‘बिनधास्त’ आणि ‘स्थितप्रज्ञ’ अभियंत्यांचा सेवापूर्ती कार्यगौरव
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
‘बिनधास्त’ आणि ‘स्थितप्रज्ञ’ अभियंत्यांचा सेवापूर्ती कार्यगौरव
कुशल कर्मामुळे होतो यशाचा मार्ग प्रशस्त- झाल्टे
![]() |
छत्रपती संभाजीनगर : महापारेषणचे निवृत्त कार्य संचालक रोहिदास मस्के यांचा सेवागौरव करताना जे. एस. पाटील, सोबत रोहिदास मस्के यांच्या सहचारिणी प्रा. कुसूम मस्के व भुजंग खंदारे आदी. |
छत्रपती संभाजीनगर : अभियंत्यांनी आपल्या कामाचा परीघ वाढवला पाहिजे. सेवा कार्यकाळात एकदा तरी कठीण ठिकाणी काम केले पाहिजे. माणसांची कुशल कर्म यशाचा मार्ग प्रशस्त करतात. आज ज्या दोन अभियंत्यांचा सेवापूर्ती कार्यगौरव होत आहे, त्यांचे कुशल कर्म प्रबळ होते म्हणूनच ते आव्हानात्मक जबाबदार्या पार पाडू शकले, असे गौरवोद्वार निवृत्त संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी तथा माजी ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख सल्लागार उत्तमराव झाल्टे यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन आणि बॅकवर्ड क्लास सिनिअर इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महापारेषणचे निवृत्त कार्य संचालक रोहिदास मस्के व महापारेषणचे निवृत्त अधीक्षक अभियंता मिलिंद बनसोडे यांच्या सेवापूर्ती कार्यगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार प्रशिक्षण केंद्र, शरणापूर फाटा येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतंत्र मजदूर युनियनचे अध्यक्ष जे. एस. पाटील होते. प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके, महापारेषणचे मुख्य अभियंता नसीर कादरी, महावितरणचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, रोहिदास मस्के निडर आहेतच, शिवाय ते एक उत्कृष्ट अकॅडेमिशियनही आहेत. त्यांच्या आई-वडिलांच्या चेहर्यावरचे तेज पाहून मुलगा त्यांना कसं वागवतो, याची प्रचिती येते. माणसाच्या जीवनात कुशल कर्माला फार महत्त्व आहे. ज्यांचे कुशल कर्म जितके प्रबळ तितके त्या व्यक्तिचे यश, हा निसर्ग नियम आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्यांच्या यशात मस्केताईंचीही मोलाची साथ असल्याचे झाल्टे यांनी सांगितले.
पेटली जीवनात प्रकाशज्योत!
रोहिदास ऊर्फ ‘बिनधास्त’ मस्के यांनी आपले अनुभव कथन करताना पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवत असताना राष्ट्रनिर्माते महात्मा जोतीराव फुले यांचा संदर्भ दिला. महाविद्यालयात वरिष्ठ असलेले ससाणे यांनी मुलांना शिकविण्यासाठी काय तयारी केली पाहिजे याचे मार्गदर्शन केले. त्यानंतरच माझे शिक्षकी जीवन आरपार बदलून गेले, असे ते म्हणतात. रोहिदास मस्के यांच्या जीवनात प्रकाशज्योत पेटवणारे ससाणे कुटुंबीय हे महात्मा फुले यांचे व्याही अर्थात यशवंत फुले यांचे सासरे होते. याच ससाणे कुटुंबीयातील शिक्षकाने रोहिदास मस्के यांचा दृष्टिकोन बदलवला. त्यांच्याप्रती मस्के यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.
मिलिंद बनसोडे यांच्याविषयीचे अनुभव सांगताना झाल्टे यांनी अनेक उदाहरणे दिली. अभियंत्यांनी आयुष्यात एकदा तरी कठीण ठिकाणी काम केले पाहिजे. तुमच्या कामाचा परीघ वाढवा. जे अभियंते आव्हाने स्वीकारतात तेच मोठे होतात. मिलिंद बनसोडे त्यापैकीच एक आहेत. महाराष्ट्रात अतिसंवेदनशील अशा कंधारला बनसोडे यांची पोस्टींग केली. शेतकरी नेते केशवराव धोंडगे, शंकरआण्णा धोंडगे यांच्या धास्तीमुळे कंधारचा पदभार घेण्यास अभियंते धजावत नसत. मात्र, हे आव्हान बनसोडे यांनी स्वीकारले आणि धाडसाने निभावलं. मोठ्या खुबीनं माणसं हाताळण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. समाजऋण परतफेड म्हणून ते संपूर्ण आयुष्य सक्रिय राहिले. तांत्रिक ज्ञानाबरोबरच सामाजिक भान त्यांच्या ठायी असल्याची शाबासकीची थापही झाल्टे यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या वास्तूमध्ये या दोन महनीय अभियंत्यांचा सेवापूर्तीनिमित्त कार्यगौरव समारंभ घेण्याच्या पाठीमागे संजय घोडके यांच्या डोक्यात काहीतरी संकल्पना असली पाहिजे. या वास्तूच्या उभारणीत या दोन्ही अभियंत्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग नवीन अभियंत्यांना व्हावा, ही संकल्पना घोडके यांच्या डोक्यात असावी. या वास्तूचा उपयोग केला पाहिजे. अभियंते, कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. शिवाय इतरांना प्रशिक्षण देणारे अभियंते बनले पाहिजेत. अभियंत्यांनी पॉवर सेक्टरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. 2070 पर्यंत पॉवर सेक्टर विद्युतशून्य होईल. त्यासाठी आतापासूनच तुम्ही तयार असले पाहिजे. काळाची पावले ओळखून वागायला शिकले पाहिजे, असा वडीलकीचा सल्लाही झाल्टे यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर : अधीक्षक अभियंता मिलिंद बनसोडे यांचा सेवागौरव करताना यु. जी. झाल्टे, सोबत जे. एस. पाटील, रोहिदास मस्के, मिलिंद बनसोडे यांच्या सहचारिणी प्रा. सुवर्णा बनसोडे आदी.
मुख्य अभियंता नसीर काद्री, भुजंग खंदारे व संजय घोडके यांनी रोहिदास मस्के व मिलिंद बनसोडे यांच्या कार्याचा गुणगौरव केला. रोहिदास म्हणजे बिनधास्त! प्रचंड आत्मविश्वास असणारा जिगरबाज तितकाच धडाडीचा अभियंता. याउलट मिलिंद बनसोडे एखाद्या स्थितप्रज्ञासारखे वागले. संकट कितीही मोठे असले तरी न डगमगता त्यावर उपाय शोधत राहिले. या दोघांच्या यशात त्यांच्या सहचारिणींचा मोलाचा सहभाग असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
नारायण मेघाजी लोखंडेंच्या पणतूची केंद्राला भेट
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने शरणापूर फाटा येथे रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. या निवासी प्रशिक्षण केंद्रात अलीशान राहण्याची व्यवस्था आहे. येथे एक कॉन्फरन्स हॉल, एक सभागृह असून प्रशस्त कार्यालय आहे. या कार्यालयातील कपाटात ज्येष्ठ सत्यशोधक लेखक राजाराम सूर्यवंशी यांनी लिहिलेले ‘सत्यशोधक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे’ या ग्रंथाची एक प्रत ठेवण्यात आली आहे. ही प्रत नारायण मेघाजी लोखंडे यांचे पणतू (सख्ख्या भावाचे पणतू) गोपीनाथ वसंतराव लोखंडे यांनी भेट दिली आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याची जाणीव व्हावी, हा यामागील उद्देश आहे. इतिहास पुरुषाच्या पणतूची भेट या केंद्राला कायम आठवणीत राहणारी तर आहेच, शिवाय जबाबदारीचीही जाणीव करून देणारी आहे.
यानंतर मिलिंद बनसोडे यांनी आपल्या मवाळ तितक्याच प्रभावी वाणीने आपला जीवनप्रवास सांगितला. दुसरीकडे रोहिदास मस्के यांनी आपल्या बिडाच्या भाषेत प्रेक्षकांना पोट भरून हसायला लावले. तत्पूर्वी सत्कारमूर्तींच्या सहचारिणींनीही आपल्या सहवेदना सभागृहाला अवगत केल्या. कामाच्या व्यापामुळे या दोघांनाही घराकडे लक्ष देता आले नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली. शेवटी जे. एस. पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला.
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा