दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

दुर्लक्षित घटोत्कच बुध्द लेणीचे ‘आम्ही मार्गदीप’

 दुर्लक्षित घटोत्कच बुध्द लेणीचे ‘आम्ही मार्गदीप’

-सर जेम्स प्रिन्सेप यांची जयंती व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राबवली स्वच्छता मोहीम
-भारतीय पुरातत्व विभाग दखल घेणार?
घटोत्कच लेणी (जंजाळा) : जंजाळा गावाजवळ असलेल्या घटोत्कच बुद्ध लेणीचे विलोभनीय दृश्य पर्यटकांना खुणावत आहे.


भास्कर सरोदे, औरंगाबाद :

मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद जिल्ह्याला वेरूळ-अजिंठा-औरंगाबाद बुद्ध लेणीचा जागतिक वारसा लाभला आहे. लेणींचा जिल्हा म्हणूनही औरंगाबादची वेगळी ओळख आहे. म्हणूनच येथे भारतीय पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक कार्यालय आहे. मात्र, जागतिक वारसास्थळ अजिंठा लेणीचाच भाग असलेली ‘घटोत्कच बुद्ध लेणी’ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन औरंगाबाद येथील ‘आम्ही मार्गदीप’ समूहाने या लेणीची स्वच्छता केली. विशेष बाब म्हणजे या मोहिमेत मुस्लिमबहुल जंजाळा ग्रामवासियांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ‘आम्ही मार्गदीप’ने आपला अहवाल पुरातत्व खात्याला सादर करताना लेणीची दुरुस्ती आणि संवर्धनाची मागणी केली आहे. भारतीय पुरातत्व खात्याला जाग येते का, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

घटोत्कच बुद्ध लेणीचे ऐतिहासिक महत्त्व आणि ‘आम्ही मार्गदीप’च्या स्वच्छता मोहिमेचा वृत्तांत वाचक आणि पर्यटकांच्या ज्ञानात भर टाकणारा आहे.

कोण होते महाराजा घटोत्कच? :

घटोत्कच हे ऐतिहासिक नाव जगाला फारसे परिचित नाही. याबद्दल फारशी माहिती जगाला नाही. त्यांच्याविषयीची ऐतिहासिक माहिती जळगाव येथील घटोत्कच लेणीचे अभ्यासक अजय पवार यांच्याकडून उपलब्ध झाली ती अशी

गुप्त राजवंशाचा संस्थापक श्रीगुप्त (इ.स. 240 ते इ. स. 280) यांचे मोठ्या मुलाचे नाव महाराजा घटोत्कच होते. महाराजा घटोत्कच (इ.स. 280 ते इ.स. 319) नंतर त्यांचा मुलगा चंद्रगुप्त पहिला (इ. स. 319 ते इ. स. 335) व घटोत्कचचा नातू चंद्रगुप्त दुसरा (इ.स.वी. 335 ते इ. स. 356) याने नाग घराण्यातील कन्या कुबेरनागाशी विवाह केला. नाग हे शक्तिशाली सत्ताधारी कुळ होते. या वैवाहिक युतीमुळे चंद्रगुप्त दुसरा याला आपले साम्राज्य वाढवण्यात मदत मिळाली.



प्रभावतीगुप्त ही वाकटक राजा रूद्रसेन दुसरा ( इ. स. 356 ते इ. स.378)  याची मुख्य राणी होती. प्रभावतीगुप्त ही चंद्रगुप्त दुसरा व कुबेरनागापासून झालेली मुलगी होती. पती राजा रूद्रसेन दुसरा याच्या निधनानंतर प्रभावतीगुप्त पतीचे राज्य सांभाळले. या संदर्भातील पुरावा पुणे ताम्रपटात आहे. यांच्या संबंधातील विशेष बाब म्हणजे नाग, वाकटक व गुप्त राजवंश बुध्द, धम्म व संघाचे उपासक होते. अलाहाबाद अशोक स्तंभावरील शिलालेखात महाराज घटोत्कच विषयी माहिती कोरण्यात आली आहे. प्रभावतीगुप्त यांच्या ताम्रपटात महाराज घटोत्कच याचा नावाचा उल्लेख आहे. याशिवाय सेंट पीटरबर्ग या वास्तू संग्रहालयात महाराज घटोत्कच यांचे सोन्याचे एक नाणे संग्रहित आहे. या नाण्यावर ‘श्रीघटोगुप्त’ असे लिहिले आहे.

घटोत्कच का पडले नाव? :

घटोत्कच बुद्ध लेणीचे नाव महाराजा घटोत्कच यांच्या नावावरून पडले आहे. त्यांच्या वारसांनी महाराजा घटोत्कच यांच्या स्मरणात ही लेणी कोरली असावी असा कयास बांधला जात आहे. ही लेणी निश्‍चित कोणाच्या काळात कोरल्या गेली याचा स्पष्ट उल्‍लेख आढळत नाही. मात्र, वॉल्टर स्पिंक यांच्या मतानुसार ‘अजिंठा लेणीचा पुढील टप्पा ही घटोत्कच बुद्ध लेणी होय’. त्याचे कारण देताना त्याने अजिंठा व घटोत्कच येथील बुद्ध विहार, शून्यागार आणि स्तंभाचे साधर्म्य विशद केले आहे.

घटोत्कच लेणीतील शिलालेख :

लेणीच्या प्रांगणात डाव्या बाजूला शिलालेख आहे. ऊन व पाऊस यापासून बचाव करण्यासाठी वर छज्जा आहे. शिलालेख अंदाजे अठ्ठावीस ओळींचा आहे. यातील एक ते दहा ओळी वाचण्यायोग्य आहे. खालील सर्व ओळी नष्ट झाल्या आहेत. वॉल्टर स्पिंक यांच्या मतानुसार हा शिलालेख वाकाटक राजा हरिसेनचा मंत्री वराहदेवने नंतर कोरले आहेत. शिलालेखातील मजकुरावरून त्याच्या विश्‍वासर्हतेवर प्रश्‍नचिन्हं उभे राहिले आहे. मात्र, ह्या शिलालेखातील हस्तिभोज आणि अजिंठा लेणी क्रमांक सोळातील शिलालेखात निर्देशित केलेला हस्तिभोज एकसारखाच आहे.

जगभर होईल आमच्या गावचे नाव!

जंजाळ गाव अत्यंत दुर्गम भागात आहे. सुमारे 1800 लोकवस्तीच्या गावात पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. गावात सोसायटी आहे. आरोग्य केंदाचा अभाव आहे. घटोत्कच लेणीची दुरुस्ती आणि संवर्धन झाले तर अजिंठ्याप्रमाणे आमच्या गावाचे नाव जगाच्या नकाशावर जाईल. गावाचा विकास होऊन रोजगारांच्या संधी वाढतील. सरकारने या लेणीच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे, ही विनंती.

-हनिफ खान, सरपंच जंजाळा

घटोत्कच बुद्ध लेणीचा इतिहास :

सिल्‍लोड तालुक्यातील जंजाळा गावापासून उत्तरेस अजिंठा डोंगर रांगेत सुमारे 500 मीटर अंतरावर घटोत्कच लेणी आहे. कॅप्टन रोझ यांनी ही लेणी सर्वप्रथम निदर्शनास आणली. सर्जन डब्ल्यू. एच. ब्रॅडली यांनी लेणीचे वर्णन केले आहे. अजिंठा लेणीच्या पश्‍चिमेला 11 मैल अंतरावर असलेली घटोत्कच लेणी या दोघांमुळे प्रकाशात आली. बर्गेस जेम्स (Archaeological Survey of Western India, Vol. IX, Report on the Buddhist Cave Temples and their Inscription, 878-79, Indological Book House Varanasi, 1964, P. 60) व वॉल्टर स्पिंक (Ajanta and Ghatotkachha, A Preliminary Analysis, Journal of the American Oriental Society 1974, P.356) या विदेशी लेखकांनी घटोत्कच लेणीची इत्यंभूत माहिती दिली आहे. घटोत्कच लेणीमध्ये एक चौकोनी विहार आहे. त्याला तीन आयताकृती प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वारासमोरच्या भागात सहा अष्टकोनी स्तंभ असून त्यासमोर मोकळा व्हरांडा आहे. आज ही लेणी भग्‍नावस्थेत खितपत पडलेली आहे. येथे पर्यटकांचा नव्हे तर वटवाघळांचा वावर आहे. कोळ्यांच्या जाळ्यांनी वेढलेल्या लेणीला दुरुस्ती आणि देखभालीची गरज आहे. पुरातत्व विभागाने या लेणीचे संवर्धन करून पर्यटनाच्या नकाशावर आणावे, अन्यथा हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

घटोत्कच लेणी (जंजाळा) : औरंगाबाद येथील ‘आम्ही मार्गदीप’ समूहाच्या वतीने घटोत्कच लेणीची स्वच्छता करण्यात आली. यावेळी समूहाचे मुख्य प्रवर्तक शिरीष बनसोडे, डॉ. संजय पाईकराव, सादीक सिंगल-सरपंच नानेगाव, कोळी-ग्रामसेवक जंजाळा, आयुबभाई-चेअरमन जंजाळा, डॉ. संजय वाघ, देविदास बिरारे आदी.


‘आम्ही मार्गदीप’ समूहाकडून स्वच्छता :

तथागत बुद्धांच्या तत्वज्ञानाचा, विचारांचा काळाच्या ओघात दडलेला खजिना असलेल्या धम्मलिपीचे वाचन करून तसेच धम्मलिपीची जगाला ओळख करून देणारे महान संशोधक सर जेम्स प्रिन्सेप यांची (दि. 20 ऑगस्ट 2022) जयंती व भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त ‘आम्ही मार्गदीप समूहामार्फत घटोत्कच लेणीची स्वच्छता करण्यात आली. ही स्वच्छता मोहीम शिरीष बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मभगिनी मांजरमकर मॅडम, निकाळजे सर, कांबळे मॅडम यांच्या नेतृत्वात करण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष अनुभव कथन केला.

सिल्‍लोडपासून 35 किलोमीटर अंतरावर जंजाळा गाव आहे. अत्यंत दुर्गम असून मुस्लिमबहुल गाव. ‘आम्ही मार्गदीप’ लक्झरी बसने सहपरिवार जंजाळा गावाला पोहोचलो. सरपंच, ग्रामसेवक व गावकर्‍यांनी आमचे स्वागत केले. ‘घटोत्कच लेणीची स्वच्छता करण्यासाठी आलो आहोत’, असे त्यांना सांगितले. लेणी स्वच्छ झाली आणि पर्यटकांचा राबता होईल या विचारानेच त्यांना खूप आनंद झाला. आम्ही गावातील लहान मुलांना खाऊ वाटप केला. मुलांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. जंजाळा गावातून लेणीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे बस येथेच थांबवून गावकरी आम्हाला लेणीकडे पायवाटेने घेऊन गेले. चिखल तुडवत, दगडांना ठेचकाळत लेणीपर्यंत गेलो. लेणीवर जाण्यासाठी दगडी पायर्‍या आहेत. निसर्गाच्या कुशीत, खोल दर्‍यांत आणि हिरवाईने नटलेले लेणीचे विलोभनीय दृश्य पर्यटकांना खुणावणारे आहे. डोंगरातून वाहणारे झरे, पक्षांचा किलबिलाट, मोरांच्या आवाजाने मन हारखून जाते. लेणीच्या बाहेर निसर्गरम्य वातावरण असले तरी प्रत्यक्ष लेणी खूपच दुर्लक्षित आहे. रस्ता, वीज व इतर सुविधांचा अभाव दिसून आला. लेणीच्या प्रवेशद्वारावरच चिखल आणि घाण आढळून आली. लेणीत मोठ्या प्रमाणात वटवाघळांचा ठिय्या दिसून आला. वटवाघूळ पक्षांच्या विष्ठेचा एक फुटाचा थर व दुर्गंधी पसरलेली होती. एकाच वेळेला एवढी माणसं पाहून पक्ष बिथरले. इकडून तिकडे घिरट्या घालत फडफडू लागले. काहीतरी अघटित होत असल्याचा भास त्यांना झाला असावा. कधीकाळी या लेणीत भिक्खू निवास करत असतील! ध्यानधारणा करण्यासाठी भिक्खूंसाठी खास शून्यागारांची निर्मिती लेणीत आहे. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे ही लेणी वटवाघुळांचे अधिवास बनले, असे खेदाने म्हणावे लागते.

‘आम्ही मार्गदीप’चे मुख्य प्रवर्तक शिरीष बनसोडे, महिला, पुरुष आणि गावातील तरुणांनी लेणी स्वच्छतेचे काम तातडीने हाती घेतले. लेणीची स्वच्छता झाल्यावर बॅटरीच्या उजेडात लेणी बघितली. तथागत बुद्धाची मूर्ती आजही हा प्रदेश, हा देश बुद्धाचा असल्याची साक्ष देतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागाचे डॉ. संजय पाईकराव यांनी लेणीचा इतिहास सांगितला. शेवटी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

घटोत्कच अजिंठा लेणीचाच भाग

घटोत्कच लेणी ही अजिंठा लेणीचाच एक भाग आहे. येथे दोन लेणी असून स्थापत्य दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ही लेणी वराहदेव जो वाकाटक राजा हरिशेणचा प्रधान होता, त्यांनी ही लेणी कोरली आहे. भव्य असा विहार असून त्यामध्ये बोधिसत्व, बोधिशक्तीच्या मूर्ती आहेत. त्याचबरोबर गर्भगृहात बुद्धाची भव्य मूर्ती असून सेवक गंधर्व पुष्पवृष्टी करत आहेत. बाहेरील बाजूस नागराजाचे शिल्प, सख्खनिधी, पद्मनिधी यक्ष असून वराहदेव यांनी 28 ओळींचा धम्मलिपित शिलालेख कोरला असून त्यात धम्माविषयी माहिती दिली आहे.

-डॉ. संजय पाईकराव
इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

गावकर्‍यांनी केला पाहुणचार! :

जंजाळा ग्रामवासियांनी आमच्यासाठी भोजनाचा पाहुणचार केला. पडत्या पावसात त्यांनी बेसन रोटी बनवून आमच्यासाठी आणली होती. अत्यंत प्रेमाने बनविलेली बेसन रोटी सर्वांनी तितक्याच आपुलकीने खाल्‍ली. गावकर्‍यांना आमच्याविषयी आणि आम्हाला त्यांच्याविषयी जिव्हाळा वाटत होता. असं प्रेम खेड्यातच मिळू शकते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. यावेळी सादीक सिंगल-सरपंच नानेगाव, कोळी-ग्रामसेवक जंजाळा, आयुबभाई-चेअरमन जंजाळा, डॉ. संजय वाघ, ग्रामस्थ, तरुण उपस्थित होते.



‘आम्ही मार्गदीप’चा पुरातत्व विभागाला अहवाल :

पुरातत्व विभागाने घालून दिलेल्या 18 अटींच्या अधिन राहून ‘आम्ही मार्गदीप’ समूहाकडून 20 ऑगस्ट 2022 रोजी ‘घटोत्कच लेणी व परिसर’ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात 35 सदस्यांनी सहभाग घेतला.

स्वच्छता मोहिमेंतर्गत करण्यात आलेली कामे

  1. लेणीच्या आतील चौकोनी विहारातील प्लॅस्टिक, काडी-कचरा गोळा करण्यात आला.
  2. लेणीत सर्वत्र पसरलेली वटवाघळांची विष्ठा आणि मलमुत्र काढण्यात आले.
  3. लेणीच्या भिंतींना स्पर्श न करता दारे, खिडक्यांवर जमा झालेली जळमटं साफ केली.
  4. लेणीच्या बाहेरील प्लॅस्टिक, काडी-कचरा जमा करण्यात आला.

लेणी व परिसरात आढळून आलेल्या बाबी

  1. लेणीच्या मुख्य विहाराच्या छताला एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत मोठी भेग पडलेली असून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजुला छतामधून पाणी टपकत असल्याचे दिसले. सदरील भेग दुरुस्त करणे आवश्यक आहे.
  2. लेणी व परिसरात विजेची व्यवस्था नसल्याने वटवाघळांचा वावर वाढलेला आहे. लेणीत दृश्यमानता कमी असून अंधारामुळे साप, विंचू आदी सरपटणार्‍या प्राण्यांचा लेणीत आढळ असल्यास पर्यटकांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे महावितरणमार्फत विद्युत व्यवस्था अथवा सौर उर्जेद्वारे प्रकाश व्यवस्था करणे आवश्यक आहे.
  3. लेणीच्या बाहेर असलेल्या शेषनाग शिल्पाची पाणी, वारा, वादळ, उन्हं आदींमुळे झीज होत असून त्यावर संरक्षण उभे करणे गरजेचे आहे.
  4. जंजाळा गावातून लेणीपर्यंत जाण्यासाठी शेतांमधून पायवाट आहे. पावसामुळे ही वाट निसरडी बनत असून पर्यटकांना लेणीपर्यंत पोहचणे कठीण बनते. त्यामुळे गावातून लेणीपर्यंत पक्‍का सिमेंट रस्ता बनवणे आवश्यक आहे.
  5. लेणीच्या समोरून जंजाळा गावातील पशुपालक आपल्या पशुंची ने-आण करत असल्यामुळे लेणीची नासधूस होणे तसेच अस्वच्छता पसरणे आदी बाबी होत आहेत. त्यामुळे पशुपालकांच्या वर्दळीला बंधन घालणे आवश्यक आहे.

घटोत्कच लेणी व परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यास परवानगी दिल्यामुळे पुरातत्व विभागाचे आभार मानताना निदर्शनास आणून दिलेल्या बाबींवर कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षाही या अहवालात करण्यात आली आहे. या अहवालावर ‘आम्ही मार्गदीप’ मुख्य प्रवर्तक शिरीष बनसोडे व प्रवक्‍ता अमित उम्रजकर यांच्या स्वाक्षरी आहेत.

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?