दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

दुसर्‍यांच्या सुखात स्वत:चे सुख शोधतो! : 30 अंध मुलींचा आधार बनलेल्या एका अवलियाची ही कथा...

दुसर्‍यांच्या सुखात स्वत:चे सुख शोधतो! : 30 अंध मुलींचा आधार बनलेल्या एका अवलियाची ही कथा...


हा वृत्तांत शहरातील संत तुकाराम मुलांचे शासकीय वसतिगृह, मिलिंद मुलांचे शासकीय वसतिगृह, पद्मपुरा येथील मुलांच्या जीवनातील खर्‍या संघर्षावर आधारित आहे. गेट-टुगेदर-2024 निमित्त संपादक भास्कर सरोदे यांनी ‘दिसलं ते टिपलं’ हे सदर चालविले आहे. बहुजन शासक मीडियाच्या वाचकांसाठी हे वेगळं सदर म्हणून वाचणास देत आहे. मधुकर सूर्यवंशी : ट्रस्टी : कै. श्री. रंगलालजी रामरतनजी बाहेती अंध मुलींचे निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, ए. एस. क्लब मागे, वाळूज महानगर, औरंगाबाद (संत तुकाराम व मिलिंद) यांच्या जीवनावरील आधारित हे सदर आपणास आवडेल, असा विश्‍वास आहे.


भास्कर सरोदे : औरंगाबाद

मागील आठवड्यात मधुकर सूर्यवंशी (पाचव्या वर्षी अंधत्व) यांना फोन केला आणि हट्ट धरला की, 
‘ओळखा पाहू मी कोण?’
‘ओळखू येत नाही, पण तुम्ही बोलत राहा मी प्रयत्न करतो’, असा त्यांचा आत्मविश्‍वास!
या आत्मविश्‍वासाला दाद दिलीच पाहिजे...
1993 ला आम्ही दोघे मिलिंद मुलांचे शासकीय वसतिगृहात होतो. विशेष अशी घसेट नाही की, कधी आम्ही सोबत बसलो-उठलो असेही नाही. कधीमधी मेसवर जातायेता हाय हॅलो व्हायचा.
तब्बल 30 वर्षानंतर हा व्यक्‍ती मी प्रयत्न करतो असे म्हणत आहे, याचेच मला आश्‍चर्य वाटले.
बोलता बोलता, ‘तुम्ही भास्कर आहात का?’ असा त्यांनी अंदाज बांधला.
‘तुम्ही कसं काय ओळखलं?’ असं विचारलं तर मधुकरने प्रांजळपणे कबुली दिली की, मी तुमचा बहुजन शासक कुठेतरी वाचला आहे आणि जीटी-2024 च्या निमित्ताने सुरू केलेले ‘दिसलं ते टिपलं’ हे सदर वाचत असतो. म्हणून तुम्हीच असला पाहिजे असा कयास बांधला. 
मी थोडा बुचकाळ्यात पडलो की, अंध-अपंग व्यक्‍तींमध्ये जो तथाकथित ‘तिसरा डोळा’ असतो त्याचे काय?
बरं असो, दोन-चार दिवसांनी फोन केला आणि भेटायला येतो म्हटले, तर मीच येतो, तुम्ही तुमचा पत्ता सांगा असा त्यांनी आग्रह धरला. अंध व्यक्‍ती रस्ता तुडवत येतो म्हणतो आणि मी कार्यालयात भेटतो असे म्हटले तर तयार होत नाही, काहीतरी कारण असले पाहिजे? मी विचारात पडलो.
‘कार्यालयात आपल्याला फारशा गप्पा मारता येणार नाहीत, त्यापेक्षा आपण आमच्या संस्थेच्या कार्यालयात जाऊ’, असा त्यांचा फोन आला.
ठीक आहे. ‘असं करा, मी गाडी घेऊन येतो, तुम्ही कार्यालयापासून रोडपर्यंत या’, असे मी म्हटल्यावर ते तयार झाले. जिल्हा सत्र न्यायालयाच्या सिग्‍नलवर येतो असे ते म्हणाले. मी तेथे पोहोचलो, तर एक अंध व्यक्‍ती बूटपॉलीशचे काम करतो, त्याच्याशी मधुकर गप्पा मारत होते. मी त्यांच्या हाताला धरून उभा केलेल्या गाडीवर बसण्यास सांगितले आणि नेमकं कुठं जायचं ते सांगा, असे म्हटले तर,
‘तुम्ही फक्‍त गाडी चालवत राहा, मी बरोबर नेतो ठिकाणावर’, मधुकरने मला चांगलाच धक्‍का दिला.
माझा इलाज खुंटला होता, मी मुकाटपणे गाडी काढली आणि वाळूजच्या दिशेला निघालो. बाबा पेट्रोल पंप ओलांडला की, मधुकरची परीक्षा घ्यावी म्हणून विचारले की, आपण कुठे आहोत? तर त्यांनी न चुकता,
‘छावणी उड्डाणपूल, ती नदी नाही का खामनदीजवळ!’ असल्याचे सांगितले.
खात्री पटली आणि पुढे कुतूहलापोटी विचारत गेलो,...
‘पायी चालताना समजू शकतो, पण गाडीच्या वेगाचे काय गणित आहे?’
मधुकर सूर्यवंशी मोठ्या आत्मविश्‍वासाने सांगत होते की,
‘काय आहे बघा, अंध व्यक्‍तीसाठी तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. 
1. त्याच्यात आत्मविश्‍वास असला पाहिजे. 
2. कुणाच्याही मदतीविना तो चालत राहिला पाहिजे अर्थात तो गतिशील असला पाहिजे आणि 
3. त्याला सातत्याने भूगोल माहिती ठेवावा लागतो’.
अंध व्यक्‍तीबाबत मधुकरने मांडलेले हे तत्त्वज्ञान कुठल्याही पुस्तकात वाचायला मिळणार नाही, तर ते त्यांनी अनुभवाच्या आधारे स्थापित केले आहे. माणसाची इच्छाशक्‍ती असेल तर काय नाही करू शकत, याची प्रचिती तर मला यायचीच होती...बराच वेळानंतर,
‘आता आपल्याला उजवीकडे वळायचे आहे’, मधुकरने सूचना दिली. थोडा पुढे गेलो की, ‘पुढे स्पीडब्रेकर लागेल, तेथून डावीकडे वळा, थोडं पुढे गेलं की, उजवीकडे आणि नंतर पुन्हा डावीकडे वळून उजवीकडे गेले की, आपली संस्था...’
बोलण्याचा नादात मधुकरने त्यांच्या संस्थेच्या कार्यालयासमोर उभं केलं. मी पाटी पाहिली आणि खात्री पटली. पाटीवर नाव होते, ‘ राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचलित कै. श्री. रंगलालजी रामरतनजी बाहेती अंध मुलींचे निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र’.
मधुकरने संस्थेचे गेट स्वत:च उघडत, ‘कोण आहे रे तिकडे, साजेद आहे का?’, असा आवाज दिला. पुढे जाऊन बूटस्टॅण्डजवळ एकरेषेत बूट उतरलेले होते. मधुकरनेही आपली चप्पल त्या बुटांना जोडूनच उतरली. कधी आपण या शिस्ती बूट उतरवतो का, हा प्रश्‍न मला पडला. लगेच ताडताड तीन-चार पायर्‍या चढून वॉर्डनच्या कार्यालयात नेले. तिथे ओळख करून दिली. सगळी संस्था फिरून दाखवली...
या संस्थेला अत्याधुनिक असा संगणक कक्ष आहे. पाच संगणक आणि एक प्रिन्टरने हा कक्ष सजलेला. स्टेट बँकेच्या सीएसआर निधीतून हे संगणक मिळालेले. दुसर्‍या एका कक्षात आठ संगणक आहेत, ते स्टरलाईटच्या सीएसआर निधीतून मिळाले आहेत. या निवासी प्रशिक्षण केंद्रात अंध मुलींना एमएस-सीआयटी, बेसिक, मराठी-इंग्रजी टायपिंग शिकवले जाते. उद्देश हाच की या मुलींनी स्वत:च्या पायावर उभं राहावं.
संगणक कक्षाच्या समोरच म्युझिक रूम सुंदर ड्रॉईंगने सजलेली. येथे शास्त्रीय आणि सुगम संगीत शिकवले जाते. संगीत विशारद गणेश काकडे विद्यार्थिनींना संगीताचे धडे देत असतात. 
’काय वाजवून दाखवता’ म्हणून सहज प्रश्‍न केला, तर ‘काय वाजवून दाखवू’, असा त्यांनी प्रतिप्रश्‍न केला. त्यांच्या जवळच खिडकीत बासरी होती, तीच वाजवून दाखवा, असे म्हटले, तर त्यांनी माझ्या कुतूहलाला बासरीच्या सप्‍तसुरांनी साज चढविला!
मधुकरने नंतर अंडरग्राऊंडला नेले. ज्या रूममध्ये जातील त्या रूमचे लाईट ते स्वत:च लावतात, हे लक्षात घेण्यासारखे आहे. द्रोण-पत्रावळ्या बनविण्याच्या रूममध्ये नेले. तेथे मशीनचे विद्युत बटन स्वत: सुरू केले. बाजूला असलेला पेपर हातात घेतला आणि स्वत: मशीनच्या डायखाली पेपर ठेवला आणि द्रोण-पत्रवाळ्या बनवून दाखविल्या. मदतीला कोणीच नव्हते.
त्यानंतर दुसर्‍या एका रूममध्ये बॉक्स फाईल्स बनविण्याची मशीन, पेपर कटिंग मशीन, लिफाफे बनविण्याची मशीन, प्रसादाची वाटी बनविण्याची मशीन, पंचिंग मशीन, आदींची माहिती कुठेही न थांबता किंवा थबकता सांगितली. पुन्हा एकदा परीक्षा घ्यावी म्हणून बॉक्स फाईल्स किती रंगाच्या आहेत, असा प्रश्‍न केला तर त्यांनी एक निळ्या रंगाची आणि दुसरी गुलाबी रंगाची असल्याचे सांगितले. इतके बारीक तपशील आपण धडधाकट माणसं लक्षात ठेवतो का, असा मी मनालाच प्रश्‍न विचारला.
त्याला लागूनच फिजिओ थेरपी रूम आहे. त्याविषयी माहिती देताना येथे फक्‍त महिलांसाठीच सेवा दिली जाते, असे ते म्हणाले.
आम्ही ऑर्डरप्रमाणे काम करतो. आधी ऑर्डर दिली तर माफक दरात आम्ही उपरोक्‍त सगळ्या वस्तू तयार करून देतो. याचे प्रशिक्षण मुलींना दिले जाते.
या केंद्रात स्पर्धा परीक्षेची तयार करून घेतली जाते. हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन उटणं, राखी, पेपरबॅग, कापडबॅक तयार केल्या जातात. होमसायन्स अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे मधुकर सांगतात. अंध आहे म्हणून आई-वडील या फिल्डपासून मुलींना दूर ठेवतात. आम्ही तसं करत नाही. या मुलींनी कुणावरच अवलंबून राहता कामा नये, अन्यथा लोकं दयेचा भाग म्हणून आमच्याकडे बघतील. एखाद-दुसर्‍यावेळी हात पोळेल, पण तिसर्‍या चौथ्यावेळी तीच मुलगी बरोबर गॅस पेटवेल, पोळ्या करेल, भाजी करेल. प्रत्येक मुलीने स्वत:च्या पायावर उभं राहून स्वावलंबी बनावे हाच आमचा उद्देश असल्याचे मधुकर सांगतात.
13 कर्मचारी असलेल्या या संस्थेत मधुकर सूर्यवंशी ट्रस्टी म्हणून विनामूल्य काम करतात. जागेपासून ते इमारत, टेबल-खुर्च्या, फॅन असे एकन्एक वस्तू या दानातून मिळाल्या आहेत. आमच्याकडे राखीव निधी असतो. त्यातून सर्व खर्च भागविला जातो. वेळ पडलीच, तर माझ्या शेतातील अन्नधान्य देण्याची तयारी ठेवली असल्याचे ते सांगतात. या संस्थेच्या जागेत आता वृद्ध महिलांसाठीही इमारत बांधण्याचे प्रस्तावित असल्याचे ते सांगातात.



शासनाने संस्थेला अनुदान द्यावे :
फक्‍त एकच अडचण वारंवार भेडसावते ती म्हणजे आमच्या विद्यार्थिनींना लेखणीक आणि वाचकाची कमतरता भासते. त्यासाठी धावपळ करावी लागते. शिवाय शासनाने आमच्या संस्थेला अनुदान दिलं पाहिजे. दात्यांच्या मदतीवर किती दिवस भागणार? जे संस्थेसाठी सेवा देतात, त्यांना उचित मानधन मिळाले पाहिजे.


शासकीय वसितगृहाने मला काय दिलं? :
1. सगळं दाखवून झाल्यावर मधुकर संगणकाच्या रूममध्ये घेऊन जातात. गप्पांच्या ओघात गेट-टुगेदर आणि वसतिगृहाच्या जीवनाविषयी मधुकरची अफलातून समज आहे. आजमितीला माझ्याकडे नोकरी, घर, जमीन, धुळे-सोलापूर हायवेवर बिअरबार-लॉज असून नोकरी आहे. मला कशाचीच कमी नाही. मात्र, माझ्या अडचणीच्या काळात मला कोणीतरी मदत केली, कुणीतरी रस्ता ओलांडताना मदत केली, वाचून दाखविले. मिलिंद आणि संत तुकाराम वसतिगृहात असताना ही मदत मला नेहमीच झाली आहे. हीच जाणीव ठेवून मी या संस्थेत काम करत आहे. दुसर्‍याच्या सुखात माझं सुख शोधतो आहे. आज आम्ही मिलिंद-संत तुकाराम वसतिगृहातून शिकून मोठ मोठ्या पदावर गेलो आहोत. त्यामुळे गाडी-बंगला, नोकर-चाकर, पैसा-पाणी, हे सगळं तर होणारच, पण त्याबरोबरच आम्ही सगळ्यांनी सामाजिक कामाचीही जाणीव ठेवली पाहिजे. ही जाणीवच मला वसतिगृहात असताना शिकायला मिळाली, असे ते आवार्जुन सांगतात.
2. मिलिंद-संत तुकाराम वसतिगृहाने मला स्वावलंबी बनायला शिकवले. इतरांवर अवलंबून न राहता, स्वत:ला सिद्ध करून दाखवणे, हेच वसतिगृहाने शिकवले.
3. कोणताही निर्णय घेताना समूहाचा आदर केला पाहिजे. आपलं मत लादलं नाही पाहिजे. समूहाने निर्णय घेण्याची क्षमता वसतिगृहात शिकता आली.
4. माणसानं गतिशील असलं पाहिजे. ती गती स्वत:पूरती तर असावीच, पण तीच गती समाजाबाबतही असली पाहिजे. जेव्हा मी वसतिगृहात असताना मित्रांना घेऊन चालत होतो, आता इतरांना घेऊन चालत आहे.
5. वसतिगृहाने मला करुणाभाव शिकवला. हा करुणाभाव स्वत:पूरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात उतरवला पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे.
6. वसतिगृहाने निरोगी राहण्याचे शिकवले. नियमित व्यायाम, कुठलंही व्यसन नाही. आयुष्यभर व्यसनमुक्‍त राहण्याचे धडे वसतिगृहातच गिरवले.
7. वसतिगृहात राहिल्याने वाचनाचा छंद लागला. तसेच दुसर्‍याचे ऐकूण घेण्याची सवय लागली. यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते.
8. अभियांत्रिकीचे मुलं नेहमी कशावरही वादविवाद करायचे. त्यांचा वादविवाद मी ऐकायचो. त्यामुळे माझ्या ज्ञानात भर तर पडलीच. शिवाय वाक्चातुर्य येऊन स्टेज डेअरिंगही वाढली. आज मी तास दोन तास सहज बोलतो, ही सगळी देण वसतिगृहाची आहे.


वसतिगृहातील बर्‍यावाईट अनुभवाविषयीही मधुकर सूर्यवंशी भरभरून बोलतात...
1. वसतिगृहात रॅगिंगचा प्रकार होता. इंजिनिअरिंगच्या पोरांनी माझी रॅगिंग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यांना समजावून सांगितले की, अरे बाबांनो, मी लहानपणापासून वसतिगृहातच राहतो. तुमच्या वयाइतका माझा वसतिगृहाचा अनुभव आहे. तेव्हा तुम्ही काय माझी रॅगिंग घेणार? तेव्हा कुठे ते वरमले आणि नंतर माझे चांगले मित्र झाले.
2. वसतिगृहातील मुलांचे खूपच सहकार्य लाभले. शशीकांत पाटील, पंडागळे, संदीप रूपनर, दादासाहेब खंडागळे आदी मित्रवर्य माझी पुस्तकं वाचून दाखवित आणि मी ते ग्रहण करत असे. पाहिजे तर ते मला टाळूही शकले असते. अनेक कारणं सांगता आली असती की, आम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहोत, अभ्यास खूप असतो, वगैरे. देणार्‍यांना अनेक कारणं असतात. तथापि, या मंडळींनी कधीच मला टाळण्याचा प्रयत्न केला नाही.
3. काही विद्यार्थी हातात हात द्यायचे आणि विचारायचे की, मी कोण? तेव्हा खूप राग यायचा, पण लगेच रागावर नियंत्रण मिळवायचो. स्पर्शाने कोणाला ओळखता येणं शक्य नाही. त्याला सातत्याची गरज असते, हे त्यांना त्यावेळी सांगता येत नव्हतं.
4. संत तुकारामला असताना प्रल्हाद पठाडे नावाचा विद्यार्थी बीए करत होता. तो काही दिवसांसाठीच रूममध्ये आला होता. त्याला असे वाटायचे की, आम्हाला दिसतं, पण आम्ही मुद्दामहून न दिसण्याचे नाटक करतो! म्हणून तो वेगवेगळे नाटकं करायाचा. कधी कपडे काढून नाचायचा, तरीही आमच्या चेहर्‍यावर कुठलेच हावभाव त्याला दिसायचे नाही. आमची परीक्षा घ्यायचा, पण काहीच उपयोग व्हायचा नाही. यानंतर त्याचा आमच्याविषयीचा गैरसमज दूर झाला आणि तो काय करत होता, ते सगळं सांगायचा.
5. काहीवेळा तर काहीजण थट्टामस्करी करायचे. मी आंघोळीला गेलो की, पाण्याने भरलेली बकेट दुसरीकडे उचलून ठेवायचे, कोणीतरी मस्करी करायचे. मग असं कोण करू शकतो, याचा शोध घ्यायचो. अर्थात ते जाणीवपूर्वक त्रास द्यावयाच्या हेतूने करतच नव्हते. तो एक थट्टामस्करीचा भाग होता.
6. टी. व्ही. हॉलमध्ये असताना अनेकजण आवाज बंद करायचे. मग आम्ही निघून जायचे. आवाज का बंद झाला, याच्याशी आम्हाला काहीएक देणंघेणं नव्हतं. बाहेर गेल्यावर पुन्हा टी. व्ही. सुरू व्हायचा. रिकामटेकड्यांचा हा उद्योग असायचा. आम्ही हॉलमध्ये आलो की, पुन्हा टी.व्ही.चा आवाज बंद व्हायचा. असा उद्योग चालायचा. नंतर ते सांगायचेही. त्यामुळे राग निवळायचा. अशी खूप मजा यायची. हे सगळं ते कुतूहलापोटी करायचे. मात्र, त्यापेक्षाही मला जास्त जपायचे.
मधुकर सूर्यवंशी पुढे सांगतात, अंधत्व ही आमची अडचण नाही, तर ती तात्पूरती गैरसोय आहे. मात्र, समाज आमच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो ती खरी अडचण आहे. समाजाने आमच्याकडे तुच्छतेने बघितले तर ही खरी अडचण आहे.
आमची क्षमता तुम्ही नाही ठरवू शकत. अंध म्हणजे भिकारी, हा समाजाचा दृष्टिकोन आहे. अरे, पण त्याला संधी द्या, मग त्याच्या क्षमता ठरवा. मला ही संधी वसतिगृहाने दिली.
वसतिगहात असताना कुठल्याच अडचणी भासल्या नाहीत. कुठलाही संघर्ष करावा लागला नाही. मात्र, वसतिगृहाबाहेर पडल्यावर पदोपदी अडचणींचा सामना करावा लागला, आजही करावा लागतो. आमच्यावेळेस खर्‍या अपंगांना न्याय मिळायचा. आता तसं होत नाही. बर्‍याचदा बोगस प्रमाणपत्रांवर सवलतींचा फायदा उचलला जातो. त्यामुळे खरा गरजू शासनाच्या सोयीसुविधांपासून वंचित राहतो, अशी खंतही त्यांनी व्यक्‍त केली.
मधुकर सूर्यवंशी पुढे जाऊन सांगतात की, त्यांनी पूर्ण भारतभ्रमण केले आहे. वेगवेगळ्या राज्यातील वातावरण, तेथील भूगोल पाहिला आहे. या भ्रमंतीत माझे डोळे बनला होता गुलाबसिंग चव्हाण. आज तो हयात नाही. त्याला दिसत होते, पण ते पाहण्याचा आत्मविश्‍वास माझ्यात होता! हाच आत्मविश्‍वास या संस्थेतील मुलींमध्ये आणण्याचा प्रयत्न असल्याचेही ते आवार्जुन सांगतात.
अशा या अवलियापुढे शंभरदा नतमस्तक झालं तरी कमीच आहे! कारण वसतिगृहात असताना नाही, पण आता मी त्यांची परीक्षा घेण्याचा शूद्रपणा दाखवला!!


विनंती विशेष...या संस्थेला कुणाला मदत करावयाची असेल तर मधुकर सूर्यवंशी यांच्या 8275043150 या क्रमांकावर फोन करावा.


जीटी-2024 साठी येणार्‍या सगळ्या बांधवांचे मंगलमय स्वागत! नवनिर्माण्याच्या दिशेने ही जीटी घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सूज्ञ आहात. आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या अपेक्षेसह थांबतो. उद्या भेटूया!!

तात्पर्य : कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका.


उद्याचे सदर : जीटीनंतरही काही जणांचा जीवन संघर्ष संपादकाच्या नजरेतून रेखाटला जाईल. याच मालिकेचे अनुभवांचा ठेवा असलेले एक सुंदर पुस्तक तयार करण्याचा मानस आहे. बघूया कोण प्रतिसाद देतोय ते...

Save Journalism!, Save Democracy!!

DONATE...

BAHUJAN SHASAK MEDIA

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा) 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?