आपणास हे माहिती आहे का?; देशातला पहिला सहकारी साखर कारखाना सत्यशोधकांनी केला होता स्थापन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आपणास हे माहिती आहे का?; देशातला पहिला सहकारी साखर कारखाना सत्यशोधकांनी केला होता स्थापन
-सत्यशोधक समाजाची दीडशे वर्ष; सत्यशोधक समाज व सहकार चळवळ
![]() |
माळीनगर : दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि. माळीनगर, हा देशातला पहिला सहकारी साखर कारखाना सत्यशोधकांनी स्थापन केला. |
सत्यशोधक रावजी पाटलांनी आळ्यातील सत्यशोकांना एकत्र आणून 1916 साली ‘आळे विविध कार्यकारी सोसायटी’ स्थापन केली होती. गुरुवर्य केशवराव विचारेंनी हेच कार्य सातारा जिल्ह्यात केले होते. मात्र, आजच्या सहकार महर्षिंना या दोन आद्य सत्यशोधकांची स्मृती राहिली नाही. परिणामी सहकारातला आत्मा दिवसेंदिवस हरवत चालला आहे.
त्याकाळी आर्य समाज व प्रार्थना समाज हे दोन समाजही महाराष्ट्रात धार्मिक प्रबोधनाचे कार्य करीत होते. सत्यशोधक समाजात त्याकाळी महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील, रामय्या वैंकय्या अय्यावारू व डॉ. संतुजी लाड अशी मोजकीच; परंतु प्रखर बुद्धिवंत मंडळी होती. तर आर्य समाज व प्रार्थना समाजात सर्वच बुद्धिवंत होते. मात्र, त्यांच्या ठायी सत्यशोधकांसारखे नीतिधैर्य नव्हते. आर्य व प्रार्थना समाजिष्ट मंडळींचा भर अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थनेवर होता. ते जातीभेद पाळीत नसत; परंतु त्यांच्या समाजात उच्चविर्णयांना विशेषाधिकार होता. त्यांची ज्ञान व बुद्धी ईश्वरभक्ती व प्रशासनातील उच्चस्थान मिळवणे यासाठीच खर्च होई. खालच्या, तळागळातील शूद्रातिशूद्र समाजाच्या उद्धाराची त्यांना कळकळ नव्हती. त्यामुळे या कनिष्ठ जातींच्या उद्धारासाठी शिक्षण, शेती, आरोग्य वा सहकारासारख्या काही मूलभूत गोष्टी कराव्यात, असे त्यांना वाटत नसे.
महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज हा विचार व कृतीच्या दृष्टीने या दोन्ही समाजांपेक्षा वेगळा होता. शिक्षण हा विषय केंद्रबिंदू ठेवून ठिकठिकाणी सत्यशोधक समाजाच्या कार्याचे स्वरूप स्थानिक प्रश्न व परिस्थितीवर आधारलेले होते. सत्यशोधक परिषदांच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक, अंधश्रध्दामूलक विचार, अनिष्ठ रुढी यांच्या प्रबोधन आणि कृतिकार्यक्रमासोबत शेती सुधारणा व सहकारावर आधारित आर्थिक उन्नती असे विषय जनतेपुढे मांडून त्यानुसार चळवळी चालवल्या जात असत.
महात्मा फुले यांच्या निधनानंतर जुन्नर भागातील धडाडीचे सत्यशोधक नेते भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील व नारो बाबाजी महाधर यांनी सावित्रीबाईंच्या नेतृत्वाखाली ग्रामीण महाराष्ट्र ढवळून काढला होता. इंदापूर तालुक्यात केशवराव पाटील, नगर जिल्ह्यात कृष्णराव भालेकर, मुंबईच्या लालबाग, परळ, भायखळा परिसरात नारायण मेघाजींची कामगार चळवळ, घाटकोपर-ठाणे पट्ट्यात डॉ. संतुजी लाडांचे शिक्षण व आरोग्यविषयक कार्य, डोंगरी व जुन्नर परिसरातील माधवराव रोकडे व त्यांची कन्या जनाबाई रोकडेंचे शिक्षण व आरोग्यासंदर्भातील कार्य, रावजी सखाराम भुजबळ पाटलांचे मुंबई व जुन्नर भागातील आरोग्य, शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्य जोमात सुरू होते. होय, सहकार क्षेत्र!
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राची पायाभरणी व उभारणी सत्यशोधक कार्यकर्त्यांनी व सत्यशोधक समाजाने केली व हाच आपला आजच्या लेखाचा विषय आहे..!
1904 साली सहकारी पतसंस्थेचा कायदा पास झाल्या झाल्या महाराष्ट्रातील जागृत सत्यशोधक चळवळ व सत्यशोधक समाजाने सहकार चळवळीला सुरुवात केली होती. 1905 साली भारतातील प्रथम पथपेढी पुण्याच्या सत्यशोधक समाजाने सासवड येथे सुरू केली होती. त्यानंतर दुसरी पतपेढी याच सत्यशोधकांनी हडपसरला सुरू केली होती. गोपाळराव देवधर, कृष्णराव भालेकर व ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे ही सत्यशोधक मंडळी यात अग्रेसर होती. यानंतर सासवडचे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते अकलुजला गेलेत. तेथे त्यांनी देशातला पहिला सहकारी साखर कारखाना माळीनगरला उभारला होता. त्यातील काही सत्यशोधक समाजियनांनी नगर व श्रीरामपूरच्या सत्यशोधकांना घेऊन तेथेही साखर कारखान्यांची उभारणी केली होती. येथे ही गोष्ट लक्षात येते की, महाराष्ट्रातील ग्रामोद्योगाच्या व सहकारी चळवळीच्या मागे सत्यशोधक समाजाची प्रेरणा होती. हीच प्रेरणा घेऊन आळे-जुन्नर परिसरात व रावजी सखाराम भुजबळ पाटील व पाडळी सातारा परिसरात गुरुवर्य केशवराव विचारे यांनी सहकार चळवळ रुजवली आणि बळकट केली होती.
सहकार चळवळीच्या प्रसाराकरीता ब्रिटिश प्रशासनाकडूनही प्रयत्न चालला होता. तत्कालीन मुंबई प्रांताच्या सरकारात सहकार खाते निर्माण करण्यात आले होते. हे खाते नवीनच असल्याने या खात्यात विनामोबदला, पण सहकाराची माहिती असलेले मानद व्यवस्थापक नेमण्यात येत असत. सत्यशोधक रावजी सखाराम भुजबळ पाटील व गुरुवर्य केशवराव विचारे यांचा सत्यशोधक चळवळीबरोबर सहकार चळवळीचा दांडगा अभ्यास असल्यामुळे त्यांना अनुक्रमे पुणे व सातारा जिल्ह्याचे मानद व्यवस्थापक म्हणून नेमण्यात आले होते.
ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या की सांघिक भावनांचे महत्त्व पटू लागते. सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्यांची ज्ञानलालसा व लोकसंग्रहवृत्ती पाहून तत्कालिन ब्रिटिश कलेक्टर व प्रशासन स्वत:हून अशा त्यागी लोकांपर्यंत पोहचत असे. हा महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा व चळवळीच्या प्रवाहीपणाचा परिणाम होता. सत्यशोधक समाजाने सर्वसामान्य माणसांमध्ये जो बुद्धिवाद व आत्मविश्वास जागवला होता, त्यामुळे असे सेनापती गावोगाव निर्माण झाले होते.
रावजी पाटलांनी आळ्यातील सत्यशोकांना एकत्र आणून 1916 साली ‘आळे विविध कार्यकारी सोसायटी’ स्थापन केली होती. गुरुवर्य केशवराव विचारेंनी हेच कार्य सातारा जिल्ह्यात केले होते. मात्र, आजच्या सहकार महर्षिंना या दोन आद्य सत्यशोधकांची स्मृती राहिली नाही. परिणामी सहकारातला आत्मा दिवसेंदिवस हरवत चालला आहे.
1904 च्या सहकारी पतसंस्था कायद्यामध्ये फक्त के्रडीट सोसायटी स्थापण्याची तजवीज होती. पुढे याबाबतचा सहकारी सोसायट्यांचा कायदा ब्रिटीश प्रशासनाने 1913 साली मुंबई प्रांताला लागू केल्यानंतर शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात 30 नोव्हेंबर 1913 रोजी कोल्हापुरात नोंद झालेली व सत्यशोधक समाजाने स्थापन केलेली ‘कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटी’ ही पहिली सहकारी सोसायटी स्थापन केली होती. तर अशाच प्रकारच्या सहकारी संस्था गुरुवर्य केशवराव विचारेंनी 1921-22 साली कोरेगांव, सातारा, खटाव वाई तालुक्यात स्थापन करून सहकाराचे जाळे विणले होते.
सहकारी सोसायट्यांचे मानद संघटक म्हणून काम करताना रावजी पाटलांनी पुणे जिल्ह्यात झंझावाती दौरे करून आळ्याशिवाय वडगांव-आनंद व ओतूर येथे अनेक सहकारी सोसायट्या स्थापन केल्या होत्या. सर्वसामान्य जनतेचे, गरीब शेतकर्यांचे जीवनमान सुसह्य करणे, जमल्यास उंचावे व त्यांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देणे हा त्यामागचा उद्देश होता. सहकाराबरोबरच शेतकर्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा, ज्येष्ठांसाठी रात्रशाळा, मुलींसाठी स्वतंत्र शाळा जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये रावजी पाटलांनी स्थापन केल्या होत्या. त्याचप्रमाणे वारंवार पडणार्या दुष्काळात मुक्या जनावरांसाठी चारा छावण्याही ते चालवत असत. त्यासोबत त्याकाळातील अस्मानी संकट भासणार्या आणि वारंवार पडणार्या प्लेगच्या साथीविरोधात हाफकिन संस्थेने विकसित केलेल्या प्लेगविरोधी लसीचाही प्रचार ते गावोगावच्या आठवडे बाजारात आपल्या सत्यशोधक सहकार्यांच्या मदतीने करीत असत. त्यांच्या या प्रगतीशील व उपक्रमशील कामांची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने रावजी पाटलांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर म्हणून नियुक्त केले होते. पुढे पुणे जिल्हा सहकारी संस्थांचे डायरेक्टर म्हणूनही नेमणूक केली होती. अशा प्रकारचे अविरत समाजोपयोगी कार्य सत्यशोधक समाजातर्फे केले जात होते. सत्यशोधक रावजी पाटलांनी विविध अडचणींचा सामना करत सत्यशोधक समाजातर्फे महाराष्ट्राच्या सहकार चळवळीच्या उभारणीत जो मोलाचा वाटा उचलत होता, त्याला सत्यशोधक व सहकार चळवळीच्या इतिहासात तोड नाही.
अशाच प्रकारचे कार्य विदर्भात आणि मराठवाड्यातही घडून आले होते. मात्र, ते पुरेशा प्रमाणात उजेडात आले नाही. येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की, गांधी याकाळात असहकार चळवळ चालवत होते...! रावजी पाटलांप्रमाणे गावोगावचे सत्यशोधक समाजियन वेगवेगळ्या उपक्रमशील कार्यात गुंतले होते. त्यापरिणामी माळी शिक्षण परिषदांनी व मराठा शिक्षण परिषदांनी त्याकाळी जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले होते. याविषयीचा इतिहास सतीश जामोदकरांनी खूप चांगल्याप्रकारे लिहिला आहे. जिज्ञासूंनी तो मुळातून वाचावा असा आहे. या शिक्षण परिषदांमध्येही शेती व सहकाराचा विषय मांडला जात होता.
