शपांची सावली!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शपांची सावली!
राजाराम सूर्यवंशी, पालघर :
दि. 2 फेब्रुवारी 2025, सुशिलाताई शरद पाटील यांना 89 व्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन!
प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांच्या सहचारिणी सुशिलाताई यांना मी दहावीत असल्यापासून म्हणजे 1974-75 पासून ओळखत होतो. प्रथम नेहरुनगरच्या शनी मंदिरसमोरच्या निवासस्थानी व नंतर 19 77 पासून ‘असंतोष’ला राहायला गेल्यावर.
शरद पाटलांना भेटण्यासाठी व विविध विषयांचे अध्ययन आणि शंकाचे निरसन करण्यासाठी मी जेव्हा असंतोषवर जात असू तेव्हा त्या हमखास भेटत असत. मायेच्या ममतेने आमची चौकशी करत असत. त्यांच्या नचिकेत आणि सर्मद या मुलांच्या वयाचा मी होतो. तेव्हा त्यांच्या डोळ्यात आमच्याप्रती मायेची ममता व आप्पांच्या (शरद पाटलांच्या) विद्वत्तेप्रती सार्थ अभिमान झळकत असे.
तेव्हापासून सुशिलाताई मला कायम जोतिबांची क्रांतिज्योती आणि बाबासाहेबांची सोशिक रमाई वाटत आली होती. तेवढीच सहनशील आणि समर्पित! आप्पाही त्यांचा तेवढाच सन्मान करताना दिसत असत. त्या दोघांचे नाते खूप वेगळ्या प्रकारचे होते.
त्या मला सतत शरद पाटलरूपी प्राच्यविद्यासंस्थेच्या महाकाय वटवृक्षाच्या ट्रस्टी वाटत असत. तसेच त्या शपांच्या जीवनाच्या आजन्म सेवक व केअरटेकर होत्या. त्यांनी आयुष्यभर त्यांचे काका व पित्याला दिलेला शब्द इतमानाने पाळला होता. खरंच त्या सत्यशोधक कन्या व सत्यशोधक सहचारिणी होत्या. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या सहचारिणी लक्ष्मीबाईंसारख्या! पूर्णपणे पतीच्या ध्येयाशी एकात्म झालेल्या, तादाम्य पावलेल्या. आयुष्याची किडुकमिडूक शपांचे ध्येय व संसारासाठी खर्च वेचणार्या.
‘असंतोष’ त्याकाळात एक प्याऊ होते. कोणीही ज्ञानामृतासाठी तहानलेला तेथे यायचा व शपांकडून ज्ञानाचे डोस पिऊन तृप्त मनाने परत जायचा. जातांना शपांचे ज्ञानामृत आणि सुशिलाताईंची मायेची शिदोरी सोबत घेऊन जायचा.
सुशिलाताई पेशाने शिक्षिका राहिल्या असल्याने विद्येचे महत्त्व जाणत, तर आप्पा सत्यशोधक असल्याने स्त्रियांचा सन्मान जाणत, त्यांचे सामाजिक व ऐतिहासिक मूल्य जाणत! अशा सामाजिक मूल्य जपणार्या दाम्पत्याला भेटून आम्ही भारावून जात असू!
सत्यशोधक कम्युनिस्ट कार्यकर्ते ते प्राच्यविद्यापंडित शरद पाटील या शरद पाटिलांचा वर्धिष्णू आलेख चितारणार्या त्या एक पडद्यामागच्या नेपथ्यकार होत्या, एवढी जरी जाणीव तमाम शरद पाटलांच्या चाहत्यांनी ठेवली, तर शरद पाटलांना खर्या अर्थाने आपण जाणले असे आपण म्हणू शकू.
त्याशिवाय आपण मातृसत्तावादी आहोत, स्त्रीदाक्षिण्यवादी आहोत, महात्मा फुलेंच्या विचारांचे खरे पाईक आहोत, यासाठी तरी शरद पाटलांच्या विद्वतेची महत्ता गातांना आपण त्यांच्या सहचारिणी सुशिलाताई यांना विसरणार नाही, एवढी काळजी घ्यावीच लागेल.
सुशिलाताईंचा त्याग खूप मोठा होता. त्या स्वत:साठी कधीच जगल्या नाहीत. त्यांचा जन्मच झाला होता जणू शरद पाटलांसाठीच!
शपांच्या जीवनातून सुशिलाताईंना वजा केले, तर शपा प्राच्यविद्यापंडित कधीच बनू शकले नसते! हे सत्य आहे. ते फार तर एक लढवय्या नेते बनू शकले असते. मात्र, डॉ. सदानंद मोरे सर म्हणतात तसे बहुजन समाजाची पाच हजार वर्षांची ज्ञानाच्या क्षेत्रातील पोकळी कोणी भरून काढली असती? ती ज्ञानशाखेतली रिक्त पोकळी शपांनी भरून काढली ती केवळ सुशिलाताई शपांचा पाठीचा कणा बनून राहिल्याने.
आता सहा फेब्रुवारीला ताईंची पुण्यतिथी येते आहे. त्यांच्यावर लिहिण्यासारखे भरपूर आहे. आता तूर्त ताईंची उद्याची जयंती व सहा तारखेची पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन!
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा