‘उदाहरणार्थ मंथन कांबळे’
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
‘उदाहरणार्थ मंथन कांबळे’
नागपूरचा एक गरीब मुलगा मंथन. ज्याची आई 5 हजार रुपये महिन्यावर धुणी भांडी करायची. त्याला आयआयटी खरगपूरला प्रवेश मिळाला. आर्थिक समस्येवर मात करत कसे शिकायचे? हा त्याला प्रश्न पडला आणि त्याचवेळी ‘बानाई’ मदतीला आली. 5 वर्षात त्याला 4 लाख रुपयाची आर्थिक मदत झाली. मंथन आता नोकरीच्या पदार्पणातच जपानच्या एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्यावर काम करीत आहे. लाखोचे पॅकेज त्याने साईन केले आहे. 22 वर्षाच्या नागपूरच्या एका जिद्दी मुलाची कहाणी… आदर्शाच्या शोधात ‘आश्वासक’ लेखणी…
आजच्या या सदराचा नायक आहे मंथन कांबळे. वास्तव्य इमामवाडा, नागपूर. ज्याचे वडील ठेकेदाराच्या हाताखाली लोखंड बांधणीचे काम करीत. 6 वीत असतानाच बाबांचे आकस्मिक निधन झाले. कुटुंबाची जबाबदारी आई छायावर आली. छायाताई कामाच्या शोधात घराबाहेर पडल्या. कष्टाशिवाय तिला पर्याय नव्हता. एका साहेबांच्या बंगल्यावर ती धुणी भांडी करू लागल्या. त्यातून कुटुंबाच्या जेवणाची जेमतेम सोय झाली. गरजांची तोंडमिळवणी करताना तिची दमछाक व्हायची. कधीतर उपचारासाठी देखील पैसे नसायचे. मंथन जात्याच हुशार होता. नागपूरच्या पंडित बच्छराज व्यास विद्यालयात त्याला कल्पना पांडे यांच्यामुळे प्रवेश मिळाला. शाळेची फी भरण्याइतपत त्याची स्थिती नव्हती. कल्पना पांडे यांनी या कुटुंबाची परिस्थिती शाळा व्यवस्थापनाला समजावून सांगितली. शाळेने त्याला प्रवेश दिला. मंथन तिथे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत 95 टक्के गुणांनी पास झाला. संस्कृत भाषेत त्याला तर त्याला 100 गुण मिळाले होते.
शिक्षण घेताना मंथनला त्याच्या मित्राची आई आणि व्यवसायाने शिक्षिका असलेल्या गीता डोळसमॅडम यांनी 25 हजार रुपयाची पुस्तके घेऊन दिली. रमा मसराम मॅडम यांनी त्याला थंडीच्या काळात त्याला स्वेटर घेऊन दिले होते. पंडित बच्छराज विद्यालयाच्या प्राचार्य आणि संस्कृतच्या शिक्षिका जोशी मॅडम यांनी संस्कृतचे मोफत कोचिंग दिले होते. त्यांच्यामुळेच त्याला संस्कृतमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले होते. इयत्ता 8 वी आणि 9 वीत असताना शाळेच्या ट्रिपला पैशाअभावी मंथन जाऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर हुद्दार मॅडम यांनी 2 वेळा ट्रीपची फी भरली होती. दहावीनंतर मंथनने शिवाजी सायन्स कॉलेज, धंतोली याठिकाणी प्रवेश घेतला. मात्र, निकाल लागल्याबरोबर मुले पुढील ध्येय्य निश्चित करून कोचिंग क्लासेसला ज्वाईन झाली होती. मंथन मात्र सहा महिने होऊनही कोणताच क्लास लावू शकला नव्हता. क्लाससाठी लागणारी फी भरण्याची त्याच्या परिवाराची ऐपत नव्हती. तथापि, इथेही माणुसकी धावून आली. मंथनच्या गुणवत्तेची कदर झाली. नागपूर स्थित आयआयटी कोचिंग क्लासच्या संचालिका नीशा कोठारी मॅडम यांनी त्याची गुणवत्ता हेरली. अगदीच नगण्य रकमेत त्याला कोचिंगला प्रवेश दिला. मंथनने संधीचे सोने केले. वर्ष 2015 मध्ये त्याला आय.आय.टी. खरगपूरला केमिकल इंजिनीअरिंगला प्रवेश मिळाला.
आय.आय.टी. ला प्रवेश मिळाला तरी त्याला हॉस्टेल आणि मेससाठी प्रत्येक सेमिस्टरला पैसे लागणार होते. 5 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्याला जवळपास चार लाख इतका खर्च येणार होता. हा खर्च कसा करायचा हा कुटुंबाला प्रश्न पडला. बंगल्यावर धुणी भांडी करताना तिथेच बागकाम करणार्या गौतम पाटील यांना ही परिस्थिती कळली. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अर्थात ‘बानाई’ बद्दल माहिती होती. त्यांनी मंथनला सोबत घेऊन बानाई कार्यालय गाठले. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. अभियांत्रिकी शिक्षण घेणार्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी बानाईने आजवर अनेकांना लाखो रुपयांची मदत केली. यातील सर्वजण आता आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाले आहेत. त्यातल्या थोड्यांनी याची जाणीव ठेवली. मात्र बाकीचे बंगला, गाडी, नोकरी, छोकरीत अडकले. चमकदार वर्तुळात रमले. बानाईकडे परत फिरकले देखील नाहीत. मात्र, सारीच माणसे सारखी नसतात यावर बानाईचा विश्वास आहे. बानाईने मंथनची सर्व परिस्थिती समजून घेतली आणि मदतीची हमी दिली. 2015 ते 2020 या काळात न चुकता सतत मदत केली. मंथनला पाच वर्षाचा एम. टेक. अभ्यासक्रम पूर्ण व्हायच्या आतच विविध कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर्स आल्या. निकाल लागताच जपानच्या एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्यावर लाखोच्या पॅकेजवर नोकरीला लागला.
मंथनची गरिबी होती. त्यावर मात करून तो शिकला. नोकरीला लागला. इथे ही कहाणी संपत नाही तर इथूनच एका वेगळ्या ‘आश्वासक’ कहाणीला सुरुवात होते.
नोकरीची ऑर्डर मिळताच मंथनने पहिला कॉल आईला केला. तेव्हा ती तर अक्षरश: रडू लागली. मंथनच्या डोळ्यातही आनंदाचे अश्रू आले. वयाच्या 22 व्या वर्षी पहिला पगार मिळाला तेव्हा त्याने त्याच्या शिक्षणात मदत करणार्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन कृतज्ञता व्यक्त केली आणि आदरपूर्वक भेटवस्तू दिल्या. बानाईला कॉल करून आभार मानले आणि दरमहा 10 हजार रुपये देण्याची इच्छा प्रदर्शित केली.
बानाईसाठी ही यशोगाथा आहे. त्यासाठी ‘बानाई मंथन कोच’ नावाने खाते उघडले गेले. त्यात मंथन दरमहा रक्कम जमा करीत असतो. या रकमेचा उपयोग मंथनसारख्या आणखी काही गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी बानाई करीत आहे. मंथन आता नागपूर बानाईशी जोडला गेला आहे. नुकतेच त्याने नागलोक येथील कोव्हिड सेंटरला रुग्णसेवेसाठी एक मशीन मोफत दिले आहेत.
‘आश्वासक’साठी मंथनची मुलाखत घेतली असता तो म्हणाला की, ‘माझ्या जडणघडणीत आई-आजोबा यांचा जसा वाटा आहे, तसाच माझ्या गुरुजणांचा आणि मित्रांचा आहे. विशेषत: गीता डोळस मॅडम, हुद्दार मॅडम, जोशी मॅडम, मसराम मॅडम आणि नीशा कोठारी मॅडम यांचाही वाटा आहे. पाटील काकांनी मला ‘बानाई’ची भेट घडवली नसती तर कदाचित मला शिकता आले नसते. ‘बानाई’ने तर माझ्या आयुष्याची घडी बसवली. माझ्या यशाला माझी मेहनत आणि या सर्वांची मदत कारणीभूत आहे. आयुष्यात कितीही मोठा झालो तरी मी माझ्या मुळाशी असलेल्या या मान्यवरांना कधीच विसरणार नाही. मला माझ्या पायावर उभे करण्यासाठी जशी इतरांनी मदत केली तशीच माझीही जबाबदारी आहे. यापुढे कुठेही असलो तरी ती बांधिलकी आयुष्यभर निभावत राहील’.
‘चंद्र सूर्य जरी आले हाती, तरी पायाखालची विसरू नये माती’ या आशयाची ही जमिनी जाणीव मंथनजवळ आहे. म्हणूनच आजच्या काळात सर्वांसाठी ‘उदाहरणार्थ मंथन कांबळे’ हा प्रवास मला अत्यंत ‘आश्वासक’ वाटतो.
![]() |
मो. 9822262003 |
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा