‘डॉन’ ते सर्जनशील प्रशासक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
‘डॉन’ ते सर्जनशील प्रशासक
अजित खंदारे, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी. मराठवाड्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील एक आणि दोन वर्गातील अधिकार्यासाठी जज, औरंगाबाद (संत तुकाराम मुलांचे शासकीय वसतिगृह, औरंगाबाद) या वर्गमित्राची आणि हॉस्टेलमेंटची स्टोरी आहे. इतिहासाच्या खाणाखुणा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मराठवाड्याच्या पर्यटनावर वास्तववादी भाष्य करणारी ही जिवंत स्टोरी असून बहुजन शासकच्या वाचकांना निश्चितच आवडेल, असा विश्वास आहे.
भास्कर सरोदे : औरंगाबाद
‘डॉन’ चित्रपटातला डायलॉग तर सर्वांनाच माहिती आहे. तसाच, पण स्वयंघोषित डॉन आपल्या संत तुकाराम वसतिगृहात होता. संपूर्ण वसतिगृहाचा डॉन म्हणता येईल असे कर्तृत्व नव्हतेच! मात्र, स्वत:च्या रूममध्ये दुसर्या कोणत्याच विद्यार्थ्याला टिकू देत नसे. एखादा विद्यार्थी आला की, त्याला पिटाळून म्हणा किंवा पळवून कसे लावायचे, याचे विविध हातखंडे तो वापरायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून कोणीच रूममध्ये टिकत नसे. आणि मग हा एकटाच रूममध्ये वावरायचा एखाद्या ‘डॉन’सारखा! म्हणूनच तो स्वयंघोषित डॉन! किमान आपल्या रूमपुरता!
हा डॉन फार मुडी...एकदा कोणालाच न सांगता हैदराबादला गोयंका गुरूजींची विपश्यना शिकायला गेला. विपश्यना करून आला नि आरपार बदलला. डॉनगिरीची हवा आपोआप निघून गेली आणि आपण जे काही करत होतो, ते चुकीचे होते, याचे प्रायश्चित म्हणून आता दुसर्यांना रूममध्ये राहू देऊ लागला. हा प्रकार सुरूवातीचे एक-दीड वर्षेच होता. फार तर तुम्ही त्याला दीड वर्षाचा डॉन म्हणू शकता. अजित खंदारेच्या या रूपाशी कितीजण परिचित आहेत, हे सांगणे कठीण. मात्र, चुकीचा मार्ग सोडून तो आता सन्मार्गाला लागला होता. अभ्यासातही प्रगती करू लागला. आज तो राज्य प्रशासनात बिनीचा शिलेदार बनला असून प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी. मराठवाड्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील एक आणि दोन वर्गातील अधिकार्यासाठी जज म्हणून औरंगाबादला कार्यरत आहे. अशा या ‘डॉन’विषयी आणि त्याच्या कार्यकर्तृत्वाविषयी जाणून घेऊया...
बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी 23 फेब्रुवारी 1941 रोजी कसबे-तडवळे, जि. उस्मानाबाद या गावात ऐतिहासिक महार-मांग वतन परिषद घेतली होती. यानिमित्ताने तडवळेचे उपासक जगन्नाथ खंदारे यांनी जिवंत चित्ररथ तयार केला होता, जो जिल्ह्यात प्रथम आला होता. इतिहासाचा साक्षीदार राहिलेले उपासक जगन्नाथ खंदारे यांचा सपूत म्हणजे अजित खंदारे. त्याच्या कारकीर्दीवर दृष्टीक्षेप टाकला, तर त्याचा जन्मच इतिहास बनविण्यासाठी झाला की काय, असे वाटायला लागते.
हेरगिरीत वाजवला डंका! :
अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यावर तो स्पर्धा परीक्षेकडे वळला. त्याची पहिली अपॉईन्टमेंट दि. 14 एप्रिल 2005 रोजी आयबीमध्ये गुप्तहेर म्हणून झाली. डॉ. आंबेडकर जयंतीला सुट्टी असल्याने सहसा कुणाची जॉईनिंग त्या दिवशी होत नाही. मात्र, अजितची जॉईनिंगच जयंतीच्या दिवशी झाली. तीन वर्षे तो पाकिस्तानच्या बॉर्डरवर राहिला. या बॉर्डरवर असलेल्या फेन्सिंगच्या लाईटमध्ये तो अभ्यास करायचा. ना शत्रूच्या गोळ्यांची भिती ना बॉम्बची! तो बेस्ट फायर्र आहे. एके-47, पिस्तुल हर प्रकारचे शस्त्र लिलया चालवण्यात पटाईत आहे. अचूक निशाणा ही त्याची खासियत आहे. त्याचा निशाणा आणि अचूकता पाहून प्रशिक्षक आणि अन्य प्रशिक्षणार्थीही तोंडात बोट घालून आचंबित व्हायचे. याचे श्रेय तो अभियांत्रिकीमध्ये शिकलेल्या स्ट्रेट लाईन व विपश्यनेला देतो. बोलताना ‘गॉडगिफ्ट’ म्हणण्यास तो कचरतो आणि स्वत: सावरत ‘नैसर्गिक देण’ असल्याचे सांगतो. समयसूचकता पाळण्यात तो वाक्बगार आहे.
तो म्हणतो, एका मदरशातून पाकिस्तानसाठी हेरगिरी चालायची. भारतातून पाकिस्तानात जाण्यासाठी मदरशातून बोगदा कोरलेला होता. त्यातून ये-जा होत होती. मोठी रिस्क घेऊन मदरशातील एक माणूस फोडून ही हेरगिरी उघड केली होती. इंटरपोलची रेडकॉर्नर नोटीस असलेल्या गुन्हेगाराला पकडून अजितने 500 रूपयाचे बक्षीसही मिळवले आहे. देशसेवेसाठी आव्हान स्वीकारताना कधीच भीती वाटली नसल्याचे तो सांगतो.
सिंघम स्टाईलने पाडले अतिक्रमण! :
कळंब नगरपालिकेचा कार्यकारी अधिकारी असताना अजितने नजरेत भरणारी कामगिरी केली. विकासात्मक कामे आणि स्वच्छतेत नगर पालिका विभागात प्रथम आणली. हे रेकॉर्ड गेल्या 12 वर्षांपासून अजूनही अबाधित आहे. पालिकेंतर्गत सुमारे 10-12 हजार झाडे लावून पर्यावरणपूरक कामगिरी केली. व्यापार्यांनी केलेले अतिक्रमण पालिकेसाठी चांगलीच डोकेदुखी झाली होती. अतिक्रमण काढण्यास गेले की, व्यापारी दगडफेक करून प्रशासनाची मोहीम हाणून पाडायचे. हे अवघड काम अजितने हातावर घेतले. स्वत: सर्वांच्या पुढे उभा राहून अतिक्रमण हटवले. हे करताना कर्मचार्यांना विश्वास देताना त्यांना दमही भरला की, ‘मी मोहिमेवर असेपर्यंत कोणीही पळून जाणार नाही आणि गेलाच तर त्याला निलंबित केले जाईल’, असा इशारा अतिक्रमण पथकाला दिला. स्वत: सिंघमस्टाईलने सर्वांच्या पुढे उभा राहून व्यापार्यांच्या दगडांचा सामना केला. व्यापारी थकले. शेवटी अतिक्रमण हटविण्यात यश आले.
सेल्फ अॅटेश्टेशन आणि नोटरीबंदीचा निर्णय :
अजित, महाराष्ट्र शासनात 2007 ला कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात रूजू झाला. त्याने सेल्फ अॅटेश्टेशन आणि नोटरीबंदीची संकल्पना मांडली आणि मंजूर करून घेतली. 2013-14 लाच यासंबंधीचा महाराष्ट्र शासनाचा जीआर आलेला आहे. मात्र, लोकांना त्याची माहिती नाही. असे करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे.
तोट्यातील परिवहन आणले फायद्यात :
सोलापूर महानगरपालिकेचा उपायुक्त असताना अजितकडे परिवहन खात्याचा पदभार होता. अजितने पदभार घेण्यापूर्वी परिवहन दरदिवशी 30-35 हजार रूपयांनी तोट्यात होते. 700-800 कर्मचारी, 7-8 महिण्यांनी पगार व्हायचा. नेहमीच कटकटी, वाद म्हणून कोणीच परिवहनचा पदभार घ्यायला तयार नव्हता. अशा विपरीत परिस्थितीत अजितने आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत परिवहनला दिवसामागे 2-3 हजार रूपये फायद्यात आणले. तीनचार वेळा पगारवाढ आणि नियमित पगार केला. खासगी बस भाड्याने घेऊन परिवहन खात्याला फायद्यात आणले. असा प्रयोग महाराष्ट्रात पहिलाच झाला. अलीकडे एस. टी. महामंडळाने हा प्रयोग सुरू केला आहे.
एक रूपया न घेता 132 जणांना नोकरी :
परिवहन खात्याला शिस्त लावण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले. खराब वर्तन आणि अनियमिततेच्या कारणावरून 128 जणांना नोकरीतून काढले. ज्या कर्मचार्यांनी वर्तन सुधारण्याचे लेखी दिले अशा पाच जणांना पुन्हा नोकरीत घेण्यात आले. त्यामुळे उर्वरित कर्मचारी लेबर कोर्टात व औद्योगिक कोर्टात गेले. या कोर्टांची खासियत अशी आहे की, ते नेहमी कर्मचार्यांची बाजू जास्त घेतात. मात्र, या प्रकरणात या दोन्हीही कोर्टांनी अजितच्या बाजूने निर्णय दिला. या कर्मचार्यांच्या जागेवर 132 वाहक-चालक मेरिटच्या आधारावर निवडण्यात आले. तत्कालीन पालकमंत्री, आमदार, महापौरांच्या उमेदवारांच्या याद्या आल्या; परंतु त्यांचा एकही माणूस घेतला नाही. 132 जणांना एक रूपयाही खर्च करावा लागला नाही.
यामुळे पालकमंत्री, आमदार, महापौर सगळेच अजितच्या विरोधात उभे ठाकले. चुकीची निवड प्रक्रिया राबविली असल्याचे कारण दाखवत महापालिका स्वत:च्याच अधिकार्याच्या विरोधात कोर्टात गेली. कोर्टानेही अजितचीच बाजू घेऊन महापालिकेला तोंडावर पाडले.
मात्र, या प्रकरणाचा खूप त्रास झाल्याचे अजित सांगतो. सगळ्या राजकारण्यांनी खूप त्रास दिला. महापौरांनी तर 10-12 पत्रकारांच्या समोर माझे माणसं का घेतली नाही, असा प्रश्न केला होता. मेरिटमध्ये न बसल्याने घेतले नसल्याचे अजितने स्पष्ट सांगितले. याबाबत एकही पत्रकार आपल्या पत्रकारितेला जागला नाही, हे विशेष.
अजित सांगतो, या काळात मी हसायचं विसरून गेलो होतो. आणखी एखादं वर्ष राहिलो असतो तर निश्चित पागल झालो असतो, इतका मानसिक त्रास झाला. तथापि, 132 लोकांचे कल्याण करता आले, याचे समाधान असल्याचे तो मोठ्या अभिमानाने सांगतो.
नळदुर्गला बनविले नंबर 1 चा पिकनिक पॉईंट! :
पुरातत्व खात्याचा सहाय्यक संचालक असताना अजितने मराठवाड्यातील किल्ले, मंदिरं आणि मशिदी या पुरातन वास्तूचे संवर्धन व जतन केले. मंत्रालयात कक्ष अधिकारी असताना नळदुर्ग किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी कॅबिनेट नोट पाठविली होती. एकही त्रुटी न निघता ती मंजूर करण्यात आली. अर्थात कागदावरचंही काम अजितनेच केलं आणि प्रत्यक्ष फिल्डवरचंही. आज नळदुर्ग किल्ला मराठवाड्यातील एक नंबरचा पिकनिक पॉईंट आहे. कोरोनाच्या आधी दिवसाला लाखो पर्यटकांनी भेट दिली आहे. या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी सुमारे 11-12 कोटींचा खर्च आला. मात्र, यात शासनाला एक रूपयाचाही खर्च होऊ दिला नाही. काफिल मौलवी मालक असलेल्या युनिटी मल्टिकॉन्स, सोलापूरने हा खर्च उचलला आहे.
मराठवाड्यात पर्यटनाला मोठा वाव :
अजित सांगतो की, मराठवाड्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. संपूर्ण मराठवाड्यात सुमारे 125-150 गडकिल्ले आहेत. मात्र, त्यांची दूरवस्था झालेली असून त्यांचे संवर्धन आणि जतन केले तर मराठवाड्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. या पुष्ट्यर्थ तो जागतिक अहवालाचा हवाला देतो. जागतिक अहवालानुसार उद्योगात गुंतवणूक करताना, तेवढ्याच गुंतवणुकीत पर्यटनातून सातपट रोजगार निर्मिती होते. पर्यटनातून अमर्यादित रोजगार निर्मित होऊ शकते, असा त्याला विश्वास आहे. सुयोग्य मार्केटिंग करण्याची गरज असून मराठवाड्यात खूप काही युनिक आहे.
अजितच्या माहितीनुसार, बिलोलीतील मशिद युनिक आहे. या मशिदीचे वैशिष्ट्ये म्हणजे फार वेगळे आहे. अखंड दगडापासून साखळी, तिच्या टोकाला असलेले घुंगरू आणि बॉलही दगडापासूनच बनविलेला आहे. हे बनविण्याची नजाकत आणि विज्ञान अप्रतिम आहे. हवेची झुळूक आली की ते घुंगरू वाजते. किती हे अद्भूत!
दुसरं उदाहरण देताना तो म्हणतो, देगलूरमध्येही एक मशिद आहे, जिचे पर्यटकांना मोठं आकर्षण आहे. या मशिदीत सात दगड असे आहेत की, त्यातून ‘सा, रे, ग, म, प, ध, नी, सा’ हे सप्तसूर निघतात. आपल्या पूर्वजांनी किती उच्चदर्जाचे तंत्र आणि विज्ञान वापरून हा अनोखा ठेवा आपल्यासाठी ठेवला आहे.
वेरुळची लेणी तर अप्रतिम! :
मराठवाड्यातील पर्यटनावर अजित भरभरून बोलतो. वेरुळची लेणी तर अप्रतिम आणि अद्भूत आहे. बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माच्या लेणी येथे आहेत. एक लेणीतील बुद्ध मूर्तीच्या चेहर्यावर वेगवेगळे भाव दिसतात. तीन कोनातून पाहिले तर तीन वेगवेगळे भाव पाहावयास मिळतात. ही लेणी कोरताना दोन लाख टन दगड कोरून काढलेला आहे. या कोरलेल्या दगडाचा साधा चिपुराही 200 किलोमीटरच्या परिघात सापडत नसल्याचे गूढ अद्यापही कायम आहे. सूर्याची किरणं, पाण्याचा प्रवाह, वार्याची दिशा, या सगळ्यांचा सुयोग्य वापर केलेला असलेले हे विज्ञान जगातील एकमेव आहे.
पुढे तो सांगतो की, सुमारे सहाशे वर्षे या लेणीचे काम सुरू होते. धर्म बदलले, राजवटी बदलल्या, पण एकाही राज्याने निधी थांबवला नाही, ही किती उच्च कोटीतली नीतिमत्ता! आज काय सुरू आहे? सरकार बदलले की, आधीच्या सरकारच्या योजना जाणीवपूर्वक बंद केल्या जातात, यावरही अजितने बोट ठेवले आहे.
वेरूळच्या लेणीच्या तंत्राविषयीही अजित भाष्य करतो. या लेणीतील ध्यानधारणा कक्ष अशाप्रकारे बांधलेला आहे की, ज्यात हवा, सूर्यप्रकाश जात नसतानाही गुदमरल्यासारखे होत नाही. या कक्षाच्या भिंतीचे तंत्रज्ञान त्याला कारण आहे. या भिंतींमध्ये गांजा वनस्पतीच्या मुळ्या आणि पानं वापरलेली आहेत. या वनस्पतीत तिच्या वजनाच्या 200 पट कार्बनडायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेथे गुदमरल्यासारखे होत नाही. त्या काळातलं विज्ञान किती प्रगत होतं? ही सारी देण नालंदा, तक्षशिला आदी विद्यापीठांची असल्याचेही अजित ठामपणे सांगतो.
सोनेरी महल परिसराचा कायापालट :
प्रशासनात असूनही खूप काही करता येण्यासारखे आहे. मग सरकारची इच्छा असो वा नसो! आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक कामे करता येतात, असे अजित सांगतो. तो जेव्हा सोनेरी महल येथे सहाय्यक संचालक म्हणून आला तेव्हा हा परिसर उजाड माळरान होता. औरंगाबादेतील जनसहयोग बहुउद्देशीय संस्थेचे प्रमुख प्रशांत गिर्हे यांना वृक्षारोपण करण्याचा प्रस्ताव दिला. संस्थाही अशा कामात आग्रही असल्याने त्यांनी लगेच होकार दिला. ही संस्था दुर्मीळ आणि औषधी झाडं लावतात आणि जगवतात. त्यांच्याकडे 100-150 माणसं स्वयंस्फूर्तीने कामं करतात. शासनाचा एक रूपया खर्च न करता सोनेरी महल परिसर हिरवागार बनविला आहे.
सॅटेलाईट ईमेज : पुरातत्व विभागाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सोनेरी महल पहिल्या चित्रासारखा, तर पदभार सोडल्यानंतर झालेला बदल दुसर्या छायाचित्रात खुलून दिसतो आहे.
महाराष्ट्र गीताचे बनविले मॅन्युअल:
महाराष्ट्र प्रशासनात एक बुद्धिमान आणि सिन्सीअर अधिकारी म्हणून अजितचा नावलौकीक आहे. म्हणूनच प्रधान सचिव विकास खरगे यांनी मंत्रालयातील इतक्या अधिकार्यांतून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताचे मॅन्युअल बनविण्याची जबाबदारी अजितवर सोपवली. अजितने ही जबाबदारीही मोठ्या कुशलतेने पार पाडली. हे मॅन्युअल म्हणजे एक छोटी पुस्तिका आहे. महाराष्ट्र शासनाचे हे पहिले पुस्तक असे आहे की, जे बोलते आणि गातेही. स्कॅन केले की हे गीत वाजते, अशी या मॅन्युअलची खासियत आहे.
आपल्या सर्जनशीलतेतून अजित महाराष्ट्र प्रशासनात विविध पदांवर राहून मोठमोठे पथदर्शी प्रकल्प राबवित आहे. जिथे जाईल तिथे आपल्या कामाची छाप तो सोडून जात आहे. म्हणून तो महाराष्ट्र प्रशासनात एखाद्या हिर्याप्रमाणे चमकताना दिसतो आहे.
संत तुकाराम मुलांचे शासकीय वसतिगृहाने त्याच्यावर केलेल्या जाणिवांचा हा परिणाम मानला पाहिजे.
अजितच्या कार्याला सॅल्यूट!
तात्पर्य : परिवर्तन हेच विश्वासचे सत्य आहे.
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा