आठवणींना उजाळा : सातवीत काढला पहिला मोर्चा; नि केला दोन दिवसाचा संप!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आठवणींना उजाळा : सातवीत काढला पहिला मोर्चा; नि केला दोन दिवसाचा संप!
भास्कर सरोदे, औरंगाबाद :
मार्चचा महिना. केंद्रीय प्राथमिक शाळा, कापडसिंगी. एकपारगी (फक्त उन्हाळ्यातच अर्धादिवस) शाळा. एकेसकाळी 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) आणि 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) ला जशी प्रभातफेरी निघावी, तशीच मुलांची प्रभातफेरी निघाली. फरक एवढाच की, आमच्यासोबत कुणी शिक्षक नव्हते. बर्याच मुलांच्या हातात पाट्या होत्या आणि त्यावर लिहिले होते की, ‘शिक्षक द्या, अन्यथा शाळा बंद’. होय, तो विद्यार्थ्यांनी काढलेला मोर्चाच!
कशाची प्रभातफेरी म्हणून गावातील मंडळीही रस्त्यावर आली. कुणी आमुक घोषणा द्या, टमूक घोषणा द्या, असे सांगत होता. एकदोघे तर पालक-शिक्षक समितीचे अध्यक्ष रामराव (पाटील) हराळ यांच्याविरोधात घोषणा द्यायला सांगत होते. तेव्हा ते तसे का सांगत होते, हे आम्हाला काही कळत नव्हते. मोर्चाचे नेतृत्व मीच करत असल्याने नकळत आम्ही कुणाचे ऐकून चुकीच्या घोषणा दिल्या नाही, ते चांगलेच झाले.
आता रामराम पाटील म्हणजे एक जिंदादिल माणूस! रांगडा स्वभाव. परंपरेने दोन बायका. पूर्वी चार नंबर होते…! नंतर ते कमी कमी होत गेले. गावात टोलेजंग वाडा. तेथून त्यांचा थाट आणि रूबाब चालायचा. या वाड्याचे वैशिष्ट्ये असे की, त्याला जातीच्या भिंती नव्हत्या. या वाड्यात कुणाचाही वावर असायचा. आमच्या घराशी रामराव पाटलांच्या घराचे आजोबापासूनचे संबंध. आजोबाला खाण्या-पिण्याचा नाद, तसा रामराव पाटलांनाही. आजोबाचा वारसा आमचे चुलते चालवित. मला आठवतंय की माझे चुलते कधीमधी हातभट्टीवर दारू काढायचे. अस्सल मोहाची असायची. त्यामुळेही त्यांच्याकडे नेहमी ये-जा असायची.
त्याकाळी आम्हा बच्चे कंपनीवर दोन माणसांची फारच जरब होती. एक रामराव पाटील आणि दुसरे व्यक्ती म्हणजे सेवालाल चव्हाण! रामराव पाटलांना पाहूनच आम्ही चिंगाट पळायचो. दुसरे गृहस्थ म्हणजे सेवालाल! सेवालाल हे माझा वर्गमित्र देविदास चव्हाणचे वडील. त्यांच्याविषयी अशी चर्चा होती की सेवालाल चव्हाण ‘वेडा माणूस आहे, तो मुलांना पळवून नेतो’, वगैरे वगैरे…रामराव पाटलांचा दरारा तर सेवालाल चव्हाण यांची भीती म्हणून आम्ही मुलं घाबरायचो. सेवालाल बकर्या चारत रानोमाळ भटकायचे. अंगावर पूर्ण कपडे नसायचे. अर्धवट कपड्यानिशी आणि अनवानी पायांनी सारा शिवार एक करायचे. कधी आंघोळ करत तर कधी नाही. कदाचित त्यांच्या या राहणीमानामुळेही लोक त्यांना वेडा म्हणत असतील. मात्र, माझं मन त्यांना कधीच वेडा म्हणत नव्हतं. माझ्या बालमनाला त्यांच्या डोळ्यात प्रतिशोध दिसत होता. कायम युद्धावर असल्यागत त्यांची देहयष्टी, सैरभैर नजर, जीवनाशी आणि व्यवस्थेशी संघर्ष असल्यागत त्यांचे वागणे वाटायचे! कळत्या वयापर्यंत ते जिवंत असते तर सेवालाल यांच्या व्यक्तीमत्वाचा अचूक शोध घेता आला असता. असो…ज्यांचा आधीच आमच्या मनावर दरारा आणि धाक असणार्या रामराव पाटलांविरोधात घोषणा का द्यायच्या हे माझ्या समजच्या बाहेरचे होते. त्यांचा आणि शाळेला शिक्षक नाहीत याचा काय संबंध? हे सारे गणितं ताडून पाहिली तर आम्ही योग्य होतो. कुणाच्या बहकाव्यात न येता शांततेत मोर्चा सुरू होता…
मी जेव्हा पहिलीत होतो तेव्हा कंकाळ बाई, बुखारी सर, माळोदे सर, आंधळे सर हे चार शिक्षक होते. शाळेत बुखारी सर आणि माळोदे सर यांचा फार मोठा धाक होता. त्यांच्या हातात कायम रूळ असायचा. विद्यार्थ्यांना टबाटबा बोंबलेपर्यंत ते मारायचे. काही मुलं तर चड्डीत मुतायची (शीऽऽ शूं..चा जमाना नव्हता). अनेकजण त्यांच्या भीतीनेच शाळेत येत नसत. ‘छडी लागे छम्छम्, विद्या येई घमघम्’ ही म्हण प्रचलित होती. अर्थात ती चुकीची होती. या छडीच्या धाकानेच मुलं शाळेत येत नव्हती. त्यामुळे अनेक बहुजनांच्या मुलांना शाळेला मुकावे लागले. ते दोघेही विद्यार्थ्यांना टेबलवर हात ठेवायला लावायचे आणि जोरात हाताची बोटं सडकून काढत. तेवढ्याने समाधान झाले नाही तर ढुंगावर, पायाच्या पोटर्यांवर सटासट् मारायचे. अंगाची लाही लाही व्हायची. आरडाओरडा करूनही काही उपयोग व्हायचा नाही. कारण आमच्या मदतीला यायला कुणालाच सवड नव्हती. शिवाय पालकांचाही गुरुजीवर गाढ विश्वास. आज कसे सारेच बदलले आहे. साधे रागावले तर पालक शिक्षकांना भांडायला जातात. पालक भांडतात म्हणून शिक्षकही आपल्या वकुबाप्रमाणे शिकवून मोकळे होतात. मुलांना काही येवो अथवा न येवो!
वर्ग सात आणि शिक्षक चार. तरीही आम्हाला काही अडचण नव्हती. आम्ही पाचवीला जाईपर्यंत बुखारीसर निवृत्त झाले होते. तर माळोदे सरांची दुसरीकडे बदली झाली होती. आता फक्त आंधळे सर आणि आमच्या कंकाळबाईच होत्या. दरम्यान केकान सर शाळेत दाखल झाले. पाचवीचे वर्षे सरायच्या आतच आंधळेसरांचीही दुसरीकडे बदली झाली. आमचे इंग्रजी नेमकेच शिकणे सुरू झाले आणि इंग्रजी शिकविणार्या आंधळे सरांचीच बदली झाली. गणिताला तर शिक्षकच नव्हते, विज्ञानाचीही तिच गत. कंकाळबाई चौथीपर्यंतच्या मुलांना शिकवत शिकवत कशानुशा वर्ग थोपवून धरत. केकान सर मुख्याध्यापकपदाचा कारभार पाहत आम्हाला हिंदी विषय शिकवत. विद्यार्थ्यांची परवड सुरू होती...
पाचवी, सहावी दोन शिक्षकांवर काढली. सातवीला बोर्ड होता. थेट नापास होऊन गुराढोरामागे जायची भीती होती. अनेकदा मागणी करूनही शिक्षक काही मिळत नव्हते. मार्च आला तरी शिक्षक नाहीत म्हणल्यावर आम्ही ‘शाळा बंद’चा निर्णय घेतला. शाळा बंद पाडण्याचा निर्णय डोक्यात कसा आला, आता निटसे स्पष्ट होत नाही. शाळा बंद पाडायची तर कशी गाजत वाजत..! काय करणार? विलाजच नव्हता! नेहमीच्या प्रभातफेरीमध्ये घोषणा द्यायला मी जसा पुढे असायचो तसा या मोर्चातही पुढेच होतो. पहिलीच्या वर्गात जोराजोरात पाढे म्हणायचे आणि मागे इतरांनी म्हणायचे. दुसरी, तिसरीतही हेच सुरू होते. बाई मला पाढे म्हणायला लावायच्या आणि त्या दुसर्या वर्गाला शिकवायच्या. वर्ग अॅडजस्ट करताना शिक्षकांची तारांबळ उडायची. सायंकाळचा आणि शेवटचा तास तर जोराजोरात पाढे म्हणायचाच असायचा. शिवाय शाळेत देशभक्तीपर गितं म्हणण्यातही आघाडीवर असल्यानेही अपसूकच या मोर्चाचेही नेतृत्व माझ्याकडेच होते.
या मोर्चात त्याकाळचे जीवलग मित्र पंजाबराव हराळ (हिंगोली येथे पोलीस दलात कार्यरत), प्रकाश हारगावकर (परभणी येथे संस्थाचालक), संभाजी नागरे (बंदी मौजा या मुळगावी शेतकरी), भगवान लहाने (जिंतूर तालुक्यात शिक्षक, संस्थाचालक), माणिक राठोड (नामांकित ठेकेदार), देविदास चव्हाण (दहावीनंतर जगाचा निरोप), सखाराम साबळे (आरोग्य खात्यात कर्मचारी), गोवर्धन चव्हाण (ठेकेदार), सुभाष आढे (औरंगाबादेत व्यवसायीक) होते. मी, देविदास चव्हाण आणि सखाराम साबळे अशा तिघांत कायम स्पर्धा असायची. त्यातून हेवेदावे व्हायचे. देविदासचे आणि माझे तर कायम खटके उडायचे. देविदास नेहमी डोक्याला तूप लावून यायचा. त्यामुळे त्याच्या अंगाचा खूप वास येत असे. तूप खाण्याबरोबरच डोक्यालाही लावले तर बुद्धी तल्लख होईल, असा त्याचा कयास असला पाहिजे. त्याचा लहाना चुलतभाऊ मोहन चव्हाण चांगलाच आडदांड होता. तो नेहमी मला त्रास द्यायचा. म्हणून पंजाबराव हराळ, प्रकाश हारगावकर, संभाजी नागरे मला संरक्षण द्यायचे. प्रकाश कबड्डी खेळाडू आणि संभाजी तर पैलवानच होता. ते मोहनला पुरून उरायचे!
मोर्चात मी पुढे घोषणा द्यायला आणि ही मित्रमंडळी त्या घोषणांना आसमंत दाखवायला. गावाचा फेरा मोठा असल्याने मोर्चाच्या डोक्यावर तळपता सूर्य...कुणाच्याच पायात चप्पल वा बुट नव्हते...या चटक्यांपेक्षा शिकूनही शिक्षकाविना अज्ञानी राहिलो तर ते चटके भयंकर असतील म्हणून या चटक्यांचे काही वाटत नव्हते. शाळेत असताना आपापला अभ्यास करण्यात वेळ जायचा. शाळेत कधीच जातीयेता जाणवली नाही. मात्र, शाळेबाहेर गेले की, ती जाणवायची. खेळताना जातीवरून टोमणे मारले जायचे. काहीजण तर मुद्यामहून ‘महारड्या’ म्हणून चिडवायचे. आम्हीही मग असे म्हणणार्यांच्या मागे लागून त्याला झोडपायचो. बौद्धवाड्याला लागूनच पोलीस पाटलाचा वाडा. या वाड्यात सगळेच माळकरी आणि वारकरी. सकाळ-संध्याकाळ भजन-कीर्तन करणारी मंडळी. याच वाड्यातील सुंदर नावाचा वर्गमित्र नेहमी माझ्याबरोबर खेळायचा, जेवायचा आणि अभ्यास करायचा. जेवणात काय कायम चटणी-भाकर (आजच्या मुलांच्या जेवणात जसे पिझ्झा, बर्गर,...वगैरे वगैरे असते, तसे काही नसायचे.). बर्याचदा पावसाळी पिकांमध्ये पाटे घालून भेंडी, गवारीच्या शेंगा वाळवून ठेवल्या जायच्या. त्याच शेंगा वा भेंडी बिगरहंगामात भाजी म्हणून वापरली जायची. याला निगुतीने (आपल्या आजच्या भाषेत आर्थिक नियोजन) वागणे म्हणायचे. ठेंचा, कधी जवस, कर्हाळ तर कधी तिळाची चटणी असायची. आजचे मस्तवाल लोक ‘ओमेगा थ्री’ मिळावा म्हणून मोठ मोठ्या दवाखान्यात जातात. आम्हाला ओमेगा थ्री या तीन गळीतधान्यातून मुबलक प्रमाणात मिळायचा. त्यामुळे आमची हाडंही मजबूत व्हायची. ग्रामीण भागात जेवणात फारसा भेद नव्हता. मात्र, उच-नीचतेची भावना असायची.
जवळच विहीर होती. बौद्धवाड्यातील महिला या विहिरीवर पाणी ‘मागायला’ जायच्या. कारण विहिरीचे पाणी शेंदून आणण्याची परवानगी नव्हती. बौद्ध महिलांनी विहिरीचे पाणी शेंदले तर ती बाटते, असा जातीयेतेचा अलिखित नियम. बाट पाळणार्या महिला अनेकदा या महिलांना घालून-टाकून बोलून हाकलून देत. या विहिरीत सुंदर आणि मी कधीमधी चोरून पोहायचो. माझ्यामुळे विहिर बाटेल आणि गावात हंगामा होईल, याची सतत भीती असायची. नंतर गावात सार्वजनिक विहिर खुली झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटला. आता ठिकठिकाणी बोअर, हापशे आहेत.
अर्धवेळ शाळा असली की आम्ही नेहमी अभ्यासासाठी आमराईत जायचो. तढणी (पोटभर) लागेपर्यंत कैर्या खायचो आणि नंतर अभ्यासाला लागायचो. अभ्यास म्हणजे पाठांतर, काही समजो अथवा न समजो. गावात लग्नाकार्याच्यानिमित्ताने पंक्तीभोजन असायचे. गावजेवण असायचे. बौध्दांची सर्वात शेवटी आणि वेगळी पंगत असायची. ते खटकायचे. आम्ही ठरवून टाकले की, पंक्तीभेद होत असेल तर जेवायला जायचे नाही. कापडसिंगी (ता. जिंतूर, जि. परभणी, हल्ली ता. सेनगाव, जि. हिंगोली) म्हणजे बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेले गाव. शिक्षणात आघाडीवर, परिवर्तनातही पुढे. ठरल्याप्रमाणे गावातील पंक्तीला बौध्दांचे जाणे बंद झाले. बौध्दांनी स्वाभिमान दाखवला. कालांतराने हा पंक्तीभेद लोकांच्या मनातून निघून गेल्याने आता पुन्हा एकत्र पंक्ती बसताहेत. मंडल आयोगामुळे गावातील मंडळींची मुले आता शिकल्यामुळे त्यांच्यात समतेचा विचार रूजू लागला आहे, ही आनंदाची बाब.
मोर्चा समारोपाला आला. शाळा बंदचा निर्णय झाला. सर्व विद्यार्थी आपापल्या घरी. बाहेरगावची मुलं आपापल्या गावी गेली. दोन दिवसांनी मला शाळेतून बोलावणे आले. ‘आता सध्या तरी इतक्या तातडीने शिक्षकांची व्यवस्था होणार नाही; तात्पुरती व्यवस्था म्हणून दोन पदवीधारकांना शिकवण्यासाठी पाठविण्याचा शिक्षणखात्याने निर्णय घेतलाय’, असे मुख्याध्यापक केकान सरांनी सांगितले. तेवढ्याने आमचे समाधान झाले. निरोप पाठवून बाहेरगावच्या मुलांना शाळेत बोलावून घेतले…संप मिटला..! आज या शाळेत वर्ग आठ आणि शिक्षकही आठ आहेत. या शाळेचा मी पहिला इंजिनिअर. बँक मॅनेजर, सरकारी वकील, प्राध्यापक, शिक्षक आणि अनेक कर्मचारी या शाळेने दिले आहेत. मात्र, सरकारी अनास्थेच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील शिक्षण मरणपथाला लागले. त्याला केंप्राशा, कापडसिंगीही अपवाद नाही. कोरोना काळात तर शिक्षणच बंद आहे.
शिक्षण संपले की, सर्वकाही संपले म्हणून समजा. गुलाम बनविण्याची प्रक्रिया सुरू झालीय. अज्ञानी लोकांना गुलाम बनविणे सोपे जाते. असे म्हणतात, जगातील महान सम्राट अशोकाच्या काळात या देशात सोन्याचा धूर निघायचा. खरोखरच सोन्याचा धूर निघत होता का? अर्थाअर्थी नाही. सम्राट अशोक महान लोककल्याणकारी राजा होता. त्याने देशात समता निर्माण करणारे कायदे केले, भेदाभेद मिटवले, सर्वांसाठी समान शिक्षण धोरण राबविले, कुणालाही विशेषाधिकार नव्हते, माणसाबरोबरच प्राण्यांवरही प्रेम करायला शिकवले. म्हणून जनतेत आनंदी आनंद होता. मौर्यांचे साम्राज्य होते तोपर्यंत भारतावर आक्रमण तर सोडाच साधी नजर उठवून बघण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. मात्र, विश्वासघाताने मौर्यांची सत्ता गेली, लोककल्याणकारी राज्य बुडाले आणि विषमता, भेदाभेद, जातीभेद सुरू झाला. या देशातील बहुतांश बहुजन समाज (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी) सत्ताहीन, धनहीन, शस्त्रहीन, विद्याहीन बनला. मनुस्मृतीची देन म्हणून बहुजन समाज गुलाम बनला, तसा भारतावरही परकीय आक्रमकांची वक्रदृष्टी पडली. ज्यांनी मनुस्मृती जबरदस्तीने लागू केली अशा उच्चजातीयांनी परकीय आक्रमकांपुढे सफसेल नांग्या टाकल्या. शरणागती पत्करून परकीयांची थुंकी झेलू लागले. परकीय आक्रमक आणि या देशातील सामंती व उच्च जातींच्या हातमिळवणीतून देश नागवला गेला. हाच तो मध्ययुगीन काळ. यालाच अंधार युग म्हणतात.
300 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. पुढे समाजक्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांनी पुन्हा बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. राजर्षी शाहू महाराज यांनी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटनेच्या माध्यमातून सम्राट अशोकाच्या काळातील लोककल्याणकारी राज्याची पुनर्स्थापना केली. तथापि, भारतीयांचे दुर्दैव असे की, ज्या सामंती उच्च जातीयांनी भेदाभेद, जातीभेद करून देश परकीयांच्या घशात घातला, त्याच सामंती उच्चजातीयांच्या हाती देशाची सत्ता आली. या सामंती जातींनी भारतीय संविधानाची आजपर्यंत नीट अंमलबजावणीच होऊ दिली नाही. परिणामी सध्या देशाची वाटचाल पुन्हा अंधारयुगाच्या दिशेने सुरू आहे. कारण आम्ही सर्वजण गाढ झोपेत आहोत. जाती-जातीत बाटले गेलो आहोत. हेच सत्ताधारी सामंती उच्चजातींच्या पथ्यावर पडले आहे.
तात्पर्य : 1985 ला शाळेला शिक्षक मिळावेत म्हणून मोर्चा काढून संप करावा लागला, ती परिस्थिती बदलली का? राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 ही परिस्थिती बदलणार आहे का? नसेल तर त्याचा काय उपयोग? जनतेने ते नाकारले पाहिजे.
विनंती : पुन्हा एकदा गुलामगिरी नको असेल तर राष्ट्रीय शिक्षण धोरण समजून घ्या. त्यासाठी वाचा ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 : भारतीयांच्या गुलामीचा जाहीरनामा’ हा ग्रंथ. संपर्क : 7875451080
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
खूपच भारी डेरिंगबाज होता तुम्ही. तुम्हाला वयाच्या बाराव्या वर्षापासून संघर्ष करायची सवय आहे.
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवाक्रांतीकारकाचे पाय पाळन्यातच दिसतात हे खरे...फार छान व अभिमानास्पद
बुखारी सर हे माझे शेजारी होते जिंतूर येथे
उत्तर द्याहटवामला खरंच तुझा मित्र म्हणून अभिमान वाटतो
उत्तर द्याहटवाखुपच छान लेखन, जन्मभुमीबद्लची माहिती मिळाली, वास्तव चित्रण डोळ्यासमोर उभे राहिले,
उत्तर द्याहटवाभास्करराव असेच लिहित रहा ,आपल्या लेखनाला कमालीची धार आहे....!
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवामी आपला सर्वांचा आभारी आहे.
उत्तर द्याहटवा