दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

सामाजिक वेदनांवर फुंकर घालणारी कादंबरी : ‘लॉकडाऊन’

सामाजिक वेदनांवर फुंकर घालणारी कादंबरी : ‘लॉकडाऊन’

 


लॉकडाऊन शब्द कानावर आला की चाकरमान्यांच्या मनात आजही धडकी भरते. अडीच वर्षे कोरोना महामारीने देशालाच नव्हे, तर जगाला हातघाईला आणले होते. आजही अधूनमधून कोरोना सक्रिय असल्याच्या बातम्या येतात आणि ऊरात धस्स होते. संपूर्ण देशातील माणसे आपापल्या घरात गोठून गेल्यासारखी राहत होती. प्रत्येक गल्लीबोळातून कर्फ्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती. जे सरकारी नोकरीत होते, त्यांना महिन्याला पगार मिळत असल्याने त्यांना जगण्याची भ्रांत नव्हती; परंतु खासगी नोकरीत असणार्‍यांचा रोजगार बंद झाला होता. हातावर पोट असणार्‍यांची उपासमार सुरु होती. अत्यावश्यक शासकीय आणि निमशासकीय कार्यालये सुरु होती. त्यातही कामगारांची कपात केली होती. अनेक ठिकाणी अन्नछत्र आणि रेशनचे धान्य मिळत असल्याने गोरगरिबांचे पोट भरण्याचे कार्य सुरु होते.

टाळ्या वाजविणे, पराती, थाळ्या, भांडी, घंट्या वाजविणे, मेणबत्या लावणे असे अनेक प्रयोग करण्यात आले. भोळ्या भाबड्या जनतेने सुरुवातीला गंमत म्हणून आणि नंतर भीतीपोटी या सर्व गोष्टी विश्वास बसत नसल्यातरी मनोभावे केल्या. तथापि, महामारीचा कहर कमी होत नव्हता. कोरोना झाला की समोर मरणाचीच भीती असल्याने लोक प्रचंड घाबरले होते. एकमात्र झाले की, कोरोना महामारीने लोकांना जगायला शिकविले. समाजात पडत जाणारी दरी कमी करण्यास मदत केली. लोक एकमेकांशी आस्थेने बोलू लागले. शेजारच्या घराला ‘प्रतिबंधीत क्षेत्र’ असा बोर्ड लागल्यावर आपल्याही घराला कधीतरी लागेल याचा कोणालाच नेम नव्हता. लोक पटापट मरताहेत, याच्या बातम्या वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावरून सुसाट येत होत्या. त्यामुळे लोक अधिकच घाबरत होते. रस्त्यारस्त्यावर पोलीस बंदोबस्त असल्याने घराबाहेर निघण्याची कोणाची हिंमतच नव्हती. समाजातील भेदाभेद कमी झाले होते. लोक एकमेकांकडे आश्वासक, आपुलकीच्या नजरेने पाहत होते. 

ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या, डॉ. संभाजी खराट यांच्या सिध्दहस्त लेखनीतून झिरपलेल्या ‘लॉकडाऊन’ या 94 पानांच्या छोट्याशा कादंबरीने लॉकडाऊन काळातील अनेक बारकावे टिपत सामाजिक अस्मितेवर प्रहार केले आहेत. विशेषतः हिंदू आणि मुस्लीम ही वाढत जाणारी दरी लॉकडाऊनच्या काळात कशी कालबाह्य ठरली, याचे मार्मिक विवेचन अतिशय बारकाईने या कादंबरीतून डॉ. संभाजी खराट यांनी केले आहे. डॉ. संभाजी खराट हे माहिती आणि जनसंपर्क विभागातील निवृत्त उपसंचालक आहेत. नाटक, चित्रपट, पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि संशोधन क्षेत्रात कार्य करीत असताना त्यांचे साहित्य क्षेत्रातही मोठे योगदान आहे. त्यांनी आजपर्यंत विविध विषयांवरील 28 पुस्तकांचे लेखन केले असून, अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना डॉ. संभाजी खराट यांच्या नजरेतून कोरोना महामारीच्या काळातली सामाजिक अस्वस्थता सुटलेली नाही. त्यांनी लॉकडाऊनच्या काळातले अनेक सुक्ष्म बारकावे, सविस्तरपणे आपल्या कादंबरीत मांडले आहेत.

‘लॉकडाऊन’ ही कादंबरी मुंबईत राहणार्‍या एका कुटुंबाची कथा आहे. मुस्लिम कुटुंबाला हिंदू कुटुंबाने केलेली मदत आणि त्यांच्यात असणारे जिव्हाळ्याचे संबंध या कादंबरीत मुलायम धाग्याने गुंफले आहेत. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतीलच नव्हे, तर राज्यातील नागरिक, नोकरदार, व्यापारी, हातावर पोट भरणारे रोजंदार, मोलमजुरी करणारे अनेक हात यांचे झालेले हाल आणि आर्थिक नुकसान यावर प्रकाशझोत टाकलेला आहे. या महामारीतून कुटुंब कसे बाहेर पडले, याचा हळुवार आलेख मांडला आहे.

बँकेत काम करणारा हिंदूधर्मिय ज्ञानेश, त्याची पत्नी सविता, वडील शामराव आणि दीपा, विशाल ही मुले, यांच्याभोवती फिरणारी ही कादंबरी आहे. ज्ञानेशच्या शेजारी राहणारे मुस्लीम कुटुंब हातावर पोट भरणारे आहे. रहिमचाचा दुकान चालवतात. त्यांच्या घरात पत्नी फरीदा. नजीर, खुशबू आणि शबाना हे सदस्य आहेत. कोरोना महामारीच्या काळात जनसामान्यांवर लादलेल्या लॉकडाऊनमध्ये कुटुंबाचा जगण्यासाठीचा संघर्ष या कादंबरीत रेशमी धाग्यांनी गुंफला आहे. ज्ञानेशचा कौटुंबिक मित्र व्यंकटेश याचीही साथ त्यांच्या कुटुंबाला मिळाली आहे. लॉकडाऊनच्या काळातही संचारबंदी, प्रारंभी झालेला पोलिसांचा आरेरावीपणा, बाजारपेठा बंद असल्याने हातावर पोट असणार्‍यांची होणारी तारांबळ, कोरोना रुग्णांचे मृत्यू, जगभराची स्थिती, दळणवळणाच्या सुविधाही बंद असल्याने जीवावर उदार होऊन होणारे स्थलांतर, मास्क आणि सामाजिक अंतराचा वापर, आरोग्य सुविधा, कुटुंबातील वाद-विवाद, सण-उत्सवावर आलेली बंदी, धार्मिक स्थळे, उद्याने, शाळा, कार्यालये बंद यामुळे होणारी घालमेल. ऑनलाईन वर्क फ्रॉम होम, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे निर्णय, सूचना यांना लोकं कंटाळले होते. मनातून घाबरतही होते. नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट यांच्या भेटीगाठी थिजलेल्या होत्या. रस्ते सुनसान झालेले होते. सकाळ, संध्याकाळचे वॉक बंद झालेले होते. त्यामुळे चहाची टपरी, पानपट्टी कित्येक दिवस धुळखात बंद होते. त्यांना लावलेली कुलपे गंजली होती. प्रत्येक समाज आपल्या देवतेचा धावा करीत होता. प्रत्येकासाठी दुआँ मागत होता. लोकांच्या मनामनातील विचित्र घुसळण आणि तगमग ‘लॉकडाऊन’ कादंबरीत वाचायला मिळते. सामाजिक वेदनांवर हळुवारपणे फुंकर घालणारी ही कादंबरी आहे. डॉ. संभाजी खराट यांनी सर्व घटनांची नोंद ठेऊन, बारकावे टिपून घेऊन अतिशय संयमाने, लेखनातील तोल कोठेही ढळू न देता या कादंबरीला श्रृंगारले आहे.

हिंदू-मुस्लिमांच्या अप्रतिम ऐक्याचे विलोभनीय चित्रण या कादंबरीतून साकारले गेले आहे. दोन जातीत तेढ निर्माण करण्याचे काम समाजविघातक, सत्ता स्वार्थी लोकच करतात, सामान्य माणसांना त्याच्याशी काहीच देणे-घेणे नसते, याचा आदर्श या कादंबरीतून मांडलेला आहे. प्रत्येक जाती, धर्माच्या लोकांच्या मनामनातील अस्मिता जागविण्याचे आणि सर्व समाज एक आहे असा संदेश ही कादंबरी देऊन जाते. सतीश खानविलकर यांनी अतिशय समर्पक असे मुखपृष्ठ रेखाटले आहे. ग्रंथाली प्रकाशनच्या या 94 पानांच्या छोटेखानी कादंबरीची किंमत अवघी 150 रुपये आहे.

लॉकडाऊनच्या इशार्‍याने सुरु झालेली ही कादंबरी वेगवेगळी वळणे घेत सकाळचा सूर्योदय बघत, मंदिरातून हनुमान चालीसा तर मशिदीतून अजानच्या सुमंगल आवाजाने, सकारात्मक संदेश देत थांबते. वाचकांना आणि अभ्यासकांना ‘लॉकडाऊन’ ही कादंबरी निश्चितच आवडेल अशी खात्री आहे.  


-प्रा. डॉ. बाबा बोराडे, संभाजीपूर, 94225 83106.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?