नारायण मेघाजी लोखंडे : एक समर्पित सत्यशोधक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नारायण मेघाजी लोखंडे : एक समर्पित सत्यशोधक
-राजाराम सूर्यवंशी, बदलापूर
(रविवारी दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी नारायण मेघाजी लोखंडे यांची 128 वी पुण्यतिथी येत आहे. त्यांच्या 128 व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भावपूर्ण आदरांजली!)
सत्यशोधक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे हे महाराष्ट्राच्या सामाजिक व कामगार चळवळीच्या इतिहासातीलच नाही तर भारताच्या व्यापक पटलावरील एक मोठे व्यक्तिमत्त्व आहे, ही गोष्ट आता अख्ख्या देशाने मान्य केली आहे. भारताच्या ट्रेड युनियन चळवळीची मुहूर्तमेढ रोवता रोवता त्यांनी कामगार चळवळ व सामाजिक सुधारणा चळवळ एकाच वेळी हातात हात घालून लढवता येतात याचे कम्युनिस्ट, समाजवादी व दलित चळवळीपूर्व एक उदाहरण भारताच्या सामाजिक व कामगार चळवळीच्या इतिहासात वासाहातिक कालखंडात घालून असा एक नवीन वस्तूपाठ घालून दिला आहे की ज्याची उजळणी अजून वरीलपैकी एकाही चळवळीला करता आलेली नाही, हे ऐतिहासिक सत्य आहे!
भारतीय औद्योगिकरणाला नुकतीच कुठे सुरुवात झाली होती, असा तो 1850-55 चा कालखंड होता. कापड उद्योग मुंबईत मोठ्या तेजीत येऊ लागला होता. ठीक ठिकाणी कापड गिरण्या उभ्या राहत होत्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पोटापाण्यासाठी आलेले हजारो कामगार अतिशय तुटपुंज्या पगारात व अत्यंत निष्कृट दर्जाच्या कामाच्या जागेत रात्रंदिवस काम करीत होते व खुराड्यांसारख्या चाळींतून राहत होते. कामाचे तास ठरलेले नव्हते. गिरणी व्यवस्थापन मनमानेल त्याप्रमाणे पगार कापत असत. कामगारांना साप्ताहिक सुटी नव्हती.अशा विपरित परिस्थितीत कष्ट करणार्या कामगारांना त्यांच्या रास्त मागण्या मान्य करून द्याव्यात व मानवी हक्काच्या सोयी सुविधा प्राप्त करून द्याव्यात तसेच कामगारांवर होणार्या विविध अन्यायांना वाचा फोडावी व मिल मालकांना कामगार नियमाच्या कक्षेत आणावे, यासाठी बाँम्बे मिल हँण्डस् असोसिएशन नावाची भारतातील पहिली कामगार ट्रेड युनियन नारायण मेघाजी लोखंडेंनी स्थापन केली होती. या युनियन मार्फत लोखंडेंनी कामगारांचे विविध लढे लढवले व त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला. अगदी फॅक्ट्री अॅक्ट कायदा लागू व्हावा म्हणून गिरणी मालकांबरोबर तत्कालीन राष्ट्रीय सभेच्या नेत्यांशी सुद्धा त्यांना भांडावे लागले होते.
त्याकाळी कामगारांना त्यांची हक्काची आठवड्याची सुटी अर्थात साप्ताहिक सुटी मिळावी यासाठी त्यांनी जो ऐतिहासिक लढा दिला, त्याला कामगार चळवळीच्या इतिहासात तोड नाही. सतत दहा वर्षे लढा देऊन कामगारांना तिचा लाभ मिळवून दिला होता. पुढे ही सुटी इतर सर्वांना लागू झाली होती. आज आपण सर्वचजण जी रविवारची सुटी उपभोगतो, तीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे हे होते, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.
त्याकाळी अस्पृश्यांप्रमाणे स्त्रियांनाही गिरणीतील विव्हिंग खात्यात काम करण्यास मनाई होती. कामगार कामगारांमध्येही अस्पृश्यता पाळली जात होती. यासाठीही नारायण मेघाजी लोखंडेंनी कामगारांचे प्रबोधन करताना मालकांशी संघर्ष करून हा सामाजिक भेद मिटवून विव्हिंग खात्यात अस्पृश्य व शुद्र स्त्रियांना काम करण्याची परवानगी मिळवून दिली होती.
नारायण मेघाजी लोखंडे हे आजच्या नेत्यांसारखे पोटार्थी नेते नव्हते, तर ते कामगारांच्या हितासाठी गिरणीगेटच्या आतही व गेटच्या बाहेरही दक्ष राहत असत. याचे सर्वात मोठे व ऐतिहासिक उदाहरण म्हणजे 1892 साली मुंबईत उद्भवलेल्ला दंगा हे होय. हा दंगा शमवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य ऐकमेवाद्वितीय व महान असे आहे.
एकीकडे बाळ गंगाधाद टिळकांसारखी मंडळी या दंग्याला प्रोत्साहन देत होती, तर नारायण मेघाजी लोखंडे व त्यांचे सहकारी हा दंगा शमवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत होती. या दंग्यात होरपळलेल्या दोन्ही धर्माच्या सर्वसामान्य जनतेला धीर देण्यासाठी सर्व मोहल्ले, चाळी पिंजून फिरत होते.त्यांना कामावर जाण्यासाठी प्रोत्साहीत करीत होते.दोन्ही समाजाच्या मनातील भीती काढून त्यांच्यात पूर्वीसारखाच बंधुभाव वृद्धिंगत व्हावा यासाठी त्यांनी मुंबई प्रांताचे तत्कालीन कलेक्टर मि. व्हिसेंट यांच्या मदतीने व आपल्या सत्यशोधक सहकार्यांच्या साहायाने राणीच्या बागेत एक ऐतिहासिक असा ऐकोपा मेळावा घडवून आणला होता. असा हिंदू-मुस्लीम ऐकोपा मेळावा ज्याने जगाच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. तसेच मोहल्ला कमिटी स्थापन करण्याची कल्पनाही त्यांचीच होती. त्या मोहल्ला कमिट्यांने 1892-93 चा दंगा शांत करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. अशी ही मोहल्ला कमिटी पुढील प्रत्येक दंग्यांच्यावेळी रोड मोडल म्हणून वापरली गेली आहे. या मोहल्ला कमिट्यांचे श्रेयही नारायण मेघाजी लोखंडेंच्या नावावर जमा होते. तर सांगायचा मुद्दा हा की दंगा होऊ न देणार्या कारगर कल्पनेचे जनकही लोखंडे हेच आहेत. मोहल्ला कमिट्यांनी दंगा होत नाही किंवा त्यांची मुळं खोडून काढता येतात, या सुत्रांनुसार नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्या काळी काम करून एक आदर्श नियमाचा वस्तुपाठ घालून दिला होता. आजही त्यांनी घालून दिलेल्या आदर्श व उपायांवर वेळोवेळी उद्भवलेले दंगे शांत करण्यात नंतरच्या प्रशासनास मदत झाली आहे. एवढी काळाच्यापुढे पाहण्याची दूरदृष्टी नारायण मेघाजी लोखंडेंकडे होती.
बाळ गंगाधर टिळक व आगरकर हे हिंदुकट्टरपंथी व मुस्लिमांचे कट्टर विरोधक आहेत हे माहीत असूनही ते जेव्हा कोल्हापूच्या राजकीय खटल्यात अडकले होते, तेव्हा दहा हजारांचा जामीन महात्मा फुले यांनी दिला होता. या जामिनावर ते जेव्हा डोंगरीच्या तुरुंगातून सुटून बाहेर आले तेव्हा एक आदर्श मानवधर्माच्या नात्याने त्यांचा जाहीर सत्कार भायखळ्याला नारायण मेघाजी लोखंडेंनी केला होता. कारण नारायण मेघाजी लोखंडे हे माणसाचे विरोधक नव्हते. वाईट, कालबाह्य व समाजहिताच्या आड येणार्या विचारांचे विरोधक होते. वैचारिक शत्रूतही आपलाच आत्मा पाहणारी तथागत बुद्धांची करुणा त्यांच्या ठायी होती.
कामगारांसाठी फॅक्ट्री अॅक्टचा जसा त्यांनी आग्रह धरला त्याचप्रमाणे शेतकर्यांचे अनेक प्रश्न सोडवता सोडावता डेक्कन अॅग्रीक्लचर रिलिफ अॅक्टचा ही त्यांनी पाठपुरावा केला होता. यासोबत महिलांचे केशवपनाविरोधात जसे त्यांनी सावित्रीबाई फुले व न्हावी बांधवांबरोबर सत्याग्रह केला होता, त्याचप्रमाणे सरकारी नोकर्यांमध्ये (अबकारी खात्यात) शुद्रातिशुद्र जनतेला आरक्षण मिळावे यासाठी प्रशासनाविरोधात ‘दीनबंधू’तून आवाज उठवून चळवळही केल्या होत्या.
नारायण मेघाजी लोखंडे यांचे भाऊ भाऊराव लोखंडे यांचे पणतू श्री वसंत किसन लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण मेघाजी लोखंडे यांना जन्म ठाण्याच्या तलावपाळी समोरच्या एका पारशाच्या चाळीत 13 ऑगष्ट 1848 रोजी झाला होता. त्यांना लहानपणापासून कष्टाची व सहकार्याची आवड होती. तसेच वडिलांच्या गावाकडून व इतर ठिकाणाहून आलेले कष्टकरी पोटाच्या खळगीसाठी व मुंबई ठाण्याच्या विकासासाठी कसे रक्ताचे पाणी करताहेत ते हे पाहत होते व त्या वेदना ते मनात साठवत होते.
पुढे या महान नेत्याने आपल्या आयुष्याची सुरुवात जीपीओत पोस्टाच्या नोकरीतून केली होती.तथापि, त्यात त्यांचे मन रमले नाही. ती नोकरी सोडून त्यांनी रेल्वेत लोकोमोटीव्ह विभागात नोकरी केली.तेथेही त्यांचे मन रमले नाही. ते सतत कामगारांच्या दुःखमुक्तीचा विचार करीत. त्यामुळे त्यांनी ही नोकरीही सोडून प्रत्यक्ष कामगारांमध्ये राहता वावरता यावे म्हणून गिरणीत स्टोअरकिपरची नोकरी पत्कारली होती. तेथे राहून कामगारांचे दुःख व अमानवीय कष्ट पाहून त्यांचे मन तीळ तीळ तुटत असे. या कामगारांचे जीवन सुसह्य करण्यासाठी व गिरणी मालकवर्गाच्या अनिर्बंध शोषणाविरुद्ध संघटित आवाज उठवण्यासाठी त्यांनी गिरणी कामगारांची संघटना बांधली होती व तेवढ्याच पोपतिडकीने त्यांचे प्रश्न सोडवले होते..!
कामगार कष्टकरी व शेतकर्यांच्या चळवळी चालवता चालवता त्यांनी सत्यशोधकांचे प्रथम मुखपत्र ‘दीनबंधू’ सुरू करून या क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली होती.
नारायण मेघाजी लोखंडे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. कामगार-शेतकरी व कष्टकर्यांचे प्रश्न सोडवता सोडवता त्यांचे प्रबोधन करणे हे सुद्धा त्यांच्या कार्याचे एक महत्त्वाचे सूत्र होते.
वर म्हटल्याप्रमाणे ग्रामीण भागातील हजारो हात मुंबईसाठी झटत होते, राबत होते. पहाटे तीन वाजेपासून त्यांचा दिवस सुरू होत असे व सायंकाळी सूर्य मावळल्यावर त्यांचे काम थांबत असे. या कष्टकर्यांचा श्रमाचा व घामाचा पैसा इतरत्र वाया जाऊ नये म्हणून या कामगार-कष्टकर्यांना नैतिक जीवनाचे धडे शिकवावे म्हणून नारायण मेघाजी लोखंडेनी ‘नीती शिक्षा वर्ग’ ही सुरु केले होते.
मुंबईतील ही कष्टकरी जनता कुठे राहते, काय खाते याचे सोयरसुतक मालकवर्गाला नव्हते. त्यांची दशा व व्यथा यांची जाणीव नारायण मेघाजी लोखंडेंना होती. म्हणून ते पोटच्या मुलासारखे या कामगार, शेतकरी, कष्टकर्यांना जपत असत. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत. त्यासाठी ते नीती शिक्षा वर्गाच्या बरोबर ‘सुशिक्षण गृह’ही चालवत असत. त्यात स्वतःसह, कृष्णराव भालेकर, विठ्ठलराव वंडेकर, अय्यावारु, केळुस्कर गुरुजी, माधवराव रोकडे गुरुजी व महात्मा फुले मुंबईत आल्यावर त्यांची ही व्याख्याने येथे ते आयोजित करत असत.
थोडे दिन तरी मद्य व्यर्ज करा।
तोच पैसा वाचवा मुलांच्या शिक्षणासाठी॥
असे महात्मा फुलेंचे अखंड याच सुशिक्षण वर्ग व नीती शिक्षा वर्गातून मांडून त्यावर उपदेशपर/प्रबोधनपर व्याख्यान दिले जात असत.
नारायण मेघाजी लोखंडे जे ‘दीनबंधू’ नावाचे वृत्तपत्र मुंबईतून 9 मे 1880 पासून चालवत होते, त्याच्या मुखपृष्ठावर लोखंडेंनी पुढील आशयाचे घोषवाक्य मोठ्या जाड अक्षरात छापले होते,
’'journal devoted to the interest of working class'.
त्यानंतर संपादकीय पानावर पुढील श्लोक छापला जात असे,
अज्ञानाने महिमाजी दीन आवघे सर्वांपरि गांजले।
विद्याधर्म तया न सेव्य म्हणुनि स्वार्थी बाहू माजले॥
धुर्तहि मनी मत्सरास धरुनी केली अशी दुर्दशा॥
जागोमी बहुमान योग्य करुनी विद्येप्रति व्हा वंशा॥
अशाप्रकारे कामगार कष्टकर्यांचे हित व बहुजन समाजासाठीचा शिक्षणाचा वसा नारायण मेघाजी लोखंडेंनी प्रत्यक्ष तर उचलला होताच, त्याशिवाय ‘दीनबंधू’च्या माध्यमातूनही कसा लावून धरला होता, हे आपणास त्यांच्या वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावरून व संपादकीय पानावरच्या मुद्रेवरून लक्षात यायला वेळ लागत नाही.
महात्मा जोतीराव फुले ज्या उपाधीने जगप्रसिद्ध झाले ती ‘महात्मा’ ही उपाधीसुद्धा नारायण मेघाजी लोखंडे यांनी आपल्या मुंबईच्या सत्यशोधक सहकार्यांच्या मदतीने मुंबईत एका जाहीर कार्यक्रमात दिली होती. त्यामुळे आज जोतीराव फुलेंना जे आपण महात्मा म्हणून ओळखतो ते केवळ नारायण मेघाजी लोखंडेंमुळे!! किती मोठी गुणग्राहता त्यांच्यामध्ये होती हे एकाच उदाहरणावरून आपणास कळून येते.
वृत्तपत्र व्यवसायाशी नारायण मेघाजी लोखंडे हे अल्पावधीतच कामगारांच्या प्रश्नांइतकेच एकरूप झाले होते. त्या वासाहातिक कालखंडात भारतातील वेगवेगळ्या सामाजिक, व्यावसायिक व राजकीय गट आपापले हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी वृत्तपत्र माध्यमांचा वापर करीत असत. तेव्हा वृत्तपत्रांच्या विरोधात जेव्हा गव्हर्नर जनरल लार्ड लिंटन याने दडपशाहीचे धोरण अंमलात आणले होते तेव्हा नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘दीनबंधू’तून वृत्तपत्र स्वायतत्तेसाठी जोरदार आवाज उठवला होता.
आपल्या व्यापार व औद्योगिकरणाला पूरक असा नोकरवर्ग तयार करणे आणि आपल्या वखारी व कंपनीच्या नोकरांच्या सेवा रक्षणासाठी सर्वसामान्य शेतकरी व कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सोयी सुविधा पुरवणे यासाठी ब्रिटिश सरकार व ईस्ट इंडिया कंपनी दक्ष होती व महात्मा फुले, रावजी पाटील व नारायण मेघाजी लोखंडे सारख्या नेत्यांच्या वचकाला घाबरून होती. तथापि, त्यांच्यातला लॉर्ड लिंटन सारख्या काही उतावीळ घमंडी प्रशासक जेव्हा स्वतःला राणीचे शासक समजून हिंदी जनतेवर जुलूम करीत असत तेव्हा जनतेतील असंतोषाची दखल घेऊन त्या जुलमी नोकरशाला बदलून, जनतेचा असंतोष अधिक भडकू नये यासाठी एक चांगला मानवी चेहरा असलेला प्रशासक त्याजागी राणी सरकार बसवत असत. यावेळी ही राणी सरकारने लॉर्ड लिंटन यांना बदलून लॉर्ड रिपन यांची हिंदुस्थानचे गव्हर्नर जनरलपदी नेमणूक केली होती.
लॉर्ड रिपन साहेबांनी कंपनी सरकारची सुत्रे हाती घेताच दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या होत्या.
1. वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करणारा कायदा रद्द केला
2. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक जनतेला प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा कायदा केला होता.
लॉर्ड रिपन साहेबांचे मन ऐलफिस्टन साहेबांसारखे दयाळू व मानवतावादी होते. त्यांमुळे त्यांची नारायण मेघाजी लोखंडेंची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. तेव्हा लॉर्ड रिपनसाहेबांच्या जनहिताच्या दृष्टीने चांगल्या निर्णयांना पाठिंबा देऊन त्यांनी हाती घेतलेल्या कामात त्यांना अधिक रस निर्माण व्हावा, यश यावे तसेच त्यांचा उत्साह वाढावा या हेतूने रिपन साहेबांनी प्रशासनाची सुत्रे हाती घेताच काही दिवसात भायखळा येथे नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1881 साली मोठा सत्कार करून त्यांचा ऊत्साह वाढवला होता. या सत्कारामुळे लॉर्ड रिपन खूप भारावून जाऊन त्यांची नारायण मेघाजी लोखंडेंशी चांगली मैत्री जमून आली होती. त्यानंतर त्यांनी हिंदुस्थानी जनतेच्या, कामगार कष्टकर्यांच्या, शेतकर्यांच्या हिताचे निर्णाय घेऊन आपली कारकीर्द संस्मरणीय केली होती. त्यांचा कार्यकाळ 1884 साली संपला होता. तेव्हा नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईकर कष्टकरी व त्यांचे मित्र एल्लाप्पा बाळाराम यांच्या हिंदी शेतकरी सभा या संघटनेच्या वतीने त्यांचा निरोपाचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला होता.
माझे जिज्ञासू आणि अभ्यासू मित्र श्री सुधीर जाधव यांनी मला पुरवलेल्या एका महत्त्वपूर्ण माहितीनुसार या निरोप समारंभात मुंबईतील तत्कालीन सर्व नेते मंडळी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. नाना शंकरशेठ, फक्रुद्दीन तय्यबजी, सावळाराम मेहेर, एल्लाप्पा बाळाराम, डॉ. संतुजी लाड, रावजी राणू आरु, आदी यासर्व मंडळीसह मुंबईकर कष्टकरी जनतेच्या वतीने नारायण मेघाजी लोखंडेंनी हा रिपनसाहेबांना निरोप देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्याकाळी 75 हजारांची थैली देऊन त्यांचा भव्य सत्कार केला होता.
हा भव्य सत्कार व ही भली मोठी थैली जी मुंबईकर प्रतिष्ठित नागरिक, नेते व जनतेच्यावतीने त्यांना देण्यात आली होती, त्याने रिपनसाहेब भावनावश झाले व म्हणाले, ‘तुम्ही पोटचा पैसा वाचवून मला ही भली मोठी थैली दिली आहे याची मला जाणीव असून माझ्याप्रती तुमच्या मनात किती आस्था आहे व होती ही गोष्ट मला, मोठे त्यागी व सन्माननीय सत्यशोधक नेते नारायण मेघाजी लोखंडे नेहमी मला सांगत असत, ती गोष्ट शंभर टक्के खरी आहे, हे आजच्या माझ्या निरोप समारंभावरून मला लक्षात आले आहे. लोखंडे सर मला नेहमी अजून एक खंत बोलून दाखवत ती ही की, आमच्या कष्टकर्यांतून कुशल कारागीर तयार झाले पाहिजेत, जेणेकरून येणार्या औद्योगिकरणाच्या रेट्यात ते मागे पडणार नाही व त्यांचे जीवनमान सुधारण्यातही मदत होईल. म्हणून मी येथे जाहीर करतो की, या 75 हजार रुपयांमध्ये मी माझ्या पाकिटातले पाच हजार रुपये टाकून एकूण 80 हजार रुपये मी मा. आयोजकांच्या हवाली करतो व या रकमेतून त्यांनी या कामगार-कष्टकरी जनतेच्या मुलांना कुशल कामगार, तंत्रज्ञ बनवणारी भली मोठी टेक्निकल इन्स्टिट्यूट स्थापन करावी! जेणेकरून या पैशांचा सदुपयोग होईल.’
या निरोप समारंभानंतर लगेच झालेल्या आयोजकांच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला व तेथल्या तेथे लॉर्ड रिपन मेमोरियल ट्रस्टची स्थापना करण्यात नारायण मेघाजी लोखंडेंनी पुढाकार घेतला व तसा ट्रस्ट स्थापन केला.
1. 1887 हे वर्ष व्हिक्टोरिया राणीचे ज्युबिली वर्ष होते. या ट्रस्टद्वारे व त्या पैसातून भायखळ्याला जेथे आज रेल्वे हॉस्पिटल आहे, तेथे एक टेक्निकल शिक्षण देणारी संस्था राणीच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट या नावाने स्थापन करण्यात आली. 1887 ते 1923 पर्यंत ही इन्स्टिट्यूट तेथे व्यवस्थित सुरू होती. 1892 च्या दंग्याच्यावेळी दंगाप्रभावित जनतेला तेथे आश्रय देण्यात आला.
2. पुढे विद्यार्थी संख्या वाढू लागली. वर्ग व जागा कमी पडू लागली म्हणून मांटुंग्याला एका पारशाकडून 16 एकर जागा विकत घेऊन तेथे ही इन्स्टिट्यूट 1923 साली शिफ्ट करण्यात आली. ती जागा भौगोलिकदृष्ट्या वडाळा रेल्वे स्टेशनपासून जवळ असून तिचा खरा पत्ता माटुंगा पूर्व, मुंबई-19.असा आहे. उपरोक्त जागा एका पारशाकडून, अर्थात महंमद अली जीना यांच्या पारशी सासर्याकडून ट्रस्टने ती जागा विकत घेतली होती.
नारायण मेघाजी लोखंडे व रिपनसाहेबांचा मैत्रीचा हा एक अनोखा भेट ‘नजराना’ म्हणून मुंबई आणि महाराष्ट्राला उपलब्ध झाला आहे.
भायखळाच्या त्या रिकाम्या झालेल्या जागेत त्याचवर्षी म्हणजे 1923 साली सेंन्ट्रल रेल्वेचे हॉस्पिटल सुरू आले होते. नंतर त्या हॉस्पिटलचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल असे नामकरण करून त्यालाही अजरामर करण्यात आले आहे.
1887 साली स्थापन झालेल्या लोखंडे-रिपन मैत्रीचा अजरामर नजराना ठरलेल्या व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेचे पुढे नाव बदलून त्याचे नाव ‘वीर जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट’ असे देशी नामकरण करण्याचे श्रेय माझे बहुआयामी व हरहुन्नरी अभ्यासू मित्र श्री सुधीर जाधव यांच्याकडे जाते. त्याकरिता त्यांनी 1987 ते 1997 अशी सतत दहा वर्षे एकट्याने पाठपुरावा करून हे नामकरण घडवून आणले आहे. याबाबतचा सविस्तर वृतांत त्यांनी त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात एका पुस्तिकेच्या रूपाने प्रसिद्ध करून एक ऐतिहासिक दस्ताऐवज तयार केला आहे.
अशाप्रकारचे नारायण मेघाजी लोखंडेच्या कार्यांची गाथा लिहावी व गावी तेवढी थोडी आहे.
आपल्यातला एक सामान्य माणूस सत्यशोधक विचारसरणीच्या बळावर किती मोठी मजल मारू शकतो याचे नारायण मेघाजी लोखंडे हे उत्तम ऊदाहरण आहे.
मी त्यांचे विस्तृत असे 350 पानी चरित्र लिहून सत्यशोधक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांचे चरित्र या नावाने मावळाई प्रकाशनामार्फत 2016 साली प्रसिद्ध केले आहे. जिज्ञासूंनी ते मुळात वाचण्यासारखे आहे.
आज नारायण मेघाजी लोखंडेंच्या 128 व्या स्मृतीदिनानिमित्ताने ही शब्दसुमनांची श्रद्धांजली वाहतांना मन खूप भरून आले आहे!
महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीच्या इतिहासात नारायण मेघाजी लोखंडे यांचे जीवनकार्य हे एक सोनेरी पान आहे. त्यांना जाणून घेतल्याशिवाय महात्मा फुलेंची चळवळ व मुंबईची जडणघडण आपल्याला उमगणार नाही. इतका या चळवळीचा, मुंबईचा व नारायण मेघाजी लोखंडे यांचा हाडामांसाचा संबंध आहे.
शेवटी नारायण मेघाजी लोखंडेंना त्यांंच्या 123 व्या स्मृतिप्रित्यर्थ विनम्र अभिवादन करून हा लांबलेला लेख प्रपंच संपवतो. जय ज्योती-जय क्रांती!!
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा