतानाच त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली.

शिक्षणमहर्षी पंजाबराव देशमुखांचा वारसा

शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्रात रचनात्मक आणि सर्जनात्मक काम करत आहे. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा चालवत आहे. 2020 मध्ये या संघटनेने पाठ्य पुस्तकात ज्यांच्या कविता आहेत, अशा कविंचे संमेलन आयोजित केले. असे कविसंमेलन महाराष्ट्रातील पहिलेच ठरले. यापुढेही शिक्षक, विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांसाठी ही संघटना भरीव योगदान देईल, असा विश्‍वास औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मनोज खुटे यांनी व्यक्‍त केला.

कर्मचार्‍यांच्या मुलांना सरकारी शाळा बंधनकारक करा :

सरकारी शाळा वाचल्या पाहिजे, ही सर्वांचीच ईच्छा आहे. मात्र, त्या वाचविण्यासाठी प्रयत्न कुणी करताना दिसत नाही. सरकार उदासीन आहे. शिक्षकही त्याला काही प्रमाणात जबाबदार आहेत. शिक्षकांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत न शिकता खासगी शाळेत शिकतात. आता विरोधाभास बघा, जि. प. शिक्षकाला सुमारे एक लाख रूपये पगार, आणि खासगी शाळेतील शिक्षकाला चार हजारांचे मानधन! कोण चांगले शिकवत असेल? हे गणित काही जुळत नाही. शिक्षकांचा हा दृष्टिकोन तथा न्यूनगंड सरकारी शाळांना मारक ठरला आहे. शिक्षकांनी स्वत:हून ही आपत्ती ओढवून घेतली आहे. सरकारी शाळा वाचवायच्या असतील तर ग्रामसेवकापासून ते सचिवापर्यंत, शाळामास्तरापासून ते कुलगुरूपर्यंत, ग्रामपंचायत सदस्यापासून ते आमदार-खासदार या सर्वांची मुले सरकारी शाळेत टाकण्याचे बंधन करणे गरजेचे आहे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्‍ता प्रा. डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले.

महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या नावे योजना राबवा :

शिक्षणमहर्षी पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना सुरू आहे. राजर्षि शाहू महाराज यांच्या नावाने ईबीसीची सवलत सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू असलेल्या बार्टीअंतर्गत सारथी योजना कार्यरत आहे. यापुढे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नावानेही एखादी योजना राबवावी, अशी मागणी प्राचार्य आर. एस. पवार यांनी अध्यक्षीय समारोप करताना केली. 

अन् कवितेने बंडखोरी केली!

जिल्हास्तरीय कविसंमेलन झाले. पारंपरिक ‘सारस्वत’ कवितेपासून अंतर राखून तसेच शोषित-वंचितांच्या व्यदनांना स्पर्श करणार्‍या कविता सादर झाल्या. शिक्षक, शेतकरी, स्त्रिया यांच्या प्रश्‍नांवर कवींनी जोर दिला. समग्र परिवर्तन आणि बंडखोरी फारसी जाणवली नाही. मात्र, एक तरूण बंडखोर कवी होताच. अजय दवंडेंने सरळ सांगून टाकले, देव नाही! सभागृह स्तब्ध… त्याचे शब्द सभागृहाची शांतता चिरून आणि भिंती फोडून बाहेर पडले, ते असे

देवा तू नाहीये!

काही वेडे लोक

देव कल्पनेला सत्य मानतात

कसं पटवून द्यावं त्यांना

की देव कल्पनाच आहे

सत्य नाही


दंतकथेत तू वाढत आला

दळूबाईचा तू देव

धार्मिकांचा संसर्ग झाला

तू इकडे होता न तिकडे

एक कल्पनेचाच तू बुरूज झाला


म्हणतात दे अंतरयामी

तो सर्वांना बुद्धी देतो

‘मग अशी का?’

भर रस्त्यात निष्पाप खून

निरपराध बलात्कारांचे ऊन

पान्हवते दगडालाही

मग देव कशाला बनला आहे?


तुझ्याच दारात सत्यांनी गळफास घेतला

तुझ्याच भक्‍ताने तडफडत श्‍वास सोडला

एवढा क्रूर-कठोर तू कळता

तरीही मी मूर्ख शोधतो तुला

एका निर्जीव दगडात


देवा तू नाहीये

कुठेच नाहीये

शिक्षकांत वाचनाची वानवा!

वाचनाशिवाय लिखाणाचा दर्जा वाढत नाही. खोलवर वाचन ही दर्जेदार साहित्याची पूर्वअट आहे, असा सूर मान्यवर वक्त्यांच्या भाषणातून निघाला. कसदार साहित्यासाठी लेखक अथवा साहित्यिक वाचन तथा पुस्तकांचा तहानलेला असावा, याची मात्र वानवा येथे दिसून आली, ती अशी… एक, सभागृहात पुस्तकांचे दोन स्टॉल असताना त्याकडे मोजके शिक्षक सोडले तर कुणी फिरकले नाही. औरंगाबादचे जीवक प्रकाशन आणि साकेत प्रकाशकांनी शिक्षकांसाठी वैचारिक पुस्तके आणली होती. दोन, कविसंमेलनाच्या शेवटी सादरकर्ता कवी आणि विचारमंच इतकीच उपस्थिती होती. ‘मी आणि माझी कविता, मला दुसर्‍याचे काही देणेघेणे अथवा ऐकूण घ्यायचे नाही’, ही वृत्ती चिंता करायला लावणारी दिसून आली.

महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने 40 शिक्षक सन्मानित :

अर्थतज्ज्ञ डॉ. डी. एस. काटे यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अय्युब पठाण लोहगावकर यांच्या ‘अनाथ’, श्यामकांत पाचपुते यांच्या ‘मी असा’, भारती सोळंके यांच्या ससोबा भित्रे, शिवप्रणाम या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. तसेच शिक्षण, साहित्य व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या 40 शिक्षकांना महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात शिंदे अशोक काशीनाथ, छाया तुकाराम सिरसाट, प्रा. डॉ. शिवाजी हुसे, बापू बावीस्कर, के. एस. माळी, भारती दशपुत्रे, उज्वलकुमार म्हस्के, विद्या गवई, नितीन अंतरकर, विजय पाटील, सुनिता राजगुरू, वनिता दयाटे, शर्मिला विधाटे, अनिरूद्ध सोनवणे, महेंद्र राऊत, अशोक पाटील, दीपमाला देशमुख, शशीकला सोमवंशी, गजेंद्र बोंबले, आसराजी सोंडगे, संदीप बहीर, कविता घुले, सोपान करवंदे, रोहिदास शिखरे,  रामहरी ढमाले, भानुदास मलवाड, सुनिल निकम, बेबी माळोदे, सागर जाधव, एन. एम. घाडगे, अकील पठाण, वासनिक सुचिता, काकासाहेब दिवेकर, वर्षा देशमुख, शेख अब्दुल रहीम शेख, रेखा माने, सुहास मिश्रीकोटकर आदींचा समावेश होता.

‘मास्तर’ जेव्हा शिस्तभंग करतात!

आजचा दिवस शिक्षकांचा…कार्यक्रम एक एक टप्पा गाठत पुढे सरकत होता. अत्यंत शिस्तीत कार्यक्रम सुरू होता. मात्र, विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी, यासाठी आग्रही असलेले शिक्षक अधुमधून शिस्त मोडत होते. मोबाईलसाठी सभागृह सोडत होते. अनेकजण आनंदाच्या भरात सभागृहाच्या कानाकोपर्‍यात जिथे जागा आणि सवड मिळेल तिथे फोटो काढत होते. आपले पुस्तक प्रकाशन, सत्कार वा कविता झाली की सभागृह सोडत होते. मास्तर, हा शिस्तभंग आहे!

बहारदार कार्यक्रम :

शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, औरंगाबादच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे दीर्घ नियोजन आणि आयोजन सोडले तर कार्यक्रम अत्यंत नीटनेटका, सुटसुटीत पार पडला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनोज खुटे यांनी केले. संदीप भदाणे यांच्या संयत आणि बहारदार सूत्रसंचलनामुळे कार्यक्रमाने उंची गाठली. तितक्याच तोलामोलाचे आणि समयसूचकतेच्या ताळमेळात कवि संमेलनाचे सूत्रसंचलन संदीप ढाकणे यांनी जबाबदारीने केले. तर आभार भास्कर गोपाळ यांनी मानले. लग्‍नाची दाट तारीख असतानाही कार्यक्रमाला मोठी गर्दी होती, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज खुटे, भास्कर गोपाळ, किशोर पवार, आत्माराम गोर्डे, गोविंद गायकवाड, विशाल तिखे, योगेश गायकवाड, गोरक्ष जगताप, दीपक नवधर, गणेश पुरी, पठाण सर, नारायण बहीर, पी. ए. गाढवे, अण्णासाहेब इंगळे, अशोक आढाव, मनोज भादे आदींनी परिश्रम केले.

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासक' नियमित वाचा) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?