शपा, परशुराम व सुभाषचंद्र सोनार!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शपा, परशुराम व सुभाषचंद्र सोनार!
-राजाराम सूर्यवंशी
हिंदू धर्मातील भगवान विष्णूचा सहावा अवतार म्हणजे परशुराम अवतार. या परशुरामाने 21 वेळा पृथ्वीवरील क्षत्रियांचा निप्पात करून ती पृथ्वी त्याने ब्राह्मणांना दान दिली वा अर्पण केली होती, असा पुराणात उल्लेख आहे.
या दशावतारातील चौथा अवतार रामाचा होता, तर पाचवा अवतार कृष्णाचा आणि सहावा अवतार परशुरामाचा दाखवला व लिहिला गेला आहे.
हा ब्राह्मण पुत्र चिरंजीव आहे, असे पुराणांचे म्हणणे आहे. या अमर परशुरामाला महात्मा फुलेंनी 1 ऑगस्ट 1872 रोजी जूनी गंज पेठ, घर नंबर 527 वरून एक पत्र पाठवले होते. त्यात लिहिले होते की,
‘अरे दादा परशुरामा, तु चिरंजीव आहे, असे ब्राह्मणांच्या ग्रंथावरून समजले आहे........तरी तु तोंड चुकवून इकडे तिकडे फिरू नको. हे पत्र मिळाल्यानंतर सहा महिन्याच्या आत तु तुझे अस्तित्व दाखव व तुझ्या चमत्कारांनी इंग्रज , फ्रेंच वैगरे लोकांना पळवून लाव........’.
महात्मा जोतीराव फुलेंचे हे पत्र काही परशुरामापर्यंत पोहचले नव्हते. कारण परशुराम हा राम व कृष्णांकडून शिल्लक राहिलेली पुरुषसत्तावादी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्यात व्यस्त होता. स्त्रीसत्ताक मातृसत्ताकवादी समाजव्यवस्थेच्या समर्थकांचा नायनाट करण्यात व्यस्त होता.
मात्र, हा विषमतावादी व पुरुषसत्ताक समाजाचा पक्का समर्थक, ब्राह्मण वडिलांच्या सांगण्यावरून क्षत्रिय आईची हत्त्या करून पुरुषसत्तेचा पाईक असल्याची ग्वाही देण्यासाठी वडिलांकडे गेला असता वडिलांनी त्याला तडक आदेश दिले की, त्यांची कामधेनू गाय चोरीला गेली आहे व ती लक्ष्मणाने चोरली आहे.
अज्ञाधारक परशुराम तडक निघाला व लक्ष्मणाचा शोध घेत सीता स्वयंवराच्या ठिकाणी पोहचला. तेथे सीता स्वयंवर चालू होते. लक्ष्मण परशुरामाच्या भितीने रामाच्या बाजूला जाऊन बसला होता. तेथे परशुरामाने लक्ष्मणाला द्वंदयुद्धासाठी तयार राहण्यास सांगितले. तेव्हा राम मध्ये पडून लक्ष्मणाला मारण्यापूर्वी तुला माझ्याशी लढावे लागेल असे सांगितले.
तेव्हा परशुरामाने स्वयंवरानंतर सरळ रामालाच आव्हान दिले व मी इथे असतांना तू अयोध्येला सीतेसह कसा जातो? असे बजावून सांगितले!....बसं झाले....!
कॉ. शरद पाटील यांना हा परशुराम येथे सापडला.
शपांनी येथे हे पाहिले की, परशुराम हा रामाला आव्हान देतो आहे!
शपांनी तत्काळ ताडले की, रामाला आव्हान देणारा जो कोणी असेल तो पुरुषसत्तेचा विरोधी असला पाहिजे. म्हणजे पर्यायाने स्त्रीसत्तावादी वा मातृसत्ताक समाजव्यवस्थेचा समर्थक असला पाहिजे! मग, त्यांनी तत्काळ परशुरामाला स्त्रीसत्ता व मातृसत्ताक समाजाचा समर्थक घोषित करून टाकले!!
शपा त्याला भेटून विचारणार होते की, तू स्त्रीसत्तावादी कसा?; परंतु तेवढ्यात परशुराम तेथून निसटला व शपांचे काम अपूर्ण राहिले.
आता पुढची पाळी सुभाषाचंद्र सोनारांची होती...
ते तेव्हापासून कामाला लागलेत. शरद पाटील यांनी कोणताही पुरावा न देता पुरुषसत्तावादी परशुरामाला स्त्रीसत्ता व मातृसत्तेचा कट्टर समर्थक म्हटल्यानंतर पुरशुराम हा कसा स्त्रीसत्तावादी व मातृसत्ताक समाजाचा समर्थक होता, हे सिद्ध करण्याचा खटाटोप करताहेत. त्यासाठी गुमशुदा परशुरामाला शोधताहेत.
सुभाषचंद्र सोनारांचं म्हणणं आहे की, शरद पाटीलांना वेळेअभावी परशुराम हा स्त्रीसत्तावादी समाजाचा समर्थक होता हे सिद्ध करणं जमलं नाही, ते काम आपलं आहे!
तेव्हापासून सुभाषचंद्र सोनार हे परशुरामाची स्त्रीसत्ताक-मातृसत्तावादी हिडन बाजू शोधताहेत. त्यांना सछिच्छा!
कॉ. शरद पाटील यांनी रामायण आणि महाभारतातील वर्ण संघर्ष या ग्रंथातील प्रकरण 2 मधील पान 22/23 वर लिहिले आहे की, ‘स्त्रीसत्तेचा शेवटचा महत्तम समर्थक असलेला परशुराम हा रामाशी लढायला आला. त्यात परशुरामाचा पराभव झाला...!
बस्सऽऽ, झालंऽऽ...!
सोनारांना एवढंच पुरेसं झालं व ते 1986 पासून म्हणजे रामायण-महाभारतातील वर्ण संघर्ष शपांचे हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून, परशुराम हा कसा स्त्रीसत्तावादी होता हे आज 38 वर्षांपासून शोधताहेत! अजून शोध लागला नाही! प्रयत्न करतायेत!!
सोनार सर, जे शपांना शोधता आलं नाही वा सापडलं नाही ते तुम्हाला सापडेल असं कशाच्या भरवश्यावर वाटतं?
बरे असो!
सर,
परशुराम हा स्त्रीसत्ता व मातृसत्तेचा समर्थक होता, हा शोध जर तुम्ही लावला ना, तर तुम्ही प्रति शरद पाटील व्हाल! तुम्हांला ही खूप मोठी संधी आहे!!
आणि असे जर झाले, तर वैचारिक क्षेत्रात प्रचंड खळबळ माजेल, ब्राह्मणी छावणी डगमगू लागेल! व महात्मा फुलेंपासूनच्या तमात परिवर्तनवादी मंडळींची भ्रांती फिटेल! या क्रमाने कृष्ण व राम हे सुद्धा स्त्रीसत्तेचे समर्थक ठरतील. तमाम परिवर्तनवादी निष्क्रिय होतील. त्यांना सांस्कृतिक संघर्ष करण्याची गरज भासणार नाही!! सर्व काही आलबेल होईल. ही ब्राह्मणी छावणी, ती अब्राह्मणी छावणी असा भेद उरणार नाही.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय!’ या घोषणेऐवजी‘ सर्वजन हिताय, सर्वजण सुखाय’ हा नारा प्रचलित होईल. राजकीय-सामाजिक क्रांती करण्याची गरज उरणार नाही. परशुरामाच्या चमत्कारांनी सर्व समस्या सुटू लागतील! शंबुक जिवंत होईल व एकलव्याचा अंगठाही जोडला जाईल!!
-राजाराम सूर्यवंशी ,पालघर Mob. no. : 9503867602 |
(लेखक हे सामाजिक विचारवंत असून त्यांच्या ‘युगस्त्री सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या असून या पुस्तकावर ‘सावित्री एक क्रांती’ ही दूरदर्शन मालिका चालवली गेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने समिती व महात्मा फुले चरित्र साधने समिती यांचे ते सन्माननिय माजी सदस्य आहेत.)
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा