दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

वादग्रस्त : ‘अस्पृश्यांनो, कम्युनिस्टात जा!’; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हवाला देत प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांचा दावा

वादग्रस्त : ‘अस्पृश्यांनो, कम्युनिस्टात जा!’; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हवाला देत प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांचा दावा

👉कोण म्हणतंय वेदांमध्ये तत्त्वज्ञान आहे?; महात्मा फुले आशिया खंडातले महान तत्त्वज्ञ

👉उद्घाटनाला चातुर्वर्ण्याची उतरंड फोडून भरगच्च प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अधिवेशन उत्साहात

औरंगाबाद : सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सावाचे उद्घाटन चातुर्वर्ण्याची उतरंड फोडून करण्यात आले. उद्घाटक डॉ. भारत पाटणकर चातुर्वर्ण्याच्या उतरंडीवर काठीने प्रहार करताना, सोबत उद्घाटन सत्राचे अध्यक्ष डॉ. जनार्दन वाघमारे, स्वागताध्यक्ष आमदार सतीश चव्हाण, मुख्य आयोजक के. ई. हरिदास, माजी न्या. डी. आर. शेळके आदी. (छायाचित्र : सपकाळ फोटो)


सत्याचे दमनकारी जेव्हा सत्यशोधकांची जागा बळकावतात, तेव्हा सत्यशोधक चळवळीचा विनाश अटळ आहे. भांडवलदार, सरंजामदार बहुरूपी बनून येतात आणि आपणच सत्यशोधक असल्याचा बनाव करतात. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे आज सत्व हरवले असले तरी, भांडवलदार, सरंजामदरांकडून ती चळवळच हायजॅक करण्याचा डाव रचला जात असताना आमच्यातलेच वैचारिक बुद्धिभेद करतात, यापेक्षा वाईट ते काय?
-संपादक
 
भास्कर सरोदे, औरंगाबाद :
क्रांती आणि प्रतिक्रांतीचे मूळ खासगी मालकीत आहे. खासगी मालकीलाच भांडवलशाही म्हणतात. खासगी मालकी अर्थात भांडवलशाही सुरक्षित ठेवण्यासाठी जगाची धडपड सुरू आहे. तथापि, परिस्थितीनुरूप नवं रूप धारण करण्याची भांडवलशाहीची क्षमता आता संपुष्टात आली आहे. जगाच्या परिघात कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाला प्रचंड मागणी वाढलीय. तोच भांडवलशाहीविरोधात लढण्याचा पर्याय दृष्टिक्षेपात असल्याचे अप्रत्यक्ष मत सुप्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांनी मांडले. दरम्यान, बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांनीच 1952 साली दादासाहेब गायकवाड यांना पत्र लिहून अस्पृश्यांनी कम्युनिस्टांत जावे, असे म्हटले होते, असा दावा डॉ. कसबे यांनी केला. मात्र, त्यांच्या या दाव्यावर आता वाद निर्माण झाला आहे. डॉ. कसबे यांचे सविस्तर भाषण आणि प्रतिवादीचे पुराव्यासह म्हणणे पुढीलप्रमाणे
सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, औरंगाबाद आयोजित ‘सत्यशोधक समाज-शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अधिवेशना’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉ. स्मिता पानसरे, डॉ. भारत पाटणकर, प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांची विचारमंचावर विशेष उपस्थिती होती, तर मा. न्या. डी. आर. शेळके, अ‍ॅड. के. ई. हरिदास, अभियंता महेश निनाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, आपल्याला आता सत्यशोधक समाजाची आठवण झाली. महात्मा जोतीराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा हा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आहे, असे महोत्सव होत राहतीलच. मात्र, महात्मा जोतीराव फुलेंची आठवण का करावी? त्यांची नुसती आठवण काढून त्यांनी काय केलं, हे आपल्याला का सांगायचं? त्यांनी जे केलं, त्याचं विश्‍लेषण का करायचं? त्याची दोन कारणे आहेत. एक, महात्मा जोतीराव फुले हे 19 व्या शतकातले आशिया खंडातील महान तत्त्वज्ञ होते. ‘महात्मा फुले हे तत्त्वज्ञ नव्हते’ असे म्हणणार्‍यांसाठी ही चपराक आहे. दुसरी बाब म्हणजे महात्मा जोतीराव फुले यांनी 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा काढण्याचे क्रांतीकारी कार्य केले. याच काळात विख्यात तत्त्वज्ञ कार्ल मार्क्सने ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’ जाहीर केला. महात्मा जोतीराव फुलेंना कर्ते सुधारक वगैरे असे काही म्हटले जाते, तर ते तसं नाही. महात्मा फुले महान प्रज्ञावंत होते, बहुजन समाजातून आलेला एक मोठा प्रज्ञावंत होता. जेव्हा भारताचा खरा इतिहास लिहिला जाईल, त्यांचं स्थान भारतीय इतिहासात अढळ राहील.

औरंगाबाद : सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा समारोप करताना प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, विचारमंचावर डॉ. भारत पाटणकर, प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे, आमदार सतीश चव्हाण, अ‍ॅड. के. ई. हरिदास, माजी. न्या. डी. आर. शेळके आदी. (छायाचित्र : सपकाळ फोटो)

डॉ. आंबेडकर आणि मार्क्सच्या सूत्रांमध्ये संवाद :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या इतिहासासंबंधी सूत्र सांगितले, तर कार्ल मार्क्सने जगाच्या इतिहासाचे सूत्र दिले. मनुष्यजातीचा विकास कसकसा होत गेला, तो कोणकोणत्या टप्प्यावर होत गेला, आणि तो पुढे तो कसा होणार आहे, यासंबंधीचे एक समग्र चिंतन कार्ल मार्क्सने दिले. मात्र, बाबासाहेबांनी भारतीय इतिहासाचे सूत्रं वेगळं मांडलं. हे सूत्र जरी तुम्हाला वेगळं वाटत असले तरी त्यांच्या सूत्रांमध्ये एक संवाद होता. एक मानवी समाजाची भौतिक अवस्था सांगते. म्हणजे प्राथमिक समाज, सामंतशाही, भांडवलशाही, गुलामगिरी, समाजवाद आणि साम्यवाद. कार्लने समाजविकासाची भौतिक अवस्था मांडली. तर बाबासाहेबांनी भारतीय इतिहासाची तात्त्विक मांडणी करतात. आणि भारतीय इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या कड्यांची साखळी असल्याचे सांगतात. क्रांती आणि प्रतिक्रांतीतील द्वंद भारतीय समाजात सातत्याने चालू असतं.

वेदांमध्ये कुठलेही तत्त्वज्ञान नाही :

डॉ. रावसाहेब कसबे यांनी आपले चिंतन सादर करताना वेदांवर कठोर प्रहार केले. ते म्हणतात, ‘लोक म्हणतात वेदांमध्ये तत्त्वज्ञान आहे. माझ्या मते एक तर ते स्वत: मूर्ख असले पाहिजे किंवा दुसर्‍याला तरी मूर्ख बनवत असले पाहिजेत. मी सगळ्या वेद आणि उपनिषदांचा सहा वर्षे अभ्यास केला. वाराणसीत अनेक मुक्‍काम टाकले. तेथील ऋग्वेदांच्या अभ्यासक कवी-ऋषींना प्रश्‍न केला की, ऋग्वेदामध्ये माणसासंबंधीचे काय तत्त्वज्ञान आहे? ते आजपर्यंत उत्तर देऊ शकले नाही. कारण या प्रश्‍नाचे उत्तर वेदांमध्ये नाही. एवढेच काय वेदांमध्ये कुठलेच तत्त्वज्ञान नाही. माणसाला लागणार्‍या भौतिक सुख प्राप्‍ती होण्यासाठी निसर्गाकडून ज्या अपेक्षा करावयाच्या आहेत, त्या त्यांनी काव्यात्मक मांडल्या एवढेच’. मग त्यांनी पर्जन्य, अग्‍निवर सूक्‍त लिहिले. त्यांनी उषासूक्‍त लिहिले. मी या सर्व सूक्‍ताची मराठी भाषांतर केली आहेत. नाही म्हटले तर ऋग्वेदातील नासदीयसूक्‍त काहीसे तत्त्वज्ञानाकडे जाते. यात विश्‍वाच्या निर्मितीबाबत माहिती दिली आहे. मात्र, तेही फारसं महत्वाचे नाही. एक मात्र खरं की त्यावेळी विश्‍वाच्या निर्मितीविषयी विचार करणारे माणसं होती. त्यापलीकडे ऋग्वेदामध्ये कुठलेही तत्त्वज्ञान नाही, हे सांगण्याचे धाडस आणि ते करणारा पहिला महापुरुष जोतीराव फुले होत. 

वेद भाषांतरित झाले तर लोक लाथाडतील! :

महात्मा जोतीराव फुले यांनी विवेकवादी, विज्ञानवादी सत्य जगापुढे मांडले. त्यांनी जाहीर आवाहनच केले की, जे वेद संस्कृतमध्ये आहेत, ते मराठीत आणा. मराठी सुशिक्षित वाचतील त्यावेळी ते त्याला लाथेने उडवतील. जेव्हा स्त्रिया वाचतील तेव्हा त्या वेदांवर थुंकतील. अशा नको त्या गोष्टी वेदांमध्ये आहेत. वेदांमध्ये सख्ख्या भावाचे त्याच्या बहिणीशी संबंध आहेत. यमा आणि यमीचे संबंध आहेत. आणि यमी आपल्या भावाला सांगते की, तू ये आणि मला शरीरसुख दे. तोपर्यंत खासगी मालमत्ता नावाचा प्रकार नव्हता. 

वेदानंतर आली पितृसत्ता :

वेदांमधून खासगी मालकीचा हक्‍क प्रस्थापित झाला. त्यातूनच पितृसत्ताक पद्धती आली. त्यापूर्वी येथे मातृसत्ता होती. स्त्रीसत्तेविषयी वाद असू शकतो, मात्र मातृसत्ता जगभर होती. ही पितृसत्ता पद्धती काय भानगड आहे? तर ही पितृसत्ताक पद्धती निर्माण झाली जेव्हा खासगी मालकीचा संबंध प्रस्थापित झाला. खासगी मालकीतून विवाह संस्था व राज्य संस्था जन्माला आल्या. स्त्रीदास्य कुठून सुरू झाले? तर स्त्रीदास्याचा उगम विवाहसंस्थेत आहे. तो यासाठी आहे की, ‘मी जेकाही कमवेन ते माझ्या रक्‍ताला मिळावं’. म्हणून आपल्याकडे पातिव्रत्याची कल्पना आली. विशेषत: योनीसुचिता आली. ही कल्पना जी आहे, ती या खासगी मालमत्तेचेच्याच भानगडीचे एक अंग आहे. कारण माझ्या पत्नीशी मीच रत होणार, त्यापासूनची संतती माझ्या बिजाचीच असली पाहिजे, याविचारातूनच स्त्रीच्या शोषणाला सुरूवात झाली. म्हणून मी म्हणतो, स्त्रीदास्याची सुरुवात विवाहसंस्थेतून झाली. पुरुष मोकळा राहिला. त्याच्यावर कुठलीही बंधन नव्हती. स्त्रियांवर बंधनं आली. या स्त्रीचा एखाद्या यंत्रासारखा उपयोग केला. मग त्यातूनच भारतात जातीयेता जन्मली. म्हणजेच भारतीय जातीयेतेचा उगमसुद्धा विवाहसंस्थेत आहे. 

‘तेच’ आता शाकाहाराच्या गप्पा मारतात :

यापूर्वी वेदांनी एक कर्मकांड निर्माण केले होते. यज्ञसंस्था. हे कर्मकांड खूपच वाईट. यज्ञसंस्था इतकी वाईट होती…दक्षिणेपोटी यजमानाची तरुण मुलगी वा बायको मागितली जायची. आजच्या लोकांचा यावर विश्‍वास बसत नाही, पण हे खरं आहे. ऐतरिय उपनिषधांमध्ये हे सगळं लिहिले आहे. यज्ञ करायला चार पुरोहित पुरूष असायचे. यज्ञात जनावर कापले जात. त्याची कलेजी, चॉप्स, खूरमुंढी कुणी घ्यायची यावरून पुरोहितांत भांडणं होऊन हाणामार्‍या झाल्या. न्यायनिवाड्यानंतर यज्ञात दिला जाणार्‍या पशुचा कोणता भाग कुणी घ्यायचा हे ठरले. यजमानाला त्या प्राण्याचा अंडकोष आणि यजमानीला शेपटी असेही ठरले. ऐतरिय उपनिषधांमध्ये ही वाटणी केली आहे. आता तेच शाखाहाराच्या गप्पा मारतात, असा टोलाही डॉ. कसबे यांनी लगावला. मी या श्‍लोकाचे भाषांतर करण्यास भारतातील तज्ज्ञांना सांगितले, मात्र, एकही तयार झाला नाही. कारण ही त्यांची लबाडी. याच कारणामुळे वेदांचे भाषांतर मराठीत येऊ द्या. मराठीत वेद आणण्याचे महात्मा फुलेंचे आवाहन कुणीही स्वीकारले नाही.  

वेदांविरोधात उपनिषधांची क्रांती :

पुरोहितवर्ग कर्मकांडांआधारे जनतेचे शोषण करीत राहिला. यज्ञप्रसंगी मिळणारे धान्य किती, रोकड किती, सोनं किती, याचा हिशेब करायला सुरुवात झाली. आणि भारतात एक पुरोहित वर्ग असा बनला की तो जनतेचे शोषण करीत राहिला. या जनतेचं शोषण सुखरूप व्हावं, यासाठी त्यांनी आपली सगळी शक्‍ती पणाला लावली आणि वेगवेगळे ग्रंथ लिहिले. त्याविरोधात पहिलांदा क्षत्रियांनी बंड केले. डॉ. आंबेडकर जे सांगतात ते नीट समजून घ्या. तो वर्गसंघर्ष होता. ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय वर्गसंघर्षातून तात्त्विक पातळीवर उपनिषधं आली. उपनिषधं क्षत्रियांनी निर्माण केली आहेत. उपनिषधांनी जाहीर केले की, ‘जे यज्ञ करतात, ते मूर्ख आहेत. ते बुडणार्‍या नावेत बसले आहेत. ते एक दिवस बुडून जातील’. वास्तवात तो ब्राह्मण विरूद्ध क्षत्रियांचा संघर्ष होता. वेद विरुद्ध उपनिषेधाचा वास्तवातला संघर्ष तात्त्विक पातळीवर गेला. काय म्हणणं होतं उपनिषधांचं? वेद माणसाचे बाह्यविश्‍व सांगते. तर उपनिषधं हे माणसाचे अंतरविश्‍व सांगतात. हे क्षत्रियांचे तत्त्वज्ञान. ही उपनिषधं तथागत बुद्धाच्या आधीची. भारतीय इतिहासात तत्त्वज्ञान हे फक्‍त उपनिषधात आहे. हीच वेदांच्या विरोधात उपनिषधांची क्रांती होय.

बुध्द आणि फुलेंचा वैचारिक संबंध :

उपनिषधानंतर तथागत बुध्द आणि भगवान महाविर आले. ते दोघेही क्षत्रिय होते. त्यांनी आपले तत्त्वज्ञान मांडले. ज्याप्रमाणे उपनिषधं वेदांच्या विरोधात लढले, त्याप्रमाणेच हे दोघेही वेदांच्या विरोधात लढले. आणि त्यांनी क्रांती केली. वेदांच्याविरोधात पहिल्यांदा उपनिषधांनी क्रांती केली. भारताचा इतिहास तिथून पुढे क्रांती आणि प्रतिक्रांतीची साखळी बनली. तथागत बुद्धाच्या तत्त्वज्ञानाविषयी मॅक्स म्युलर यांचे लिखाण प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, ‘आशिया खंडात भारत नावाचा देश आहे. या देशात जेव्हा तथागत बुद्धाचे तत्त्वज्ञान स्थापित झाले, तेव्हा संपूर्ण जग ज्ञानाच्या प्रकाशानं वेढलं गेलं. ही जगातील सर्वात मोठी वैचारिक क्रांती होती’. तथागत बुद्धाचे तत्त्वज्ञान खूप साधे आणि सरळ आहे. बुद्ध म्हणतात, माणूस जगतो कशासाठी? माणूस जगतो याचं कारण त्याला मरता येत नाही म्हणून. त्याला मरता आलं असतं नं तर त्याने जगणं कधीच सोडलं असतं. बुद्धांनी सांगितलं की, ‘माणसाला मरता येत नाही म्हणून तो जगतो ही बाब खरी असली तरी तो दु:खात जगतो. माणसाचे अंत:करण दु:खानी ओतप्रोत भरलेले आहे. मला दु:ख नष्ट करायचे आणि माणसाला जगण्याचे प्रयोजन द्यायचे आहे’. तुमच्याकडे जगण्याचे प्रयोजन नसेल तर जगण्याला काही अर्थ नाही. बुद्ध म्हणायचे की माणसाच्या जीवनात दु:ख आहे, त्यालाच मार्क्स एक्सप्लॉयटेशन म्हणत होता. तथागत बुद्धांनी चार आर्यसत्य सांगून अष्टांगिक मार्गातून दु:ख मुक्‍तीचे तत्त्वज्ञान दिले. हे तत्त्वज्ञान नीती म्हणजेच सदाचारावर अवलंबून आहे. महात्मा फुले यांनी हेच तत्त्वज्ञान त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्ममधून मांडले आहे. ‘मानवी नीती हीच धर्मनीती, मानवांचा धर्म सत्य खरी नीती’. सत्य आणि नीती यात ते फरक करत नाहीत. बुद्ध आणि महात्मा फुले यांच्यात हा संबंध आहे. तो मूलतत्त्वी आंबेडकरवाद्यांना आजही मान्य होत नाही, अशी खंतही डॉ. कसबे यांनी व्यक्‍त केली. 

प्रतिक्रांतीची सुुरुवात मनुस्मृती आणि भगवतगीतेने केली :

तथागत बुद्धाच्या धम्मक्रांतीला काटशह देण्यासाठी भगवतगीतेची निर्मिती झाली. बुद्ध तत्त्वज्ञानाच्या विरोधात सारे धर्म-संप्रदाय एकत्र आले. डॉ. कसबे म्हणाले, प्रतिक्रांती का होते? तर या प्रतिक्रांतीला खासगी मालकी जपून ठेवायची असते. जेव्हा खासगी मालमत्ता अडचणीत येते तेव्हा प्रतिक्रांती होते. महाभारत काय आहे? महाभारत हे इतिहास काव्य आहे. काय आहे त्यात? भावाभावांतील मालकी हक्‍काचे भांडण. संपूर्ण गीताचे तत्त्वज्ञान महाभारतात घुसडलेले आहे. त्याची समीक्षा मी केलेली आहे. भगवतगीता काय सांगते? खासगी मालमत्तेसाठी तुम्ही भावाचा, काकाचा, मामाचा खून केला तरी चालेल, तो धर्म आहे. लोक म्हणतात गीतेत खूप तत्त्वज्ञान आहे. काय तत्त्वज्ञान आहे? अरे, गीतेत कोणतेच सुसंगत तत्त्वज्ञान नाही. तिथं निरीश्‍वरवादी सांख्यबळ आहे, तिथे कर्माप्रमाणे काम करणारा कर्मयोग आहे, कर्म सोडायला सांगणारा कर्मसन्यास आहे, भक्‍तीपण आहे, तिथे काय नाही? माणसाला काहीना काही आवडतचं असते. तुम्हाला जे पटलं ते घ्या, असा तो व्यवहार आहे. म्हणून प्रतिक्रांतीची सुरुवात मनुस्मृती आणि भगवतगीतेने केली. मनुस्मृती आणि भगवतगीता या जुळ्या बहिणी आहेत.

मनुस्मृतीविरोधात विद्रोह :

मनुस्मृती आणि चातुर्वर्ण्याचा हा कालखंड असाच चालत राहिला. नवव्या शतकात शंकराचायांनी बौद्धांच्या कत्तली केल्या. दरम्यान, त्याचवेळेला दक्षिणेत भक्‍ती चळवळ उभी राहिली, आल्वारांची. आणि ती चळवळ बहुजन समाजाची होती. त्याच्या प्रमुख स्त्रिया होत्या. आंगल नावाच्या स्त्रीने या चळवळीचे नेतृत्व केले. बसवण्णाच्या चळवळीत अकप्मा प्रमुख होती. ती चळवळीचे नेतृत्व करीत होती. तर उत्तरेत मीरा नेतृत्व करीत होती. तिने अस्पृश्य असलेला रविदास गुरू केला आणि ठणकावून सांगितले की, ‘मला रविदासाचा अभिमान आहे’. हा मनुस्मृती आणि चातुर्वर्ण्याविरोधात विद्रोह होता.

कम्युनिष्टांमध्ये जा..! :

डॉ. रावसाहेब कसबे म्हणतात, मी 1978 साली ‘झोत’ लिहून पुढे काय होणार आहे, ते सांगितले होते. आरएसएस पुढे जाऊन काय करणार आहे, ते मी 1978 साली सांगितले आहे. ते सर्वांना आता दिसतच आहे. 1985 पासून मी सांगत होतो की, बाबासाहेब आणि कार्ल मार्क्स यांच्यात संवाद वाढवा. समाजवादी, साम्यवाद्यांना सांगून बघितले. ज्यांच्या रक्‍तातच बाबासाहेब आहे, त्यांनाही सांगून बघितले. आता कुठे डी. राजा म्हणायला लागले की, डॉ. आंबेडकर आणि मार्क्समध्ये संवाद चालू आहे. पुस्तक लिहून सांगू लागले आहेत. अरे, संवाद काय सुरू आहे, हा संवाद झालेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरू मानले तेव्हाच हा संवाद संपला होता. कारण महात्मा फुले आशियातला मोठा मार्क्स होता. संवाद तिथेच संपलेला आहे. 29 फेब्रुवारी 1952 साली दादासाहेब गायकवाड यांना पत्र पाठवून कम्युनिष्टांमध्ये जा, असे बाबासाहेब म्हणतात, असा दावाही डॉ. कसबे यांनी केला. डॉ. कसबे जोर देऊन बाबासाहेबांच्या पत्राचा हवाला देतात. त्या पत्रातील संवाद पुढीलप्रमाणे असल्याचाही दावा डॉ. कसबे करतात तो असा... ‘मला स्वत:चं एक तत्त्वज्ञान आहे, मला स्वत:ची जगण्याची एक दृष्टी आहे, माझा एक विचार आहे, आणि हा विचार प्रत्यक्षात यायला खूऽऽप वर्षे लागणार आहेत. आणि तुमचे अस्पृश्यांचे प्रश्‍न तर निकडीचे आहेत. तुम्हाला तोपर्यंत थांबता येणार नाही. तुम्ही माझ्या पाठीमागे लागू नका. मला राजकारणातून मोकळं करा. मी भारतीय लोकांना समजेपर्यंत तुम्ही काय करणार? निदान तोपर्यंत तुम्ही कम्युनिष्ट पक्षामध्ये जा आणि आपले प्रश्‍न सोडवून घ्या’. बाबासाहेब आंबेडकरांनी हा संवाद 1952 सालीच संपवलेला आहे. आणि तुम्ही आता संवाद करायला निघालात?, असा सवाल डॉ. कसबे यांनी केला.

सत्याचा विपर्यास..!

आयुष्यमान डॉ. रावसाहेब कसबे सरांचा कम्युनिस्टांप्रती असणारा सॉफ्टकॉर्नर व आयुष्यमान डॉ. जनार्दन वाघमारे सरांचे आर्यसमाज विषय असणारे चुकीचे आकलन…दि. 24 सप्टेंबर 2022 रोजी औरंगाबाद येथे सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अधिवेशनानिमित्ताने केलेले विधान
1. डॉ. रावसाहेब कसबे सर, बाबासाहेबांचे 29 फेब्रुवारी 1952 चे पत्र संदर्भ म्हणून उद्धृत करतात व त्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी ‘तुम्ही कम्युनिस्ट पक्षात जा’, असे म्हटले हे विधान करतात…तथापि, सदरील पत्राची पार्श्वभूमी अशी आहे…1951 व 1952 मध्ये schedule caste federation या बाबासाहेबांच्या पक्षात काही तुरळक कार्यकर्त्यांची चलबिचल सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब म्हणतात, ‘माझे तत्वज्ञान ठरलेले आहेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा समझोता होणार नाही. ज्याला पाहिजे त्यांनी कम्युनिस्टांमध्येही जावे. मी मात्र माझ्या तत्त्वज्ञानावर ठाम आहे…हा बाबासाहेबांचा सल्ला नव्हे तर अप्रमाणिक कार्यकर्त्यांप्रती उपरोधिक टोला आहे….वाचकांच्या सोयीसाठी बाबासाहेबांचे ओरिजनल आणि भाषांतरीत पत्र जोडले आहे. ते प्रामाणिकपणे वाचले तर बाबासाहेबांची पत्रामागील उद्विग्नता लक्षात आल्यावाचून रहात नाही. या पत्रावरून समाजाचा कसा बुद्धिभेद केला जातोय, तो दूर व्हावा एवढाच हेतू आहे.
2. डॉ. वाघमारे सर आर्य समाजाची एक मर्यादा ओलांडून स्तुती करतात तेव्हा आर्य समाजाची वास्तविकता समोर आणणे गरजेचे आहे. बाबासाहेबांवर सर्वाधिक टीकेचा सूर हा आर्य समाजाचा होता, अजूनही आहे. आर्य समाजाने कुठलेही समतेचे कार्य केले नाही, तर चातुर्वर्ण्य धर्म बळकट करण्याचे काम केले. त्यामुळेच पंडित राहुल सांकृत्यायन, भंते जगदिश काष्याप, प्रसिद्ध विद्वान संस्कृत पाली भाषेचे पंडित डॉक्टर सुरेंद्र शर्मा हे पूर्वी आर्य समाजात असणारे नंतर त्यामधून बाहेर पडले. यासंदर्भात जिज्ञासूंनी डॉक्टर सुरेंद्र शर्मा-अज्ञात यांची आर्य समाजावर लिहिलेली ‘मनुस्मृति बनाम आंबेडकर’ हे पुस्तक अवश्य वाचावे. त्यातून स्पष्ट होऊन जाईल की, आर्य समाजाला चातुर्वर्ण्य कसे अपेक्षित होते व आहे…आर्य समाजाचे खाण्याचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत
-प्रकाश तुपे, औरंगाबाद.
Enclosures
1.aforesaid letter of Dr. Babasaheb ­Ambedkar.... original copy with translation.
2. aforsaid book... written by Dr. Surendra Sharma agnyat



जग एका ज्वालामुखीच्या कड्यावर उभं…:

19 व्या शतकात महात्मा फुले होऊन गेले. जेव्हा ज्ञानबंदी होती तेव्हा महात्मा फुलेंनी बंड केले. विद्येविना काय काय झाले ते सांगितले. 19 वं शतक होऊन गेलं. आता 2022 मध्ये ज्ञानाची काय अवस्था आहे. आता जग एका मुठीत आले आहे. आज कुठे आहे ज्ञानबंदी? एकाही राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण बनू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीचे खासगी मालकी मूळ आहे. आज काय परिस्थिती आहे? संपूर्ण जग एका ज्वालामुखीच्या एका कड्यावर उभं आहे. 2008 सालापासून जगात पुन्हा मार्क्स येणार याची चाहूल लागली आहे. त्याच्या लिखाणाची विक्री प्रचंड वाढली आहे. बदलत्या काळातील भांडवलशाहीवरील आंतरराष्ट्रीयस्तरावरील 50 पुस्तके मी वाचली आहेत. म्हणून भांडवलशाहीकडे लक्ष द्या. भांडवलशाही म्हणजे खासगी मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी जगाचा आटापिटा सुरू आहे.

भांडवलशाहीच खरा शत्रू :

डॉ. कसबे यांनी भांडवलशाहीसंबंधी ओहापोह करताना म्हणतात, तुमचा मुख्य शत्रू कोण आहे? ब्राह्मण की धर्म? भांडवलशाही आपली खासगी मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी ब्राह्मण आणि धर्मालाही चालवते. भांडवलशाही इतक्या वर्षे टिकली का? तर तिच्यात स्वत:ला बदलण्याची क्षमता आहे. मी तिला वारांगणा म्हणतो. ती वेळोवेळी परिस्थितीनुरूप वेगवेगळी रूप घेत येत असते. मात्र, अ‍ॅडम स्मिथ पासून ते रिकॉर्डोपर्यंतच्या अर्थशास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की, आज परिस्थितीप्रमाणे नवंरूप धारण करण्याची क्षमता भांडवलशाहीची संपली आहे, ती आता नवं रूप धारण करू शकत नाही. मग काय करावं लागेल. सत्यशोधकांना काय करावं लागेल? आंबेडकरवाद्यांना काय करावं लागेल? आंबेडकरवादी म्हणजे त्यांच्या जातीतले नाही. बाबासाहेब म्हणत होते नं की, एक दिवस हे लोक मला समजतील. आणि त्यांच्या पश्‍चात 40 वर्षानंतर जगाला आणि भारताला आंबेडकर समजले आहेत. म्हणूनच जगातलं आणि भारतातील कोणतचं आंदोलन बाबासाहेबांच्या फोटोशिवाय चालू शकत नाही. मग ते शेतकरी आंदोलन असो की, एनआरसी-सीएएचे आंदोलन असो वा इतर कोणतेही आंदोलन असो. केजरीवालनी तर आपल्या पाठीमागे ते दोन फोटो लावलेलेच आहेत. अर्थात तो भाजपला किती मदत करणार तो भाग वेगळा. आता सर्वांना बाबासाहेब समजले. ते दलितेतरांना समजले, अभ्यासकांना समजले, बुद्धिवाद्यांना समजले. म्हणून बाबासाहेबांच्या नावाशिवाय देशात यापुढे काहीही चालणार नाही, याची मला खात्री आहे.
मग सत्यशोधक आणि आंबेडकरवाद्यांची काय जबाबदारी आहे? या भांडवलशाहीचे स्वरूप निश्‍चित करा, तिचे विश्‍लेषण करा, तिची समीक्षा करा आणि तिच्यातून मार्ग कसा काढायचा ते बघा. तिच्यातून मार्ग काढायला फुले उपयोगी पडतीलच असे नाही; परंतु फुलेंची चेतना उपयोगी पडू शकते. त्यासाठी आंबेडकर किती उपयोगी पडतील हे आपल्याला अभ्यासातून शोधावे लागेल. त्यासाठी बुद्ध आणि कबीर किती उपयोगी पडतील, हे आपण शोधलं पाहिजे. यासाठी आपण आता कटिबद्ध राहिलं पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात महात्मा जोतीराव फुले यांच्यापासून सुरूवात करावी लागेल. फुलेंपासून सुरुवात करून जसजशी आपण भांडवलशाहीची समीक्षा करू, तसतशी धर्माची समीक्षा होईल. कारण भांडवलशाही नेहमीच धर्माला उभं करते. ती ओसामा बिन लादेनलाही जन्माला घालते आणि त्याचा उपयोग संपला की त्याला मारून पण टाकते आणि तो कुठे गाडला गेलाय हे लोकांना समजू नये याची व्यवस्था पण करते. भांडवलशाही धर्मा-धर्मामध्ये भांडण पण लावते आणि धर्मा-धर्मामध्ये समझोताही करते. भांडवलशाही धार्मिक मूलतत्त्ववाद्यांनाही जोपासते, आणि जिथे अडचणीत येईल तेव्हा त्याला संपवतेही. भांडवलशाहीची ही क्षमता आहे. 
आज अशी अवस्था आहे. पुढे काय होईल, ते सांगता येत नाही. म्हणून सावध रहा! विचार करा, काय निर्णय घ्यायचा तो तुम्हीच ठरवा, असे म्हणून डॉ. रावसाहेब कसबे यांनी आपल्या वाणीला पूर्णविराम दिला.

लक्षवेधी उद्घाटन :

सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन लक्षवेधी ठरले. चातुर्वर्ण्याची चौकट मोडून अमृता नानासाहेब जाधव व सुमित सुभाष निंदाणे यांचा आंतरधर्मिय विवाह सत्यशोधक पद्धतीने करण्यात आला. अमृता बौद्ध तर सुमित हिंदू धर्मिय आहे. यावेळी कुठलेही कर्मकांड वा विधीचा सोपास्कार करण्यात आला नाही. अत्यंत साध्या पद्धतीने हे नवदांपत्य विवाहबद्ध झाले. समाधान इंगळे यांनी बहारदार सूत्रसंचलन केले. समारोपानंतर सायंकाळच्या सत्रात सत्यशोधक जलसा, चौसाळा आणि त्यानंतर सचिन माळी आणि शीतल साठे यांचा नवयान महाजलसाने सत्यशोधक समाज अधिवेशनाला प्रबोधनाचा साज चढविली. सचिन माळी आणि शीतल साठे यांच्या वेगळ्या धाटणीतील मांडणीने सभागृह कधी गंभीर तर खळाळून हसले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

(सविस्तर वृत्त बहुजन शासकमध्ये वाचा…)

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?