दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

भीममयी वामनदादा !

भीममयी वामनदादा !


या महिन्याच्या 15 तारखेला वामणदादांचा 19 वा स्मृतीदिवस येऊन गेला. त्या एका दिवसाने वामणदादांच्या सार्‍या आयुष्याच्या जीवनपट नयनचक्षुसमोर उभा राहिला. त्यांचा संघर्ष उभा राहिला! व काही प्रश्नही उभे राहिलेत..! ते सर्व नव्याने समजून घेताना वामनदादांचं बाबासाहेबमय होणं, भीममय होणं , हे मला अधिक भावलं! ते चुक होतं का बरोबर हा प्रश्न नाही, मात्र ‘त्याने’ वामनदादांवर काय प्रभाव पडला..., त्याचे परिणाम काय झाले? हा कुतुहलजन्य प्रश्न माझ्या मनात उत्पन्न झाला व तो शोधता शोधता... ह्या लेखाचा जन्म झाला...! 

इतिहासातील प्रश्नांना वर्तमानात उत्तर नसले, तरी त्या संभाव्य उत्तरांचा मागोवा जरुर आपण घेवू शकतो.., त्यांची समीक्षा करू शकतो..! त्यानिमित्ताने काही ऐतिहासिक उत्तरं आपल्यापरीने शोधू शकतो...! व वर्तमानात ऐतिहासिक व्यक्तिरेखांची उजळणी करताना काही नवीन मांडणी करू शकतो. लेखकाचे, इतिहासकाराचे, भाष्यकाराचे हेच तर काम असते...! चला तर मग, वामनदादांना ‘समजून’ घेवू या...!
15 ऑगस्ट 1922 साली सिन्नर तालुक्यातील देशवंडी उर्फ दुसोंडी या छोट्याशा गावात जन्मलेले वामनदादा दुःखाचा भला मोठा डोंगर घेवून 1942 साली आपल्या आईसोबत मुंबईत आले होते.
गावी 18 एकर शेती असूनही घरात दारिद्र्य होते. आई लाकडाच्या मोळ्या विकायची. भाऊ विड्याची पानं विकायचा, तर वामनदादा जंगलात गुरंढोरं चारायचे. त्यामुळे शाळेची गाठभेट नाही. अक्षरांशी ओळख कधी झालीच नाही. 
गरिबी व कष्ट सोबत नांदत होते. 
अनुसुयेसोबत लग्न झालं...मीरा नावाची मुलगी झाली...
परंतु अनुसुयेने पतीधर्म निभावला नाही.
सोडून गेली....!
मीरा आईवीना जास्त दिवस जगू शकली नाही.
दारिद्र्याने मीराला जगू दिसू दिलं नाही.
ती लहानवयातच गेली...!
वामनदादांना अनुसुयेपेक्षा कन्या मीरा गेल्याचं दुःख अधिक झालं...!
या दुःखावर मात करण्यासाठी दादांनी गाव सोडलं. आईला सोबत घेऊन मुंबईची वाट धरली...!
तोपर्यंत ही मुंबई कितीतरी अनाथांची नाथ बनली होती. जो जो नशिब आजमायला मुंबईत आला, त्याला त्याला मुंबईने निराश केले नाही...! गरीब, कष्टकरी, मजूर, भूमिहिनांची आश्रयदाती या मुंबईने वामनदादांनाही निराश केले नाही...!
मुंबईत येण्याआगोदर वामनदादा फक्त वामन होते. गरीब हतभागी, निराश, अडाणी, अक्षरशत्रु होते.
पोटाची खळगी भरणे व आईचा सांभाळ करणे ऐवढ्याच उद्देशाने वामन मुंबईत दाखल झाले होते.
बाबासाहेबांचं नाव ऐकून होते..!.
परंतु खरा प्रश्न त्याचा जगण्याचा होता. हिम्मत त्याच्या रगारगात भरली होती.शिक्षण नसले तरी चौकसबुध्दी होती. जगण्याची कला अवगत होती. दोन हात दहा बोटांनी कष्टावर स्वार होण्याची जिद्द होती. त्यामुळे मुंबईत पाय ठेवल्या ठेवल्या हमाली कर..., कोळसा वाह..., लाकूड तोड..., चिक्की वीक..., फळं वीक ..., थिएटरच्या दारात जावून मिळेल ते काम कर.....!
असं करता करता वामनदादांना टाटा कंपनीत काम मिळाले. शिवडी बी.डी.डी.चाळीत रहायला मिळालं....! पोटाचा आणि राहण्याचा प्रश्न मिटला होता...!
संघर्ष तर अटळ होता, मात्र जीवन पुढे सरकत होते...!
समता सैनिक दलाचा गोतावळा तेथे होता. हातात काठी डोक्यावर निळी टोपी व बाबासाहेब कंठी! 
हा आवेश वामनदादांना भावला.
ते ही समता सैनिक बनले. 
फावल्या वेळात संचलन करू लागले.
समता सैनिक दल म्हणजे बाबासाहेबांची संरक्षणफळी.
प्रत्यक्ष रणांगणावर हिम्मतीने उभी रहाणारी निळी फौज.
ही नवी भूमिका वामानदादांना खूप आवडली. या फौजेमार्फत एकदिवस आपण बाबासाहेबांना भेटणार..., त्यांना डोळे भरून पहाणार..., त्यांचे गुण अवलोकणार..., त्यांचं बौध्दिकतेज ह्रदयात साठवायला मिळणार...! अशी उमेद दादांना होती व ती अनठायी नव्हती. 
व तो दिवस उगवला....!
शिवडीच्या नायगांवमध्ये बाबासाहेबांची सभा होती. काठीला काठी लावून वामनदादा समता सैनिल दलासोबात बाबासाहेबांना ‘वाट’ करून देणार होते. कोटी कुळांचा उध्दारकर्ता त्यांनी संरक्षीत केलेल्या वाटेने जाताना अगदी जवळून ते पहाणार होते...!
आणि घडलंही तसंच...
त्यांनी बाबासाहेब ‘पाहिला’... अगदी डोळ्यात 
‘साठवला’. 
बाबासाहेबांचे भाषण मन लावून ऐकले...!
मुंबईत येऊन जीवनाचं सार्थक झाल्याचं त्यांनी आईला सांगितलं....!
वामनदादांमध्ये परिवर्तन झाले.
लाकूडतोड्या, त्याची लोखंडी कुर्‍हाड, ती गोष्टितली विहीर व तो देवदूत..! ही गोष्ट वामनदादांच्या जीवनात प्रत्यक्ष घडली..!
टाटाची नोकरी करता करता थोडी उसंत मिळाली तर दादा शिवडीच्या बागेत जावून बसत. एकदा तेथे बसल्या बसल्या काही शब्दांची जुळवाजुळव केली व एक गौळण तयार केली. चाळीत जावून रात्री मित्रांच्या मैफीलीत गाऊन दाखवली. मित्रांनी शाबासकी दिली. व्वाह व्वाह केली. वामनदादांची छाती फुगून आली. आपण काहीतरी नवीन केल्याची जाणीव झाली.
तेवढ्यात एक वृध्द एक पत्र घेवून वामनदादांजवळ आला व म्हणाला...वामना हे गावाहून पत्र आलं आहे, जरा वाचून दाखव...! 
वामनदादाला लिहिता-वाचता येत नाही, हे त्या वृध्दाला कुठे माहित होते.तो मोठ्या आशेने वामनदादाकडे पत्र वाचायला घेवून आला होता....! ते पत्र पाहून दादांना रडू आलं. त्या वृध्दाला वाटलं या पत्रात बरं-वाईट काहीतरी आहे...., तो वृध्दही रडू लागला. वामनदादा तडक उठले व आपल्या घरी निघून गेले. आज त्यांना शाळा न शिकल्याचा खूप मोठा पश्‍चाताप झाला होता. अक्षरशून्य असणे ही गोष्ट किती वाईट आहे याची त्यांना तीव्र जाणीव झाली होती.
बरं-वाईट असं काही तरी आपण शिकलं पाहिजे. थोडं वाचता आलं पाहिजे , थोडं लिहिता आलं पाहिजे, असं दादांना प्रकर्षाने जाणवलं!
मास्तर शोधायला जास्त प्रयास पडाले नाहीत. समता सैनिक दलातील एक महानुभव सैनिक त्यांना शिकवायला तयार झाला. वामनदादांची डंगरी शाळा -रात्रंशाळा सुरु झाली. एका वर्षात वामनदादा थोडं वाचायला, थोडं लिहायला शिकले....! वामनदादाचा कायापालट झाला, ते 1944 हे सालं होतं . तेव्हापासून सतत साठ वार्ष वामनदादा लिहित राहिले होते. 
तेव्हापासून खर्‍या अर्थाने वामनदादांची ओळख ही वामनदादा कर्डक म्हणून बनली. 
1944 पासून वामनदादा भीममय झालेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच दादांचे श्रेयस आणि प्रेयस झाले.
या सर्व काळात वामनदादा हे बाबासाहेबांचे सावली बनलेत. या संपूर्ण काळात वामनदादा जगले बाबासाहेबांसाठी, गायले बाबासाहेबांसाठी व लिहिले बाबासाहेबांसाठी.
बाबासाहेब हेच त्यांचे प्रेरणा बानलेत. म्हणून या साठ वर्षात एकट्या बाबासाहेबांवर वामनदादांनी 10,000 च्यावर कवणे, गीते, शाहिरी काव्ये रचलित. 
या संपूर्ण लेखन प्रवासात बाबासाहेब हे जसे वामनदादांचे शक्तीस्थळ होते, तसेच बाबासाहेब हेच वामनदादांचे ‘मर्यादा’ ही होते. त्यांचे वीकपाईंट होते....ते कसे? हे आपण नंतर पाहाणार आहोत. 
आपण या लेखनाकडे कसे वळलोत, या आपल्या ‘वाटचाली’बद्दल वामनदादा काय म्हणतात ते पाहू या...
‘बामणाच्या घरी लिवणं !
कुणब्याचा घरी दाणं!
महाराच्या घारी गाणं!’ 
या जातिव्यवस्थाक समाजाच्या सांस्कृतिक विभागणीमुळे मी लेखनाकडे वळलो. माझी जेमतेम आक्षरओळख मुंबईला आल्यावर झाली. गावी गुरे वळणारा वामन मुंबईत कवी झाला तो भीमबाबामुळे.
अशा शब्दात आपल्या गीतांची आंबेडकरी प्रेरणा वामनदादांनी आपल्या ‘वाटचाल’ या गीतसंग्रहात व्यक्त केली आहे.
वामनदादांनी बाबासाहेबांना नायगांवला भाषण करताना प्रथम पाहिले आणि त्यांच्या मनःपटलावर बाबासाहेबांची एक लढाऊ प्रतिमा कायमची कोरली गेली....!
त्यामुळे बाबासाहेबांविषयी वामनदादा लिहितात...
‘वादळी वार्‍यामधी तोफेच्या मार्‍यामधी
पाहिला भीम आम्ही रणी लढणार्‍यामधी’.
वामनदादा, अण्णाभाऊ साठे, अमरशेख, गव्हाणकर, आत्माराम पाटील या शाहीर कवींच्या उदयापूर्वी शाहिरी हा काव्यप्रकार तमाशा, भारुड, गण-गौळण , लावणी इ. रूपात सधन उच्चवर्णिय-जातिय भटजी-लाटजींच्या अंगणात पाणी भरत होती. तीचा परंपरेचा साज उतरवून परिवर्तनाच्या लढाईत तीला आणले ते वर्ग व जातीअंताच्या चळवळींनी.
आपल्या देशात साम्यवादी, समाजवादी व आंबेडकरवादी या चळवळींचे नेतृत्व विविध जातियश्रेणीतून आल्यामुळे या चळवळी जशा एकमेकांशी सांधेजोड न होता सामाजिक, आर्थिक व राजकिय लढ्यात पृथक राहिल्यात, तशा सांस्कृतिक क्षेत्रातही त्या जवळ आल्या नाहीत.
यात वसंत बापट हे एक महत्वाचे नाव होते, जे समाजवादी चळवळीशी निगडीत होते. 
अमरशेख-अण्णाभाऊ-गव्हाणकर हे साम्यवादी चळवळीशी बांधिलकी मानणारे होते, तर वामनदादांची बांधिलकी आंबेडकर चळवळीशी होती.
वसंत बापटांनी शाहिरी मध्यमवर्गात नेली!
अण्णाभाऊंनी कामगार वस्तीत नेली!
, तर वामनदादांनी शाहिरी गावाच्या चावडीवर नेली होती.
वामनदादा हे भीममय झाले होते. बाबासाहेब हेच त्यांचा श्वास व शब्द होते.म्हणून त्यांनी बाबाहेबांच्या प्रत्येक कृतीचा भरभरुन पुरस्कार केला होता.
1956 साली बाबासाहेबांनी बुध्दधम्म अंगीकारल्यानंतर वामनदादांंमधला कवी बौध्द धर्मातील मानवतावाद, समता, मैत्री, शील व करुणा या तत्वावर भर देऊन प्रचारकी रचना करू लागला होता.

या संदर्भात बुध्दांना आपली शब्दकमले अर्पण करताना वामनदादा लिहितात की,...
‘सारे मानव प्राणी ना उच्चनीच कोणी!
कुणीही यावे शुध्द बनावे बुध्दाच्या चरणी!!
इथे नाही जातीवाद! ना पोकळ वर्णभेद!
सर्वांवरती प्रिती करीतो माझा गौतम बुध्द!
दार खुले सर्वांना! शूद्रांना चांडाळांना 
साळी कोळी माळी तेली! विलिन व्हारे त्रिसरणी!’
या गीतात वामनदादा सर्व बहुजन जातींना बुध्द धम्म स्वीकारण्याचे आवाहन करतात.
मात्र बौध्द धम्म फक्त पूर्वाश्रमीच्या महार जातीने स्वीकारल्याचे दिसल्यावर दलितांच्या इतर जाती हिंदुधर्माच्या वर्चस्वाखाली राहिल्या. मात्र आरक्षणाचा लाभ घेण्यात ते पुढे सरसावल्याचे पाहून वामनदादा संताप व खंत व्यक्त करताना म्हणतात..
‘गोळ्या खायला आम्ही आणि पोळ्या खायला तुम्ही ’. 
वामनदादा महार आणि इतर दलित जातींमध्ये जी दरी निर्माण झाली आहे, त्याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना लिहितात...
‘आम्ही भीमाची कोटी मुलं! 
वाहतो पदी त्यांच्या कोटी फुलं!!
महार-मांगचांभाराला! वडारी कैकाड्याला! केलं शिक्षण खुलं!
पण भिमाचं कौतुक फक्त महारांनी केलं!!1!!
सात कोटीला त्यानं होतं आव्हान केलं! 
हिंदुधर्मामध्ये नाही तुमचं भलं 
धर्म त्यागाचं नोटीस फक्त महारांनी दिलं!! 2 !!.
अशा शब्दात वामनदादांनी आपल्या भावनांद्वारे सत्य जगासमोर मांडले होते. या शब्दांमागे, महारेतर जातींनी ज्याप्रकारे बाबासाहेबांना ‘वापरा आणि विसरा’ अशी वागणूक दिली, त्याबद्दल चीड होती व बाबासाहेबांप्रती पोटतीडिक होती.
वामनदादा आता पुरते भीममय झाले होते. बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर तर अधिकच कट्टर आंबेडकरवादी बनले होते.
सामाजिक चळवळीत काम करताना सर्व समावेशक भूमिका घेणं वामनदादांना जमलं नाही. ते कायम बाबासाहेबांप्रती बायस राहिलेत. म्हणून त्याची फळेही त्यांनी भोगलीत.
बाबासाहेबांच्या महानिर्वानानंतर रिपब्लिकन नेत्यांची गटबाजी उफिळून आली.सामान्य दलित जनतेच्या आशा-आकांक्षा या नेत्यांनी धुळीस मिळवल्या. बेच्या पाढ्याने रिपब्लिकन पक्षाचे तुकडे होत गेले. प्रत्येक पुढारी ‘अखिल भारतीय’ झाला. हे चित्र पाहून वामनदादा कमालीचे अस्वस्थ झाले होते. मनाचा एक कोपरा घायाळ झाला होता...वामनदादामधला कवी घायाळ झाला होता.., तेव्हा ते लिहितात...
‘जरा जपून वागा बाई, ती भिमाई आता नाही!
उपसूनी आईच्या कोपीवरले बांबू!
हे बांधू लागले मनाप्रमाणे तंबू 
पुढे लिहितात की,...
.........उन्हात वेडा राही ग बाई ,
ती भीमाई आता नाही!!
दलितांच्या जातीअंतवादी लढ्यांना कम्युनिस्ट पक्षांसह इतर मध्यममार्गी पक्ष अजिबात साथ देणार नाहीत म्हणून बाबासाहेबांनी स्वतःचा पक्ष उभारला होता. मात्र, बाबासाहेबांच्यानंतर तो पक्षच स्वतः गटातटामध्ये विभागला गेल्याने, वामनदादांची अशा फक्त दादासाहेब गायकवाडांवर टिकून राहिली होती.., तेव्हा वामनदादा एका गीतामध्ये दादासाहेब गायकवाडांना उद्देशून लिहितात, विनवणी करतात...
‘किती सांगू तुम्हाला दादा! 
आता तरी, एकतेने नांदा!
अशी विनवणी गायकवाडांना करत असतानाच, दुसरीकडे रूपवते, भंडारे हे मागच्या दाराने काँग्रेसमध्ये जाऊन सुरक्षितता अनुभवत होते, त्यांचा उपहास करताना वामनदादा लिहितात...
‘मासळी बोले पिलाला! 
खेळ बाळा तु तळाला 
दुनिया पहाण्याच्या फंदात पडता!
व्यर्थ लागून जाशील गळाला!!
वामनदादा पुरते भीममय झाले असल्याने त्यांची पारखी नजर प्रत्येक रिपब्लिकन नेत्याच्या खेळीवर खिळली होती. 
संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही प्रायः कम्युनिस्ट-समाजवाद्यांची, काँग्रेसच्या गुजराथी लाबी विरोधाची-शेटजी, लाटजी विरोधातली चळवळ होती; परंतु काँग्रेसने मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा निर्णय घेतल्यानंतर बाबासाहेबांनी मुंबईसाठी रान उठवले व त्यासाठी मुंबई ही कोणाची असा कळीचा प्रश्न विचारला.
मुंबई ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीची रणभूमी होती. मुंबईत दलित समाजाची लोकसंख्या लक्षणीय होती. हे आंदोलन मुंबईत यशस्वी व्हायचे असेल तर बाबासाहेबांना मानणारा प्रचंड जनसमूदाय या आंदोलनात हवाच, या स्वार्थी हेतूने काँम्रेड डांगे, एस.एम.जोशी व आचार्य अत्रे ही मंडळी दिल्लीत बाबासाहेबांना भेटून त्यांची संमती मिळवून आली होती. बाबासाहेबांनीही या लढ्याला पाठिंबा दिला होता. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बर्‍याच बैठका मुंबईत ‘राजगृहात’ झाल्या होत्या.
मुंबई गुजरातला जोडावी म्हणून इंग्रजी वृतपत्रातून वारंवार काही खोडसाळ लेख छापून आणत असे. असे लेख बाबासाहेब वकिली प्रतौयुत्तराने खोडून काढत असत. ‘जनता’ मधून मराठी जनतेची बाजू मांडत असत. एवढेच नव्हे तर 7 जानेवारी 1956 रोजी बाबासाहेबांनी एक पत्रक प्रसिध्द करून केंद्र सरकारचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या प्रस्तावास विरोध केला होता.
मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता का व कशी? याविषयी बाबासाहेबांनी यात लिहिले होते की,
मुंबईचे खरे वारसदार हे कोळी आहेत....मुंबईत गुजराती लोकांची संख्या केवळ 15 टक्के आहे...मग, 50 टक्क्याहून अधिक असलेल्या मराठी जनतेचा हक्क तुम्ही कसे नाकारता...? मुळची कोळी लोकांची वस्ती असलेली मुंबई, पोर्तुगीजांनी राणीकडून भाडेपट्ट्याने घेतली. नंतर ब्रिटिश राजपुत्राच्या लग्नात हुंडा म्हणून ब्रिटिशांना दिली. त्यावेळी मुंबई फक्त कोळी लोकांचीच होती (संदर्भ-डॉ. बाबासाहेबांची समग्र भाषणे, खंड 10,पृ,85.)
त्यानंतर 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुण्यात एस.एम.जोशींच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. या समितीत कम्युनिस्ट, समाजवादी, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आदी सर्वच सहभागी होते. दादासाहेब गायकवाड व बी.सी.कांबळेंच्या या समितीतील सहभागाला बाबासाहेबांचा पाठिंबा होता.
घटनाक्रम एखाद्या चित्रपटासारखे जलद गतीने पुढे जात होते. त्याबरोबर इतिहासही.
बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरात हिंदुधर्माचा त्याग करून बुध्दधम्म स्वीकारला... व पुढे महाराष्ट्राची वाटचाल सामाजिक क्रांतीकडे नेत असताना अचानकपणे 6 डिसेंबर 1956 रोजी, धर्मांतरानंतर अवघ्या 57 दिवसांनी अचानकपणे या जगाचा निरोप घेतला. वामनदादासह सर्व पददलित समाज पोरका झाला होता. भावनाविवश अवस्थेत विवेक जागृत नसतो. त्यात सयुक्त महाराष्ट्र समितीत फूट पडली होती. तरीही दादासाहेब गायकवाडांनी कम्युनिस्टांबरोबर आघाडी चालूच ठेवली होती.
तोपर्यंत प्रस्थापित झालेल्या दलित पुढार्‍यांनी दलित जनतेत प्रचंड कम्युनिस्ट विरोध बिंबवला होता.
वामनदादाही कम्युनिस्टांचा प्रचंड विरोध करत. कम्युनिस्टांत अण्णाभाऊ, अमरशेख, गव्हाणकर हे आपलेच बंधु आहेत ही गोष्ट ते विसरत. त्यामुळे अण्णाभाऊ साठे व अमरशेखांचं वामनदादांशी कधीच पटलं नाही.
कम्युनिस्टांच्या राष्ट्रप्रेमावर शंका घेऊन बाबासाहेब त्यासाठी जी संयुक्त महाराष्ट्र समिती बनवण्यात आली होती, त्यात आंबेडकरी चळवळीचा विरोध असूनही दादासाहेब गायकवाडांनी सहभाग घेतला होता. नेहमीप्रमाणे समिती फुटली तरी दादासाहेबांनी कम्युनिस्टांबरोबर आघाडी कायम ठेवली होती. या गोष्टीचा राग वामनदादांना आला होता. 
तेव्हा दादांनी आपला अंध कम्युनिस्ट विरोध खालीलप्रकारे गीतातून व्यक्त केला होता...
‘लाले लाले नार, तीचा मास्कोमध्ये यार!
अरे अरे वेड्या फसशील रे...
अशा गीतांमुळे अण्णाभाऊंच व वामनदादांमध्ये मैत्रीचे सूर कधीच जमले नाहीत.
बाबासाहेबांचा कम्युनिस्ट विरोध जगजाहीर होता. मात्र, तो बाबासाहेबांनी तात्त्विक पातळीवर ठेवल्यामुळे कम्युनिस्ट, समाजवादी व बाबासाहेबांमध्ये भेटीगाठी होत असत.
संयुक्त महाराष्ट्र समिती 2 फेब्रुवारी 1956 रोजी पुण्यात स्थापन होण्यापूर्वी कॉ. डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे व एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे, वसंत बापट यांच्या कितीतरी पूर्व बैठका राजगृहावर बाबासाहेबांसोबत झाल्या होत्या. बाबासाहेबांनी कोणालाही दूर ठेवले नव्हते. बदलापूरच्या चाफेकरांनाही नाही. त्यांची भूमिका अगदी तंतोतंत महात्मा फुलेंसारखी होती.
मात्र, नेता आणि कार्यकर्ता अनुयायी यामध्ये, त्यांच्या ‘समज’मध्ये खूप अंतर असते.
वामनदादा अगदी भीममय झाले होते. ते पक्के, कट्टर आंबेडकरवादी होते.
असं म्हणू या, ‘कर्मठ आंबेडकरवादी’. ते बाबासाहेबांची नीती जाणून होते. मात्र, त्यांना बाबासाहेबांची रणनीती आवगत नव्हती. इथेच सर्व फरक पडत होता.
वामनदादा असे कर्मठ आंबेडकरवादी असल्याने त्यांनी स्वतःवर निखळ आंबेडकरवादी स्तुतीपर गीतांची मर्यादा आखून घेतल्यामुळे ते दलितेतर समुदायांमध्ये आपलेसे झाले नाहीत. जसे अण्णाभाऊ, अमरशेख झाले होते...!
वामनदादांचे कार्यक्रम रंगले ते चावडीवर. इतर समविचारी, परिवर्तनवादी दोस्तशक्ती व श्रमजीवी, कष्टकर्‍यांच्या लढ्यापासून ते फटकूनच राहिले.
त्यामुळे साठ वर्ष लिहित असूनही त्यांचा स्वर गावकुसाबाहेरच निनादत राहिला. ही उपेक्षा त्यांच्यावर जशी दलितेतर जातींनी लादली, तशी दलित प्रस्थापितांकडूनही ते उपेक्षित राहिले.
रिपब्लिकन पक्षाच्या वाताहतीनंतर बहुसंख्य सामान्य कार्यकर्त्यांचा चळवळीचा आधार तुटला होता...! त्यामुळे कित्येक तमाशाकडे वळले.
वामनदादा मात्र खंबीरपणे, प्रसंगी एकटे फिरून गाणी गात फिरत होते.
दलितांच्या पक्षसंघटनांची गळचेपी करून स्वतःचा स्वार्थ साधणार्‍या दलित पुढार्‍यांप्रमाणे राखीव जागा आणि आरक्षणाच्या सवलतीतून मध्यमवर्गीय बनून, चळवळींबद्दल उदासीन झालेले व्हायीटकॉलर नोकरीदार, बाबासाहेबांना शोभेची बाहुली बनवून जयंत्या, पुण्यतिथ्या, लग्नकार्य, वाढदिवस, वर्षासन, श्राध्द साजरे करणारे व काही दिवस चीवर पांघरुन प्रति तथागत बनून दलित जनतेला मुर्ख बनवणारे छद्मी दलित यांना गेली 50-60 वर्षे जवळून पाहणारे वामनदादा वैतागून खालिलप्रकारे कवन रचून म्हणतात, की यांनीच बाबासाहेबांच्या फसवलं आहे व आपल्या आई-वडिलांच्या तोंडाला काळं फासलं आहे. दलितांत व दलितेतर मागास जातीत ऐवढे भामटे निपजल्यावर बाबासाहेबांच्या विचार, कार्य व अनुयायांना बाह्य शत्रुची गरजच काय?
याविषयी वामनदादा आपली चीड खालील कवनातून व्यक्त करताना लिहितात की,...
‘एकात एक नाही, बापात लेक नाही
अशी भीमाची ही बाळं!
घरादारांची केलीया राळं
यानी नावाला फासलंय काळं!’
पंचवार्षिक योजनांद्वारे नियोजनबध्द विकासाची कास धरल्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या पुढील वीस वर्षात देश अन्नधान्याच्या बाबतीत जसा स्वयंपूर्ण बनला, तसा धरणांनी बारमाही पाण्याची सोय केल्यामुळे जी काही हरितक्रांती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घडून आली, त्यामुळे महाराष्ट्रभर सहकारी चळवळीचे जाळे विणले गेले. सहकारी साखर कारखाने, पतपेढ्या, सहकारी सोसायट्या, ग्रामीण बँका, नाबार्ड, सत्तेचे विकेंद्रिकरण यामुळे मध्यम शेतकरी जातीतून नवश्रीमंत, नवसामंतांचा एक थर जात्यांतर न होता वर्गांतर होऊन नवीन शोषक-शासक बनला..., बाबासाहेबांनी आरक्षण देऊन माणूस म्हणून जगण्यासाठी धडपडणारा दलित तरुण, शेतमजूर दलित महिला या नवसामंतांच्या डोळ्यात सलू लागल्या व तेथून दलित जनता, दलित वस्त्यांवरती अत्याचारांची मालिका सुरु झाली.
बेलछी, शेलटी ते खैरलांजी अशी प्रदीर्घ सिक्वेन्स त्यातून उदयाला आली.अत्याचारांची मालिका चढात्या भांजणीने वाढत गेली.
ग्रामीम भागात स्त्रीमुक्ती व दलित चळवळी रुजू न शकल्याने ग्रामीण नवशोषकांचं फावलं व ते शिरजोर झालेत. ग्रामीण दलित जनता गावं सोडून मुंबईच्या आश्रयाला आली. गावं उजाड झाली व शहरी झोपडपट्टीत वाढ झाली.
अशावेळी वामनदादांची लेखणी प्रतिशोधाची आग ओकू लागाते व म्हणते की,
‘ऐसी हिम्मत आभी तुझमे आये 
की तेरे दुष्मन सर ना उठाये!
बस्ती बस्ती तेरी जल रही है!
गोली भाईसे कुचल गायी है!
कितने भाई तेरे बेलछी मे! 
एक चिता रचाकर जलाए !’
शेवटी वामनदादांना जातमुक्ती महत्वाची वाटत होती. म्हणून त्यांनी आपल्या शोषणाची मुळं रुढीत शोधली व कागदावर जातीय शोषणाचे व्रण..त्यात वामनदादा लिहितात...
‘कुणी बनवलं धनी कुणाला! कुणी बनवलं दास?
कष्टकर्‍यांच्या गळी बांधीला! कुणी गुलामी फास?
वामन ऐक आता! सांगे भीमगाथा 
जून्या पिढीचे नको रूढीचे? बंधन माणसाला!!’.
वामनदादांची गाणी आंबेडकरी चळवळीचे प्रतिबिंब होते. शिक्षण सवलतींमुळे दलित मध्यमवर्ग वाढत चालला होता. जातीय प्रश्नांवर एका टप्प्यात मात केल्यावर वीज, पाणी, महागाई, बेकारी हे भांडावलदारी समाजाचे वर्गीय प्रश्न त्यालाही भेडसावत होते; परंतु आंबेडकरी चळवळीने तिकडे लक्ष दिले नाही. म्हणून वामनदादांच्या गाण्यातही ते विषय आले नाहीत! तसेच, मंडल आयोग समर्थन चळवळीसाठी, दलित-पक्ष संघटना ओबीसींच्या पाठीशी उभ्या राहिल्या. वामनदादांनी त्यांचं स्वागत केलं. मात्र, याच दलित संघटनांनी हिंदु कोडबीलाच्या माध्यमातून दलित स्त्रियांची दलित स्त्रिमुक्ती संघठना उभारली नाही. म्हणून वामनदादांच्या गाण्यातूनही स्त्रिमुक्तीवर गीते आढळत नाहीत.कारण वामनदादांनी केवळ आंबेडकर स्तुतीपर गीत लेखनाची मर्यादा स्वतःवर घालून घेतली होती. त्यामुळे स्त्रीमुक्ती चळवळीचा आशय त्याच्या गीतात आला नाही. ना दलित चळवळी स्त्रीमुक्तीच्या चळवळीकडे वळायला अद्याप तयार नाहीत.
हा आंबेडकवादाचा एक प्रकारे पराभव म्हणावा लागेल! वामनदादा सारखे आंबेडकरी कवी त्याला साक्ष आहेत! 
(टिप  : प्रस्तुत लेखक हे सत्यशोधक, आंबेडकरी व महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक व भाष्यकार आहेत)
- राजाराम सूर्यवंशी, पालघर.

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?