महात्मा फुले व मराठी साहित्य...!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महात्मा फुले व मराठी साहित्य...!
आपल्या देशातील शूद्रातिशूद्र व बहुजन समाज हा सामाजिक क्रांतीसाठी कधीही तयार नव्हता व आजही तयार नाही...त्याऐवजी तो स्वतःचे ब्राह्मणीकरण करून स्वतःला अपग्रेड करून घेतो व ब्राह्मणशाहीचे हातचे कटपुतळी बाहुले बणून आपल्याच शूद्रातिशूद्र वा बहुजन समाजाचे सर्वांगीण शोषण करण्यात उच्चवर्णियांना मदत करतो. त्याच्या या अपग्रेडेड धारणेचा ब्राह्मणशाहीला कुठेही त्रास होत नाही. उलट ब्राह्मणशाही बहुजनांच्या जातीय आणि आर्थिक शोषणासाठी त्यांचा पुरेपुर वापर करून घेते व पाहिजे तेव्हा त्याची जातीय पत दाखवून त्याला आपल्या स्पर्धेतून बाद करते. शिवाय सर्व जातीय स्त्रियांना पुरुषसत्ताक बेड्यात अडकवून ठेवण्यात यांचा उपयोग करते.
आपल्या देशात स्त्री शोषणात ब्राह्मणजातीयस्त्रियांचे धार्मिक शोषण अत्यंत पराकोटीचे होते. समताशून्य जाच या ब्राह्मण स्त्रियांना भोगावा लागत होता. म्हणून तत्कालीन समाजसुधारकांना व संतांना सामाजिक, जातीय समतेबरोबर स्त्री-पुरुष समतेचा मुद्दा सतत अजेंड्यावर ठेवत ठेवावा लागला होता.
बाराव्या शतकातील बसवेश्वर व चक्रधर यांनी सामाजिक व धार्मिक समतेबरोबर स्त्री-पुरुष समतेचाही जोरदार पुरस्कार केला होता आणि तसा संप्रदाय तयार केला होता. या दोन्ही संताचा स्त्री-पुरुष समतेचा पुरस्कार एवढा दांडगा होता की, संपूर्ण वारकरी चळवळ या दोन्ही तत्वांनी भारलेली होती.
चक्रधर व बसवेश्वर यांच्या या स्त्री-पुरुष समतावादी व सामाजिक समतावादी तत्त्वामागे तथागत बुद्धांचे समग्र समतावादी तत्वज्ञान होते. म्हणून त्यांनी अतिरिक्त प्रबोधनावर जोर न देता कृतिशीलतेवर भर देऊन त्यांच्या पंथात स्त्री-पुरुष समता व जातीय समतेला सक्रिय रूप दिले होते.
महात्मा जोतीराव फुलेंनी हा आशय लक्षात येताच त्यांनी बसव-चक्रधरांनंतर स्त्री-पुरुष समतेचा अपूर्व व अनन्य असा सक्रिय पुरस्कार करून आपली वर्ण-जातीभेद विरोधी व स्त्री-पुरुष समतावादी सत्यशोधक चळवळ उभारली होती. त्या अंगाने जातिव्यवस्थाविरोधी, खरेखुरे निधर्मी व स्त्रीमुक्तीवादी साहित्य निर्माण केले होते.
महात्मा फुलेंच्या निधनानंतर जवळ जवळ 50 वर्षे ब्राह्मणेतर चळवळीला हा फुले आशय लक्षात न आल्याने ती चळवळ ब्राह्मण्यविरोधात चालवली गेली होती.
बाळ गंगाधर टिळक व शाहू महाराजांच्या काळात स्वातंत्र्य चळवळ रांगत्या आवस्थेत होती; परंतु मुठभर तथाकथित राष्ट्रवादी पुढार्यांमुळे तिला राष्ट्रवादी चळवळीचे नाव देण्यात आले होते. नंतरच्या 30 वर्षात आणि 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात ती चळवळ पूर्णपणे उच्चवर्णीय-जातियांच्या प्रभावाखाली आल्यावर अर्थात, ही राष्ट्रवादी स्वातंत्र्य चळवळ गांधींच्या प्रभावाखाली आल्यावर, गांधींजींद्वारे वर्गजातधर्मातीत भासणारा स्वातंत्र संर्षाचा स्वातंत्र्यलढा लढवला गेला होता. मात्र, त्याचवेळी समांतरपणे ब्राह्मणेतर चळवळीद्वारेही शूद्रातिशूद्रांचा जातिव्यवस्था विरोधी संघर्ष चालवला जात होता.
या दोन्ही चळवळी गतिमान असताना टिळकांपासून स्फूर्ती घेतलेल्या राष्ट्रवादी साहित्यिकांनी निर्माण केलेले सर्व साहित्य हे केवळ उच्चवर्णीय व पुनरुज्जीवनवादी साहित्य होते. ते पुनरुज्जीवनवादी असल्याने ते परंपरागत परधर्मद्वेष्टे निपजले होते. प्रयत्न करूनही ते निधर्मी साहित्य निर्माण करू शकत नव्हते! कारण टिळकांचा समाजकारणाचा व राजकारणाचा पायाच मुळात परधर्मद्वेष व उच्चजातीय अभिमान हा होता. कारण
1) सार्वजनिक गणेश उत्सवाची चळवळ त्यांनी याच उद्देशाने बांधली होती..!
तर,
2) जातीव्यवस्था मोडण्याच्या चळवळीत ते सामील झाले नव्हते! ते कसे? पहा प्रार्थना समाजीयन श्री. चंदावरकर हे त्यांच्या चरित्रात याबाबत काय म्हणतात ते पहा, ‘...टिळक हयात असताना वि. रा. शिंदे यांनी सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत 1918 साली एक अस्पृश्यता निवारण परिषद भरविली होती. अस्पृश्यता व जातीभेद नष्ट करावा हा या परिषदेचा उद्देश होता. या परिषदेला रवींद्रनाथ टागोरांनी शुभसंदेश पाठवला होता, तर द्वारकापिठाच्या शंकराचार्यांनी या परिषदेला विरोध करून वि. रा. शिंदे व सयाजीराव गायकवाड यांना त्यांनी कलीपुरुष म्हणून संबोधून त्यांचा निषेध केला होता.
बाळ गंगाधर टिळक हे या परिषदेला उपस्थित होते. वि. रा. शिंदे व टिळकांची भाषणेही झालीत होती. तथापि, अस्पृश्यता आम्ही जातीने मोडू असा व्यक्तीविषयक प्रतिज्ञेचा एक जाहीरनामा होता. त्यावर ज्यांना जातिव्यवस्था मान्य नाही त्यांनी या जाहीरनाम्यावर सह्या करायच्या होत्या. त्या मसुद्यावर बाळ गंगाधर टिळकांनी सही केली नाही....’ असा स्पष्ट प्रकाश तत्कालीन प्रार्थना समाजिस्ट सर नारायण गणेश चंदावरकर यांनी त्यांच्या चरित्रात टाकला आहे.
अशा राष्ट्रवादी टिळकांना गुरु मानणार्या साहित्यिकांकडून जातीभेद, वर्णभेद, स्त्री-पुरुष विषमता विरोधी साहित्य निर्माण होणे शक्य नव्हते! केशवसूत व वि. स. खांडेकरांचा अपवाद वगळता तसे साहित्यिकही निर्माण झाले नाहीत.
याउलट, महात्मा जोतीरव फुलेंनी इंग्रजाळलेल्या मराठी ऐवजी चक्रधरांप्रमाणे शूद्रातिशूद्रांच्या मायबोली मराठी भाषेत साहित्य निर्मिती केली होती. त्याशिवाय त्यांनी 1869 साली रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतल्यावर जे प्रदीर्घ पोवाडारूपी चरित्रात्मक साहित्य निर्माण केले ते सुद्धा शूद्रातिशूद्रांच्या मायबोली मराठीत केले होते. एवढेच नव्हे तर त्यांचा शिवाजी महाराज हा कुळवाडीभूषण शिवाजी होता. त्यामुळे व पर्यायाने म. फुलेंचा शिवाजी परधर्मद्वेष्टा असणे शक्य नव्हते व तो त्यांना तसा दिसलाही नाही. एवढेच नव्हे तर याच पोवाड्यात पुढे महात्मा फुलेंनी इस्लाम धर्माचा ख्रिस्ती धर्माप्रमाणे समतेचा धर्म म्हणून गौरव केला होता.
डॉ. भालचंद्र नेमाडे म्हणतात, ‘...जातिव्यवस्थाविरोधी खरा निधर्मीपणा व स्त्री-पुरुष समानता कशी असते याचे आदर्श महात्मा फुलेंनी त्यांच्या साहित्यातून दाखवून दिले होते!’
सत्यशोधक शरद पाटीलांनी एक सूक्ष्म नोंद करून ठेवली होती ती अशी की, ‘महात्मा फुलेंच्या साहित्य वारसा ब्राह्मणेतर चळवळीला आत्मसात करता आला नाही. कारण ही ब्राह्मणेतर चळवळ सत्यशोधक चळवळीशी एकनिष्ठ राहिली नव्हती व पुढे ती काँग्रेसवासी झाल्यानंतर तर उरली सूरली आशा ही संपुष्टात आली होती!’
दुसरीकडे महात्मा फुलेंचा साहित्यिक वारसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला व पुढे नेऊन तो दलित साहित्य चळवळीच्या हवाली केला होता.पुढे या दलित साहित्याने आपली इतिहासदत्त कामगिरी निभावत ग्रामीण साहित्यिकांना प्रेरणा देऊन प्रथम ग्रामीण साहित्य जन्माला घातले होते!
दलित साहित्याचा उदय जसा बाबासाहेबांच्या धर्मांतर प्रेरणेतून झाला होता आणि या साहित्याने जातिव्यवस्थाअंतवादी साहित्य निर्माण करावे, असा अंडरकरंट त्यामागे जसा होता, तसा ग्रामीण साहित्यही जातिव्यवस्थाअंतवादी निपजावे अशी प्रेरणा दलित साहित्याने ग्रामीण साहित्याला दिली होती! आणि त्यादिशेने काही पाऊले का असेना त्यांनी तशी वाटचाल केली होती.
या सर्व अर्थात फुलेवादी, आंबेडकरवादी, दलित व ग्रामीण साहित्याच्या वैचारिक समुद्र मंथनातून नव्वदीच्या दशकात प्रस्थापित साहित्याच्या विरोधात विद्रोही साहित्य चळवळ दमदारपणे पुढे आली. म .फुलेंना अपेक्षित असल्याप्रमाणे प्रस्थापित साहित्याच्या विरोधात प्रत्येक क्षेत्रामध्ये या चळवळीने आपले अस्तित्व सिद्ध केले व शूद्रातिशूद्रांचा आवाज, जाणिवा, दुःख व हक्क प्रभावीपणे मांडले. तसेच अनेक शूद्रातिशूद्र साहित्यिकांना हक्काचे विचारपीठ मिळवून दिले होते!
चक्रधर व बसवेश्वर सर्वधर्मसमभाववादी होते. म्हणून त्यांचा विरोध भारतीय समाजातील जातिव्यवस्थेला होता, पण ब्राह्मण हेच या जातिव्यवस्थेचे धार्मिक अधिष्ठाते व नियंते असल्याने त्याचा विरोध ब्राह्मण्याला व ब्राह्मणवादालाही असणे स्वाभाविक होते.
आध्यात्मिक-सांस्कृतिक व सामाजिक समतेसाठी असाच विरोध वारकरी चळवळीतील संतांनी धर्माच्या आध्यात्मिक पातळीवरून विठ्ठालभक्तीद्वारे केला होता. म्हणून जातिव्यवस्थाक समाजातील भारतीय साहित्यातील आद्य व मूलभूत संघर्ष हा जातिव्यवस्था समर्थक व जातिव्यवस्थाअंतक यात असणे स्वाभाविक होता.
हा संघर्ष म. फुलेंनी अचूकपणे ओळखल्याने त्यांनी त्यांच्या ‘गुलामगिरी’ या ग्रंथात जातिव्यवस्थाक संस्कृतीचे सूत्र ‘इडापिडा टळो, बळीराजा येवो’ असे म्हणणारे बहुजन समाज व कणकेच्या बळीचे पोट फाडणार्या उच्चवर्णीय समाज यांच्या परस्परविरोधी प्रथांमधून प्रकट केला होता.
अस्सल फुलेशिष्य डॉ. आंबेडकरांनी जातिव्यवस्थाक समाज, साहित्य, इतिहास व संस्कृती यातील वर्णजातींसंघर्षाच्या प्राधान्यावर भर दिल्याने ढसाळ-ढालेकृत दलित साहित्याच्या अभिव्यक्तीला नेमका अवकाश व स्पष्ट दिशा प्राप्त होऊन त्यांनी बाबासाहेबांच्या निर्वाणानंतरच्या पहिल्या 20 वर्षात जातिव्यवस्थेच्या बेड्या खिळखिळ्या करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती व साहित्याद्वारे म. फुलेंना अपेक्षित असलेले योगदान दिले होते!
डॉ. बाबासाहेबांनंतर त्यांच्या साहित्याचा जसा एकंदर दलित व पँथरचळवळीने जसा विकास घडवून आणला तसा विकास फुलेंच्यानंतर त्यांच्या साहित्याचा विकास ब्राह्मणेतर चळवळीतून घडून आला नाही. तो बाबासाहेबांनी घडवला, तर दुसरीकडे ब्राह्मणेतर चळवळीकडून राहून गेलेला व खुंटलेला विकास खंडेराव बागल व माधवराव बागल, मुकुंदराव पाटील तरवडीकर व केशवराव विचारे यांनी व यांच्या साहित्याने भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता; परंतु या प्रयत्नांना व्यापक स्वरूपात त्यांना पेश करता आले नाही.मात्र बागल, तरवडीकर व विचारे यांची उणीव डॉ. बाबा आढाव, सदानंद मोरे, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे व सत्यशोधक कॉम्रेड शरद पाटील यांनी मोठ्या प्रमाणात भरून काढून वैचारिक व सामाजिक क्षेत्रात महात्मा फुलेंना अपेक्षित असलेला दबदबा निर्माण केला असून ब्राह्मणेतर चळवळीच्या हातून घडलेली ऐतिहासिक चुक भरून काढली आहे. यातील सत्यशोधक शरद पाटीलांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या सर्व अंग-उपअंगावर उपस्थित केलेले प्रश्न एवढे मोठे आहेत की, त्या प्रश्नांच्या धास्तीत संपूर्ण ब्राह्मणी व्यवस्था आज वावरते आहे. त्यांची वाणी व शब्द एवढे तीक्ष्ण, तिखट व धारदार होते की, एका शतकानंतर पुन्हा महात्मा फुले अवतरले की काय? असा प्रश्न प्रस्तापित व्यवस्थेला पडला आहे.
म. फुलेंच्या साहित्याची ही नाळ आता डॉ. भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, अरुण कोल्हटकर व इंद्रजित भालेराव यांच्यापर्यंत जोडली गेली आहे. महात्मा फुलेंच्या साहित्याचा वारसा ते पुढे नेटाने चालवत आहेत.
कुठल्याही देशाचा इतिहास हा एका सरळ रेषेत कधीच मांडता येत नाही. त्यात भारतासारख्या जातिव्यवस्थाक समाजाचा इतिहास मांडणे तर अधिक कठिण कार्य असते!
साहित्य क्षेत्रातील मालतीबाई बेडेकरांची ‘बळी’ ही कादंबरी, अण्णाभाऊ साठेंची ‘फकिरा’, नजूबाई गावितांची ‘भिवा फरारी व प्रेमचंदांची ‘गोदान’ व र. वा. दिघेंची ‘पड रे पाण्या’ या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडातील जातीय शोषणावर आधारित प्रातिनिधीक ग्रामीण कादंबर्या आहेत. त्या साहित्याची नेणिवेची नाळ ही फुले साहित्याशी जोडली गेली आहे. आता पुन्हा शंभर वर्षानंतर हा फुलेकृत साहित्य वारसा जोर पकडताना दिसत आहे. अनेक नवनवीन कवी व कलावंतांनी तो वसा आत्मसात केला आहे. आज पुन्हा अदृश्यरूपात अवतीर्ण झालेल्या सामाजिक व राजकीय प्रतिक्रांतीला वैचारिक शह देण्याची या नव फुलेवादी साहित्यिकांमध्ये दिसते आहे.
चित्रपट क्षेत्रातही विधु विनोद चोप्रा, नीलेश कळमकर व नागराज मंजुळेसारखी मंडळी प्रखर फुले जाणिवा घेऊन पुढे येत आहेत व हीच आपली जमेची बाजू आहे. ब्राह्मणी साहित्याने फुले जाणिवांना काही काळ ग्रासले असले तरी ते सर्व काळ या जाणिवा ग्रासू शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे?
![]() |
-राजाराम सूर्यवंशी ,पालघर Mob. no. : 9503867602 |
(लेखक हे सामाजिक विचारवंत असून त्यांच्या ‘युगस्त्री सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या असून या पुस्तकावर ‘सावित्री एक क्रांती’ ही दूरदर्शन मालिका चालवली गेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने समिती व महात्मा फुले चरित्र साधने समिती यांचे ते सन्माननिय माजी सदस्य आहेत.)
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा