बंडखोर ‘राम’ : मुलं कोल्हाट्याचं पोर म्हणून हिणवायचे...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बंडखोर ‘राम’ : मुलं कोल्हाट्याचं पोर म्हणून हिणवायचे...प्रा. डॉ. राम आशाबाई ठाकर या मित्राविषयी भावना व्यक्त करणारे हे सदर बहुजन शासक मीडियाच्या वाचकांसाठी
भास्कर सरोदे :
‘कोल्हाट्याचे पोर’कार डॉ. किशोर शांताबाई काळे हे मिलिंद मुलांचे शासकीय वसतिगृहात आले होते. राममुळेच डॉ. काळे दोन दिवस वसतिगृहात मुक्कामी राहिले. यावेळी ते प्रसिद्धीच्या शिखरावर होते. त्यांच्याबरोबर मला गप्पा मारण्याचा योग राममुळे आला.
या चळवळीत राम कसा? हा प्रश्न अनेकांचा असायचा. काहीजण टोमणेही मारायचे. त्या टोमण्यांनी राम अनेकदा घायाळ व्हायचा! कोलमडून पडायचा!! आई संगीतबारीत असणं आणि कोल्हाटीण असणं यातला फरकच लोकांना वा विद्यार्थ्यांना समजायचा नाही.
खरं तर थट्टामस्करीचा हा विषय नव्हताच, पण असंवेदनशील मुलांना कोण सांगणार? माणसाचा जन्म कोठे व्हावा, हे त्याच्या हातात नसतेच मुळी. तथापि, जातिव्यवस्थेची मुळं समाजमनावर इतकी खोलवर रूजली आहेत की, ती आपल्या जाणिवेतून आणि नेणिवेतून प्रकट होत असते. रामचा विषय तर त्यापलीकडचा होता.
राम हारणारा नव्हताच, तो लढणारा होता, मार्ग काढणारा होता.
एके दिवशी तो माझ्या रूममध्ये आला अन् म्हणाला, ‘सरोदे, मला तुझ्या रूममध्ये राहायचे...’
मी म्हटले का?
‘काही मुलं मला चिडवतात, डिवचतात, त्यांच्या तोंडी लागलो तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल....’
माझ्यासोबत राहिल्याने ते तसे करणार नाहीत, असा रामचा अंदाज होता, हे मी हेरले होते. रामला होणारा त्रास अनाकलनीय होता. मात्र, त्याविषयीची पुसटशी कल्पना आम्हा दोघांमधील कॉमन मित्र राजेश पंडितने DIG, भुवनेश्वर, ओडिसा. सध्या अमेरिकेतील MIT मध्ये प्रशिक्षणला आहे) मला दिली होती. आणि जो मुलगा रामला नेहमी टोमणे मारायचा, त्याचा संत तुकाराम मुलांचे शासकीय वसतिगृहाला प्रवेशच माझ्या विनंतीवरून आदरणीय चौधरी सरांनी केलेला होता. असं म्हणतात आता तो फार श्रीमंत झालाय आणि हो, मला तर तो केव्हाच विसरलाय. त्याचे नाव घेण्याची गरज वाटत नाही इतका तो ‘मोठा’ झालाय.
राम आणि मी सेलूच्या नूतन महाविद्यालयाचे विद्यार्थी. हा आमच्यामध्ये एकसमान धागा असला तरी औरंगाबादला मिलिंद मुलांचे शासकीय वसतिगृहात आल्यावरच आमची खरी ओळख झाली. यामुळेही मला त्याची सहानुभूती वाटली.
मी होकर दिला...
आणि झालेही तसंच, रामची पुढील दोन वर्षे नको वाटणार्या त्रासाविना गेली.
मी आणि संभाजी बुक्तरेंसोबत राम खूपच मिळूनमिसळून राहिला. अनेकदा आनंदून हसला, फुलला, बहरला...
त्याला चुकूनही ‘त्या’ टोमण्याची जाणीव अथवा आठवण आम्ही होऊ दिली नाही...
आपल्या नावासोबत आईचे नाव लावून रामने या पुरुषी व्यवस्थेच्या विरोधात बंडच पुकारले होते. अनेकांना ते विचित्र वाटायचे. मात्र, राम आपल्या निर्णयावर ठाम होता. बापाच्या नावाविना कर्तृत्व गाजविता येते, हेच रामला दाखवून द्यायचे होते. शिवाय भारत मातृसत्ताक कालखंडात समतामूलक होता, हाही संदेश त्याला त्यातून द्यायचा होता. पुरुषसत्ताक व्यवस्था विषमतावादी आहे, असे त्याला म्हणायचं होतं. मातृसत्ताक पद्धती भिल्ल आदिवासींमध्ये आजही कार्यरत आहे. एका स्त्रीचा आदर-सन्मान करणारा हा राम आहे. असे धाडस येर्या गबाळ्याचे काम नाही...असे करायला वाघाचे काळीज लागते, जे रामकडे आहे!
राम बीई मेकॅनिकल पास होणारा भिल्ल आदिवासी आणि नाच गाण्याची पार्श्वभूमी असलेल्या समाजातून आलेला मराठवाड्यातील पहिला विद्यार्थी!
आज तो प्राध्यापक व संचालक, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्र आणि प्रभारी नियोजन अधिकारी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे कार्यरत आहे. त्याने IIT मद्रास सारख्या नामवंत संस्थेतून M.Tech. केले आहे.
तमाशा कलावंतांसाठी डॉ. किशोर काळेंसोबत काम, आदिवासी समाज, बहुजन चळवळ, आदिवासी चळवळीत सहभाग, 2005 पासून FASA (Phule Shahu Ambedkar Student Association advisor ), बामसेफ, मालेगांव व भिवंडीतील 4500 यंत्रमाग कामगारांसाठी काम व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीचे प्रयत्न, विद्यापीठातील शैक्षणिक सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील आणि तो स्तंभलेखक असून त्याच्या तीन पुस्तकांचे लेखन पूर्णत्वास आले आहे.
असा हा हुरहुन्नरी राम मिलिंद मुलांचे शासकीय वसतिगृहाचा विद्यार्थी आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
तात्पर्य : विपरीत परिस्थितीचा सामना केला पाहिजे, विजय निश्चित आहे.
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा