मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर हे खरे (पाणी) पुजारी!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर हे खरे (पाणी) पुजारी!
![]() |
पाणीप्रश्न आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आधार देण्यासाठी ‘नाम’ फाऊंडेशन कार्यरत आहे. एका हतबल महिलेला आधार देताना सुप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे. |
-राजाराम सूर्यवंशी
आता नाम फाऊंडेशन पाण्यावर नेमकं काय काम करतं हे मी येथे सांगण्यापेक्षा (ते तुम्ही यु ट्युबवर बघू शकता) मी हा लेख ज्या हेतूने लिहित आहे व श्री. नाना पाटेकर व सन्माननिय मकरंद अनासपुरे यांची याबाबतची जी मुलाखत मी ऐकली, त्यावरून गौरीहर शिवशंकर व पाणी यांचा जो वास्तविक संबंध होता, तो मी येथे विशद करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातून आपल्या काही अंधश्रद्धा दूर झाल्यात, पाण्याचे वास्तव महत्व आणि आपण लावलेली पर्यावरणाची वाट याविषयी थोडी जागृती होऊन आपण काय केले व करतो आहोत किंवा काय करू शकतो याची साधी जाणीव झाली तरी या लेखाचे ते यश समजेल!
श्रद्धा + अंधश्रद्धा यातील खरा इतिहास जाणून घेतला नाही, तर आपण स्वतःला ज्ञानी, प्रज्ञावंत वा किमान सुशिक्षित म्हणण्यास काही अर्थ नसेल असे मला वाटते, म्हणून हा लेख प्रपंच मांडतो आहे.
कवयित्री शांता शेळकेंनी दिलेला संदेश :
कवयित्री शांता शेळकेंनी एक सुंदर आशयघन लोकगीत लिहिले होते,
‘डोलकर दर्याचा राजा...’
या लोकगीतात त्या एके ठिकाणी लिहितात,
‘वाट बघून थकते पिरती, तव्हा दर्याला येते भरती’
येथे पृथ्वीने आकाशाला पती मानले असून ती पावसाचे पाणी येण्याची, मेघांच्या डमरुचा गडगडाट ऐकण्याची वाट पाहून थकते! मग वार्याचे तांडव नृत्य सरू होते व मेघ गर्जनेसह दमदार पाऊस पृथ्वीवर कोसळतो, त्याने सारी धरती ओलीचिंब होते.
या लोकगीतात कवयित्री शांता शेळकेंनी नकळत, त्यांच्या नेणिवेतून मातृसत्ताक व्यवस्थेचे वर्णन केले आहे. ते म्हणज स्त्रिया या भूमातेच्या प्रतिनिधी व पुरुष आकाश देवाचे!
शिवव्रत आणि शेतीचा शोध याचा संबंध :
ज्या आदी स्त्रीने (Nirruti)-राष्ट्रदेवीने, येथे गौरीने शेतीचा शोध लावल्यावर तिच्या झाडांना, पिकांना पाणी देण्यासाठी आदीपुरुष अर्थात शिव गंगेच्या पाण्याचा ओघ वळवतो. या ओघ वळवण्याला एकदंत रूपी नांगराने मदत करतो. नांगर ओढणार्या वृषभाने अर्थात नंदीने डोंगर उताराचे नागमोडी वळणे छाटून ते पाणी सरळ रेषेत गौरीपर्यंत आणून पोहचवितो आणि शेती सुजलाम् सुफलाम् करतो, असा त्या शिवव्रताचा अर्थ व इतिहास आहे.
यामुळे सर्व शिव मंदिरे पाणी / झर्याच्या उगमाजवळ वा तळ्याकाठी का आहेत याचे हे उत्तर आहे. जे शिवमंदिर आहे तेथे पुष्करणी अवश्य वा हमखास.
![]() |
शेतीचा शोध लावणारे राष्ट्रमाता निर्ऋति |
पाण्याचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व :
शिवाचा वा शिवलिंगाचा पाण्याने अभिषेक करणे, शिव मंदिराचा गाभारा पाण्याने भरणे वा पाण्याने भरण्याचे व्रत करणे, कोटीलिंगार्चन व्रत करणे ही सर्व आपल्या नेणिवेतील पाण्याच्या व्यवस्थापनाची सूत्रे आहेत. या प्रकारे प्रकृती+परमेश्वराची दांपत्यपूजा जी केली जाते ती म्हणजे शिवव्रत.
कावडाने रामेश्वराला अभिषेक :
ऐतिहासिक काळी कावड भरून रामेश्वराला अभिषेक करण्याची प्रथा होती.अजूनही उत्तर भारताच्या काही भागात अशी प्रथा आढळून येते. यात संगमावर अंघोळ करून शिखरावर पाणी वाहून नेले जाते. जे परत पुढच्या मान्सूनमधेच येणार असते. म्हणून त्या शिखरेश्वरास पाण्याने अभिषेक करतात. ते पाणी डोंगरावरील जीव जंतूंना जीवन मिळण्यासाठी असते. शंख अथवा कवाडात भरून वर शिखरावर वाहून नेलेले गंगाजल व त्यात टाकलेल्या तांदळाच्या अक्षता या पशुपतीच्या गणांना दिलेला चारा व पाणी करण्याची आमच्या पूर्वजांची दूरदृष्टी आणि यतार्थ समज या कावड प्रथेमध्ये होती.
ज्ञानेश्वरांनी संबोधलेला कापडी ध्वज! :
या प्रकारच्या प्रतीक पूजेत पशुपक्ष्यांना चारापाण्याची तरतूद करणे, झाडांच्या वाढीसाठी त्यांच्या आसपासची जमीन ओली ठेववणे, त्या ओल्या जमिनीला पाणी देणे, तसेच अर्ध नारीनटेश्वराच्या रूपात स्त्री-पुरुष समानता व सामाजिक विकासासाठी स्त्री-पुरुष एकात्मता दृढ करणे, यात गौरीला अग्रपूजेचा मान देऊन शिवाने स्वतः कर्म विरक्ती स्वीकारून गौरीच्या हाती संसाराची सूत्रे देणे, यात मातृसत्ताक व्यवस्था दृढमुल ठेवण्याची तरतूद कायम ठेवणे म्हणजे खरी शिवपूजा आहे.
ज्ञानेश्वरांनी नवव्या अध्यायात या शिवपूजेला योग मार्गातला जीवन दिग्दर्शक कापडी ध्वज म्हटले आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज योगाभ्यासी नाथ संप्रदायी होते. या गौरीहराच्या पूजेचे पाणी बाष्पीभवनरूपाने सूर्यनारायण समुद्रातून उचलून घेतो, पाऊसरूपाने गिरीशिखरांवर फेकतो, ते वाहून जाऊ नये म्हणून ते आडवणं, तळी बांधणं, तळ्यातील गाळ काढणं, अशी कामे शिवगणाकडून करून घेणे व ते खाली सपाट भूमीपर्यंत, शेतीभातीपर्यंत सरळ पोहचविणे म्हणजे शिवव्रत!
अशी सर्व कामे सध्या ‘नाम फाऊंडेशन महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर, बिहार व उत्तरांचलमध्ये करतो आहे.
‘नाम’चे घोषवाक्यच आहे की,‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’.
या योजनेखाली ‘नाम’ने आतापर्यंत महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांतील 125 गावांमधील नदी, नाले, तळी, तलाव व धरणांमधून सव्वालाख क्युबीक मिटर गाळ काढला आहे. आता महाराष्ट्र शासनाबरोबर सामंजस्य करार करून 350 गावांमध्ये 50 लाख क्युबीक मिटर गाळ काढण्याचा उद्देश आहे. त्यात कोयना धरणाचाही समावेश आहे.
पाटबंधारे बांधून हे पाणी सरळ शेतीला पोहचविणे ही एक तपश्चर्या आहे, जी पुराणाकाळी मुनी करत असत. तशी तपश्चर्या आज श्रीयुत नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे करीत आहेत.
कण्व मुनीचा आश्रम, संदीपनी मुनीचा आश्रम, धौम्य मुनीचा आश्रम, वाल्मिकी मुनीचा आश्रम यातून आपणाला हेच वर्णन वाचायला मिळते. याच प्रकारचे मूलभूत कार्य एकव्रत स्वरूपात ‘नाम’ करत असल्याने सन्माननिय नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे करत असल्याने ते वर्तमानातील खरे मुनी व पाणी पुजारी ठरतात यात शंकाच नाही.
धार्मिक श्रद्धा वा अंधश्रद्धा बाजूला सारून जरा विवेकी दृष्टीकोनातून हा पौराणेतर इतिहास वाचून पाहिला वा जाणला, तर आपल्याला यातीला अर्थ बरोबर उमजतो.
गौतम मुनीने महाराष्ट्रात गंगा आणली, तर भगीरथाने उत्तर भारतात आणून तो प्रदेश सुजलाम सुफलाम केला, असा उल्लेख आपल्या वाचणात नेहमी येतो. तथापि, त्याविषयीचे पूर्ण ज्ञान नसल्याने त्याचा अर्थ आपल्याला उमगत नाही.
उत्तर चरितमानसात राम सीतेला अशा मुनींनी फुलवलेल्या वनांचे व वनाश्रमांचे वर्णन करताना रामाला दाखवले आहे. दुसरीकडे कालीदासाने शाकुंतलेला झाडांना पाणी व वन्यजीवांना अन्नपाणी दिल्याशिवाय तोंडात पाण्याचा एक थेंबसुद्धा न घेण्याचे व्रत करताना दाखवले आहे. या उदाहरणात आपल्याला पाण्याविषयी स्पष्ट दिसून येते.
मात्र, त्याच रामायणात तळे व सरोवरे खाजगी मालकीची व राखीव बनवणार्या सरंजामशाहीने जन्म घेतला. अशाच एका तळ्यावर श्रावणबाळ हा गरीब ब्राह्मणेतर आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा करताना त्यांना तहान लागली. तेव्हा तो दशरथ राजाच्या मालकीच्या राखीव तळ्यावर पाणी आणायला गेला असता तळेरक्षकांनी श्रावणबाळाचा वध करताना दाखवले आहे.
दुसरीकडे महाभारतात द्रौपदीच्या राज्यातले तळे एवढे काचेसारखे स्वच्छ दाखवले आहे की, दुर्योधनाला द्रौपदीचा अपमान करण्यासाठी ते तळे घाण करताना त्यात पाय घसरून पडल्याचे दाखवले आहे.
तसेच, महंमद पैगंबराने मक्का-मदिनेत उन्हाळ्यातली पाणी कमतरता भरून काढण्यासाठी मान्सूनपूर्व येणार्या रमजानमध्ये सूर्य उगवल्यापासून सूर्यास्तापर्यंत सतत महिनाभर दिवसा एक पाण्याचा थेंबही न पिण्याचे व्रत सांगितले आहे. हे एक प्रकारचे पाण्याचे मनेजमेंट होते.
![]() |
अर्धनारी नटेश्वर स्त्री-पुरूष समानतेचे प्रतीक |
ज्ञानेश्वरांचा दाखला :
अशा प्रकारचे पुराण युगापासून ते पूर्वमध्ययुगापर्यंत चालत आलेले पाण्याचे नियोजन, नियमनाने व्रतवैकल्याचे रूप घेतल्यावर दगडावर पाणी ओतणे हीच शिवपूजा मानली गेली आणि पूजार्यांनी पाण्याबरोबर देवळांवरही कब्जा केला.अशा स्वार्थी पुजार्यांवर शिव रागवला व भस्म लावून स्मशानात जाऊन बसला असे खुद्द ज्ञानदेवांनी म्हटले आहे.
‘येणेच क्षेत्रा भिमाने राज्य त्यांगिले ईशाने।
गुंती जाणूनी स्मशाने वासु केला?’
आकाशातून पडणारे पाणी कसे अडवावे, कसे जिरवावे व शेतीच्या कामासाठी ते कसे वापरावे यावर आज जगभरात शेकडो ग्रंथ उपलब्ध आहेत. अनेक जिज्ञासू त्यांचा अभ्यास करीत आहेत. नाना व मकरंदसारखे आधुनिक पाणी पुजारी त्यावर पूर्ण निष्ठेने कार्य करीत आहेत. मात्र, महाराष्ट्रीयन, भारतीय शेतकरी व सर्वसामान्य जनतेने या कार्याला फारसा प्रतिसाद दिला असं वाटत नाही. प्रसार माध्यमेही याबाबत तुसडेपणाने वागताना दिसत आहेत.
दुसरीकडे काही मंडळी नवनवे व्रत व उपवासांच्या पोथ्या लिहून व प्रसार माध्यमांवर त्यांची प्रवचने दाखवून, तर काही मंडळी ‘महापुराण’ सारखी मेगा ईवेंट भरवून राज्याचा पैसा आणि जनतेचा बहुमूल्य वेळ वाया घालवून नव पुराणकारांना आसरा देत आहेत. ते नव अंधश्रद्धा फैलावत आहेत. मध्ययुगातील या वेडापायी आपल्या देशात इस्लाम व ख्रिस्तीधर्माने घुसखोरी केली होती, हे विसरून चालणार नाही.
भारतात एकूण जमिनीच्या पृष्ठाभागाच्या आजही 48 टक्के भाग शेतीखाली आहे. युरोपात व अमेरिकेत हे प्रमाण अनुक्रमे 30 व 18 टक्के आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत देश जगात देश दुसर्या क्रमांकावर आहे. तरी शेत कामासाठी शेतमजूर मिळत नाही ही आपली समस्या आहे. याला कारण मोबाईलचे वेड, महापुराणाचे वेड व मोफत राशन हे आहे. त्यामुळे जपान जसा उद्योगी लोकांचा देश म्हणून ओळखला जातो, तसा भारत आता आळशी लोकांचा देश म्हणून ओळखला जावू लागला आहे.
एकेकाळी आपल्या प्राचीन कष्टाळू मुनींनी व त्यांच्या शास्त्रांनी हा आपला देश सुवर्णभूमी बनवला होता. बुद्ध कालखंड व सम्राट अशोकाचे राज्य हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे जगभरातले धाडसी लोक नशीब काढायला भारतात येत असत. अनेक चिनी, जपानी, अरब व युरोपियन प्रवाश्यांनी याबाबत बरेच दाखले लिहून ठेवले आहेत. ब्रिटिश भारतात आगमन करेपर्यंत हा ओघ सुरू होता. त्यातील चतूर लोकांनी भारतातील हे ज्ञानभांडार भारतातून अरबस्थानात नेले, अरबस्थानातून ते ज्ञान तुर्कस्थानात गेले व शेवटी तुर्कस्थातून युरोपात जाऊन देश सधन व साधनसंपन्न बनलेत. आपण मात्र पोथ्यांची पारायणे व चुकीच्या व्रत वैकल्यातच गुरफडून राहिलोत.
आपली शहरे खेड्यांची साधन संपत्ती लुटून तट्ट झाली आहेत, असं महात्मा गांधींपासून सर्व डाव्या विचारवंतांनी म्हटले आहे. खेडे व शहर यांचे सहचर्य जोपर्यंत समतोल होते तोपर्यंत शिवव्रताचे व्यवस्थापण नैसर्गिक होते; परंतु हा समतोल पुढे पुढे बिघडत गेला व आजची शहरे गटारगंगा झालीत. त्याला आपली सदोष नगररचना कारणीभूत आहे.
डॉ. स्वामीनाथन् यांनी एका प्रातःविधीसाठी आपण 10 लिटर पाणी प्लशने सोडतो यावर टीका केली होती. कारण हे पाणी तर वाया जातेच गटारे सांचतात, रोगराई होते आणि प्रदूषणाचे प्रश्न निर्माण होतात.
निसर्गात जंगलात प्रदूषण नसते. झालेले प्रदूषण निसर्ग त्याच्या अन्नसाखळीने नाहिसे करतो. तो नव्या नव्हाळीने झळाळत राहतो. मात्र, शहरातले प्रदूषण नष्ट होत नाही उलट वाढत जाते. जंगालात पृथ्वीच्या पोटात पडलेले बी त्याचे अंगभूत अन्न व जमिनीतील ओलावा यावर रुजून वर येते. त्यानंतर त्याला गरज असते ती मेघराजाच्या कृपेची. मेघराजाच्या या कृपेवरच सारी प्राणी व वन्यसृष्टी उभी आहे. म्हणून आपल्या दार्शीकांनी शिवास मेघश्याम वर्ण दिला आहे.
स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने जी मोठ मोठी धरणे बांधण्याचा जे उद्दिष्ट ठेवले होते, त्यामागे मेघातून पडणारे पाणी अडवून ते शेती विकासासाठी वापरले जावे हा हेतू होता. मात्र, वाढत्या शहरीकरणाने हे पाणी पिण्यासाठी व उद्योगधंद्यांसाठी आरक्षित होऊ लागले. शेतीसाठी नंतर मग वेगळ्या योजना आल्या. विहिरी, कूपनलिका आदी. तिकडे शहरं जास्त पाणी प्यालाने ती गटारे झालीत, हिवतापाची माहेरघर बनलीत. दुसरीकडे बेसुमार जंगलतोड झाल्याने पाऊसमान कमी झाले. त्याने भूगर्भाची पाणी पातळी खाली गेली व गावोगाव टँकरमाफियांची टँकर फिरू लागली. हे बिघडलेल्या शहरी नियोजनाचे परिणाम होते.
यासाठी प्रथम गरज आहे ती पाणी नियोजनाची व पाणी वाटपाच्या तंत्रज्ञानाची.नेमके हे व असेच काम ‘नाम’ करत आहे. म्हणून सर्वश्री नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे मला खरे पाणी पुजारी वाटतात.
![]() |
राजाराम सूर्यवंशी, पालघर 9503867602 |
(लेखक हे सामाजिक विचारवंत असून त्यांच्या ‘युगस्त्री सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या असून या पुस्तकावर ‘सावित्री एक क्रांती’ ही दूरदर्शन मालिका चालवली गेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने समिती व महात्मा फुले चरित्र साधने समिती यांचे ते सन्माननिय माजी सदस्य आहेत.)
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा