मुंबईतील कष्टकरी जनतेच्यावतीने जोतीराव फुले यांना ‘महात्मा’ पदवी प्रदान!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मुंबईतील कष्टकरी जनतेच्यावतीने जोतीराव फुले यांना ‘महात्मा’ पदवी प्रदान!
दि. 11 मे 1888 रोजी जोतीराव फुले यांना वयास साठ वर्षे पूर्ण झाली होती.
त्यांनी निवडलेला जीवनमार्ग कडकडीत व खडतर होता. या मार्गावर ते सतत चाळीस वर्षे चालत होते. ती एक सामाजिक तपश्चर्या होती. या काळात त्यांना पुरेशा सोयी-सुविधा नसतानाही महाराष्ट्राचा कानाकोपरा धुंडाळून काढला होता. समाज जागृतीसाठी अहोरात्र झटले होते. स्त्रीशुद्रातिशूद्रांच्या दाराकडे ज्ञानगंगा वळविली होती. अन्यायाचा प्रतिकार करण्याची शिकवण जनतेस दिली होती. उच्चवर्णिय स्त्रियांच्या केशवपन व भृणहत्यासारख्या निंदनीय व दयनीय रुढींविरुध्द कृतिशील संघर्ष करून तथाकथित उच्चविर्णयांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले होते.
ब्राह्मण स्त्रियांचे जे उग्र प्रश्न ब्राह्मणांनी सोडवायचे होते, ते या माळ्याच्या पोराने सोडविले होते. समस्त ब्राह्मण समाजावर माळी समाजाचा व जोतीराव फुलेंचा हा हिमालयाएवढा उपकार आहे, जो ब्राह्मणांनी अजूनही फेडलेला नाही! अशा श्रेष्ठ साधूवृत्तीच्या सत्पुरुषाचे अल्पसे उतराई व्हावे, अशी भावना त्यांच्या मुंबईतल्या अनुयायांच्या व नारायण मेघाजी लोखंडे आणि विठ्ठलराव वंडेरांच्या मनात उत्पन्न झाली. त्यांना या माणसात बोधिसत्व दिसले तर साधुंना त्यांच्यात असामान्य माणूस दिसला.
अशा या महापुरुषाला, साधुपुरुषाचा सत्कार करायचा त्यांच्या मुंबईकर अनुयायांनी ठरविले. तारीख मुक्रर केली 11 मे 1888.
मांडवी कोळीवाड्यातील रघुनाथ महाराज सभागृह शृंगारण्यात आले होते. कारण मुक्तीदात्याचे व उध्दारकर्त्याचे ऋण फेडण्यासाठीचा हा समारंभ होता. ब्राह्मण समाजाने जे करायला हवे होते, ते मुंबईकर कष्टकरी कामगार व बहुजनांनी केले होते.
सभास्थानी जसे सुशिक्षित, श्रीमंत, पागोटे घातलेले व फेटेवाले होते, तसेच जीर्ण टोप्या व फाटके कपडे घातलेले असंख्य अनुयायी होते. श्रीमंत घराण्यातील स्त्रिया जशा होत्या, तशा ठिगळांचे लुगडे असलेल्या बहुसंख्य बायाही होत्या.
या समारंभासाठी बडोदे, खानदेश, सातारा, पुणे, विदर्भ, मराठवाडा वगैरे भागातील अनेक नामवंत आले होते.
पंढरीच्या वाळवंटात सर्वस्तरीय विठ्ठलभक्तांची जणू ती मांदियाळी होती!
जोतीराव फुले सभास्थानी येताच उपस्थितांच्या डोळ्यात कृतज्ञता चमकू लागली होती. काहींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.
‘जोतीरावांचे असामान्य धैर्य, त्याग, ध्येयनिष्ठा, समता व समभाव यांचा पुरस्कार व मानवी हक्काचे दरवाजे उघडणारे हे प्रथम महापुरुष आहेत’, अशा आशयाचे गौरवपूर्ण भाषण नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले होते.
इतर मान्यवरांनी सांगितले की,...
‘एकांडी शिलेदारांप्रमाणे प्राणपणाने अज्ञानाविरुध्द, सनातन्यांविरुध्द व परंपरावाद्यांविरुध्द निकराने व प्राणपणाने लढा देणारे हेच एक युगप्रवर्तक आहेत.
असा महात्मा या भारतभूमीत बुध्दकालखंडानंतरच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात शोधूनही सापडणार नाही...’
मान्यवर उपस्थितांच्या या समयोचित भाषणानंतर बडोद्याचे राजे सयाजीराव महाराज गायकवाड यांनी मुद्दाम पाठवून दिलेला संदेश वाचून दाखवण्यात आला…त्यात महाराजांनी लिहून पाठविले होते की,..
‘जोतीराव हे भारातचे बुकर टी वॉशिंग्टन आहेत’.
अशा उत्साहपूर्ण वातावरणात राव बहाद्दूर विठ्ठलराव कृष्णराव वंडेकर यांनी एक भला मोठा हार हातात घेतला व सांगितले की,..
‘यांच्या तपश्चर्यमुळे अखिल महाराष्ट्रातील स्त्री-पुरुषास मानवी हक्कांचा, जागृतीचा व चैतन्याचा कायमचा ठेवा मिळाला. म्हणून हेच आमचे खरे महात्मा!’ व तद्नंतर ‘महात्मा फुले की जय’ असा त्रिवार जयघोष त्यांनी केला व हातातला हार जोतीरावांना अर्पण केला. ते पुढे म्हणाले की,
‘आम्ही स्वयंस्फूर्तीने जोतीरावांना ‘महात्मा’ पदवी अर्पण करीत आहोत’.
अशा भावूक व तितक्याच ऐतिहासिक वातावरणात महात्मा फुले या सत्काराला मोजक्या शब्दात उत्तर द्यायला उठले. टाळ्यांच्या गडगडाटाने सभागृह दुमदुमून गेले. महात्मा क्षणभर थांबले. सभागृह स्तब्ध झाले.
महात्मा बोलू लागले…
‘जनी जनार्दन! संत बोलती उत्तर’ या वचनाप्रमाणे मी अल्पसे कार्य केले. मानवाची सेवा हीच निर्मिकाची सेवा असे माझे मन मला नित्यहि ग्वाही देत आहे. याप्रमाणे मी केले व पुढेही करीत राहीन. सत्यशोधक समाजाच्या कार्यास तुम्ही निष्ठापूर्वक सहाय्य करीत जाणे. हजारो वर्षे जे पददलित म्हणून ठरले गेले, त्यांना माणुसकीचे हक्क देण्यासाठी झटणे यापेक्षा मी दुसरा कोणताच धर्म मानीत नाही. हेच तुम्हा सर्वांचे कर्तव्य आहे. स्त्रिया व अस्पृश्य यांना त्यांच्या जन्मास येण्याचे साफल्य करणे...! त्यांच्या दुर्दशेकडे व हालाखीकडे आजपर्यंत धर्माच्या व शास्त्राच्या नावावर मुद्दाम डोळेझाक झाली, ती दूर करण्यास मदत करा...!! मी माझे कर्तव्य केले. यात विशेष असे माझ्या हातून घडले नाही’, एवढे बोलून महात्म्याचा कंठ दाटून आला. उपरण्याने डोळे पुसत ते सावकाश खुर्चीवर बसले.
सारा सभागृह ‘महात्मा फुले की जय’ या जयघोषांनी कितीतरी वेळ दुमदुमत राहिला..!
जीवनात आपल्या हातून एक खूप महत्त्वाचे कर्तव्य पार पाडल्याची भावना नारायण मेघाजी लोखंडे व रा.ब. विठ्ठलराव वंडेकर यांच्या चेहर्यावर विलसत होती.
एका ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार बनलो, अशी भावना मंचकावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या मनात उद्भवली होती.
एका खर्याखुर्या महामानवाला आपल्या मुंबईने ‘महात्मा’ ही पदवी दिली, या भावनेने सर्व मुंबईकर सुखावले होते.
मुंबई नगरीत एक सामाजिक इतिहास घडला होता.
‘सुसंस्कृत पुण्याने सतावलं, पण कष्टकरी व गतिशील मुंबईने सावरलं, माझ्या पाठीवरून मायेने हात फिरविला’, अशी भावना जोतीरावांच्या मनात दाटून आली होती.
11 मे 1888 या तारखेने इतिहास घडविला होता.
-राजाराम सूर्यवंशी
(लेखक सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक आहेत)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा