दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

तिमिरातूनी तेजाकडे...: सागरवाडी चाले विदेशाची वाट!

तिमिरातूनी तेजाकडे...: सागरवाडी चाले विदेशाची वाट!

ग्राऊंड रिपोर्ट, भास्कर सरोदे

छत्रपती संभाजीनगर : येथून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर बदनापूरच्या उत्तरेला 10 किलोमीटर अंतरावर जवळपास 500 उंबर्‍याची वाडी. नाव सागरवाडी. नावाचा इतिहास सापडत नाही. सापडणार तरी कसा? वाडीच ती. आजुबाजूचा परिसर डोंगरदर्‍यांनी वेढलेला. सरकार पातळीवर उपेक्षा. मात्र, 1959 ला शिक्षणाची वात पेटली अन् तिच्या ज्योतीने या वाडीचा इतिहास-भूगोल बदलला. सातासमुद्रापार या वाडीचा डंका वाजायला लागला. दुसर्‍या-तिसर्‍या पिढीतील तरुण-तरुणी जगाच्या कॅनव्हासवर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. छोट्याशा वाडीतून शेकड्याने नोकरदार आणि तब्बल आठजण विदेशात आहेत. हे देशातील दुर्मीळ उदाहरण असले पाहिजे! त्यातील एकजणाने तर युनोपर्यंत धडक दिलीय. तिमिरातूनी तेजाकडे निघालेली सागरवाडी शैक्षणिक क्रांतीला जन्म देऊन उजेडात आली. ‘विदेशात विसावलेली सागरवाडी’ या नावानेही सागरवाडी ओळखली जाईल! अशा या जगात उठून दिसणार्‍या वाडीला कुतूहलापोटी भेट दिली. त्याचाच हा ग्राऊंड रिपोर्ट!

निवृत्त पोलीस उपअधीक्षक वामनराव खरात यांच्या आत्मचरित्राच्या अनुषंगाने सागरवाडीतील शैक्षणिक उत्क्रांतीचा संदर्भ आला असता या वाडीला प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा व्यक्‍त केली. खरात सरांनी तात्काळ होकार दिला. त्यानुसार गुरुवार, दि. 18 जुलै 2024 रोजी  मी, खरात सर, निवृत्त बँक कर्मचारी सुभाष वाकळे, सरांच्या मित्राचा मुलगा अभय गायकवाड, असे चौघेजण सागरवाडीला भेट देण्यासाठी  बायकार निघालो... 

‘आम्ही निघालो’, सर कुणालातरी मोबाईलवर सांगत होते. कुणी पत्रकार सागरवाडीला पहिल्यांदाच भेट देणार म्हणून गावकर्‍यांनाही उत्सूकता असावी. म्हणूनच फोनोफोनी सुरू होती. गाडी वेगाने सागरवाडीचे अंतर कापत होती. आकाशात ढगांनी गर्दी केल्याने शिरवाळ पडलेले होते. धरणीमायने हिरवा शालू परिधान केलेला होता. पक्षी आनंदाने इकडून तिकडे उडत होती. अत्यंत अल्हाददायक वातावरण. अधून मधून मी सागरवाडीविषयी प्रश्‍न विचारत होतो. सर आपल्या कोमलर्‍हदयी मनाने, शांत आणि संयमाने उत्तरे देत होते. त्यांचा एक एक शब्द विकत घ्यावा लागत होता. पोलीस खात्यातही अशी शांत, प्रज्ञाशील, मीतभाषी आणि सुस्वभावी माणसं असतात यावर खरंच क्षणभर विश्‍वास बसत नाही! म्हणूनच वाडीतील लहानथोर मंडळी सरांना आदराने ‘दादा’ म्हणतात.

बदनापूरच्या अलीकडेच उत्तर दिशेला एक कमान आहे. या कमानीवर श्री रेणुकादेवी महादेव संस्थान पर्यटनस्थळ, सोमठाणा असे नाव आहे. ही देवी प्रसिद्ध असून येथे मोठी यात्रा भरते. सागरवाडीच्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या दुतर्फा काळीआई! मायंदळ कपाशीची लागवड, तुरळक सोयाबीन, फळभाज्यांनी समृद्ध अशी शेती. सोमठाणा येथे असलेल्या अप्पर दुधना प्रकल्प, सोमठाणा, या पाण्यावर ही जमीन पोसलेली. समृद्धी हायवेखालून गाडी पुढे जाताच धरणाची विस्तीर्णी अशी भिंत लागते. धरण कोरडेठाक. दुधना नदीचा उगम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद-म्हैसमाळ-सारोळा या अर्धवतुळाकार डोंगररांगातून झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरला पाऊसमान कमी असल्याने या धरणात पाणी नाही, हे उघड!

गप्पांच्या नादात सागरवाडी आली; पण गाव कुठेच दिसेना. खरात सरांनी अभयला रोडच्या पूर्वेकडील डोंगराकडे गाडी वळवायला सांगितली. अभय अज्ञाधारक; पण चौकशीखोर! दोन तीन वेळा खात्री करूनच त्याने एका लोखंडी गेटमधून गाडी डोंगराच्या दिशेला वळवली. रस्त्याच्या दुतर्फा नारळाची झाडं जणू आमच्या स्वागतासाठीच डौलाने उभी होती. गार वारा अंगाला झोंबत होता. गोव्याच्या गर्द वनराईतून फिरल्याचा आभास होत होता. काही क्षणातच गाडी बंगलावजा अलिशान फार्महाऊस समोर थांबली. सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक इंदलसिंग बहुरे यांच्या सहचारिणी बंगल्यासमोरील शहरीवळणाच्या गार्डनमध्ये निंदण करत होत्या. आम्हाला म्हणजे खरात सरांना पाहताच त्यांनी काम थांबवून मोठ्या आदरातिथ्याने बंगल्यात येण्यास सांगितले. होऽऽ येतो, असे सरांनी हातवारेच सांगितले. इंदलसिंग डोंगराच्या कडेला सुरू असलेल्या शेततळ्यावर जेसीबीवाल्याला मार्गदर्शन करत होते. आम्हाला थेट शेततळ्यावरच येण्यास त्यांनी दूरून मोबाईलवरच सांगितले. आम्ही तिकडे गेलो. इंदलसिंग यांनी हसतमुखाने आमचे स्वागत केलं. उंचपुरा, गोरापान, नाकेलसा, दिवसभर उन्हातान्हात उभा राहून चेहरा थोडा काळवंडलेला गडी. चौफेर फिरून शेततळं दाखवलं. पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी शेततळ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू होते. शेततळ्याच्या दक्षिणेला मोठी विहीर आहे. त्या विहिरीत सोमठाणा धरणातून दोन दोन पाईपलाईनद्वारे पाणी सोडले जाते. तेच पाणी शेततळ्यात साठवले जाते. उन्हाळ्यात हेच पाणी फळबागेला व शेतीला दिले जाते. जिथं काम सुरू होतं, तिथं दोन जेसीबी उभ्या होत्या. डोंगरापर्यंत शेतजमीन सपाटीकरणाचे काम सुरू होते. डोंगर सपाट करून जमिनीच्या पट्ट्या तयार करून त्यात फळझाडांची लागवड केली. केसर आंबा, जांभूळ, मोसंबी, सीताफळं लावलेली. वहितीखालील शेतीत फळझाडं लावण्याचे नियोजन असल्याचे इंदलसिंग सांगत होते. शेतीच्या संरक्षणासाठी संपूर्ण शेतीला तारेचे कुंपण घातलेले. त्यामुळे रानटी जनावरांपासून शेतीचे संरक्षण होते. तेवढ्यात जेसीबीचे इंधन संपले. जेसीबीचालक इंधनाची तजवीज करेपर्यंत आम्हाला बंगल्यात चहापानासाठी नेण्यात आले. सर्व सुख सुविधांनीयुक्‍त हा फार्महाऊस. पोहोण्यासाठी स्विमिंगपूल. टेहळण्यासाठी गार्डनवजा लॉन. सगळंकाही हवेशीर.

चहापानी सुरू असताना इंदलसिंग सांगत होते की, आमच्या आई-वडिलांची फारच गरिबी होती. पाच गावं बदलल्यानंतर सागरवाडीत निवारा मिळाला. मामा सीतराम खोकड (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) व छोटीराम खोकड (शेतकरी) यांनी सहारा दिला. कसण्यासाठी काही जमीन दिली. तेव्हा कुठे हक्‍काचा गाव झाला. नोकरीला लागल्यानंतर ही डोंगराळ जमीन घेतली. पूर्वी येथे जनावरं चरायची. इकडं येण्याची भीती वाटायची. येथे 22 एकरांत फळझाडं लावण्याचे योजिले आहे. भाऊ कारभारी कल्याणसिंग बहुरे (पोलीस निरीक्षक) औरंगाबादला (छत्रपती संभाजीनगर) असतात. दोन मुलं एक मुलगी आहे. एक मुलगा कंपनीत नोकरीला असून दुसरा एमपीएससीची तयारी करतोय. उच्चशिक्षित मुलीचा विवाह झाला आहे. ‘दादा’च्या आशीर्वादाने सगळं काही आनंदी आनंद आहे.

सागरवाडी : इंदलसिंग बहुरे यांचा फार्म हाऊस. यावेळी डावीकडून उपा. सुभाष वाकळे, उपा. वामन खरात, उपा. इंदलसिंग बहुरे व उपा. भास्कर सरोदे.
दरोडेखोरांशी घेतला पंगा! :

डोंगरात एकटेच राहता चोरा-चिलटांची भीती वाटत नाही का? असे विचारले असता इंदलसिंग हसून म्हणाले, ‘नाही. 1972 च्या दुष्काळात आमच्या गावात डाका पडला होता. अनेक दिवसांपासून गावात रात्रीला दगडफेक व्हायची. या दगडफेकीने गाव त्रस्त झाला होता. डाका पडणार अशी कुणकुण लागली होती. तो डाका हाणून पाडायचा असं गावकर्‍यांनी ठरवलं. ही खबर आजुबाजूच्या वाड्यांवरही पोहोचली. ठरलेल्या दिवशी दोनेकशें दरोडेखोर रात्रीला चाल करून आले. गावकरीही तयारीतच होते. दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक सुरू झाली. तुंबळ युद्धच म्हणा ना. दरोडेखोरांनी काय ऐवज लुटायचा तो लुटला. या लढाईत गावातील अनेकजण गंभीर जखमी झाले. दरोडेखोरांची मोठी मनुष्य हानी झाली. अंधाराचा फायदा घेत दरोडेखोर पसार झाले. सागरवाडीकरांनी एकजूट दाखवली. तेव्हापासून सागरवाडीकडं कोणी नजर उचलून पाहात नाही.’

इंदलसिंग यांनी आम्हाला जेवणाचा खूप आग्रह केला. आता नाही तर संध्याकाळी जेवण करू, असे त्यांचे म्हणणे होते. आम्हाला जेवणापेक्षा सागरवाडीविषयी जाणून घेण्याची जास्त ओढ होती म्हणून तो विषय टाळला. इंदलसिंग यांनी गावासाठी जागेसह व्यायामशाळा व वाचनालय दान दिले आहे. समाजऋण फेडून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

सूतगिरणी ठरणार मैलाचा दगड! :

सागरवाडीच्या शिवारात आम्ही केव्हाच प्रवेश केला होता. आता सागरवाडीकडे गाडी निघाली. थेट गावात न जाता भव्य बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गेलो. ‘श्रीमंतराव मगरे कापूस उत्पादन मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी मर्यादित’चे काम प्रगतीपथावर असलेले दिसले. या कामावर प्रत्यक्ष भेट दिली. अत्यंत भव्य प्रकल्प आकाराला येत आहे. मराठवाड्यातील ही दुसरीच मागासवर्गीयांची सूतगिरणी. ही सूतगिरणी उभी राहिली तर सागरवाडीच नाही, तर आजुबाजूच्या संपूर्ण पंचक्रोशीचा कायापालट होईल. शेकडो तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष विजय मगरे यांनी महत्प्रयासाने ही सूतगिरणी आणली आहे. त्यांचे चिरंजीव आकाशने सूतगिरणी सगळी फिरून दाखवली. कामाचे कसे नियोजन आहे, भविष्यातील योजना आणि सूत गिरणी सुरू व्हायला किती दिवस लागतील, यावर आकाशने अवगत केले. ही सूतगिरणी सागरवाडीच्या विकासात मैलाचा दगड ठरणार, हे निश्‍चित आहे.

यानंतर आम्ही गावातून फेरफटका मारला. गावात चकचकीत सीमेंटचे रस्ते आहेत. त्यांचा दर्जाही उत्कृष्ट आहे. गावाच्या सुरुवातीलाच बौद्धांची वस्ती आहे. बौद्धांच्या जुन्या वस्तीत गेलो. तेथे एक-दोघांचा अपवाद सोडला तर कोणीच राहत नाही. भग्‍नावस्थेतील सरांचे घरही पाहिले. आता गावात फारसे कोणी राहत नाहीत. बहुतांशजण शेतातच आखाडे वा घरे बांधून राहू लागलीत. रोही, नीलगाय व रान डुकरांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून शेतकरी शेतात कुटुंबीयांसह राहत आहेत. पाखरं पांगावीत त्याप्रमाणे माणसं पांगलीत. गावाच्या चारही बाजुला डोंगर. हिरवाईने नटलेला परिसर. याच दर्‍याखोर्‍याच्या अंगाखांद्यावर खरात सरांचे बालपण गेलेलं. दिवसभर नदी-नाल्यांनी हुंदडायचं. आज या डोंगरावर, तर उद्या त्या डोंगरावर...पूर्वी आजूबाजूला कीर्रर जाळ्या होत्या. आता डोंगरांपर्यंत शेती झाली आहे. गावात बौद्ध, भामटा राजपूत, मुस्लीम समाज मिळून मिसळून राहतात. कुठेही वादविवाद नाहीत. उलट एकमेकांचे पाहून, एकमेकांच्या सल्ल्याने विकासाच्या वाटा प्रत्येकाने धरल्या आहेत.

परतीच्या मार्गावर असताना गावात सीताराम खोकड भेटले. त्यांच्या घरी जलपान घेतले. ते सांगू लागले की, सुरुवातीला शाळेत आम्ही 10-15 जण होतो. भीमराव खरात शिक्षक होते. त्यांनी आमच्या जीवनात खर्‍या अर्थाने प्रकाश टाकला. शिक्षणाची खर्‍या अर्थाने गोडी येथूनच लागली. शाळेच्या व्यतिरिक्‍तही ते आमचा अभ्यास आणि खेळ घेत असत. त्यांचे या गावावर खूप उपकार आहेत. अलीकडे ते मरण पावले आहेत. अन्यथा, त्यांनी या गावाशी ऋणानुबंध जपले होते. त्यांच्या प्रयत्नाला चार चाँद लागले डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद येथे. तेथेच आम्हाला शिक्षणाचे विविध प्रवाह कळायला लागले. सगळेचजण काटक आणि खेळात तरबेज असल्याने बर्‍याच जणांनी पोलीस खाते निवडले. या समोरच्या जागेत आम्ही फुटबॉल खेळलो. गाव गुण्यागोविंद्याने राहते. मात्र, एकच खंत आहे की, खासदार रामदास आठवले यांनी जाणीव ठेवून या गावासाठी प्रयत्नपूर्वक सूतगिरणी आणून दिली, तसा प्रयत्न इतर कोणी करताना दिसत नाहीत. सूतगिरणीमुळे सागरवाडी मराठवाड्यात ओळखली जाईल, असा विश्‍वास सीताराम खोकड यांनी व्यक्‍त केला.

गावात कोण अनोळखी आलेत म्हणून काही वृद्ध महिलांमध्ये चलबिचल सुरू झाली. जवळ गेल्यावर त्या महिला खरात सरांच्या नात्यातून असल्याचे समजले. रस्त्यातच एका महिलेने ‘मला ओळखले का?’ म्हणून सरांची चक्‍क परीक्षाच घेतली. सरांनी त्या महिलेकडे पाहिले आणि हो म्हटले. तेवढ्याने तिचे समाधान झाले नाही.

सागरवाडी : उपा. वामन खरात यांच्या आगमनाने आनंदून गेलेला महिला वर्ग. यावेळी उपा. सीताराम खोकड, उपा. भास्कर सरोदे, उपा. सुभाष वाकळे आदी.
‘मग सांगा नाव’, असा त्या महिलेने हट्टच धरला. तेवढ्यात भराभरा  10-12 वयोवृद्ध महिला आमच्या भोवती जमा झाल्या. सरांना ख्यालीखुशाली विचारू लागल्या. यावेळचा त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद वाखणण्याजोगा होता. निर्व्याज प्रेम हे फक्‍त खेड्यातच मिळतं. खेड्यातला आपला एखादा नातेवाईक शहरात आला तर आधी कारभारणीच्या कपाळावर आठ्या पडतात. आलेल्या पाहुण्याचे स्वागत करण्याऐवजी दुसर्‍या खोलीत जाऊन काहीतरी करत असल्याचे दाखवतात; पण समोर येऊन ख्यालीखुशाली विचारत नाहीत. हा फरक खेडे आणि शहरात चटकन दिसून येतो. या महिलांबरोबर एक फोटो काढला. त्यांचं सुपासारखं मन, आपुलकी आणि जिव्हाळा घेऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला.

डॉ. आंबेडकर कॉलेजची देण :

सागरवाडी सोडली. रस्त्यातच सेंट्रल जीएसटीमधून सेवानिवृत्त झालेले अधीक्षक तोताराम बहुरे यांचा मळा लागतो. ते संपर्कात होतेच. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोसंबीची बाग आहे. छत्रपती संभाजीनगरहून ये-जा करून तोताराम शेती बघतात. 16 एकर शेतीचे बागायतीकरण करण्यात आले आहे. तोताराम सांगतात, पूर्वी आमची फारच हलाखीची परिस्थिती होती. आई-वडील मोलमजुरी करायचे. गावातच शाळेचे धडे गिरवले. आम्हाला साधी मराठी येत नव्हती. आमच्यामुळे गावातील इतर समाजही आमची (भामटा राजपूत) भाषा बोलायचा. अशा परिस्थितीत आम्ही शाळा शिकलो. औरंगाबादला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण झाले. मी कुस्तीपटू होतो. मराठवाड्यातून तीन वेळा नॅशनल झालोय. गावातील सगळेजण आम्ही आंबेडकर वसतिगृहात राहत असत. तिथूनच आमच्या जीवनाला दिशा मिळाली. पूर्वी या गावाला धड रोड नव्हता. या रोडवर पहिली बरास माझी आहे. यावरून आमच्या परिस्थितीचा अंदाज येईल. राजूर-पैठण धार्मिकस्थळ जोड प्रकल्पामुळे गावाला रोड झाला. नोकरीला लागल्यावर ही शेती घेतली. आज माझ्या घरात 14 सदस्य नोकरीला आहेत. सगळी डॉ. आंबेडकर कॉलेजची देण आहे, या शब्दात ते कृतज्ञता व्यक्‍त करतात.

मतदानावर बहिष्कार;  पाडले दोन आमदार :

तोताराम बोलण्यात फारच पटाईत. पूर्वी लाख-दोन लाख देऊनही व्हॅलिडीटी निघत नव्हती. खूप संघर्ष करावा लागला. आमच्या बापजाद्यांचा ठावठिकाणाच नव्हता, तर कुठून आणणार पुरावे? समजून कोण घेतो? शासन दरबारी खूप खेटा मारून प्रमाणपत्र मिळवले. हा संघर्ष आजही सुरूच आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा कार्यक्रम घेतला. समाजबांधवांचे गार्‍हाणे त्यांच्या कानावर घातले. येथील लोकप्रतिनिधींसमोरही समस्या ठेवल्या. मात्र, कोणीही त्याकडे ध्यान दिले नाही. परिणामी मागील विधानसभा निवडणुकीत सागरवाडीने मतदानावर बहिष्कार टाकला. आमच्या मागण्यांना गावातील इतर समाजांनीही साथ दिली. त्यामुळे बहिष्कार यशस्वी झाला. आमचे पाहून पंचक्रोशीतील वाड्यांनीही बहिष्काराचे शस्त्र उगारले. परिणामी बदनापूर आणि भोकरदनचे दोन्हीही आमदार पाडले. हा आमच्यातील एकीचा विजय होता. दोन्हीही आमदार माझ्यावर नाराज झाले. मात्र, याचा परिणाम असा झाला की, सागरवाडीला निधीची कमी नाही. सागरवाडीचा झपाट्याने विकास सुरू आहे. राज्यकर्त्यांवर सागरवाडीचा आता वचक निर्माण झाला असल्याचे तोताराम बहुरे सांगतात.

तोताराम यांच्या पुतण्याने छान डीकाशन बनवली. डीकाशन पिऊन तोताराम यांनी त्यांच्या शेततळ्यावर नेले. 12-13 लाख केवळ शेततळ्याची खोली वाढवण्यावर खर्च झाला, असे ते सांगत होते. श्रमप्रतिष्ठेवर विश्‍वास असल्याने हा गाव झपाट्याने विकास साधत असल्याचा निष्कर्ष काढून आम्ही छत्रपती संभाजीनगरकडे निघालो.

शाळेबाहेर बसून गिरवला पहिला धडा :

सागरवाडीचा शिकलेला नोकरदार वर्ग छत्रपती संभाजीनगर, नोकरीच्या ठिकाणी आणि विदेशात स्थायिक झाला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील वेदांतनगर येथील आनंद विहार येथे राहत असलेले इंडियन नेव्हीमधून सेवानिवृत्त झालेले भानुदास भिकाजी खरात यांची भेट घेतली. खरात सर आणि मी घरी गेलो तेव्हा ते दुपारचे जेवण करत होते. एक प्लेट स्लाड, एक वाटी वरण आणि एक ज्वारीची भाकर असा संतुलीत आहाराचे ते सेवन करत होते. हर्बल न्यूट्रीशनने घालून दिलेला डायट प्लान ते फालो करतात. ते सांगतात, 1959 ला सागरवाडीचे सरपंच बंडुसिंग बहुरे होते. त्यांनी जालन्यातील एका संस्थेची शाळा गावात सुरू केली. आर. बी. बारोकर शिक्षक होते. शाळेला अनुदान वगैरे काहीच नव्हते. त्यामुळे वर्गणी करून शिक्षकाचा पगार केला जायचा. पहिली शाळा परदेशीच्या (भामटा राजपूत) वाड्यात भरली. आम्हा महाराच्या पोरांना वर्गाबाहेर बसवले जायचे. पुढे हैदराबाद संस्थानातून मराठवाडा मुक्‍त झाला. 1961 ला नादर साहेबांनी शाळेला भेट दिली. त्यांनी शाळेतील जातीभेदाचे चित्र पाहिले आणि ‘असे असेल तर शाळेला मान्यता देणार नाही’, असा सज्जड दम भरला. तेव्हापासून आम्ही सगळेजण एकत्र बसू लागलो. 

भावाचे स्वप्न केले पूर्ण :

भानुदास खरात पुढे सांगतात, 1963 ला चौथी बोर्ड परीक्षेत मी औरंगाबाद जिल्ह्यात प्रथम आलो होतो. त्यामुळे 60 रुपये शिष्यवृती मला मिळाली होती. माझा सत्कार झाला होता. माझ्या शिक्षणाची अशी सुरुवात झाल्यावर मी थांबणारा नव्हतोच. 1971 ला नागसेनवनातील मिलिंद महाविद्यालयातून पीयूसी झालो. आयएनएस-शिवाजी, लोणावळा येथून बी. ई. (यंत्र) झालो. मोठे भाऊ एकनाथ खरात नेव्हीमध्ये शिपाईपदावर होते. त्यांचे स्वप्न होतं की, मी मॅट्रीक पास झालो, तर नेव्हीत अधिकारी बनविण्याचे. ते स्वप्नही पूर्ण झाले. भारत-पाकिस्तान युद्धात मी आयएनएस-शिवाजीवर ट्रेनी म्हणून बेस सांभाळत होतो. त्याबदल्यात संग्राम मेडलही आहे. 10 वर्षे सेवेनंतर 1985 ला नेव्ही सोडली. 1985-91 मुंबईत खासगी नोकरी केली. त्यामाध्यमातून देश-विदेशात जाण्याची संधी मिळाली. 1992-2007 पर्यंत औरंगाबाद येथे मेटल टेस्टिंग लॅबोरॅटरी चालवली. भारतातील चार अल्ट्रासोनिक तज्ज्ञांमध्ये मी एक होतो. काळाची पाऊले उलटी पडली आणि कंपनी ठप्प झाली. त्याविषयी न्यायालयात वाद सुरू असल्याचे ते सांगतात.

मुलांचा अभिमान वाटतो :

भानुदास खरात म्हणतात, मी 10-12 देश फिरलो आहे. त्यामुळे माझ्या मुलांनीही बाहेरच्या देशात जाऊन करिअर करावे, असे वाटत होते. ते प्रत्यक्षात उतरल्याचे पाहून लेकरांचा अभिमान वाटतो. मीरा, हीना, राहूल व रोहण चौघांनीही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणाच्या आधारावर एका मुक्‍कामावर पोहोचले आहेत. मीरा (एम.ई., एम.बी.ए.) असून लंडनला आहे. हीना (एम. टेक्.) असून ती सध्या नॉर्वेला आहे. राहूल (एम. टेक्., एम.बी.ए.) एका अमेरिकन कंपनीत असून युनोच्या एका पॅनलवर नुकतीच त्याची नियुक्‍ती झाली आहे. शेवटचा रोहण (बी.ई., एम.बी.ए.) व्यावसायिक आहे. मुलांचे करिअर ब्राईट झाल्याचे पाहून समाधान वाटते.

सागरवाडी ते युनो स्वप्नवत प्रवास :

भानुदासरावांचे तिसर्‍या क्रमांकाचे चिरंजीव राहूल खरात आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तज्ज्ञ आहे. संयुक्‍त राष्ट्र संघाने विकसनशील देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करावयाचा यासाठी खास एक फोरम तयार केला आहे. या फोरमवर राहूल खरात यांची निवड झाली असून त्यांनी अलीकडेच आपले प्रझेंटेशन सादर केले आहे. भानुदासरावांच्या मोबाईलवरून प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधला. तो प्रश्‍नोत्तराच्या स्वरूपात खालीलप्रमाणे...

प्रश्‍न : सागरवाडी ते युनो हा प्रवास कसा वाटतो?

राहूल : याबाबत प्राऊड फिल होतो. हा प्रवास स्वप्नवत वाटतो.

प्रश्‍न : तुमच्या वडिलांना शाळेबाहेर बसून शिकावे लागले, आपण तर युनोपर्यंत पोहोचलात, याचे श्रेय कोणाला द्याल?

राहूल : आई-वडिलांना. त्यांच्याच प्रेरणेने इथपर्यंत पोहोचलो आहे. शिक्षणामुळे संधी मिळाली. त्या संधीचा अचूक फायदा उचलला एवढेच.

प्रश्‍न : भविष्यातील काय योजना आहेत? 

राहूल : आगामी काळात एनर्जी क्रायसेस हा जगाचा प्रश्‍न असणार आहे. माझा विषयही एआयमध्ये एनर्जी क्रायसेस आहे. त्यावर उपाय काढण्याचा माझा प्रयत्न राहील.

प्रश्‍न : सागरवाडीसाठी काही करणार आहात का?

राहूल : माझ्या ज्ञानाचा जगाला जो फायदा होणार आहे, तोच फायदा सागरवाडीला होणार आहे. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. आणि गरज पडलीच तर मागेही हटणार नाही.

सागरवाडीचा टर्निंग पॉईंट :

सागरवाडीतील प्राथमिक शाळेने शिक्षणाचा पाया रचला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाने त्यावर कळस चढवला. शिक्षणाच्या बीजारोपानेच सागरवाडीच्या विकासाला कलाटणी मिळाली. शिक्षणच टर्निंग पॉईंट ठरला. आज सागरवाडीचे शेकडो लोक नोकरी-व्यवसायात आहेत. शिवाय आठजण विदेशात कार्यकर्तृत्व गाजवत आहेत. हा बदल केवळ शिक्षणामुळेच झाला. माणसाच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले व भारतीय संविधानाचे निर्माते बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी ओळखले होते. त्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम म्हणून एक दुर्लक्षित वाडी जगाच्या नकाशावर चमकत आहे.

विदेशात वसतो देश! :

सागरवाडी, ता. बदनापूर, जि. जालना येथील आठ तरुण-तरुणी विदेशात वेगवेगळ्या हुद्यावर आहेत. एका खेडेगावातून इतके विद्यार्थी विदेशात जाणं ही दुर्मीळ घटना असावी. त्यांच्या रूपाने विदेशातही आपला भारत देश असल्याची भावना तयार होते. त्यांची नावे अशी :

1. मीरा भानुदास खरात : युनायटेड किंग्डम

2. हीना भानुदास खरात : नॉर्वे

3. डॉ. राहूल भानुदास खरात : अमेरिका

4. डॉ. विक्रम किशनसिंग बहुरे : लंडन

5. डॉ. माधुरी बहुरे : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन

6. डॉ. सरिता किशनराव बहुरे : सिडनी, ऑस्ट्रेलिया

7. माधवी भास्कर हिवाळे (सागरवाडीची नात) :  नेदरलँड

8. कल्याणी सुनील हिवराळे (गयााबाई खरात-हिवराळे यांची नात) : युनायटेड किंगडम

कही खुशी कही गम! :

शिक्षणामुळे सागरवाडीचे नाव जगाच्या पाठीवर सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जात आहे, यापेक्षा आनंदाची बाब काय असू शकते? सागरवाडीवासियांना याचा अभिमान आहे. मात्र, या सगळ्यांनी सागरवाडीसाठी ठोस काहीतरी केले पाहिजे, अशी सार्थ अपेक्षा काहीजणांनी व्यक्‍त केली, तर काहीजणांनी नाराजीही व्यक्‍त केली. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवरच असले पाहिजे, अशी भावना सीताराम खोकड यांनी व्यक्‍त केली. जीवनात तडजोडी कराव्या लागत असल्याची खंत भानुदास खरात व्यक्‍त करतात. चंद्राला डाग आहे.  परिवर्तन आणि प्रगतीबरोबरच सागरवाडीतही ‘कही खुशी कही गम’ असल्याचे दिसून आले. परिस्थिती बदलणं हाताबाहेर असले तरी दुरावत जाणार्‍या नात्यातील अंतर कमी करून ‘जादा खुशी, कम गम’ देणे हे विदेशवीरांच्या हाती आहे! 

Save Journalism!, Save Democracy!!

DONATE...

BAHUJAN SHASAK MEDIA

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा) 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?