प्लेग व सतत पडणार्या दुष्काळांमुळे तत्कालीन ग्रामीण जीवन भकास झाले होते. अशा अस्मानी संकटातून शेतकरी व ग्रामीण कष्टकर्यांना जगविण्यासाठी मुंबई इलाख्यातील सर्व सत्यशोधक समाज व कार्यकर्त्यांनी सरकारकडे अर्ज, विनंत्या, निवेदने व मागण्यांचे सत्र चालविले होते. तसेच या संकटावर मात करण्याचे उपाय सुचविण्याचे महत्त्वाचे कार्य त्याकाळी सत्यशोधक समाजाने केले होते. सत्यशोधकांच्या या विधायक रेट्यातून ब्रिटिश अधिकार्यांना मुंबई इलाख्यातील पतसंस्थांना भांडवलाचा पुरवठा करण्यासाठी एका बँकेची स्थापना करावी लागली होती. त्या बँकेचे तत्कालिन नाव होते मुंबई प्रॉव्हिन्सियल को-ऑपरेटिव्ह बँक. या बँकेच्या डायरेक्टर बोर्डावर सत्यशोधक समाजातर्फे गुरुवर्य केशवराव विचारे हे 1956 पर्यंत कार्यरत होते. या बँकेच्या शाखा मुंबई, पुणे, कर्हाड व गोरेगाव येथे उघडण्यात आल्या होत्या. मुंबई इलाख्यातील पतसंस्थांची देखरेख, हिशेब तपासणी व सुधारणा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात को-ऑपरेटिव्ह बँक सुपरवायझिंग बोर्ड स्थापन करण्यात आले होते. पुणे जिल्ह्याच्या सुपरवायझिंग बोर्डाच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी आळ्याचे सत्यशोधक रावजी सखाराम पाटील हे त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1934 पर्यंत कार्यरत होते. तर सातारा जिल्हा कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी सातारारोड पाडळीचे गुरुवर्य केशवराव विचारे हे 1956 पर्यंत कार्यरत होते. के्रडीट सोसायट्यांमधून म्हणावा तसा लाभ होत नाही, असे निरीक्षणांती लक्षात आल्यावर को-ऑपरेटिव्ह के्रडीट सोसायटी कायद्यात सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून दुरुस्ती करण्यात आली होती. के्रडीट सोसायट्यांमधून ज्या उत्पादक कामाकरीता कर्ज दिले जात असे ते त्या कामाकरताच खर्च केले जाईल याची शाश्वती नसे. बर्याचदा कर्जदार घेतलेले पैसे अन्य कामासाठीच खर्च करीत असल्याचे आढळून येत असे. त्यामुळे या कर्जाची परतफेड होणे कठीण जात असे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी 1912 साली क्रेडिट सोसायटी अॅक्टमध्ये सुधारणा करून नॉनके्रडिट सोसायट्यांनाही पैशाव्यतिरिक्त अन्य उत्पादन साधनांच्या अर्थात शेतीउपयोगी वस्तू, अवजारे व साधने यांचा भांडवलाच्या रूपात पुरवठा केला जावू लागला होता. सत्यशोधक रावजी पाटील जुन्नर तालुक्यातील विविध गावातील गरजूंना स्वत: जामीन राहून कर्ज, शेतीउपयोगी अवजारे व बि-बियाणांची मदत करीत असत. त्याकाळी कर्जावर व्याजावर दर फक्त 3 टक्के होता. या सवलतीचा लाभ जास्तीत जास्त गरजू शेतकर्यांना व्हावा यासाठी रावजी पाटील व गुरुवर्य केशवराव विचारे प्रयत्नशील असत. रावजी पाटील तर स्वत:च्या जामिनावर मुंबईच्या व्यापार्यांकडून माल आणून तो जुन्नर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना पुरवत असत. तथापि, सभासदांना त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नातून कर्ज फेडणे कठीण जात असे. त्यातच 1913-1921 या कालखंडात पुणे जिल्ह्यात वारंवार दुष्काळ पडत होते. या दुष्काळावर मात करण्यासाठी सत्यशोधक समाजातर्फे सरकारात अर्ज, विनंत्या करून गरीब जनतेला जगविण्यासाठी भाटघर धरणाची उंची वाढविण्याची व फलटण कालव्याची बांधणी करण्याची दुष्काळी कामे काढली होती. तसेच भंडारदरा व गोदावरी कॅनॉलचे कामही सुरू करवले होते. या दुष्काळी कामांवर पुणे, सातारा व खानदेशातील हजारो माणसे, कुटुंबीय ‘हाताला काम व पोटाला दोनवेळचे अन्न’ मिळावे यासाठी गावातून विस्थापित होऊन गेली होती. उरले-सुरले लोक नगर-श्रीरामपूरच्या बागायती भागात कामाला निघून गेली होती. पर्यायाने रावजी पाटील जामीन राहिलेल्या कर्जाची परतफेड होत नव्हती. अशावेळी रावजी पाटलांनी आपली वडिलोपार्जित शेती विकून त्या सार्वजनिक कर्जाची परतफेड केली होती. दानशूर कर्ण व महात्मा बळीराजा यांच्या दानशूरपणा व त्यागाशी तुलना करावी, असे हे त्यांचे कृत्य होते.
गरीब व मध्यम शेतकर्यांना शेतीच्या सर्वच वस्तू घेणे परवडत नसे व अशा वस्तू बाजारात शेतकर्यांना कमी भावात मिळत नसत. तेव्हा अशा शेतकर्यांना शक्य तितक्या कमी खर्चात शेतीउपयोगी वस्तू व इतर सुविधा पुरविण्यासाठी ज्या विविध स्वरूपाच्या नॉनके्रडिट सोसायट्या ज्या रावजी पाटील व केशवराव विचारेंसारख्या सत्यशोधकांनी काढल्या होत्या, त्या सोसायट्यांमधून खालील प्रकारच्या वस्तू पुरवण्यात येत असत..नांगर भाड्याने देणे, खते पुरवणे, औते भाड्याने देणे, बैल भाड्याने देणे, बि-बियाणे पुरविणे, तात्पुरते धान्य गोदामे बनवून देणे, सांसारिक वस्तू पुरविणे, पाटबंधार्याच्या पाणीवाटपाची व्यवस्था करवून देणे, जनावरांचा विमा उतरवणे, डेअरीची व्यवस्था करणे, घरबांधणीसाठी कर्ज पुरविणे,...अशा विविध कामांसाठी सत्यशोधक कार्यकर्ते स्वत: जामीन राहून गरजूंना कर्ज व अवजार पुरवठा करीत असत. अशाप्रकारे सहकार क्षेत्राची उभारणी केली गेली होती, जी सोपी नक्कीच नव्हती. शिवाय ती सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून केली होती. अशा त्यागातूनही काही चांगल्या गोष्टी घडत होत्या. पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन गुरुवर्यांनी सत्यशोधकांचे अभ्यासवर्ग भरवणे सुरू केले होते. त्यात सहकार, राजकारण, अर्थकारण, बचत, महात्मा फुले यांची विचारसरणी, जगातील विविध विचारसरण्या, आपले पर्यावरण व आपला भूगोल, शिक्षणनिती आदी 18 विषयांचा अभ्यासक्रम बनवून ते विद्वान सत्यशोधकांची पिढी घडवत होते. सहकार क्षेत्राला वाहून घेणारे भावी सत्यशोधक घडवत होते. त्यातून वाईट सवयींचा विनाश होऊन सत्यशोकांना व सर्वसामान्य सभासदांना बचतीची सवय लागली होती. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आर्थिक जागृती निर्माण होऊन ते उपक्रमशील बनले होते. त्यांनी आपापल्या गावातील अतिरिक्त दुधासाठी डेअरी सोसायटी स्थापन करून शेतकर्यांच्या हाती बारमाही पैसा खेळत राहील याची व्यवस्था केली होती!
अशा प्रकारे महात्मा जोतीराव फुलेंनी सावकाराच्या तावडीतून सोडवलेल्या शुद्रातिशूद्र जनतेला पुढच्या पिढीतल्या सत्यशोधकांनी स्वयंनिर्भर करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. शूद्रातिशूद्र जनतेला एका महत्त्वाच्या टप्प्यावर महात्मा फुलेंनी आणल्यानंतर त्यांना आणखी पुढील पायरीवर नेण्याचे कार्य भावी सत्यशोधकांनी व सत्यशोधक समाजाने केले होते.
ग्रामीण कष्टकर्यांचे जीवनमान उंचावून व त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी असे सत्यशोधकांना वाटत असे. साधारणत: शेठ, सावकार व बडे जमीनदार मजुरांना कमीतकमी वेतनावर अधिकाधिक काम करवून घेत असत. नालाबंडींग, रस्तेदुरुस्ती व सरकारी कामाचे टेंडर गुजर, मारवाडी व जमीनदार पटकावून घेत असत. कष्टकरी मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी लाचारीचे जीवन जगावे लागत असे. त्याशिवाय त्यांना कायम काम मिळेल याची शाश्वती नसायची. अशा पिडित मजुरांच्या हितरक्षणासाठी गुरुवर्य केशवराव विचारेंसारख्या तमात सत्यशोधक समाजियनांनी ठिकठिकाणी मजूर सहकारी संघ स्थापन करायची योजना आखून ती अंमलात आणली होती. सर्वसामान्य जनतेच्या प्रती असलेल्या निखळ जिव्हाळ्यातून व तथागत बुध्दांच्या करुणेतून आणि सत्यशोधक समाजाच्या प्रॅक्टिकल विचारधारेतून असे उपक्रम रावजी पाटील आणि केशवराव विचारेंसारख्या सत्यशोधकांच्या हातून सातत्याने घडत राहून, त्यातून महाराष्ट्राला संजीवनी ठरणारे सहकारक्षेत्र आंकुरत होते!
सत्यशोधकांनी स्थापन केलेल्या मजूर सहकारी संघाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती...अंग मेहनतीचे काम करणार्या मजुरांचे जीवनमान उंचावणे, मजुरांचया आरोग्याची काळजी घेणे, काम व कामाच्या पध्दतीवर मजुरांचे नियंत्रण राखणे, श्रमाचा योग्य मोबदला मिळवून देणे, तसेच मजुरांना साक्षर करणे व त्यांच्या मुलांची शैक्षणिक व्यवस्था करणे.
अशा कल्याणकारी उद्दिष्ठांसाठी तत्कालिन सत्यशोधकांनी व सत्यशोधक समाजाने मजूर सोसायट्यांबरोबर सहकारी शेती व सहकारी कारखानदारीची पायाभरणी केली होती. अशाप्रकारे सहकार चळवळ व पतसंस्था उभारण्यात सत्यशोधक समाजाचा सिंहाचा वाटा होता!
ज्याप्रमाणे शिक्षण म्हटले की, महात्मा फुलेंबरोबर सावित्रीबाईंचे नाव अधोरेखित होते, ज्याप्रमाणे कामगार चळवळ म्हटली की नारायण मेघाजी लोखंडेंचे नाव अधोरेखित होते, ज्याप्रमाणे भारतीय संविधान म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अधोरेखित होते, त्याचप्रमाणे सहकार चळवळीचा निरपेक्ष इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा त्या इतिहासकारांना सत्यशोधक रावजी सखाराम पाटील व गुरुवर्य केशवराव विचारे यांच्यासह सत्यशोधक चळवळ व सत्यशोधक समाजाचे योगदान नमूद केल्याशिवाय पुढे लिहिता येणार नाही..!
![]() |
राजाराम सूर्यवंशी, जव्हार, पालघरमो. नं. : 95038 67602 (निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा) |
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा