दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

दूरवस्था ते मॉडेलस्कूल : आबेगाव जिल्हा परिषद शाळेचा प्रेरणादायी प्रवास

 दूरवस्था ते मॉडेलस्कूल : आबेगाव जिल्हा परिषद शाळेचा प्रेरणादायी प्रवास

आबेगाव : लोकसहभाग व श्रमदानातून नवनिर्मित जिल्हा परिषद शाळेची पाहणी करताना बहुजन शासकचे मुख्यसंपादक भास्कर सरोदे, मुख्याध्यापक संजय राठोड, विलासभाऊ शेजुळ, किशोर शेजुळ, विलास शेजुळ सर आदी.
भास्कर सरोदे,

ग्राऊंड रिपोर्ट, आबेगाव, ता. माजलगाव (8 ऑक्टोबर 2022) :

राज्यातील आणि देशातील ग्रामीण भागातल्या शाळा गिळंकृत करू पाहणारे राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020, राज्य शासनाची सरकारी शाळांबाबतची अनास्था, पालकांचा खासगी विशेषत: इंग्रजी शाळांकडे असलेला ओढा, आत्मविश्‍वास हरवलेले जिल्हा परिषद आणि महानगर पालिका शाळांचे शिक्षक, जागतिकीकरणाचा रेटा, खासगीकरणाचा सरकारी डाव, समान शाळा पद्धतीचा अभाव, हे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतानाचे वास्तव. सर्वत्र काळाकुट्ट अंधार..! अशा या अंधारात दिवा लावण्याचे काम माजलगाव तालुक्यातील आबेगावच्या गावकर्‍यांनी केले आहे. त्याचाच हा ग्राऊंड रिपोर्ट


शुक्रवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी माजलगाव येथील राष्ट्रमाता जिजाऊ शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात विलास शेजुळ सरांची भेट झाली. चळवळीच्या गप्पांमध्ये आबेगाव शाळेचा विषय आला. या शाळेविषयी माझे मित्र औरंगाबाद येथील उद्योजक नारायण शेजुळ पाटील यांच्याकडून ऐकूण होतो. या आदर्श शाळेला भेट देण्याचा मनोदय व्यक्‍त केला असता सरांनी आनंदाने होकार दिला. आणखी एक-दोघांना फोनोफोनी करून आबेगावला जायचे म्हणून दुसर्‍या दिवशीच्या शाळेला सुट्टी टाकली. शनिवार, दि.8 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील संभाजी महाराज चौकातून आदरणीय विलास शेजुळ (पाटील) सरांच्या मोटारसायकलवरून आबेगावकडे निघालो. खरं तर ते पाटील लावत नाहीत! विलास शेजुळ सर म्हणजे अभ्यासू, अत्यंत पारदर्शी आणि संयमी, मनमोकळा स्वभाव, कुठलाही अभिनिवेश नसणारे परिवर्तनवादी व्यक्‍तिमत्त्व. ते गेल्या चार वर्षापासून बहुजन शासकचे वाचक आणि लेखक आहेत. फोनवरूनच संवाद व्हायचा. एका विधायक कामाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेट झाली आणि एका चांगल्या व्यक्‍तीला भेटल्याचा आनंद झाला. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रवासात शाळेविषयी ते भरभरून बोलत होते...मी पिकांनी भरलेली शेतं न्हाळत होकार देत होतो. आख्ख्या शिवारात ऊस, सोयाबीन आणि कापूस याव्यतिरिक्‍त चौथे पिक दिसले नाही. अत्यंत समृद्ध आणि संपन्न शेती. गप्पांच्या नादात आबेगावला पोहोचायला अर्ध्याऐवजी पाऊनतास लागला. मुख्याध्यापक संजय राठोड आमच्या येण्याची वाट पाहतच होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबिका किशोर शेजुळ यांचे पती उपस्थित होते. शाळा सुरू असल्याने सर्व शिक्षक वर्गावर शिकवत होते. पाहताक्षणीच शाळेचं रुपडं आकर्षक आणि मनवेधक दिसते. शाळेच्या भल्यामोठ्या आवारातील निंबाच्या झाडाखाली टाकून ठेवलेल्या खुर्चीत विसावलो. 

आपल्या संयत आणि सुखद वाणीने शेजुळ सर सांगत होते की, आबेगाव, माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गाव. माजलगावपासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर. पाण्याची मुबलकता, समृद्धता आणि संपन्नता हे माजलगाव तालुक्यातील बहुतांश गावांचे वैशिष्ट्ये. आबेगाव जिल्हा परिषद शाळेतच माझे प्राथमिक शिक्षण झाले. माझ्यासारख्या अनेकांना याच शाळेने घडविले. आम्ही आता नोकरी, व्यवसायानिमित्त पांगलो, गावापासून दुरावलो. या शाळेने आजपर्यंत 10 डॉक्टर, तीन महिला पीएचडीधारकांसह सहा प्राध्यापक, एक महिलेसह चार वकील, दोन महिलांसह 10 अभियंते, आठ फार्मासिस्ट, 12 शिक्षक, दोन उद्योजक, तीन आयआटीयन्स, 15 व्यावसायिक दिले. हा काळ शाळा आणि गावासाठी भरभराटीचा होता. कुणालाही अभिमान वाटावा अशी ही शाळा. मात्र, काळ बदलला, जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन बदलत गेला आणि गेल्या 15 वर्षापासून या शाळेची अवकळा सुरू झाली. पूर्ववैभव लोप पावू लागले. पटसंख्या रोडावत गेली. याची सल आमच्या मनाला बोचत होती. काय करावे म्हणून काहीच सुचत नव्हते. माझ्यासारखेच अनेकजण बेचैन होते. अशातच एक घटना घडली...

2019 साली एनजींनी (नारायण शेजुळ पाटील, औरंगाबाद) आपल्या वडिलांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त परंपरांना फाटा देत वेगळी वाट चोखाळली. हो साहेबऽऽ! (घाईघाईत आलेल्या विलासभाऊ शेजुळ या शिक्षणप्रेमी धडपड्या व्यक्‍तीने मध्येच टोकले. आम्ही आल्याचे समजल्यावर घाईघडबडीत त्यांनी शाळा जवळ केली होती. नवीन, विकसित शाळा सध्या गोदाकाठावरील आबेगाव आणि 2006 च्या महापुरानंतर स्थलांतरीत झालेल्या विठ्ठलनगरच्या मधोमध आहे). एनजींनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेतील विद्यार्थ्यांना दप्‍तर, वह्या-पुस्तकांचे वाटप केले. यावेळी त्यांचा सुविद्य पत्नी शीतलही उपस्थित होत्या. शाळेचे विदारक चित्र पाहून शाळेसाठी काहीतरी केले पाहिजे, अशी खूणगाठ एनजींनी मनोमन बांधली. धडपड्या विलासभाऊंच्या कानात शाळेसाठी गाव एक करण्याचा आणि बैठक बोलावण्याचे सांगितले. विलासभाऊ म्हणजे सर्व गटांना सांधणारा दुवा. विलासभाऊ हे विलास शेजुळ नव्हे. विलासराव देसाई शेजुळ (वडिलांचे नाव देसाई गरुड शेजुळ). साहित्यिक, कवीमनाचा माणूस. तोपर्यंत आपल्या बंडूंनी (नारायण शेजुळ पाटील) शाळेत दप्‍तर, वह्या-पुस्तकं आणि खाऊ वाटप केल्याची खबर गावभर धडकली होतीच. त्यांच्यासाठी ते अपू्रप होते. ही घटना सर्वांनाच वेगळा विचार करायला लावणारी ठरली.  

मुस्लिम तरुणीचा आर्त टाहो..!

आमची चर्चा सुरू असताना शिफा मनसूर शेख ही मुलगी दुसरीत प्रवेशासाठी आली. तिच्यासोबत माहेरवासीण आई, स्वयंसेवक षनौबर सय्यद आणि एक महिला होती. प्रवेशासंबंधी सुचना मुख्याध्यापकांनी केल्या. 10 वी पास षनौबर हीच ती तरुणी कोरोना काळात शाळा बंद असताना मुलांना शिकवत होती. मुलांचे नुकसान टाळण्यासाठी गावकर्‍यांनी हा निर्णय घेतला होता. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना तिच्याशी झालेला संवाद खूपच बोलका आहे, तो असा... 

मी : शाळेविषयी काय वाटते?

षनौबर : (तितक्याच तत्परतेने) मुलांना इंग्रजी येत नाही. शाळेची प्रगती पाहून सगळे खूश आहेत, पण आणखी प्रगती व्हायला पाहिजे.

मी : काय शिकलीस?

षनौबर : 10 वी.

मी : पुढे का शिकत नाही?

षनौबर : ये-जा करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे कुठे प्रवेश घेता आला नाही. या गावातच शिकण्याची सोय असती तर माझं शिक्षण झालं असतं. शिवाय ‘आमच्यात’ जास्त शिकू दिले जात नाही. म्हणजे कुणी शिकलेलंच नाही.

मी : तुला फातिमा शेख कोण आहेत ते माहिती आहे का?

षनौबर : कोण फातिमा शेख? असा प्रतिप्रश्‍न तिनेच केला.

मी : सावित्रीबाई फुले?

षनौबर : त्यांचे नाव ऐकूण आहे, थोडं थोडं वाचनातही आले.

मी : सावित्रीबाई फुले माहिती आहेत आणि त्यांच्या सहकारी शिक्षिका फातिमा शेख कशा माहिती नाहीत?

षनौबर : कसं माहिती असणार? कुठल्याच पुस्तकात उल्‍लेख नाही, पुस्तकात एखादा पाठ असता तर माहिती झालं असतं, पण तेही नाही.

शेजुळ सर : तुला फातिमा शेख यांचे पुस्तक दिले तर वाचशील का?

षनौबर : का नाही वाचणार? सर, तुम्ही द्या, मी निश्‍चित वाचते.

मी : पुढं शिकण्याची इच्छा आहे का?

षनौबर : संधी मिळाली तर…(संवाद समाप्‍त)

षनौबरसोबत झालेला हा संवाद म्हणजे व्यवस्थेला केलेला खडा सवाल आहे. इतिहासाने आणि आताही भेदभावपूर्ण मानसिकतेला आव्हान देणारा आहे. ‘शालेय पुस्तकात नसल्याने फातिमा शेख आम्हाला माहिती नाही’, हा आर्त टाहो इथल्या व्यवस्थेला ऐकायला येईल का? षनौबरचा एक एक शब्द जसा येथील ब्राह्मणी व्यवस्थेला प्रश्‍न करणारा आहे तितकाच धर्मांध मुस्लिमांनाही ठणकावून सांगणारा आहे की, होय, मला शिकायचंय!

दरम्यान, नारायणराव शेजुळ पाटील आणि मुख्याध्यापक संजय राठोड यांच्यात संवाद वाढत राहिला. विलासभाऊंनी आपली कामगिरी चोख बजावली. बाहेरगावी नोकरी-व्यावसायानिमित्ताने असलेल्यांना फोनोफोनी झाली, व्हॉटस्अ‍ॅप मेसेजेस गेले. माजलगावातील राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेच्या कार्यालयात 20 ऑक्टोबर 2019 रोजी बैठकीचे आयोजन केले. शिवाजीराव शेजुळ (माजी सरपंच, आबेगाव), चंद्रकांत शेजुळ (जिल्हा परिषद सदस्य व तुळजा भवानी अर्बनचे संस्थापक), अभियंता अरुणआबा शेजुळ, अभियंता मदनराव शेजुळ, डॉ. शिनगारे आदी मान्यवरांची उपस्थित होती. अपेक्षेप्रमाणे बैठकीत चांगलीच खडाखडी झाली. एकमेकांची उणीधुणी काढण्यात आली. शेवटी भाऊबंदच. त्यातच सर्वच शिकलेले. मध्यममार्ग म्हणून ‘मागचं सारं विसरुन जाऊन शाळेसाठी सर्वांनी पुढे यायचे. शाळेचे आधीच खूप नुकसान झाले, ते भरून काढायचे’, असा बैठकीचा शेवट गोड झाला. बैठकीचा वृत्तांत अनुपस्थित असलेल्यांना पाठविण्यात आला. त्या सर्वांनी सहर्ष पाठिंबा दर्शविला.
आबेगाव : लोकसहभागातून…शाळासमृद्धीपर्यंतचा आदर्शवत जिल्हा परिषद शाळेचा प्रवास सुखावणारा आहे. शाळेला मॉडेलस्कूलची मंजुरी मिळताच खा. माजीद मेनन यांच्या निधीतून साकारत असलेली अत्याधुनिक नवीन इमारत. यावेळी बहुजन शासकचे मुख्यसंपादक भास्कर सरोदे, मुख्याध्यापक संजय राठोड, विलासभाऊ शेजुळ, किशोर शेजुळ, विलास शेजुळ सर आदी.

बरं का सर, शेजुळ सर सांगू लागले…निधीचा प्रश्‍न होता. एनजींनी काही उपक्रम राबवता येतील का असे सुचविले होते. ‘दिवाळीचा पाडवा’ मागायचा विचार पुढे आला. आमच्या गावाला दिवाळीचा पाडवा मागण्याची परंपरा आहे, ती अलीकडे खंडीत झाली. या पाडव्यातून आबेगावला यशवंतराव चव्हाण क्रीडा मंडळामार्फत 10 वर्षे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा झाल्या. यानिमित्ताने राज्यातील नामांकित खेळाडुंचे पाय या मातीला लागले आहेत. या स्पर्धा भरविण्यात महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते डॉ. माधवराव शेजुळ (विद्यापीठ खेळाडू), प्रा. अनुशाल्व शेजुळ (विद्यापीठ खेळाडू), कुंडलीक नाना शेजुळ, अशोक काका शेजुळ, विठ्ठल कांबळे आदींचा प्रामुख्याने पुढाकार असायचा. गावात एकोपा असायचा. अलीकडे गावातही राजकारण घुसले. त्यामुळे काही मतभेद अधुनमधून डोकं वर काढतात, तो भाग वेगळा

शाळेत सरस्वती, गणपतीऐवजी सावित्रीबाईंचा फोटो

लोकवर्गणी आणि श्रमदानातून आबेगाव जिल्हा परिषदेचे सुशोभिकरण झाले आहे. विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती मिळावी म्हणून प्रत्येक वर्गाला गडकिल्ल्यांची नावे दिली आहेत. त्याबरोबरच नकाशे, टेबल आणि भितीचित्रांनी शाळा सजलेली आहे. शाळेत सरस्वती वा गणपती यांचा फोटो वा मूर्ती नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ‘ज्या सरस्वतीने आम्हाला शिकवले नाही, आम्ही तिला कधी पाहिले नाही, आणि शिकवलेच असेल तर तीन टक्के लोकांना’, असा वर्मी घाव घातल्याने मोठा वाद उभा राहिला आहे. भुजबळांना धमक्या, गुन्हे यांना सामोरे जावे लागत आहे. अशा सांस्कृतिक दहशतवादाच्या वातावरणात आबेगाव जिल्हा परिषद शाळेच्या धाडसाला दाद दिली पाहिजे. याबाबत विचारले असता, शेजुळ सरांनी यामागचा इतिहास सांगितला. ते म्हणतात, माजलगाव तालुक्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांत सरस्वतीऐवजी सावित्रीबाईंसह महापुरुषांचे फोटो आहेत. त्याचे कारण असे की, 15 वर्षापूर्वी तालुक्यात सरस्वतीच्या फोटोवरून वाद झाला होता. कास्ट्राईब संघटनेने हा मुद्दा उचलला होता. त्यांच्या भूमिकेला जाहीर नसला तरी आतून आमचाही पाठिंबा होता. सावित्रीबाई फुले आणि सरस्वती यांच्यातील तुलनेच्या पाम्पलेट्सनी तालुक्यात चांगलाच गदारोळ उडाला होता. याचा फायदा असा झाला की, बहुतांश शाळांमध्ये आता सरस्वतीऐवजी सावित्रीबाईंचे फोटो आहेत. याला जोडूनच सरांनी गुंजथडी जिल्हा परिषद शाळेत घडलेला प्रसंग सांगितला, तो असा...

माझी गुंजथडी शाळेत बदली झाली. परिवर्तनवादी चळवळीशी संबंध असल्याने मला काही गोष्टी तेथे प्रकर्षाने जाणवल्या. मुलांना घेऊन बाभुळगावकर नावाचे गुरुजी सरस्वतीची पूजा करायचे, आरती म्हणायचे. त्यानंतर कुलकर्णी सरांनी ही प्रथा पुढे चालू ठेवली होती. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांशी दूरूनच व्यवहार केला जात होता. या सार्‍या गोष्टीला गावातूनही बर्‍यापैकी पाठिंबा होता. हे सारं बदललं पाहिजे म्हणून गावकर्‍यांशी चर्चा केली. ही चर्चा माझ्याच अंगलट येऊ लागली. मात्र, मी मागे हटणार नव्हतोच. विद्यार्थ्यांचे मतपरिवर्तन करायला सुरुवात केली. ज्या विद्यार्थ्यांशी दुरुनच व्यवहार केला जात होता, त्यांच्या डब्यातील एखादा घास खाणे, डबा खूप छान आहे, अशी स्तुती करणे, पिण्याचे पाणी त्यांनाच आणायला लावणे, असे प्रकार सुरू केले. हे सारे विद्यार्थी पाहतच होते. त्यांच्याही मनावर सकारात्मक परिणाम व्हायला लागला. कुलकर्णी सरांचेही मतपरिवर्तन झाले. एक दिवस असा आला की, विद्यार्थ्यांनीच सरस्वतीचा फोटो सन्मानपूर्वक काढून कुलकर्णी गुरुजीची कड ओढणार्‍यांच्या घरात लावला. विद्यार्थ्यांना सत्याची जाणीव झाल्याने शाळेत बदल झाला.

शाळेसाठी दिवाळी पाडवा मागितला…: 

2019 चा दिवाळी पाडवा मागायचा ठरले. जरेवाडी जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शाळेचे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्‍त शिक्षक संदीप पवार यांच्या भाषणाचा कार्यक्रम झाला. त्यांनी आम्हाला आमच्या क्षमतेची जाणीव करून दिली. ते म्हणाले, ‘जरेवाडी इनमिन 50-60 उंबरे आणि सुमारे 350 लोकसंख्या असलेले दुर्गम गाव आहे. तुम्ही तर फार समृद्ध दिसता. तुम्ही ठरवलं तर या गावाचा आणि शाळेचा कायापालट करू शकता. तुमच्यातल्या शक्‍तीला ओळखा’. त्यांनी गावकर्‍यांच्या मनालाच हात घातला. झाले दुसर्‍या दिवशी कांचन भास्करराव शेजुळ या शेतकरी तरुणाने एक क्‍विंटल कापूस दान केला. तोच पहिला देणगीदार ठरला. पाडवा मागितला. ज्यांनी जे दिले ते स्वीकारले. यानंतर आबेगावातच एक बैठक बोलावली. या बैठकीत निधी संकलनाची दिशा ठरली. दीड महिना निधी संकलन मोहीम राबविली. 18 लाख रुपयांचा निधी जमा झाला. याने गावकर्‍यांचे मनोबल वाढले. त्यातून गावठाण आणि नवीन वसाहतच्या मधोमध दीड एकर खासगी मालकीची रोडटच जमीन शाळेसाठी विकत घेतली आणि शासनाला दान केली. कारण आबेगावच्या शाळेला 2006 च्या महापुराचा चांगलाच तडाखा बसला. त्यात शाळेचे दप्‍तर भिजले होते. पूर्ण गावातून महापुराचे परसभर पाणी वाहत होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या कटू आठवणींनी गावकर्‍यांच्या आजही काळजाचा ठेका चुकतो.

निधी संकलन मोहीम :

दिवाळीचा पाडवा मागितल्यानंतर पहिल्या टप्प्यात निधी संकलन मोहीम राबविण्यात आली. किमान दीड महिना ही मोहीम चालली. स्मृतीशेष अभियंता अरूणआबा शेजुळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू होती. बाहेरगावाहून दर रविवारी आबेगावला जाऊन निधी संकलन केले जात होते. यात प्रामुख्याने प्रा. डॉ. माधव शेजुळ, प्रा. अनुशाल्व शेजुळ, धर्मराज शेजुळ, रामेश्‍वर पुरी, चंद्रकांत शेजुळ, शहाजी शेजुळ, अशोक शेजुळ, दिनेश शेजुळ, सुनील मगर, विलास शेजुळ यांच्या समावेश होता. तर गावातून विलासभाऊ शेजुळ, पंडितदादा शेजुळ, प्रमोद शेजुळ, अभियंता भागवत शेजुळ हे आघाडीवर होते. डॉ. आत्माराम शेजुळ-पुणे, उद्योजक भारत सोळंके-पुणे, उद्योजक नारायण पाटील शेजुळ- औरंगाबाद, अभियंता सूर्यकांत शेजुळ-औरंगाबाद, कल्याण शेजुळ-औरंगाबाद, विश्‍वांभर शेजुळ-औरंगाबाद यांनी यांचा या मोहिमेला पाठिंबा होता. या मोहिमेत 18 लाख रूपयांचा निधी संकलित झाला.

लोकवर्गणी आणि श्रमदान :

दुसर्‍या टप्प्यात सुमारे 22 लाख रुपये जमा झाले. त्यातून 10 शाळाखोल्या बांधल्या. शाळेसाठी काही साधनसामुग्री विकत घेतली. शाळेचे संपूर्ण काम लोकवर्गणी आणि श्रमदानातून झाले आहे. शाळेच्या कामासाठी गाव तन-मन-धनाने एक झाला. यात महिलांचा विशेष सहभाग आहे. प्रा. डॉ. माधवराव शेजुळ यांनी 7.50 लाख रुपयांची 15 गुंठे जमीन शाळेला दान दिली. त्यांचेच चिरंजीव अभियंता शेखर शेजुळ यांनी आपला 70 हजारांचा पहिला पगार शाळेला दान दिला. तो यशवंतराव चव्हाण व्यायाम मंडळ, परभणी येथील जलतरण खेळाडू आहे. शाळेतील मुलांच्या क्रीडासुविधांसाठी त्यांने हे दान दिले. प्रा. माधवराव शेजुळ यांनी यशवंतराव व्यायाम मंडळाकडून शाळेसाठी पाच लाखांचे कंपाऊंड बांधून दिले. रोडकडील बाजुने वृक्षारोपण केले. या ठळक नोंदीव्यतिरिक्‍त प्रत्येक गावकर्‍याचा यात खारीचा का होईना वाटा आहे. ‘लोकसहभागातून…शाळा समृद्धीकडे’ असा हा शाळेचा प्रेरणादायी प्रवास ठरला.

स्वीकारले वैष्णवीचे दातृत्व 

वैष्णवी बाबासाहेब शिनगारे. कोरोना काळात तिनेही स्वयंसेवक म्हणून शाळेतील मुलांना शिकविण्याचे काम केले. सरकारला कोरोना झाल्याने विद्यार्थ्यांवर ही अतिरिक्‍त जबाबदारी येऊन पडली! माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयातून 12 वी परीक्षेत अश्‍विनी प्रथम आली. त्याप्रित्यर्थ सत्कारप्रसंगी वैष्णवीने आयएएस बनण्याचा मनोदय व्यक्‍त केला. तिच्यातला आत्मविश्‍वास आणि बाणेदारपणा वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे आबेगाववासियांनी लोकवर्गणीतून सुमारे 85 हजार रुपयांचा निधी जमा केला. या निधीतून वैष्णवी पुण्यात आयएएसची तयारी करत आहे. आबेगावकरांची ही संवेदनशीलता बरेच काही सांगून जाणारी आहे.


तर देश पुन्हा गुलाम होईल : विलासभाऊ शेजुळ

आबेगाव शाळेच्या विकासासाठी गावकर्‍यांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका वठवणारे विलासभाऊ देसाई शेजुळ यांना बोलतं केले. विलासभाऊ कवीमनाचे आहेत, असा वर उल्‍लेख आला आहेच. त्याशिवाय ते कथालेखकही आहेत. कला, साहित्य हा त्यांचा आवडीचा प्रांत. ते म्हणतात, शिक्षणाशिवाय कोणत्याही राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही. अज्ञानामुळेच देश वारंवार गुलाम झाला. जे शिकले त्यांनी देश स्वतंत्र केला. भारताचा प्राचीन वैभवशाली शिक्षणविषयक वारसा म्हणजे नालंदा, तक्षशिला आदी विद्यापीठ होत. या विद्यापीठातून कला, साहित्य, विज्ञान, तर्कशास्त्र, मानसशास्त्र आदी विषयांवर भर होता. मात्र, कालांतराने हेच शिक्षण धार्मिकतेकडे वळविले आणि बहुतांश भारतीयांवर शिक्षणबंदी आल्याचे विलासभाऊ सांगतात. बहुतांश भारतीय अज्ञानी राहिल्याने देश गुलाम झाल्याचा ते दावा करतात.

सांगण्याच्या ओघात विलासभाऊ म्हणतात, सध्या पुन्हा एकदा शिक्षण नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षणाचे खासगीकरण झाले तर 70-80 टक्के लोक शिक्षणापासून वंचित राहतील. असे झाले तर देश पुन्हा गुलाम होईल. जिल्हा परिषद शाळेतील एका विद्यार्थ्यावर सरकार वर्षाला 65 हजार रुपये खर्च करते. हा खर्च खासगीकरणातून पालकांना झेपावणारा नाही. त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद शाळाच विकसित करण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे खासगी शाळा काढू शकतील अशी ऐपत असणारे अनेकजण आहेत. मात्र, त्यांनी जिल्हा परिषद शाळा विकसित करण्याला प्राधान्य दिले आहे. या बाबीला आजच्या खासगीकरणाच्या काळात फार महत्त्व आहे. समाज ज्ञानी झाला तर तुम्हाला बाकी काहीच करायची गरज पडत नाही, हे सरकार आणि समाजाला कळायला पाहिजे. मी शिक्षणामुळे ज्ञानी झालो आणि मला सत्यनारायणातील थोतांड समजले. सत्यनारायण न घातल्याने माझे काहीही बिघडत नाही, हा माझा समाजाला संदेश आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्यासाठी शिक्षकही तेवढ्या तळमळीने शिकवत नाहीत, ही माझी खंत आहे. शिक्षक अनेक संघटनांमध्ये सक्रिय असतात, त्यांना शाळाबाह्य कामांचा ताण आहे, हे बंद झाले पाहिजे.

पुढे ते म्हणतात, मुलांची ज्ञानाची भूक पाहून डोळ्यात पाणी येते. त्यांना पाहिजे ते सकस ज्ञान आपण देत नाही, हे पाहून फार वाईट वाटते. प्रत्येक गावात 10 वीपर्यंत जिल्हा परिषद शाळा झाली पाहिजे, ही माझी सरकारकडे मागणी आहे. शिवाय ते शिक्षण दर्जेदार झाले पाहिजे. दर्जाहीन शिक्षणाला सरकारी धोरण, शिक्षक, पालक, अधिकारी, राजकारणी जबाबदार आहेत.

आबेगाव शाळेच्या मूलभूत वैशिष्ट्याविषयी विलासभाऊ भरभरून बोलतात. आम्ही प्रत्येकाला शिकण्याची संधी देतो. प्रत्येकाला व्यक्‍त होण्याची संधी देतो. मी स्वत: फुले-शाहू-आंबेडकर-यशवंतराव चव्हाण-साने गुरुजी वाचले आहेत. त्यामुळे शिक्षणाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे. म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्या पाहिजे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, आबेगावचा आदर्श घेऊन जिल्हा परिषद शाळा वाचविण्याची चळवळ उभी राहिली, तर मला आनंद होईल.

आबेगाव : मोडकळीस आलेली मूळ आबेगाव जिल्हा परिषद शाळा.

शिक्षणाच्या अवनतीला सरकारी धोरण जबाबदार : किशोर शेजुळ

आबेगाव जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष अंबिका किशोर शेजुळ यांच्यावतीने त्यांचे पती किशोर शेजुळ यांनी आपले मत मांडले. शाळा शिकून पहिली पिढी यशस्वी झाली; परंतु पुढे मरगळ आली. सरकारी धोरण बदलाचा हा परिणाम आहे. गेल्या 10-15 वर्षाच्या काळात शाळांची अवकळा झाली आहे. शिक्षण व्यवस्थेत झालेले बदल त्याला कारणीभूत आहेत. परीक्षा न घेता सरसकट पास करणे, वेगवेगळे शैक्षणिक पॅटर्न राबविणे, शिक्षणातून सरकारने माघार घेणे, यासारख्या कारणांमुळे जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था आहे. यावर मात करण्यासाठी आम्ही गावकर्‍यांनी लोकसहभाग आणि श्रमदानातून या शाळेचा कायापालट केला आहे.

मॉडेल स्कूल म्हणून केंद्राची मान्यता :

आबेगाव जिल्हा परिषद शाळेच्या ‘लोकसहभागातून…समृद्धीकडे’ विकासाची नोंद घेऊन या शाळेला मॉडेल स्कूल म्हणून केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. शाळेला अत्याधुनिक इमारत, अद्यायावत क्रीडांगण, प्रशस्त वातावरण राखण्यासाठी 5 कोटी 43 लाख रुपयांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविले आहेत. जि. प. सदस्य तथा तुळजा भवानी अर्बन बँकेचे चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी आपले राजकीय कौशल्य पणाला लावून शाळेसाठी 70 लाखाचा खासदार निधी उपलब्ध करून दिला. हा निधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार माजीद मेमन यांनी दिला आहे. या निधीतून 6 वर्गखोल्यांसह आर. सी. सी.ची नवीन इमारत अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आली आहे. शाळेसमोरच क्रीडांगण प्रस्तावित आहे. इनडोअर गेम्ससाठी 2 कोटी 80 लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. तर इमारत विकासासाठी 2 कोटी 63 लाख निधीची गरज आहे. 

शाळा बंद, पण शिक्षण सुरू :

कोरोना काळात शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उद्योजक नारायण शेजुळ पाटील यांनी शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू, अशी संकल्पना मांडली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व गावकरी यांच्या वतीने शिक्षण सुरू ठेवण्याचा संकल्प सोडला. ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ हा उपक्रम 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रत्यक्ष सुरू झाला. विद्यार्थ्यांना शिकवू शकतील अशा स्वयंसेवकांना शिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले. पुरुषोत्तम जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. स्वयंसेवकांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आंतरराष्ट्रीय टिचर सौ. प्रेमल सामाले-शिंदे, अमेरिका यांनी मोफत तीन दिवशीय ऑनलाईन हॅपिनेस प्रोग्रॅम घेतला. माजलगावहून सेवानिवृत्त केंद्रप्रमुख एस. एस. पवार, अयास सिद्दीकी, एल. बी. पोटभरे, संतोष गांजुरे यांनी स्वयंसेवकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचेही वर्ग घेतले. स्वयंसेवकांना विज्ञान विषय व अध्यापन पध्दती याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. राजकुमार राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. स्वयंसेवक, विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी व्यक्‍तिमत्त्व विकास व कथाकथन कौशल्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अ. भा. साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजलगाव येथील महात्मा फुले विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक के. व्ही. गाजरे यांना आमंत्रित करण्यात आले.

स्वयं अर्थसहाय्य तत्त्वावर वर्ग वाढविण्याचा प्रस्ताव :

आबेगाववासियांचे व्हिजन स्पष्ट आहे. सातवीपर्यंत शाळा चालवून भागणार नाही, तर 12 पर्यंत शाळा झाली तर विद्यार्थ्यांसाठी सोयीचे होईल. आर्थिक व सामाजिक भीतीपोटी मुले विशेषत: मुली 8 वीनंतर शिक्षण सोडून देतात. विद्यार्थ्यांनी अर्ध्यावर शिक्षण सोडू नये, यासाठी शासन निर्णय 9 जून 2009 आदेशानुसार 10 ते 12 वी पर्यंतचे वर्ग स्वयं अर्थसहाय्य तत्त्वावर सुरू करण्याचे नियोजित आहे. सध्या 9 वी व 10 वी वर्ग मान्यतेचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड यांच्यावतीने शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परिसरातील ऊसतोड कामगारांची मुले, आत्महत्याग्रस्त पालकांची मुले तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब मुला-मुलींसाठी विनामूल्य वसतिगृह सुरू करण्याचा मानस आहे.

अधिकारी तोबा; ‘या’ भानगडीपेक्षा स्वत:च शाळा काढा :

स्वयं अर्थसहाय्यक तत्त्वावर वर्ग वाढविण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे गेल्यावर अधिकारी चक्रावून गेले. असा काही नियम आहे, हेच त्यांना माहिती नव्हते. त्यामुळे त्यांना शासन निर्णय आणि या निर्णयानुसार मान्यता दिलेल्या शाळांचे पुरावे आम्हालाच जोडावे लागल्याचे शेजुळ सर सांगतात. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वाढीव वर्गांना विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता द्यायची कशी, हा अधिकार्‍यांपुढे प्रश्‍न होता. तेव्हा परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, माळीवाडा, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा बोरगव्हाण व जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, इरळद हे प्रस्ताव मंजूर झाल्याचे पुरावे सादर केले. ‘इतक्या भानगडी करण्यापेक्षा स्वत:च खासगी शाळा सुरू का करत नाहीत’, असे अनाहूत सल्‍ले अधिकारीच देऊ लागले. मात्र, आबेगाववासियांच्या मनोनिग्रहापुढे अधिकार्‍यांनी सपसेल माघार घेत स्वयं अर्थसहाय्य तत्त्वावर वर्गवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. जिल्हा परिषद शाळेचे मूल्य आणि महत्त्व हे अधिकार्‍यांच्या गावीही नसावे, याचेच आश्‍चर्य वाटते.

गुणवत्ता वाढीवर भर देणार : संजय राठोड

मी 2018 पासून या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून रूजू झालो आहे. गावकर्‍यांच्या सहभागातून आणि श्रमदानातून आदर्श शाळेचा पट आपल्या डोळ्यासमोर आहेच. मला शेजुळ सर नेहमी म्हणायचे की, ‘गावात दानत फार आहे, त्याचा उपयोग करून घ्या. म्हणजे नेमकं काय करावयाचे हेच समजत नव्हते’. आबेगाव जिल्हा परिषद शाळेत 1-8 वर्ग आहेत. त्यासाठी 5 शिक्षक असून आणखी 3 शिक्षकांची गरज आहे. गावकर्‍यांनी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, आता गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची नितांत गरज आहे. शिवाय शाळा डिजिटल असली तर दृकश्राव्य साधनांचा विद्याथ्यार्ंना चांगला उपयोग होईल. सरकारने संच मान्यता दिली तर शिक्षकांचाही प्रश्‍न मिटेल. तोपर्यंत गावकर्‍यांच्या मदतीने दोन शिक्षक शाळेत शिकवतात. यापुढे गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्याध्यापक संजय राठोड यांनी सांगितले.

शाळेवर नेमले अतिथि निदेशक :

2018 नंतर संच मान्यता नाही. त्यापूर्वी 99 पटसंख्या होती. आता 162 आहे. संच मान्यता नाही म्हणून शिक्षक भरती नाही. सरकारचे हे उदासिन धोरण आहे. कोरोना काळात स्वयंसेवकांच्या माध्यमातून आबेगाव शाळा सुरू होती. नारायण शेजुळ पाटील यांच्या संकल्पनेतून कोरोनात शाळा सुरू राहिली. शाळेवर तीन शिक्षक कमी आहेत. गावकर्‍यांनी दोन शिक्षक अतिथि निदेशक म्हणून नेमले आहेत. तुळजा भवानी अर्बन बँकेचे चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी एक शिक्षकाच्या पगाराचा जिम्मा उचलला आहे, तर लोकवर्गणीतून दुसर्‍या शिक्षकाचा पगार केला जातो.  

2019 पासून मॅरेथॉन स्पर्धा :

यशवंतराव चव्हाण क्रीडा मंडळ, आबेगावच्या माध्यमातून पूर्वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरत. तेवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा घेणे शक्य नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे मन आणि मस्तिष्कं सुदृढ रहावे यासाठी दरवर्षी दिवाळीला विद्यार्थ्यांची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याची संकल्पना नारायण शेजुळ पाटील यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवली. 2019 ला पहिली मॅरेथॉन झाली. यामुळे विद्यार्थ्यांत उत्साह सळसळला. मंगळवार, दि. 17/11/2020 रोजी विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी ‘गुणवत्ता विकास दौड’ आयोजित करण्यात आली. 2021 ला ‘प्रा. प्रकाश शेजुळ स्मृती दौड’ आयोजित करून त्यांच्या कार्याप्रती आदरांजली वाहण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसं, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. याबाबत विद्यार्थी, पालकांत उत्साहाचे वातावरण आहे.

मंदिर आमच्यासाठी…मुलांना शाळा हवीच :

नवीन शाळेची माहिती घेतल्यानंतर जुन्या गावातून फेरफटका मारला. जुनी शाळा बघितली. शाळेवर अतिक्रमण झाल्याचे दिसले. एका वर्गात म्हैशींचा गोठा, दुसर्‍या वर्गात थाटलेले घर आणि तिसर्‍या वर्गावर चक्‍क भगवा झेंडा डौलाने उभा आहे. याविषयी छेडले असता ‘यावर न बोललेले बरे’, असे सुचक मौन पाळून सर्वांनीच काढता पाय घेतला. गावात मंदिर आहे. पारावर तीन-चार बुजूर्ग दुपारची झोप काढत होते. मंदिराच्या समोरच केस पिकलेले वयस्क माळकरी व्यक्‍ती दिसले. गंगाधरबाबा शेजुळ म्हणून ते गावात परिचित आहेत. त्यांची विचारपूस केली. कसं चाललंय विचारले असता, छान सुरू आहे, गावाची प्रगती होत आहे, शाळाही सुधारत आहे, असे ते हसतमुखाने सांगत होते. ‘काय करायची शाळा, मंदिर आहे नं’, त्यांना अधिक बोलतं करण्याच्या हेतूने प्रश्‍न टाकला, तर ‘मंदिर आमच्यासाठी, शाळा मुलांसाठी’, असे समजूतदारपणाचे उत्तर त्यांनी दिले. संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज यांच्या अभंगातून बोध घेत त्यांनाही शाळेचे महत्त्व कळले असावे. त्यानंतर शेजुळ सरांनी अंगुलीनिर्देश करत ते घर एनजींचे असल्याचे सांगितले. त्यांच्या घरी आई आहेत. त्यांना हल्‍ली ऐकायला येत नाही. ऐकायला येणारं यंत्र बसवावे, असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. औरंगाबादला ‘बंदिवाड्या’त करमत नाही, तिथे जीव गुदमरतो म्हणून येथेच राहते, असे त्या म्हणाल्या. शहरातील संकुचितपणा, बंदिस्तपणामुळे माणूस माणसापासून दुरावत चालल्याचा आईच्या बोलण्याचा होरा होता. आईची रजा घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.

पुढील कृतिकार्यक्रम काय? :

आबेगाव सुमारे 3600 लोकसंख्या असणारे मराठाबहुल गाव. गोसावी, धनगर, चर्मकार, बौध्द, मातंग, मुस्लिम हे समाजघटक गुण्यागोविंदाने येथे राहतात. पूर्वी गोदावरीचे पाणी होते, एकाच पाणवठ्यावरून भरल्या जायचे. आता घरोघरी पाण्याचे नळ आहेत. 25 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. गावात तीन स्मशानभूमी आहेत. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार अनुसूचित जातीसाठी वेगळी, मुस्लिमांसाठी वेगळी आहे. गावात लग्‍न कार्यात, समारंभात एकच पंगत बसते, असा दावा उपस्थितांनी केला. या गावाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मंदिर आणि मशीद एकाच आवारात आहेत. कोणताही तंटा वा बखेडा नाही. यापासून धर्माचे राजकारण करणार्‍यांनी बोध घ्यावा, असे हे उदाहरण आहे. गावात एकच ब्राह्मण कुटुंब आहे. आजही ब्राह्मणांच्या हस्ते धार्मिक वा सांस्कृतिक संस्कार होतात. गावात आदर्श शाळा झाली. तिथे विज्ञानवादी, विवेकवादी संस्कार मुलांवर होतील, तेच संस्कार घरामध्ये आणि समाजात झाले तर पुढील पिढ्या निकोप निपजतील, यात काही वाद असण्याचे कारण नाही.

तात्पर्य : शाळेच्या भिंती बांधताना जात, धर्माच्या क्षीण होत चाललेल्या भिंती मनामनातूनही कायमच्या नष्ट करण्याची गरज आहे. हाच पुढील कृतीकार्यक्रम आबेगावकर राबवतील, या अपेक्षेसह लेखणीला पूर्णविराम! 

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?