दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

रीडर ते रियासतकार : गो. स. सरदेसांईंचा लेखन प्रवास...

 रीडर ते रियासतकार :  गो.  स.  सरदेसांईंचा लेखन प्रवास...


-राजाराम सूर्यवंशी

आज दि. 17 मे 2024 रोजी सुप्रसिद्ध इतिहासकार, लेखक, विद्वान गोविंद सखाराम सरदेसाई यांची 159 वी जन्मतिथी आहे. तथापि, महाराष्ट्रात ती कोठेही साजरी केली जात नाही. जाणार नाही. कारण राजे-रजवाडे आणि राजकारणी यांच्याशिवायही काही कर्तृत्ववान माणसेही इतर क्षेत्रात व विशेषतः ज्ञानाच्या क्षेत्रात, कलेच्या क्षेत्रात होऊन गेलेत हे आम्हाला शिकवले जात नाही. त्यात लेखक व इतिहासकार हे दुर्लक्षांचे विषय आहेत. कारण ज्ञान व विद्येची उपासनाच आपल्याकडे केली जात नाही. पर्यायाने लेखक, विचारवंत यांना मानाचे स्थान दिले जात नाही.

पैसा कमवतो तो मोठा! मग तो पैसा कुठल्याही मार्गाने येवो, आणला जावो, त्याचा उदो उदो केला जातो किंवा सत्तेच्या व अधिकाराच्या परिघात जो फिरतो त्याचाही उदो उदो केला जातो. मात्र, लेखक, कवी, साहित्यिक व विचारवंताला अनुल्लेखाने मारले जाते. जिवंतपणी व मेल्या नंतरही! ही आपली सामाजिक शोकांतिका आहे. 

वास्तविक लेखक, कलाकार, मूर्तीकार, साहित्यिक, चित्रकार, विचारवंत हे समाजाचे भूषण असतात. त्यांच्या तपातून व कष्टातून समाजाला सांस्कृतिक चेहरा प्राप्त होतो. त्याशिवाय लेखक, कलाकार, साहित्यिक व विचारवंत आपोआप तयार होत नाही. त्यासाठी प्रचंड साधना करावी लागते. त्यांच्या पुस्तकांची, साहित्याची, कलेची, बुद्धिमत्तेची किंमत पैशात कधीच मोजता येत नाही. एकवेळ पैसा कमवणं सोपं!; परंतु लेखक, साहित्यिक व विचारवंत होणं फार कठीण असते. सर्वसामान्य समाजाला या गोष्टीची जाणीव नसली तरी आमच्यासारख्या विचारवंत, लेखकांना ती ठेवावी लागते. तशी जाणीव जपावी लागते. म्हणूनच दुर्लक्षित असलेल्या विचारवंत, कलाकार, लेखक, साहित्यिक यांची माहिती व त्यांनी केलेल्या साहित्य सेवेची उजळणी मी इतिहासातील थोर समाजसुधारक, क्रांतीकारक, परिवर्तनवादी महापुरुषांबद्दल देत असतो. त्याच उद्देशाने आज थोर इतिहासकार व रियासतकार म्हणून ओळखल्या गेलेल्या एका लेखकाची माहिती येथे देत आहे. ती देता देता त्यांनी केलेल्या साहित्य निर्मितीसाठी किती कष्ट वेचले होते, किती मोठा ज्ञानयज्ञ केला होता, याचे महत्त्व विशद करीत आहे. त्यामागचा उद्देश हा आहे की, यांच्या विचार व कार्यातून आजच्या तरुणाईला प्रेरणा मिळो. त्यांच्यातूनही उत्कृष्ट साहित्यिक व कलाकार निर्माण होवोत व आपला समाज आणि देश सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुदृढ बनो ही अपेक्षा आहे!

रियासतकारांच्या 259 व्या जयंती निमित्ताने...       

इतिहासकार गो. स. सरदेसाई म्हणजेच प्रसिद्ध रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई. हे नाव मुखी येताच इतिहास लेखानाच्या क्षेत्रातले त्यांचे भव्य व दिव्य योगदानाने डोळे दिपून जातात.

हिर्‍याला शोधण्यासाठी जशी कोळश्याची विहिर खोदावी लागते, तशीच त्या कोळश्यातून हिरा शोधण्यासाठी रत्नपारखीही लागतात. आपल्याकडे तसे रत्नपारखी होते, म्हणूनच आपल्याला काही मौल्यवान माणसं प्राप्त झाली होती. शाहू महाराज, बाबा पद्मनजी, जिजाऊ माँसाहेब, आधुनिक काळात मुकुंदराव पाटील भुजबळ अशी असंख्य नावं सांगता येतील. त्यातलेच एकनाव होते, श्री. सयाजीराव गायकवाड यांचे.

सयाजीराव महाराज गायकवाड हे खरे रत्नपारखी होते. महाराष्ट्रातील उत्तमोत्तम  विद्वान व हुशार व्यक्तींना ते आपल्या संस्थानात विविध पदांवर कार्यरत करीत असत. त्यांच्या अंगभूत गुणांना बहरण्याला फुलण्याला पूर्ण वाव देत असत.

रत्नागिरी जिल्ह्यातील गोविल गावातून असेच एक रत्न महाराजांना हाती लागले होते. इ.स.1888 साली मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून बी. ए. झालेले गो. स. सरदेसाई उर्फ गोविंद सखाराम सरदेसाई हे एका गरीब कायस्थ शेतकर्‍याचे भूमिपुत्र होते. बालपण गावी शाळा शिकतांना शेतीत कष्टात गेले होते. बी. ए. झाल्यावर एका हितचिंतकाच्या शिफारशीवरून बडोद्याला पोहचले व सयाजीराव महाराजांचे रिडर म्हणून कामाला लागले होते.

रोजचे पेपर, मासिके, घडामोडी वाचून दाखवणे हे त्यांचे कार्य होते. महाराजांना रोजच्या रोज जगातल्या घडामोडी अवगत करून देताना प्रचंड असा माहितीचा साठा त्यांच्या ठायी जमा झाला होता. महाराजांचे रिडर म्हणून काम करतानाच युवराज फत्तेसिंग राव गायकवाड यांना व इतर राजकुमार व राजकन्यांना शिकवण्याचे कामही त्याच्याकडे सोपविण्यात आले होते.

या नव्या कामगिरीसाठी ते मनापासून सिद्ध झाले होते. त्यासाठी ते शिकवण्याच्या विषयाची जी टिपणे  काढीत, ती टिपणे इतकी विस्तृत व प्रभावी असत की, त्यातून पुढे मराठी रियासतीचा जन्म झाला झाला होता.

या टिपणातून सरदेसाईंनी 1898 साली ‘मुसलमानी रियासत’ हा प्रथम ग्रंथ लिहिला होता.

साधारणतः 24 वर्ष सरदेसाई महाराजांच्या सर्व मुलांचे मास्तर होते. या काळात त्यांनी मुलांना शिकवण्याच्या नोटस् एवढ्या सखोल तयार केल्या होत्या की, त्याआधारे सरदेसाईंनी लवकरच दुसरा एक ग्रंथ लिहून हातावेगळा केला होता.

‘ब्रिटिश रियासतीचा पूर्वाध’ असे त्या ग्रंथाचे नाव होते. हे दोन्ही ग्रंथ ‘सयाजीराव महाराज ग्रंथमाला’ या मालेद्वारा प्रसिद्ध झाले होते.

पुढे वयाच्या 60 व्या वर्षी ते महाराजांच्या सेवेतून सेवानिवृत्त होऊन नंतरचे उर्वरित आयुष्य लोणावळ्या जवळच्या कामशेत या गावी इंद्रायणी नदीकाठी एक घर बांधून तेथे व्यतित केले होते.

‘मराठी रियासती’चे सर्व तेरा खंड त्यांनी कामशेतला बसून लिहिले होते.

या काळात त्यांची मैत्री दुसरे एक प्रसिद्ध इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांच्याशी झाली होती. या मैत्रीतून सरदेसाईंकडे ’पेशवे दप्तर’, रेसिडेन्सी रेकार्डस, ग्वाल्हेरचा पत्रसंग्रह इत्यादी विषयांवर लेखन घडून आले होते.महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच वा.सी. बेंद्रेंप्रमाणे तटस्थ लेखन या महान रियासतकारांच्या हातून कागदावर उतरले होते. या लेखन कार्यात सरदेसाईंना यदुनाथ सरकारांचेही बहुमूल्य सहकार्य लाभले होते.

यदुनाथ सरकारांनाही ‘मराठ्यांचा इतिहास’ लिहितांना सरदेसाईंच्या टिपणांची व ज्ञानाची भरघोस मदत झाली होती. यदुनाथ सरकारांना मराठ्यांचा इतिहास लिहिताना काही कुटप्रश्न उपस्थित झाले, तर त्यावेळी सरदेसाई आपले ज्ञान व ऐतिहासिक माहितीच्या आधारे त्या कुटप्रश्नाची सोडवणूक करीत असत.

गो. स. सरदेसाई यांनी रियासतीचे एकूण तेरा खंड प्रसिद्ध केले होते. त्याशिवाय ‘मुसलमानी रियासती’च्या तीन आवृत्या त्यांनी काढल्या होत्या.

पेशवे दप्तरांच्या कागदपत्रांवर लेखन व संपादन करून त्यांचे 45 खंड सरदेसाईंनी प्रकाशित केले होते.

त्याशिवाय यदुनाथ सरकारांबरोबर ‘पुना रेसिडेन्सी कारस्पान्डन्स’चे पाच खंड संपादित केले होते. या व्यतिरिक्त मामा परमानंदांचे दीर्घ काव्य ‘अनुपुराण’ याचे संपादनही गो. स. सरदेसाईंनी करून त्यांनी ते ‘गायकवाड ओरिएंटल सेरीज’मध्ये प्रकाशित केले होते.

रियासतकारांनी लहान मुलांसाठीही ‘महाराष्ट्राच्या इतिहासाच्या सोप्या गोष्टी’, ‘हिंदुस्थानचा प्राथमिक इतिहास’ असे विविध ग्रंथांचेही लेखन त्यांनी केले होते.

सरदेसाईंनी ऐतिहासिक तसेच वर्तमानातील महत्वाच्या विषयांवर विविध लेख नियतकालिकांमधून लिहिले होते. असे 360 लेख त्यांनी लिहिले होते.

अशा या प्रकांड इतिहासकाराचे वयाच्या 94 व्या वर्षी 29 नोव्हेंबर 1959 रोजी कामशेत मुक्कामी निधन झाले होते.

मृत्यूपूर्वी सरदेसाईंनी आपला स्वतःचा शेकडो पुस्तकांचा ग्रंथसाठा व संग्रह पुणे विद्यापीठाला दान केला होता. तो आता पुण्याच्या डेक्कन कॉलेजात ठेवला आहे. तसेच त्यांच्या सर्व पत्रव्यवहारांच्या फाईली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात त्यांनी स्वतः जमा केल्या होत्या. आज इतिहासाच्या जिज्ञासूंना त्या फार उपयुक्त ठरत आहेत.

गो. स. सरदेसाईंचे इतिहास लेखन क्षेत्रातील भरघोस योगदान बघून, यदुनाथ सरकारांनी त्यांचा ‘सर्वश्रेष्ठ मराठ्यांचा विद्यमान इतिहासकार’ या शब्दात गौरव केला होता.

सरदेसाईंना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यात ब्रिटिश प्रशासनाने त्यांना प्रथम

1) 1933 साली ‘रावसाहेब’,

2) 1938 साली ‘रावबाहादूर’,

3) 1946 साली राजवाडे संशोधन मंदिर धुळेने त्यांना ‘इतिहास मार्तंड’ ही पदवी आणि सुवर्णपदक देऊन गौरव केला होता.

4) तसेच पुणे विद्यापीठाने त्यांना 1951 साली डी. लीट ही बहुमानाची पदवी देऊन गौरविले होते. आयुष्याच्या अखेरच्या दिवसात सरदेसाईंनी 1956 साली ‘माझी संसारयात्रा’ हे आत्मचरित्र लिहिले होते.

5) तर 1957 साली महाराष्ट्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले होते.

अशा या गुणी कायस्थ शेतकरी पुत्राचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात 17 मे 1865 रोजी झाला होता. तरीही आपल्या लेखन, माहिती व ज्ञानाच्या बळावर त्यांनी जे सर्वोच्च स्थान प्राप्त केले होते, त्याला तमाम महाराष्ट्रातील इतिहासकारांच्या यादीत तोड नाही.

आपल्या लेखनाच्या बळावर ब्राह्मणांच्या कमरेला लटकलेल्या ज्ञान भांडाराच्या चाव्या त्यांनी सहज काढून घेतल्या होत्या. त्यांच्या कार्याने मराठी वाड्ःमयातील भल्या भल्यांना इतिहासकारांना, शब्दप्रभूंना आश्चर्यचकित केले होते.

गो. स. सरदेसाईंचा हा लेखन प्रवास आजच्या पिढीतील नवोदित लेखाकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही. 

मात्र, कोकणातील एका कायस्थ शेतकर्‍याच्या मुलांचे रीडर ते रियासतकार हा अद्वितीय प्रवास केवळ सयाजीराव महाराज गायकवाडांच्या रत्नपारखी नजरेमुळे झाला होता, हे ऐतिहासिक सत्य आपल्याला नाकारता येणार नाही.

तरीही यात सरदेसाईंचे कर्तृत्वही तितकेच महान आहे. म्हणून आजच्या त्यांच्या 159  व्या जयंतीदिनी त्यांना ही शब्दसुमनांची माळा अर्पण करताना विशेष कृतज्ञताभाव दाटून येत आहे!



-राजाराम सूर्यवंशी ,पालघर
Mob. no. : 9503867602

(लेखक सत्यशोधक चळवळीचे व भारतीय इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत.)


Save Journalism!, Save Democracy!!

DONATE...

BAHUJAN SHASAK MEDIA

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा) 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?