दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

स्वतंत्र मराठवाडा राज्य!

स्वतंत्र मराठवाडा राज्य!

-मराठवाडा मुक्‍ती संग्रामवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्यांचे फार मोठे उपकार-अ‍ॅड. भगवानराव देशपांडे


-खरा इतिहास माहिती असता तर मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध झालाच नसता-प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे


-प्रा. डॉ. सुधाकर नवसागर यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठवाडा’ या ग्रंथाचे थाटात प्रकाशन

औरंगाबाद : प्रा. डॉ. सुधाकर नवसागर लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठवाडा’, या ग्रंथाचे प्रकाशन स्वातंत्र्य सेनानी अ‍ॅड. भगवानराव देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून लेखक प्रा. डॉ. सुधाकर नवसागर, प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर व प्रा. डॉ. मोहन सौंदर्य.

भास्कर सरोदे, औरंगाबाद :
मराठवाडा मुक्‍ती संग्रामाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे बळ मिळाले आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून अस्पृश्यांची ताकद मिळाली, हे योगदान मोलाचे आहे. म्हणून मराठवाडा मुक्‍ती संग्रामवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्यांचे फार मोठे उपकार आहेत, असे ठोस प्रतिपादन अ‍ॅड. भगवानराव देशपांडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रनिष्ठेवर प्रश्‍नचिन्हं उभं करून मराठवाडा पेटवणारे आणि हैदराबाद वा मराठवाडा मुक्‍ती संग्रामात बाबासाहेब आणि अस्पृश्यांचे योगदान नाकारणार्‍या कृत्घनांवर हा कडा प्रहार होय. दरम्यान, जर मराठवाडा मुक्‍ती संग्रामात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्यांच्या योगदानाचा इतिहास माहिती असता तर विद्यापीठ नामांतर लढ्याला विरोधच झाला नसता, असा दावा अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांनी केला. प्रा. डॉ. सुधाकर नवसागर लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठवाडा’ या ग्रंथ प्रकाशन समारंभात ते बोलत होते. प्रकाशन समारंभाला ‘स्वतंत्र मराठवाडा राज्य’ अशी किनार मिळाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आयोजित सिडकोतील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे होते. ज्यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन पार पडले असे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा विधिज्ञ अ‍ॅड. भगवानराव देशपांडे, पुस्तकावरील भाष्यकार सुप्रसिद्ध समीक्षक, साहित्यिक आणि विचारवंत प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, आंबेडकरवादी साहित्यिक, समीक्षक व विचारवंत प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. मोहन सौंदर्य आदींची विचारमंचावर उपस्थिती होती. सुरूवातीला बहुजन महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्पाहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन पार पडले. कार्यक्रमाला शहरातील प्राचार्य, प्राध्यापक, पत्रकार, साहित्यिकांची विशेष उपस्थिती होती. प्रकाशन सोहळ्याचे प्रस्ताविक लेखक प्रा. डॉ. सुधाकर नवसागर यांनी केले.

राजकीय व सामाजिक लढ्याच्या दृष्टीने मौलिक ग्रंथ-प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मराठवाडा’ ग्रंथावर भाष्य करताना प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी बाबासाहेबांचे मराठवाड्याशी असलेल्या ऋणानुबंधांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ब्रिटिश राजवटीत जे भौतिक व सामाजिक बदल घडत होते, ते निजाम राजवटीत घडत नव्हते. शिवाय विकासाकडे पाहण्याचा निजामचा अप्रगत दृष्टिकोनही मराठवाडा मागास राहण्याला कारण ठरला आहे. या ग्रंथात मराठवाड्याच्या अनुषंगाने जे काही संदर्भ आलेले आहेत, ते समाजशास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत, त्याबद्दल प्रा. नवसागर यांचे अभिनंदन केले पाहिजे. या ग्रंथात हरिभाऊ पाटसकर (गांधीवादी ब्राह्मण), बी. एस. व्यंकटराव, बी. श्यामसुंदर, हरिहरराव सोनवणे आदी विविध जातीतील मान्यवरांचे संदर्भ आले आहेत. पुणे करारात गांधीजींचे प्राण वाचविले म्हणून गांधीवाद्यांचा बाबासाहेबांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललेला होता. गांधीजीही बाबासाहेबांना समजून घेऊ लागले होते. त्यापैकीच हरिभाऊ पाटसकरांवर बाबासाहेबांचा विशेष प्रभाव होता. 1920 पासूनच बाबासाहेबांनी सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग करायला सुरूवात केली होती. त्याचाच भाग म्हणून बाबासाहेब आणि पाटसकरांची जवळीक होय. 1934 ला बाबासाहेब मराठवाड्यात येऊन गेले होते. अजिंठा-वेरूळ आणि दौलताबादचा किल्‍ला त्यांनी पाहिला होता. त्यानंतर भाऊसाहेब मोरे यांच्या आग्रहावरून पुन्हा ते 1937 औरंगाबादला आले. तसे पाहिले तर बाबासाहेब आणि मराठवाड्याचे एक भावनिक नाते होते. म्हणूनच या ग्रंथाचे संदर्भमूल्य आणि ऐतिहासिक महत्त्व वाढले आहे.

या ग्रंथातील संदर्भमूल्य पाहिले तर राजकीय आणि सामाजिक लढ्याच्या दृष्टीने हा ग्रंथ मौलिक आहे. तथापि, बाबासाहेब आणि मराठवाडा या विषयाला धरून आणखी काही गोष्टी मांडता आल्या असत्या, त्या राहून गेल्या आहेत. त्या त्रुटी आहेत, असे मी मानत नाही, तर संशोधनाचा तो पुढील टप्पा आहे. दि. 21 जानेवारी 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आमखास मैदानावर ऐतिहासिक सभा झाली. या सभेचा उल्‍लेख या ग्रंथात आहे. मात्र, बाबासाहेबांचे ते ऐतिहासिक भाषण यात समाविष्ट करता आले असते तर ग्रंथाच्या संदर्भमूल्यांत भर पडली असती. याशिवाय महापरिनिर्वाणापर्यंतच्या काही गोष्टींचा उल्‍लेख यायला हवा होता. याशिवाय कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बाबासाहेब साडेतीन महिने औरंगाबादेत होते, बाबासाहेब आणि कलावंतांचे अतूट नाते होते, हे तपशील यायला हवे होते, अशी अपेक्षाही प्रा. कांबळे यांनी व्यक्‍त केली.

कायगाव टोकचा पूल ही बाबासाहेबांची देण :

बाबासाहेबांचे मराठवाड्याशी भावनिक नाते होते. मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारा कायगाव टोकचा गोदावरी नदीवरील पूल ही बाबासाहेबांचीच देण आहे. मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्र या दोन प्रदेशांना जोडणारा पूल बांधावा, अशी मागणी बाबासाहेबांनीच इंग्रजांकडे केली होती. त्याचे महत्त्व जाणून इंग्रजांनी कायगाव टोक येथील पूल बांधला, असा दावाही प्रा. कांबळे यांनी केला.

मराठवाड्याची वेगळी संस्कृती-प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर

‘दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा’ या ग्रंथाचे लिखाण सुरू असताना बाबासाहेबांचे मराठवाड्यावर विशेष प्रेम असल्याचे दिसून आले. बाबासाहेबांच्या अनेक पैलूंपैकी हा एक विशेष पैलू. त्यावर कुणी लिहित नाही. ज्यांच्याकडे संपन्नता आलीय, ते तर लिहितही नाहीत आणि वाचतही नाहीत. अनेक डॉक्टरेट प्राध्यापक आहेत. पीएचडी. मिळाली म्हणजे तो विद्वान असतोच असे नाही. कारण पीएचडी कशा मिळतात, याची मला चांगलीच कल्पना आहे. म्हणून ज्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे, अशा प्रा. सुधाकर नवसागर यांना या पैलूवर प्रकाश टाकण्यास सांगितले. या पुस्तकाच्या जन्मापासून मी नवसागर यांच्या सोबत आहे. त्यांनी न्याय दिला आहे. एका संशोधकाला साजेशी कामगिरी त्यांनी बजावलीय.

मराठवाड्याची संस्कृती ही इतर विभागापेक्षा वेगळी आहे, हे बाबासाहेबांनी हेरले होते. म्हणूनच त्यांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यातील माणसाच्या विकासाचा मार्ग निहित केला. मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांनी केवळ दोन महाविद्यालये असताना विद्यापीठाची मागणी केली आणि मी मान्यही झाली. मराठवाडा हा निजामाकडून ‘क्रिमिनली निग्लेक्टेड’ असल्याचे त्यांनी सर्वांच्या लक्षात आणून दिले. 13 ऑक्टोबर 1935 ला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा येवले मुक्‍कामी केली. त्यांनी येवलेच का निवडले? पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या सीमेवर बाबासाहेब धर्मांतराची घोषणा करतात, याचा अर्थ काय? तर मराठवाड्यातील जनतेलाही हा आवाज ऐकायला यावा, हा त्यांचा उद्देश होता, असे भाष्य प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले. 

मराठवाड्यावर विशेष प्रेम असणार्‍या बाबासाहेबांच्या शाबासकीची थाप ज्यांच्या पाठीवर पडली, ज्यांनी बाबासाहेबांना जवळून पाहिले, त्यांच्याशी संवाद साधला अशा स्वातंत्र्य सेनानी अ‍ॅड. भगवानराव देशपांडे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे, हा योगायोग असला तरी हा ग्रंथ संदर्भमूल्यांनी समृद्ध असल्याचेही प्रा. लुलेकर म्हणाले. 

महाराष्ट्राचे चार राज्य करा, या मताचे बाबासाहेब-अ‍ॅड. भगवानराव देशपांडे

मराठवाडा मुक्‍ती लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी अ‍ॅड. भगवानराव देशपांडे यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले. 95 वय वर्षे असलेले देशपांडे यांनी बसून बोलण्यास नकार देत पोडियमसमोर जावून त्यांनी आपले मत मांडले, तेव्हा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ऐकायला येत नसल्याने आधीचे वक्‍ते काय बोलले ते समजले नाही, अशी प्रांजळ कबुली देताना आपल्या खणखणीत आवाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्यांचे मराठवाडा मुक्‍ती संग्रामावर कसे उपकार आहेत, हे त्यांनी ठणकावून सांगितले.

ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीला सक्रिय पाठिंबा होता. मुंबईतील भांडवलदारांनी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचे कटकारस्थान रचले, तेव्हा बाबासाहेब संयुक्‍त महाराष्ट्राच्या बाजुने उभे राहिले. व्यापारी आणि भांडवलदारांनी मुंबई बसवली, असे म्हणणार्‍यांना बाबासाहेबांनी सोदाहरण सडेतोड उत्तर दिले. ‘मुंबई ही व्यापारी आणि भांडवलदारांनी बसवली नसून ती मराठी माणसांच्या घामातून विकसित झाली आहे. व्यापारी आणि भांडवलदारांना तर इंग्रज घेऊन आले. ते स्थानिक नाहीत. म्हणून मुंबई महाराष्ट्राचीच आहे. मुंबईवर मराठी माणसाचाच हक्‍क आहे’, असा बिनतोड युक्‍तीवाद बाबासाहेबांनी केला. 

पुढे ते म्हणतात, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संयुक्‍त महाराष्ट्राला पाठिंबा होता तरी, पण भाषावार प्रांत रचनेबाबत त्यांचे एक सूत्र होते. ‘एक भाषा-एक राज्य’ या सूत्राला विरोध केला. एका भाषेचे एकच मोठे राज्य बनविण्याऐवजी ‘एका भाषेची अनेक राज्य’ असे सूत्र देताना मराठवाडा-खान्देश-सोलापूर असे एक राज्य निर्माण करावे. ते करताना महाराष्ट्राच्या चार राज्याची संकल्पना त्यांनी मांडली होती’.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्पृश्य समाज आणि मागास प्रदेशाविषयी एक दृष्टिकोन होता. या दोन बाबींसाठी ते अविरत लढले. 1930 ला पहिल्या गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी इंग्रजांच्या धोरणांवर आसूड ओढले. इंग्रजांनी भारतातील पूर्वीच्या समाजरचनेत कोणतेच बदल केले नाहीत. उलट जातीयवाद कायम ठेवला. भारताला स्वातंत्र्य देताना ते मूठभरांचे असता कामा नये. तेथे जनतेचे राज्य आले पाहिजे, अशी सर्वव्यापी भूमिका मांडली.

दुसरी बाब अशी की, घटना समितीत असताना बाबासाहेबांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनतर्फे आपली घटना सादर केली. तथापि, ती घटना स्वीकारण्यात आली नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंनीही आपली घटना सादर करताना ‘समाजवादाशिवाय देशाला पर्याय नाही’, अशी भूमिका घेतली. नेहरूंच्या समाजवादाची चिरफाड करताना बाबासाहेबांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने सादर केलेल्या घटनेतील मुद्दे कसे समाजवादाचा पुरस्कार करणारे आहेत, हे पटवून दिले. त्यानुसार शेती, शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे, असा आग्रह बाबासाहेबांनी धरला होता. मात्र, त्यावर सहमती होऊ शकली नाही. भांडवलदारी म्हणजे खासगी मालकांची हुकूमशाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना बाबासाहेबांनी घटना समितीत ज्या प्रश्‍नांवर बोट ठेवले, तीच आव्हाने आजही कायम आहेत. म्हणून आजही बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घ्यावा लागतो.

देशाची जी परिस्थिती तीच मराठवाड्याचीही आहे. मराठवाडा मुक्‍ती संग्रामाला बाबासाहेबांच्या विचाराचे बळ मिळाले. बाबासाहेबांच्या आदेशावर शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून अस्पृश्यांची ताकद मिळाली. त्याकाळी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनमध्ये फूट पडून मूठभर लोक निजामसोबत गेले. मात्र, वास्तव असे आहे की, मराठवाडा मुक्‍ती संग्रामावर डॉ. बाबासाहेब आणि अस्पृश्यांचे फार मोठे उपकार आहेत. भलेही मराठवाडा मुक्‍ती संग्रामवाल्यांना ही भूमिका मान्य नाही. म्हणून अशा ग्रंथांच्या माध्यमातून बाबासाहेब आणि अस्पृश्यांचे योगदान समोर येत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. या अनुषंगाने मी प्रा. सुधाकर नवसागर यांचा ग्रंथ मराठवाडा मुक्‍ती संग्रामसाठीही मैलाचा दगड ठरावा, अशी अपेक्षा अ‍ॅड. देशपांडे यांनी व्यक्‍त केली.


‘त्यांनी’ अकलेचे तारे तोडू नये...

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठवाडा’, या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मराठवाड्यांच्या प्रश्‍नांशी निगडित राहिला. मान्यवरांच्या भाषणाचा आशय ‘मराठवाडा स्वतंत्र राज्य’ व्हावा असाच होता. याबरोबरच बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांची पराकोटीची राष्ट्रनिष्ठा या ग्रंथातून प्रतित होते. ‘मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीयच’ असे निसंकोचपणे सांगणार्‍या बाबासाहेबांना भारतीय जनता अद्यापही पूर्णत: ओळखू शकली नाही. ज्या मराठवाड्यासाठी बाबासाहेबांनी खूप काही सहन केले, तेथील जनतेनेही बाबासाहेबांना जातीच्या चष्म्यातूनच पाहण्याचे महापातक केले. मराठवाडा विद्यापीठ नामंतराच्या लढ्यात आंबेडकरानुयायांना आगीच्या भक्ष्यस्थानी ढकलले. या परिस्थितीत आजही सकारात्मक बदल झाला आहे, असे पुराव्यानिशी सांगता येत नाही. म्हणूनच मिळालेले स्वातंत्र्य गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. आणखी वेळ गेली नाही. ‘स्वतंत्र मराठवाडा राज्य’ हा अनेक समस्यांवरील उपाय आहे. स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्माण करून बाबासाहेबांशी केलेल्या द्रोहातून मुक्‍त होण्याची संधी आहे. ज्यांना स्वतंत्र मराठवाडा राज्याचा आवाज ऐकू येत नाही, ज्यांना रखडलेला विकास दिसत नाही, त्यांनी आधी बाबासाहेबांची छोट्या राज्यांची संकल्पना मुळापासून समजून घ्यावी, नंतरच अकलेचे तारे तोडावे.

-संपादक

 

हैदराबाद मुक्‍ती संग्रामवर अद्यापही प्रामाणिकपणे लिहिले गेले नाही-प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे

अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांनी लेखकाशी आपले 20-25 वर्षापासूनचे ऋणानुबंध असल्याचे सांगितले. लेखकाचा खडतर प्रवास आणि त्यातूनही अशा ग्रंथाची निर्मिती, ही खरोखरच प्रेरणादायी असल्याचे प्रसंशोद्वागार त्यांनी काढले. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा झाला. तसा हैदराबाद मुक्‍ती संग्रामलाही 75 वर्षे होत आहेत. गेल्या 75 वर्षात एकही मायचा लाल या विषयाला हात घालू शकला नाही. तो आरंभ प्रा. सुधाकर नवसागर यांनी केला आहे. म्हणून त्यांचे कौतुक वाटते. हैदराबाद वा मराठवाडा मुक्‍ती संग्राम म्हटले की, फक्‍त कॅप्टनचाच उदोउदो केला जातो. सैन्याशिवाय युद्ध लढता येत नाही, हेही कुणी सांगण्याचा प्रयत्न केला नाही. प्रा. नवसागर अशा उपेक्षित सैन्याचाही येथे उल्‍लेख करतात, म्हणून या ग्रंथाचे ऐतिहासिक मूल्य वाढले आहे.

ते पुढे म्हणतात, मराठवाडा मुक्‍ती संग्रामात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्यांच्या योगदानाचा नीट इतिहास आमच्या समोर आला असता तर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध झालाच नसता. नामांतरविरोधकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निजामाचे हस्तक आहेत, त्यांनी अस्पृश्यांना मुस्लिम होण्याचे आदेश दिलेत, पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी दिलेली जमीन, अशा अनेक मुद्यांधारे पत्रकं काढून गैरसमज पसरवला आणि मराठवाड्यात आगडोंब उसळला. नामंतरविरोधकांनी अनेकांची घरे जाळली, त्यात काही जणांचा बळी गेला. तथापि, पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठीची जमीन बाबासाहेबांनी निजामाकडून विकत घेतली होती, हा दस्ताऐवजच प्रा. नवसागर यांनी या ग्रंथात जोडला आहे. विचारांना प्रवृत्त करणारे ग्रंथ, शांतपणे विचाराला कलाटणी देणारा इतिहास आमच्यासमोर असता तर नामांतरावरून नरसंहार झालाच नसता, अशी खंत प्रा. मुलाटे यांनी व्यक्‍त केली.

‘पहाडी चुहॉ’ असा आम्हाला इतिहास शिकवला गेला. आज ‘शिवाजी’ असा साधा एकेरी उल्‍लेख जरी केला तरी राग येतो. कारण नवं संशोधनाने सत्य बाहेर येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या माणसांना आदेशच दिले होते की, ‘ही मातृभूमी आपली आहे, निजाम शत्रू आहे’, हे कोण सांगणार? नुसत्या मुडद्यांचा इतिहास नसतो, तो पुढील पिढ्यांना उर्जा देणारा असतो. हा प्रारंभ नवसागर यांनी केला आहे, असे गौरवोद्गाराद्वारे प्रा. मुलाटे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?