डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी!
शिवरायांना शूद्र ठरविणार्या पुरोहितांनीच भरपूर दक्षिणेच्या लोभाने क्षत्रियत्व बहाल केले. बाबासाहेबांच्याच शब्दात सांगायचे तर ‘सामाजिक दर्जा ठरविण्याच्या बाबतीत ब्राह्मण जे निर्णय देत असत ते कोणत्या पक्षाकडून किती पैसा मिळेल याकडे दृष्टी ठेवून ते कमी जास्त अनुकूल निर्णय देत असत. रोमन कॅथॉलिक पंथातील पाद्री लोक, लोकांच्याकडून पैसा घेऊन त्यांच्या पापांचे क्षालन करीत असत. त्याचप्रमाणे ब्राह्मण लोक आपले निर्णय विकीत असत. शिवाजी क्षत्रिय होता, असा जो निर्णय गागाभटाने दिला होता तो प्रामाणिकपणे दिलेला निर्णय नव्हता.’
-राजाराम सूर्यवंशी, पालघर
मध्ययुगीन कालखंडातील सर्वात अधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. त्यांच्यावर अनेक दृष्टिकोनातून अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. मुळात क्षत्रिय असलेल्या शिवाजी महाराजांना अगोदर कुणबी व शूद्र ठरवायचे व नंतर त्यांना क्षत्रिय पद बहाल करायचे. या मागचे गौडबंगाल शिवाजी महाराजांना जाणण्याचा दृष्टिकोनात समाविष्ट होते. मात्र, सर्वात लोकप्रिय राजा असलेल्या ‘शिवाजी’ हा आमच्या आशीर्वादाने लोकप्रिय झाला व त्याचे शासन चालवण्यात आमचा कसा सहभाग होता, हे दाखवून शिवाजीचे राज्य म्हणजे देवा-ब्राह्मणांचे राज्य हे जनतेच्या मनावर ठसविले गेले. त्याबरोबरच शिवाजी म्हणजे धार्मिक राजा. धार्मिक राजा म्हणजे हिंदूंचा तारणहार. हा दृष्टिकोन ठेवून शिवाजी महाराजांची प्रतिमा मुस्लिम विरोधाची बनवून ज्यांनी शिवाजी महाराजांना हिंदूपातशाह बनवले, त्या धार्मिक दृष्टिकोनाचे नेतृत्व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केले होते. अर्थातच पुरंदरेंचा दृष्टिकोन धार्मिक राहिला होता.
यदुनाथ सरकारही त्याच पठडीतील इतिहासकार होते. या दोघांनी हिंदुत्ववादी व मुस्लीम धर्मवेडे अशा परस्पविरोधी दोन मिथ उभारून त्यामध्ये शिवरायांना उभे केले होते. याविरुद्ध दुसरा दृष्टिकोन निधर्मी होता. ज्याचे नेतृत्व महात्मा फुले यांनी केले होते. महात्मा फुलेंचा दृष्टिकोन वर्णजातीअंताचा होता. जो काही प्रमाणात शरद जोशी व बहुतांशी प्रमाणात प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांनी स्वीकारून तसा शिवाजी महाराज मांडण्याचा प्रयत्न केला होता.
हे दोन्ही सत्यशोधक होते. सत्यशोधक केळुस्कर गुरुजींनी शिवाजी महाराजांवर इंग्रजीत चरित्र लिहिले होते. मात्र, ते पुस्तक वाचनालयाच्या बाहेर पडलेच नाही. तसेच वा. सी. बेंद्रे यांनीही शिवचरित्र लिहिले. मात्र, तेही शिवाजी महाराजांची हिंदुत्ववादी प्रतिमा बदलू शकले नाहीत. त्याशिवाय काही समाजवादी व साम्यवाद्यांनीही शिवाजी महाराजांना शेतकर्यांचा राजा, आर्थिक मुक्तिदाता ठसविण्याचा प्रयत्न केला; परंतु तोही पुरेसा नव्हता. कारण यांचा दृष्टिकोन निव्वळ आर्थिक राहिला होता. यात लालजी पेंडसे, श्रीपाद अमृत डांगे, एस. जी. सरदेसाई, नरहर कुरुंदकर, पंढरीनाथ रानडे व कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा समावेश होतो. या सर्वांच्या विचारांचा पाया आर्थिक असल्याने त्यांनी शिवरायांना शेतकर्यांचा मुक्तीदाता मांडण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न रास्त असला तरी पुरेसा नव्हता!
या सवार्ंमध्ये म. फुले व शरद पाटील यांनी शिवाजी महाराज हे खरोखरचे निधर्मी असण्याबरोबर प्रजाहितरक्षक, स्री शुद्रांचा तारणहार, जातीनिरपेक्ष व सर्वात म्हणजे वर्णजातिश्रेष्ठत्वाविरुद्ध लढणारा सामाजिक योध्दा सिद्ध करून खरा शिवाजी व त्याचे खरे जीवनकार्य जनतेच्या दरबारात मांडल्याने ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला न्याय देऊ शकलेत व तसा सर्वगुणसंपन्न, सर्व जाती-धर्माच्या प्रजेला न्याय देणारा राजा सिद्ध करून आज जनमाणसात चांगलेच प्रस्थापित केलेले आहे.
या सर्वांमध्ये अजून एका विचारवंतांने शिवाजी महाराज मांडले होते. त्यांच्यावर झालेल्या ब्राह्मणी अन्यायाची चिरफाड केली होती. शिवाजी व शिवाजीचे राज्य नाकारणारे सर्वच कसे त्यांच्या विरोधाला पुरून उरल्यामुळे, केवळ द्रव्य लोभाने आकर्षित होऊन तेच पुन्हा शिवाजी महाराजांचा उदो उदो करण्यात पुढे आलेत. शिवाय शिवाजी आमचाच हा दाखवण्याचा कसा यशस्वी प्रयत्न केला हे सिद्ध करणारे विचारवंत होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर!; परंतु त्यांनी मांडलेला शिवाजी इतिहासकारांपर्यंत पोहचलाच नाही. कारण बाबासाहेबांनी ज्या पुस्तकात शिवाजी महाराज मांडले होते, शिवाजी महाराजांच्या अपमानाची चिकित्सा केली होती, ते पुस्तक होते ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या पुस्तकाच्या आशयावर भरपूर चर्चा झाली. मात्र, या पुस्तकातील शिवाजी महाराज या पुस्तकाबाहेर आलेच नाहीत. असा हा बाबासाहेबांनी मांडलेला शिवाजी काय होता व त्याकाळी उच्चवर्णियांनी कशी कुरघोडी केली, हे आता आपण पाहूया...
बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात भरपूर लेखन केले. त्यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथ आणि पुस्तकांची संख्या 22 होती. त्या व्यतिरिक्त 10 शोध निबंध, 10 निवेदने व साक्षीपुरावे प्रसिद्ध झाले होते. तसेच 10 लेखन अपूर्ण राहिलेले ग्रंथ आहेत.
‘शूद्र कोण होते?’ हा शोधनिबंध बाबासाहेबांनी 1946 साली प्रकाशित केला होता. हा ग्रंथ त्यांनी या देशातील सर्वात महान शूद्र म्हणून महात्मा जोतीराव फुलेंना अर्पण केला होता. या शोधनिबंधात बाबासाहेबांनी शूद्रांची उत्पती केवळ शाब्दिक नसून त्याला ऐतिहासिक संबंध आहे, हे शिवाजी महाराजांच्या माध्यमातून सिद्ध केले होते. ज्यांना आज शूद्र ठरवले गेले ते सूर्यवंशी क्षत्रिय होते, असे या ग्रंथाचे व बाबासाहेबांचे प्रतिपादन होते. विशेष म्हणजे या पुस्तकात शिवराज्याभिषेकाचा विस्तृत तपशील बाबासाहेबांनी दिलेला आहे.खरे तर, हे संपूर्ण पुस्तक बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांना न्याय देण्यासाठी व उच्चवर्णियांच्या कारस्थानांचा पर्दाफाश करण्यासाठी लिहिले असल्याने ‘शिवाजी : काल व आज’ असे या पुस्तकाचे नाव असायला हवे होते, असे वाटल्याशिवाय राहात नाही.
बाबासाहेब या पुस्तकात म्हणतात की, ‘शिवरायांना शूद्र ठरविणार्या पुरोहितांनीच भरपूर दक्षिणेच्या लोभाने क्षत्रियत्व बहाल केले. बाबासाहेबांच्याच शब्दात सांगायचे तर ‘सामाजिक दर्जा ठरविण्याच्या बाबतीत ब्राह्मण जे निर्णय देत असत ते कोणत्या पक्षाकडून किती पैसा मिळेल याकडे दृष्टी ठेवून ते कमी जास्त अनुकूल निर्णय देत असत. रोमन कॅथॉलिक पंथातील पाद्री लोक, लोकांच्याकडून पैसा घेऊन त्यांच्या पापांचे क्षालन करीत असत. त्याचप्रमाणे ब्राह्मण लोक आपले निर्णय विकीत असत. शिवाजी क्षत्रिय होता, असा जो निर्णय गागाभटाने दिला होता तो प्रामाणिकपणे दिलेला निर्णय नव्हता.’ (संदर्भ : छत्रपती शिवराय, लेखक : प्रा. अशोक राणा, पान क्र. 71, छत्रपती गौरव पदवी प्रकाशन समिती.)
उपनयन विधी नाकारून ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना शूद्रवर्णात ढकलले हा सिद्धांत बाबासाहेबांनी या शोधनिबंधात मांडला होता. शिवाजी महाराजांचा उपनयनविधी न झाल्यामुळे त्यांचा संस्कारक्षय झाला असे मानले गेले.शूद्रांना त्याकाळी व्रात्य असेही म्हटले जात असे. बौद्धायन गृह्यसूत्रात व्रात्य हे भारतातील मूळ रहिवासी होते. कष्ट करून जगणार्या लोकांना पाणिनी व्याकरणात व्रात्य म्हटले आहे. शेतीप्रधान व्रत करणारा तो व्रात्य असा त्याचा अर्थ लावलेला आहे. आर्यांच्या यज्ञयागादि कर्मकाडांना व्रात्यांचा अर्थात भारतातील मूळनिवासींचा विरोध होता म्हणून आर्य व्रात्यांचा (शूद्रांचा) तिरस्कार करीत.हा विरोध रुग्वेदात पहिल्यांदा व्यक्त झाला होता असे राजवाडे लेखसंग्रहात पा.233 वर म्हटले आहे. श्रमजीवी लोकांना व्रातीन म्हणत असे श्री. दा. सातवलेकरांनीही त्याच्या वैदिक धर्म खंड 1 च्या पृ.61 वर म्हटले आहे. तर डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आस्तिक शिरोमणी चार्वाक या ग्रंथाच्या पान 43 वर ‘व्रात्य’ ही एक लढाऊ भटकी जमात असून ती आर्यांचे संस्कार न मानणारी होती, असे सोदाहरण स्पष्ट केले आहे.
ब्राह्मण पुरोहितांनी शिवाजी व्रात्य म्हणजे शूद्र होता, हे ग्राह्य धरून व्रात्यस्तोम हा विधी करून त्यांना क्षत्रियत्व प्रदान केले होते. शूद्रांना क्षत्रियत्व करण्याच्या विधीला ‘व्रात्यस्तोम’ विधी म्हटले जाते, असे तांड्य ब्राह्मणात (17/2-4) हा विधी सांगितला आहे, असे शरद पाटीलांनी त्यांच्या दास-शूद्रांची गुलामगिरी या ग्रंथात पा. 88 वर म्हटले आहे. एक प्रकारचे प्राय:श्चित असे या विधीचे स्वरूप होते.
शिवराज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित असलेला इंग्रज वकील आक्झेडेन याने या समारंभाचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. याचा तपशीलही शरद पाटीलांनी त्यांच्या उपरोक्त ग्रथांत पान 86 वर दिलेला आहे. याविषयी जयसिंगराव पवार महात्मा फुले गौरव ग्रथांत पान 494 वर लिहितात की, ‘सूरत, कारंजा या सारखी समृद्ध बाजारपेठ व मोगल-आदिलशाही संपत्ती लुटणार्या शिवाजी राजांना राज्यभिषेकाच्या निमित्ताने ब्राह्मणांनी लुटले, असे जे महात्मा फुले यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात म्हटले आहे ते खरेच आहे.’
डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘शिवाजीच्या राज्याभिषेकाला संमती देण्याच्या आगोदर गागाभटाने इतके आढेवेढे घेतले होते की, त्याला जी रक्कम दिली होती तीत त्याच्या पुरोहितपणाची दक्षिणा म्हणून एक रक्कम होतीच; परंतु गागाभटाची संमती मिळविण्यासाठी त्याला जी लाच दिली त्यात त्या रक्कमेचाही समावेश होता.’
शिवाजी महाराजांचा खासगी चिटणीस कायस्थ बाळाजी आवजी हा शिवाजी व गागाभट यांच्यामध्ये मध्यस्थ होता. गागाभटाने आवजीला सांगितले की, तो शिवाजी राजांचा राज्याभिषेक करण्यास मुळीच तयार नाही. कारण शिवाजी शूद्र आहे. बाळाजी आवजीने त्याला भरपूर लाच दिल्यानंतर गागाभटाने पगडी फिरवली व शिवाजी हा क्षत्रिय आहे व त्यांचा राज्याभिषेक करण्यास आपण तयार आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबोधनकार ठाकरे व एल. एच. कोचरे यांच्या प्राचीन भारतातील नाग यांच्या आधारे अजून यातले ट्विस्ट उलगडून दाखवले आहे. बाबासाहेब त्यांच्या पुस्तकात म्हणतात की, ‘मोरोपंत पिंगळे खुद्द राजा व्हायला तयार होता. त्यामुळे गागाभटाने पगडी पालट करून खुद्द बाळाजी आवजीला तो राजा होण्यास सांगू लागला. तशा गोष्टी करू लागला. इतिहासात कायमच कायस्थ व ब्राह्मण हे हाडवैरी होते. कायस्थ बाळाजी राजा होणे हे ब्राह्मण मोरोपंतांना मान्य नव्हते. शेवटी शिवाजी महाराजांचाच राज्याभिषेक करावा असे मोरोपंत म्हणू लागले. गागाभटाने असे जे वारंवार निर्णय बदलले, त्यामागे त्याला वेळोवेळी मिळालेला पैसा कारणीभूत असावा, असा निष्कर्ष बाबासाहेबांनी काढला होता.
बाबासाहेब आंबेडकर हे प्रबोधनकार ठाकरेंच्या ‘ग्रामण्याचा साद्यंत इतिहास’ या पुस्तकाचे आधारे पुढे म्हणतात की, शिवाजीच्या दुदैवाने त्यांचे मराठे सरदार शिवाजी महाराजांना आपल्यापेक्षा उच्च सामाजिक दर्जा द्यायला तयार नव्हते. उलट अंशी ते त्याच्या क्षत्रियत्वाच्या हक्काला विरोध करण्यासाठी त्यांच्या विरूद्ध एकजूट करून उभे राहिले होते.
बाबासाहेबांचा दाखला देऊन प्रा. अशोक राणा त्यांच्या उपरोक्त पुस्तकाच्या पान 75 वर लिहितात की, अशा परिस्थितीत शिवरायांना राज्याभिषेक करवून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. आपले क्षत्रियत्व सिद्ध करण्याकरिता त्यांना व्रात्यस्तोमासारखा प्राय:श्चित विधी करावा लागला. या सर्व कर्माकाडांमध्ये स्वराज्याची फार मोठी संपत्ती खर्ची घातली गेली. ती पुन्हा मिळविण्याकरिता त्यांना दक्षिणेकडे मोहिमेवर जावे लागले.
6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर त्यांनी नवे राज्याभिषेक शक सुरु केले. शिवरायांचे वंशज गादीवर बसून राज्यकारभार चालवीत होते तोपर्यंत तो चालू राहिला. ब्राह्मण पेशव्यांच्या हातात जेव्हा राज्यकारभार गेला तेव्हा पेशव्यांनी हुकूम जारी करून हा शक बंद केला.त्याऐवजी मोगलांचा फसली शक सुरु केला, अशी माहिती प्रा. अशोक राणा यांनी त्यांच्या ‘छत्रपती शिवराय’ या पुस्तकाच्या पान 75 वर अवन्तिका प्रसाद मरमट यांच्या वेदकालीन नागजातियों, राजाओं तथा संस्कृतीकी खोज या ग्रथाच्या पृ 99 च्या आधारे स्पष्ट केले आहे.
सांगायचा मुद्दा असा की, बाबासाहेबांनी खूप संशोधन करून शिवरायांवरील ब्राह्मणी अन्यायावर विस्तृत प्रकाश टाकला होता. शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाला वर्णश्रेष्ठावरून घायाळ करणारी वर्णजातिव्यवस्थाक विचारधारेने महाराष्ट्राचे व पर्यायाने देशाचे किती मोठे नुकसान केले होते व आजही त्याचा प्रत्यय न चुकता येतो याला काय म्हणावे? महाराष्ट्राचे वा देशाचे दुदैव वा क्रांती-प्रतिक्रांतीचा आयाम काहीही असो; पण बाबासाहेबांनी मांडलेल्या शिवाजी महाराजांचा अधिक अभ्यास व्हायला हवा. कारण बाबासाहेब फुलेंचे शिष्य होते व आपल्या गुरुंप्रमाणेच ते वर्ण-जातीअंतवादी होते. मोठे माणुसकीवादी देशभक्त होते. आपल्या देशात वर्ण-जातीव्यवस्थेचा अंमल नसता तर कदाचित देशाचे प्रथम पंतप्रधान होण्याचा मान बाबासाहेबांना मिळाला असता ...!
![]() |
(लेखक ज्येष्ट सत्यशोधक विचारवंत, लेखक आहेत.) |
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा