कुरुलकरावर बोलू काही!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुलकरावर बोलू काही!
संघाची जी स्वयंघोषिते, देशभक्तिची देती ग्वाही;
सत्याची जर चाड असे तर, कुरुलकरावर बोलू काही!
नाथुराम जर सावरकर स्वर, कुरुलकराचा मार्गच तोही;
सत्याची जर चाड असे तर, कुरुलकरावर बोलू काही!
पाकिस्तानी हनी ट्रॅप जर, नडला कोठे कुरुलकराला;
लिंगपिसाटा नसेच लज्जा, वचन खरे हे, सर्वांनाही.
संस्कारी जर असाल तुम्ही, असे घडविता पिढ्या-पिढ्यांना?
दाखविण्या हो तोंड तुम्हाला, नसेल उरली जागा काही.
ज्याला-त्याला देता धमक्या, पाकिस्तानी पाठवायच्या;
कुरुलकराचे करायचे का, सांगा आता तुम्हीच ते ही!
चौदा मेले बैठकीतले…..
चौदा मेले बैठकीतले, त्यांची चर्चा कुठेच नाही;
हिंदुहिताच्या छचोर गप्पा, कृतीत कोठे दिसतच नाही!
निवडणुकीच्या साठी हिंदू, दंगलीत सहभागी हिंदू;
सत्तेच्या सोपानावरती, त्याची जागा कुठेच नाही!
सत्तेसाठी धडपड सारी, हिंदूंची ती ढाल मखमली;
वापरून गुळगुळीत झाली, तिची खुशाली कुठेच नाही!
मलिदा खाती सत्तेचा हे, करती गप्पा हिंदु-हिताच्या;
हिंदुंची नुसतीच भलावण, हिंदू-हाती काही नाही!
हिंदूंनो आता तर जागे व्हा, अन् जागा दाखवून द्या;
अपुला वाटा मिळवून घ्या अन्, यांच्यावरती स्वार सदाही!
सोडून द्या हो मौन विखारी…..
जंतर-मंतर वरती खेळाडूंना, न्याय मिळेना का हो?
पुलवामातील लढवय्यांचा कुणास ऐकू ये ना टाहो!
मणिपुरच्या आदीवासींना, कुणीच वाली नाही का हो?
प्रचारमंत्री निवडणुकीच्या, कामी जुंपुन गेला का हो!
त्र्यंबकेश्वरी कांगावा अन्, दर्ग्यावरती चादर का हो?
प्रश्न तुम्हाला पडे न हा की, ढोंग कशाचे घेता का हो?
केरळ स्टोरी लव जिहाद तर, कुरुलकरांचा ट्रॅप कसा हो?
न्याय सारखा दोघांनाही, अशी अपेक्षा नाही का हो?
देशाची थोडी जर चिंता, लाज लोकशाहीची असे तर;
सोडून द्या हो मौन विखारी, मनातले गुज मनात राहो!
-डॉ. अशोक राणा, यवतमाळ.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
भेदक आणि वास्तव
उत्तर द्याहटवा