गौतमी पाटील : शाहीर संभाजी भगत यांच्या पोस्टने वर्मी घाव
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गौतमी पाटील : शाहीर संभाजी भगत यांच्या पोस्टने वर्मी घाव
मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावं लागणं हेच मुळापासून बंद व्हावं असं का वाटत नाही?
औरंगाबाद : नृत्यांगना गौतमी पाटीलचे नाव महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत आहे. एकीकडे तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळते, तर दुसरीकडे तिच्या डान्सवरून वादही होताहेत. तिच्या ‘पाटील’ आडनावावरून मराठा संघटनांनी वाद पेटवला असून आडनाव बदल अन्यथा तुझे कार्यक्रम होऊ देणार नाही, अशा धमक्या दिल्या जाताहेत. पुरुषी आणि जात्यांध मानसिकतेच्या विरोधात काही कलाकारांनी या वादात उडी घेतली आहे. अभिनेते किरण माने यांच्यानंतर शाहीर संभाजी भगत यांनी तर ‘ मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावं लागणं हेच मुळापासून बंद व्हावं असं का वाटत नाही?’, असा सवाल केला आहे. त्यांची पोस्ट सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
गौतमी पाटील काही महिन्यांतच प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तिच्या नृत्यावर लाखो लोक घायाळ होत असताना ती करत असलेले नृत्य, तिच्या चेहर्यावरील हावभाव, हातवारे याला काहीजण विरोध करत आहेत. गौतमीचं खरं आडनाव पाटील नाही. तिने पाटील आडनाव लावू नये असा नवा वाद सुरू झाला आहे. याबाबतच शाहीर संभाजी भगत यांनी संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
शाहीर संभाजी भगत म्हणतात, ‘नाचणार्या बायका बघणार्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटतं? तर नाचणारी बाई तर पाहिजेच, पण ती आपल्या पेक्षा खालच्या जातीची पाहिजे. नसेल तर निदान ती आपल्या जातीची असता कामा नये. आजपर्यंत ज्यांनी बायका नाचवल्या त्यांच्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्यामधील जात्यंध पुरुष दुखवतो. म्हणून निदान आडनाव तरी बदला अशी मागणी होत आहे, पण या जात्यंध लोकांना हे कळत नाही की आडनाव बदलून लाज वाचणार नाही. मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावं लागणं हेच मुळापासून बंद व्हावं असं का वाटत नाही? निदान त्यांच्या स्त्रियांना नाचून पोट भरायची वेळ आली असेल, तर ते त्या जातीतल्या स्त्रियांची स्थिती सुधारायला पुढे का येत नाहीत?’
पुढे ते म्हणतात, ‘मुळात मुद्दा नाचण्याचा नाही, मुद्दा पुरुषसत्तेचा आहे. भारतीय पुरुषांची जाणीव आणि नेणीव ही दुहेरी आहे. ते पुरुषसत्ताक तर आहेतच, पण ते जात्यंधसुद्धा आहेत. म्हणून बलात्कारित स्त्रीकडेही ते अशाच घाणेरड्या पद्धतीने बघतात. तिची जात शोधतात आणि मग काय काय करायचे हे ठरवतात. दुसर्या जातीच्या बाईवर बलात्कार झाला, तर यांना काहीच वाटत नाही आणि जातीच्या बाईवर त्याच्यापेक्षा खालच्या जातीच्या पुरुषाने बलात्कार केला असेल तर मग वस्त्याच जाळतात. बलात्कार हे हत्यार म्हणून सुद्धा वापरतात. स्त्रियांच्या बाजूने विचार करणार्या प्रत्येकाने या प्रकारच्या मानसिकतेला प्रश्न विचारायला हवाच. पण आडनाव बदलून नाचा असे ज्या बाईला सांगितलं जातं तिनेही याबाबत स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवं’.
संभाजी भगत यांची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आडनावावरून वाद? :
अश्लील नृत्याचा व्हायरल व्हिडीओ, कपडे बदलतानाचा व्हायरल व्हिडीओ, उदयनराजेंची भेट, एका मागोमाग एक घडणार्या या घटना व त्यानंतर सामाजिक, राजकीय, ऑनलाईन-ऑफलाईन स्तरावर होणार्या टीकांमुळे गौतमी पाटील ही कायम चर्चेत आहे. आता तिच्या आडनावावरून वेगळाच गोंधळ सुरू आहे. गौतमीचे आडनाव पाटील नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मराठा समन्वयक अशी ओळख सांगणार्या राजेंद्र जराड पाटील आणि काही अन्य पदाधिकार्यांनी ‘टीव्ही 9’ला दिलेल्या मुलाखतीत गौतमीला पाटील आडनाव लावण्याबाबत थेट इशारा दिला आहे. गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा या पदाधिकार्यांनी दिलेला आहे. दरम्यान, या धमकीनंतर गौतमी पाटीलनेही प्रतिक्रिया दिली. ‘मी पाटील आहे तर पाटील आडनावच वापरणार’ असे बेधडक वक्तव्य गौतमी पाटीलने केलं आहे.
तू मनोरंजनक्षेत्रातली ‘पाटलीण’ :
किरण माने यांची गौतमी पाटीलसाठी खास पोस्ट चर्चेत
एकीकडे गौतमीला असा विरोध होत असताना अभिनेते किरण माने यांनी गौतमीच्या समर्थनार्थ एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी गौतमीच्या बेधडक स्वभावाचे प्रचंड कौतुक केले असून तिच्या आडनावावरून वाद उकरून काढणार्या लोकांचाही त्यांनी समाचार घेतला आहे. याबरोबरच त्यांनी या पोस्टमधून समाजाच्या संकुचित विचारांवरही ताशेरे ओढले आहेत.
किरण माने लिहितात...
‘एक छोटीशी चिमणीसुद्धा आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते रे’ गौतम बुद्धांनी अंबठ्ठाला सांगितलेलं हे वाक्य हे भारतीय साहित्यातलं नितांतसुंदर आणि आशयघन वाक्य आहे, असं आ. ह. साळुंखे तात्या नेहमी म्हणतात. आपल्या संविधानातल्या ‘स्वातंत्र्य’ या मूल्याचं इतकं समर्पक स्पष्टीकरण दुसरीकडे कुठे क्वचितच सापडेल.
चिमणीला सुद्धा स्वत:च्या मनाप्रमाणं चिवचिवण्याची मुभा आहे, आपण तर माणूस आहोत. आपल्याला असं व्यक्त होण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य का मिळू नये??? एखाद्यानं काय बोलायचं, कसं वागायचं, स्वत:च्या घरात काय खायचं, कसले कपडे घालायचे, यावर बंधनं आणण्याचे प्रकार सुरू आहेतच, पण आता कळस झालाय. एका मुलीने पोटापाण्यासाठी काय करावं? किती पैसे घ्यावेत?? इथंपासून ते आता, तिनं कुठलं आडनांव लावावं??? यासाठी सुद्धा दुसरंच कुणीतरी जबरदस्ती करत आसंल, धमक्या देत आसंल तर हे लै म्हंजे लैच संतापजनक आणि लाजीरवाणं हाय.
गौतमी, जेव्हा तू चुकली होतीस, तुझ्या व्हल्गर हातवार्यावर गदारोळ उठला होता, तेव्हा तू माफी मागितली होतीस, पुन्हा ती चूक होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतलीस. खरंतर त्यानंतरच तू लोकप्रियतेच्या पायर्याचढू लागलीस. आज तू जे करतेस त्यात आता ‘बिभत्स’ असं काहीही नाही. परफॉर्मन्स करताना अंगभर कपडे असतात. तू ज्या अदाकार्या करतेस त्यावर ग्रामीण भागातली तरूण पोरं जीव ओवाळून टाकतात.. तुझ्या क्षेत्रात अशी लोकप्रियता लाखात एखादीला लाभते. तुझा डान्स हा उच्च दर्जाचा आहे की नाही, याविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं आणि त्या प्रत्येक मताचा आदर आहे, पण तरीही कुणीही हे नाकारू शकत नाही की, आजच्या तरूणाईमध्ये तुझी जबरदस्स्त ‘क्रेझ’ आहे.. तुझ्या स्टेजवरच्या फक्त एंट्रीनं तरूणाई पागल होते.. गांवखेड्यांत तू लोकप्रियतेचा कळस गाठला आहेस. तिथे मराठी सिनेमा-सिरीयलमधल्या टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा तू पॉप्युलर आहेस. तू हे यश एंजॉय कर. बर्याचदा अशा यशाचा काळ छोटा असतो. जोवर आहे तोवर धमाल कर. तुझ्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर याहूनही मोठे यश मिळवशील पुढे जाऊन. पण ‘आम्हाला वाटतंय तसंच तू वागावंस, तस्संच नाचावंस आणि आम्ही सांगतोय तेच नांव लावायचंस’ असं दरडावू पहाणार्यांना उंच उंच लांब उडवून लाव.
आज तरी तू आमच्या ग्रामीण भागातल्या मनोरंजनक्षेत्रातली ‘पाटलीण’ हायेस रुबाबात नाच, बिनधास्त नाच!
किरण माने यांच्या या पोस्टची प्रचंड चर्चा होत आहे. शिवाय गौतमी पाटीलला त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचंही गौतमीच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा