जनगणनेसाठी ओबीसींनो, संघटित व्हा : खा. इम्तियाज जलिल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जनगणनेसाठी ओबीसींनो, संघटित व्हा : खा. इम्तियाज जलिल
![]() |
छत्रपती संभाजीनगर : बशावृत्त
देशात 52 टक्के असणार्या ओबीसींना आमची जनगणना करा, असे म्हणावे लागत आहे. कारण तो विखुरलेला आहे. तो जर संघटित झाला, तर सर्वपक्षिय नेत्यांना ओबीसींच्या दारात यावे लागेल. अर्थात त्यांना जनगणना करावी लागेल, असा आत्मविश्वास खासदार इम्तियाज जलिल यांनी व्यक्त केला. भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
बीडबायपासवरील हॉटेल आदर्श येथे भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेचे दोन दिवशीय राज्यस्तरीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस. खा. इम्तियाज जलिल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार होते.
खा. जलिल पुढे म्हणाले, सर्वसामान्यांचा व ओबीसींचा आवाज उठवणार्या उमेदवारालाच संसदेत पाठवा. संसदेत अनेक खासदार बोलतच नाहीत. ज्या सुविधा आमदार आणि खासदारांना मिळतात, त्या सर्व प्रकारच्या सुविधा मत देणार्या प्रत्येक माणसाला मिळाल्या पाहिजेत.
ओबीसी देशात 52 टक्के पेक्षा जास्त आहे. त्यांना या देशात मागणी करावी लागत आहे की, आमची मोजणी करा. दुसर्याचे दार ठोठावं लागत आहे. कारण ते विखुरलेले आहे. जर ओबीसी बीपीएसएसच्या माध्यमातून संघटित झाला तर सर्व पक्षिय नेत्यांना ओबीसीकडे यावे लागेल. त्यांना ओबीसी जनगणना करावीच लागेल. त्यासाठी तुम्ही संघटित झाले पाहिजे.
ओबीसी जनगणनेचा मुद्दा संसदेत मांडणार :
खा. जलिल पुढे म्हणाले, आपण दिलेल्या निवेदनानुसार ओबीसी जनगणनेचा मुद्दा मी संसदेत मांडणार. या देशातील शोषित पीडित सर्वसामान्य लोकांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी किमान त्यांची मोजदाद व्हावी लागते. ओबीसी जनगणनेचा मुद्दा अगदी रास्त आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला संविधान निर्मात्याचं नाव दिले आहे. जगविख्यात विद्वानाच्या नावे असलेले विद्यापीठ जगातल्या टॉप शंभर विद्यापीठात असायला पाहिजे. मात्र, त्याबाबत सरकार उदासीन आहे. त्यादृष्टीने कोणतेच प्रयत्न होताना दिसत नसल्याची खंत खा. जलिल यांनी व्यक्त केली.
ओबीसींची जातनिहाय जनगणना करा : डॉ. दहिफळे
सध्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानंतरही देशातील ओबीसी, भटके-विमुक्तांना मूलभूत सुविधा मिळत नाही, त्यांना आधारकार्ड, आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत, ही अत्यंत खेदाची बाब आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय ओबीसींच्या आरोग्याची, नोकरीतील प्रमाणाची व त्यांना मिळणार्या सुविधांची यथायोग्य माहिती कशी मिळेल, असा सवाल ओबीसी अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष डॉ. उज्ज्वलाताई दहिफळे यांनी केला.
प्रगत आणि अप्रगत मानसिकता कोणाची? : ज्ञानेश्वर गोरे
ओबीसींना आपल्या हक्क अधिकारासाठी व सामाजिक न्यायासाठी रस्त्यावरची लढाई लढावीच लागेल. ओबीसींची जातनिहाय जनगणना बिहारप्रमाणे महाराष्ट्राने करावी. कारण जनावराची, पशु, पक्षाची, घुबडांची गणना केली जाते, माणसाची का केली जात नाही. म्हणून ओबीसींना जागृत करावे लागेल. देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे. जनगणनेसाठी सरकारवर दबाव आणावा लागेल. फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र प्रगत असूनही जातनिहाय जनगणना होत नाही. मात्र, बिहार सारख्या अप्रगत राज्यात होते. यावरून प्रगत आणि अप्रगत मानसिकता कोणाची, असा खडा सवाल बीपीएसएसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गोरे यांनी केला.
महात्मा फुलेंना भारतरत्न देण्यासाठी टाळाटाळ- प्रा. सुदाम चिंचाणे
ओबीसी राज्य अधिवेशन हे सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त होत आहे. खरं तर राज्य सरकारने हे सुवर्ण महोत्सवी वर्ष सरकारी पातळीवरून साजरे करायला हवे होते. मात्र, ही जातवर्गस्त्रीदास्य समर्थक व्यवस्था आपलाच अजेंडा राबवत आहे. या देशातल्या बहुजन समाजाच्या समतेसाठी संघटितपणे आवाज उठवणारा देशातील महात्मा म्हणजेच जोतीराव फुले आहेत. ज्यांची काहीच मागणी नसते त्या मागण्या सरकार मंजूर करते. तथापि, जोतीराव फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी असताना आजतागायत टाळाटाळ केली जात आहे. ओबीसींना त्यांचा न्याय वाटा दिला जात नाही, तोपर्यंत खर्या अर्थाने समाजाची समताधिष्ठित उभारणी होऊ शकणार नाही, असे मत प्रा. सुदाम चिंचाणे यांनी व्यक्त केले.
ओबीसी जनगणनेसाठी संघटितपणे लढाऊ उभारण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष एस.जी. माचनवार यांनी केले. यावेळी बीपीएसएसचे कार्याध्यक्ष गणपती मंडळ, महासचिव आर. के .पाल आदींची भाषणे झाली.
याप्रसंगी संयोजक डॉ. कालिदास भांगे, डॉ. देवराज दराडे, अशोक तारो, डॉ. हनुमान वांकर, बालाजी मुडे, जनार्दन कापुरे, विश्वनाथ कोक्कर, शरद बोरसे, डॉ. कृष्ण मालकर, सविता हजारे, सुनीता काळे, मायताई गोरे, वैशाली पेरके, बळी चव्हाण, अंकुश राठोड, रामकीशन मुंडे, गौरव पाटील, आदी राज्य पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ. वसंत हारकळ यांनी केले, तर आभार प्रा. रमाकांत तिडके यांनी मानले.
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा