दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

राष्ट्रध्वज : अशोकाच्या कल्याणकारी राज्याची पुनर्स्थापना

राष्ट्रध्वज : अशोकाच्या कल्याणकारी राज्याची पुनर्स्थापना

राष्ट्रध्वज


राष्ट्र ध्वजातील अशोक चक्र हे भारताच्या प्राचीन संस्कृतीतील अनेक बाबींचे प्रतीक आहे, ज्यास अशोकाच्या नावामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. सम्राट अशोक हा केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या इतिहासातही महत्त्वाचा आहे. आज भारत ज्या संघर्ष व असहिष्णुतेच्या वातावरणातून जात आहे, त्यावेळेला अशोकाचे नाव अधिकच महत्त्वाचे बनते. कारण प्राचीन काळात भारताने काही विशिष्ट मूल्यांना धारण केले होते. त्यामुळेच तो आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकला. भारत हे कधीही संकुचित राष्ट्र नव्हते, त्याने दुसर्‍या राष्ट्रांचा कधीही तिरस्कार केला नाही. अनेक उलथापालथी घडल्या मात्र भारत प्राचीन काळापासून काही मूलभूत मूल्यांवर ठामपणे उभा आहे. त्याची पायाभरणीच या मूल्यांवर झालेली आहे. भारताची खरी ताकद या मूल्यांमध्येच आहे. त्यात सर्वात महत्त्वपूर्ण जे मूल्य आहे, ते म्हणजे स्वीकारर्हता.

कोणत्याही राष्ट्रासाठी त्याचा ध्वज व राजमुद्रा ही प्रतिके अत्यंत महत्त्वाची असतात. या प्रतिकांमधून त्याची अस्मिता व त्याने ज्या मूल्यांचा आणि ध्येयांचा अंगिकार केला आहे, त्याची प्रचिती येत असते. ही प्रतिके जनतेला सतत प्रेरणादायी अशी असतात. भारताने जो ध्वज व राजमुद्रा स्वीकारली आहे, त्यास एक ऐतिहासिक संदर्भ असून प्राचीन भारतात सम्राट अशोकाने जे आदर्श व कल्याणकारी राज्य प्रस्थापीत केले होते, त्याची सतत प्रेरणा मिळत रहावी म्हणून अशोकाच्या काळातील अनेक प्रतिकांचा घटनासमितीने जाणीवपूर्वक स्वीकार केला होता. शासन व प्रशासनात असलेल्यांनी अशोकाने स्वीकारलेल्या मूल्यांपासून प्रेरणा घेऊन आपले कर्तव्य पार पाडावे आणि जनतेतही त्या मूल्यांचा प्रचार प्रसार करावा, अशी घटनाकारांची अपेक्षा होती.

स्वातंत्र्यपूर्व काळात 1904 पासूनच स्वराज्याचा ध्वज कोणता असावा? यासाठीचे प्रयत्न सुरु झाले होते. स्वामी विवेकानंद शिष्या भगिनी निवेदिता यांनी सर्वप्रथम असा प्रयत्न करून एक ध्वज डिझाईन केला होता. त्यानंतर अनेकांनी तो वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य आंदोलन काळात जो ध्वज होता, तो पिंगळी व्यंकय्या यांनी डिझाईन केलेला होता. त्यात पांढरा, हिरवा आणि लाल रंगांच्या तीन आडव्या पट्ट्या आणि मध्यभागी चरखा होता. हे तीन रंग अल्पसंख्याक, मुस्लीम व हिंदु या संप्रदायाशी नाते सांगणारे होते. आणि ‘चरखा हा उत्पादन व सामान्य माणसाचे’ प्रतीक होता. हा ध्वज आयरीश ध्वजासारखा दिसत असल्याने व त्यांच्या रंगांचा संबंध संप्रदायांशी जोडला गेल्याने काँग्रेसने 1931 साली त्यात थोडाफार बदल करून ध्वजातील रंगांचा संप्रदायांशी असलेला संबंध संपुष्टात आणला.

स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला जून 1946 मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक 13 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. ज्यात मौलाना आझाद तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजगोपालाचारी, सरोजीनी नायडू, के. एम. मुन्शी, पं. नेहरू यांच्यासारखे विद्वान हिंदू नेते होते. या समितीने शिफारस केलेला ध्वज घटनासमितीने स्वीकारला. ध्वजसमिती समोर जेव्हा ध्वजाचा प्रश्न आला तेव्हा अस्तित्वात असलेल्या ध्वजात पांढरा, हिरवा आणि नारंगी हे तीन रंग व ध्वजाच्या मध्यभागी चरखा होता. ध्वजसमितीला सूचनावजा जे टीपण देण्यात आले होते, त्यानुसार नारंगी रंगाऐवजी इतर दुसरा रंग आणि चरख्याऐवजी इतर दुसरे चक्र घेण्यासाठी विचार करावा, असे सुचविले गेले होते. ध्वजसमितीने नारंगी ऐवजी भगवा रंग आणि चरख्याऐवजी निळ्या रंगाचे अशोकचक्र असलेल्या ध्वजाची शिफारस केली व ती घटनासमितीने स्वीकारली. 

ध्वजातील रंगांमागचे तत्त्वज्ञान :

घटनासमितीत 22 जुलै 1947 रोजी ध्वजासंबंधीचा प्रस्ताव सादर करताना पं. नेहरुंनी अत्यंत भावपूर्ण असे भाषण करून दोन ध्वज सादर केले होते. एक खादीचा आणि दुसरा सील्कचा. घटनासमितीने खादीचा ध्वज मंजूर केला. ध्वजात वरच्या बाजुस भगवा, मध्यभागी पांढरा व सर्वात खाली हिरवा रंग, तर पांढर्‍या रंगाच्या पट्टीत निळ्या रंगाचे अशोक चक्र होते. रंगांचा कोणत्याही संप्रदायाशी संबंध नाही, असे नेहरूंनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. ध्वज समितीत सदस्य असलेल्या फ्रँक अँथनी यांनीसुद्धा आपल्या भाषणात म्हटले होते की, समितीत हे स्पष्ट करण्यात आले होते की, ध्वजाचा कोणत्याही धार्मिक उद्देशाशी किंवा महत्त्वाशी संबंध नाही. एक खरे की, ज्या ध्वजाखाली आपण स्वातंत्र्य लढा लढलो, तो ध्वज कायम ठेवण्यात आला आहे. तो कोणत्याही विशिष्ट समुदायाचा नव्हे तर समस्त भारतीयांचा ध्वज आहे. तो आपल्या भूतकाळाचे प्रतीक असून भविष्यातही आपल्याला प्रेरणा देत राहील.असे असले तरी ध्वज मंजूर करताना अनेक सदस्यांनी आपल्या मनोगतात ध्वजाचे धार्मिक-अध्यात्मिक दृष्टिकोनातून विश्लेषण केले होते. अनेक वक्त्यांनी भाषणे केली असली तरी राधाकृष्णन, मो. सादुल्ला, एच. जे. खांडेकर आणि गोविंद मालवीय यांची भाषणे विशेष आणि ध्वजाचे महत्व विषद करणारी होती. राधाकृष्णन् म्हणाले होते की, सध्या जग हे विचित्र अवस्थेतून जात असून सर्वत्र कल्पनावाद पसरलेला आहे. आपली बुद्धी काल्पनिक गोष्टींद्वारे भ्रमिष्ठ केली जात आहे. जगात गैरसमज, संशय व अविश्वास आहे आणि अशावेळी आपण आपला ध्वज निश्‍चित करीत आहोत. ध्वजातील पांढरा रंग प्रकाशाचा द्योतक असून तो अंध:कार नष्ट करेल. आपल्याला प्रकाश, सत्य व पारदर्शक अशा साधेपणाने मार्गक्रमण करणाची प्रेरणा देईल. या मार्गावर चालल्याशिवाय आपणास सत्य प्राप्त होणार नाही. भगवा रंग हा त्यागाचा प्रतीक आहे. ‘सर्वे त्यागाराज धर्मेषु दृष्टा’ म्हणजे राजधर्मामध्ये सर्वप्रकारचे त्याग समाविष्ट असले पाहिजेत. आपले नेते ‘अलोभी’ असावेत. जग धनवानांचे नाही तर विनम्र व विनयशिलांचे आहे, याची जाणीव भगवा रंग करून देत जाईल. हिरवा रंग हा आपले पृथ्वीशी नाते असल्याचे दर्शवितो.पृथ्वीवरील सर्व सजिवांशी आपले नाते जोडतो.

आसाम प्रांतातून मुस्लीम लीगचे प्रतिनिधी म्हणून घटनासमितीवर निवडून गेलेल्या मो. सादुल्ला यांनी राष्ट्रीय ध्वजाची निसर्गाशी तुलना करून म्हटले की, ध्वजातील भगवा रंग हा पृथ्वीचे प्रतिनिधीत्व करतो, जी सूर्याच्या उष्णतेने भाजल्यामुळे करडी झाली आहे. पांढरा रंग पाण्याचे प्रतीक आहे. पावसाचे पाणी आणि बर्फाच्छादीत पहाडांमधून वाहणार्‍या नद्यांचे पाणी जेव्हा खाली येते, तेव्हा आपली उजाड जमीन हिरवीगार होऊन आपल्याला अन्नधान्याच्या माध्यमातून समृद्ध करते. राजकीय संघर्षात पृथ्वीप्रमाणे भाजलेले आपले दिवस आता आशावादाने भरलेले आहेत. भगवा रंग हा हिंदू-मुस्लीम संप्रदायातील आध्यात्मीक जीवन जगलेल्यांचे प्रतीक आहे. तो आपल्याला सदैव उदात्त अशा सर्वसंग परित्यागाची आठवण करून देत जाईल, जे आपले साधु, पीर, फकीर आणि विद्वान खरोखर जगले आहेत. पांढरा रंग हा हिंदू-मुस्लीम  परंपरेत पावित्र्याचा प्रतीक समजला जातो. हा रंग आपणास वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात पावित्र्याची शिकवण देत राहील. तर हिरवा रंग भारतीय स्वातंत्र्याच्या उठावाची आठवण करून देतो. 1857 च्या उठावात बहादूरशहाने जो ध्वज धारण केला होता, त्याचा रंग हिरवा होता. इतकेच काय तेराशे वर्षांपूर्वी अरेबियातील ग्रेट प्रॉफेटच्या ध्वजाचाही रंग हिरवाच होता. 

मध्यप्रांतातील मागासवर्गीयांचे नेते असलेल्या एच. जे. खांडेकरांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले होते की, ध्वजातील भगवा रंग हा आपल्या समाजाचे प्रतीक आहे. कारण भगवा ध्वज घेऊनच शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्यासाठी लढले. अनेकांनी त्यासाठी बलीदान दिले. इतकेच काय कोरेगाव भीमा येथे सिध्दनाक महार याच भगव्या झेंड्याखाली लढला. त्याची साक्ष कोरेगावातील स्तंभावर आहे. म्हणून पहिला जो ‘भगवा रंग’ आहे, तो माझ्या समूदायाचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतता आणि पावित्र्याचे प्रतीक असून तो देशातील एकतेचाही प्रतीक आहे. हा ध्वज प्रत्येक धर्माचे आणि भाषेचे प्रतिनिधित्व करतो.

गोविंद मालविय यांनी ध्वजातील रंगांवर भाष्य करताना म्हटले होते की, ध्वजातील हिरवा रंग मुस्लिमांचे, पांढरा रंग ख्रिश्चन व इतर समूदायांचे आणि भगवा रंग शिख व हिंदुचे प्रतिनिधित्व करीत आहे. वेदात ध्वजाचा रंग लाल असावा, असे म्हटले आहे. त्यामुळे हिंदुच्या ध्वजाचा रंग लाल असायला पाहिजे. आपण असेही म्हणू शकतो की, ध्वजाच्या वरच्या भागात जो लाल रंग आहे, तो अग्नी व सूर्याचे आणि पांढरा रंग चंद्राचे प्रतिनिधित्व करतोय. हिंदू आणि आर्य लोक अगदी सुरुवातीपासून सूर्य, अग्नी व चंद्राची पूजा करीत आलेले आहेत. हा ध्वज या दैवतांचे प्रतिनिधित्व करतोय. आणि सर्वात शेवटी जो हिरवा रंग आहे तो आपल्या मुस्लिम बांधवांचे प्रतिनिधित्व करीत आहे. इतकेच नव्हे तर तो नऊ ग्रहातील सर्वश्रेष्ठ अशा बुध ग्रहाचेही प्रतीक आहे. जी संपत्तीची देवता समजली जाते. त्यामुळे हिरवा रंग हा समाजाच्या समृद्धी व आनंदाचा प्रतीक आहे. हिंदूंसाठी यापेक्षा अधिक चांगला ध्वज दुसरा कोणता होऊच शकत नाही. जो अग्नी, सूर्य, चंद्र आणि बुध यांचे प्रतिनिधित्व करीत आहे.

राष्ट्रध्वज

अशोकचक्र : शांतम्-शिवम्-सुंदरमचे प्रतीक : 

स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस पक्षाच्या ध्वजावर चरखा होता. जो उत्पादन व सामान्य माणसाचा प्रतीक होता. स्वतंत्र भारतासाठी ध्वजसमितीने जो ध्वज निर्धारित केला, त्यावर चरख्याऐवजी सारनाथ येथे असलेल्या अशोक स्तंभावरील चक्र घेऊन त्यास निळा रंग बहाल केला. जो आकाश, महासागर आणि सार्वजनिक सत्याचा प्रतीक समजला जातो. ध्वजात महान सम्राट अशोकाचे चक्र स्वीकारताना भारतात अशोकाचे आदर्श व कल्याणकारी राज्य पुन्हा निर्माण व्हावे, अशी घटनाकारांची मनोकामना होती. चरखा हटवून कोणतेही चक्र स्वीकारण्यास गांधीजीचा प्रखर विरोध होता. चरखा नसलेला ध्वज मी मान्य करणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली असतानाही घटना समितीने त्याकडे दुर्लक्ष केले. आणि प्राचीन भारतात तसेच जगात सुप्रसिद्ध अशा अशोक चक्रास आपलेसे केले.

घटनासमितीत ध्वज प्रस्ताव सादर करतांना पं. नेहरू म्हणाले होते की, ध्वजातील अशोक चक्र हे भारताच्या प्राचीन संस्कृतीतील अनेक बाबींचे प्रतीक आहे, ज्यास अशोकाच्या नावामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. सम्राट अशोक हा केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या इतिहासातही महत्त्वाचा आहे. आज भारत ज्या संघर्ष व असहिष्णुतेच्या वातावरणातून जात आहे, त्यावेळेला अशोकाचे नाव अधिकच महत्त्वाचे बनते. कारण प्राचीन काळात भारताने काही विशिष्ट मूल्यांना धारण केले होते. त्यामुळेच तो आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकला. भारत हे कधीही संकुचित राष्ट्र नव्हते, त्याने दुसर्‍या राष्ट्रांचा कधीही तिरस्कार केला नाही. अनेक उलथापालथी घडल्या मात्र भारत प्राचीन काळापासून काही मूलभूत मूल्यांवर ठामपणे उभा आहे. त्याची पायाभरणीच या मूल्यांवर झालेली आहे. भारताची खरी ताकद या मूल्यांमध्येच आहे. त्यात सर्वात महत्त्वपूर्ण जे मूल्य आहे, ते म्हणजे स्वीकारर्हता. नकार हा आपल्या तत्वातच नाही, जगाला केवळ देणे आणि जगाकडून काही स्वीकारयचे नाही, असा विचार करणे हा मूर्खपणा आहे. एखादे राष्ट्र असा विचार करते तेव्हा ते अधिकच कर्मठ बनून त्याचा विकास खुंटतो. त्याचा उलटा प्रवास सुरू होऊन ते र्‍हास पावते. आपण जर भूतकाळाचा अभ्यास केला तर हे अधिक स्पष्ट होते. भारताने जेव्हा- जेव्हा जगाशी संबंध तोडून स्वतःला कोषात बंद करून घेतले, तेव्हा-तेव्हा भारताचा र्‍हास झाला आहे. आणि जेव्हा-जेव्हा भारताने जगाकडे हात पुढे केले, आपले दूत, गुप्तहेर, व्यापारी बाहेर पाठविले आणि बाहेरचे स्वीकारले, तेव्हा-तेव्हा भारताने प्रगती केली आहे. या दृष्टीकोनातून पाहिल्यास अशोकाचा काळ हा भारताच्या इतिहासातील खर्‍या अर्थाने ‘आंतरराष्ट्रीय काळ’ होता.तेव्हा संकुचित राष्ट्र संकल्पनेचा त्याग करण्यात आला होता. या कालखंडात भारताचे दूत हे साम्राज्य किंवा साम्राज्यवादाचे प्रतिनिधी म्हणून जगात गेले नाही, तर शांती-संस्कृती व सदिच्छा दूत म्हणून जगभर गेले. म्हणून भारताचा ध्वज हा सम्राज्य व साम्राज्यवादचे प्रतीक नाही तर ‘स्वातंत्र्याचे’ प्रतीक असून केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर जे-जे त्यास पाहतील त्या सर्वांसाठी आहे. भारतीय प्रतिनिधी या ध्वजासह जगात ज्या-ज्या ठिकाणी जातील, त्या ठिकाणी स्वातंत्र्य, बंधुभाव व मैत्रीचा संदेश घेऊन जातील.

एक विद्वान व सक्रिय सदस्य व फॉरवर्ड ब्लॉकचे नेते असलेल्या एच. व्ही.कामथ यांनी अशोक चक्रात ‘स्वस्तिक’ टाकण्याची सूचना केली होती. स्वस्तिक हे गतीशील अशा शांतीचे प्रतीक आहे. जी निष्क्रिय नव्हे तर कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करू शकते, असे ते म्हणाले होते. मात्र आपण जो ध्वज स्वीकारला आहे, त्यात स्वस्तिक टाकणे शक्य नाही. कारण ते बेजोड दिसेल, याची जाणीव झाल्याने त्यांनी आपली सूचना वापस घेऊन, अशोकाच्या चक्रातून ‘धर्मचक्र किंवा विधीचक्र’(Wheel Of Law) याचा अर्थबोध होतो, असे म्हटले होते. त्यांच्यामते, अशोकचक्र हे ‘संसारचक्र’ असून शाश्वत अशा शांतम्-शिवम्-सुंदरम या तत्वाभोवती फिरते. ही तत्वे विश्वात समाविष्ट आहेत.

गोविंद दास यांनी अशोकचक्राचे भारतीय संस्कृतीतील महत्व विषद करताना म्हटले होते की, कलिंगाचे युद्ध जिंकल्यानंतर अशोकाने संपूर्ण जगाला प्रेमाने एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. त्याकाळी अशोका सारखा सम्राट जगात नव्हता.

मोहम्मद सदुल्लांनी गांधीजींचा चरखा काढून त्याऐवजी अशोकाच्या धर्माचक्राचा स्वीकार करताना ते स्वीकारणार्‍यांना दैवी प्रेरणा प्राप्त झाली असावी, असे म्हटले होते. त्यांच्यामते, अलीकडे चरख्यामागचा असलेला मुळ दृष्टीकोन दूषित झाला आहे. चरखा धारण करणारेच हिंसात्मक घटनांमध्ये सहभागी असल्याचे दिसून आले आहे. म्हणून चरख्याऐवजी अशोकचक्र स्वीकारल्याबद्दल समाधान व्यक्त करताना ते म्हणाले होते की, ‘धर्मचक्र हे आपणास बुद्धिष्ट सम्राट अशोकाच्या काळातील लोकांच्या स्थितीची आठवण करून देते. अशोकाने स्वतःच्या प्रगतीसाठी नव्हे तर समाधान, शांती आणि जनतेच्या समृद्धीसाठी राज्य केले. हे चक्र आता राज्यकर्ते व नागरिकांना भूतकाळ विसरून भविष्याकडे बघण्याच्या महान अशोकाच्या परंपरेचे जतन करण्याचे स्मरण करून देईल. आपली केवळ भौतिकच नव्हे तर अध्यात्मिक प्रगती सुद्धा व्हायला हवी, याची तो सदैव जाणीव करून देईल’. 

बाळकृष्ण शर्मांनी अशोक चक्रातील गतीचे महत्व विषद करताना म्हटले की, बृहदारणक्य उपनिषदात म्हटले आहे की, निद्रेत असणे कलियुग आहे, चक्षु उघडणे द्वापारयुग आहे, उठून उभे राहणे हे त्रेतायुग आहे, तर गती हे सतयुग आहे. तिरांग्यातील धर्मचक्र आपल्याला सत्ययुगाकडे घेऊन जात आहे.उपनिषदांची शिकवण आहे की, ‘चराईवेती-चराईवेती’. भगवान बुद्ध सुद्धा म्हणाले आहेत की, ‘चरावेती खिहावे चराईवेती’, म्हणजे प्रयत्नपूर्वक आणि सतत चालत रहा, चालत रहा कोठेही थांबू नका.

गोविंद मालवीय यांनी ध्वजतील अशोकचक्र हे आत्यंतिक महत्त्वाचे असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले की, हिंदूमध्ये अवतारांना फार महत्त्व आहे. जेव्हा-जेव्हा पृथ्वीवर अधर्म, दुःख आणि समस्या निर्माण होतात, तेव्हा-तेव्हा पृथ्वीवर सुव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून सत्य आणि सन्मार्ग याचे मार्गदर्शन करण्यासाठी कोणती तरी दैवी शक्ती अवतार घेत असते, असे हिंदूशास्त्र सांगते. ज्याप्रमाणे भगवान कृष्ण एक अवतारी पुरूष होते. तसे भगवान बुद्ध सुद्धा होते. सुदर्शन चक्र हे कृष्णाचे दैवी अस्त्र होते. तेच चक्र आपण ध्वजात घेतले आहे. थोडक्यात हिंदूंची अनेक प्रतिके या ध्वजात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. म. गांधी सुद्धा अवतारी पुरूष आहेत आणि हा ध्वज त्यांचेही प्रतीक आहे.

तामिळनाडूतील एस. नागप्पा या मागासवर्गीय सदस्यास ध्वजातील अशोक चक्र हे विष्णूचेही चक्र असल्याचे वाटले होते. जे सृष्टीचे चक्र असून संपूर्ण जगाला शांती, प्रगती व समृद्धीकडे घेऊन जाते. पूर्वी हा ध्वज काँग्रेसचा ध्वज म्हणून ओळखला जात असे. आता मात्र तो ‘भारतीय राष्ट्रीय ध्वज’ म्हणून ओळखला जाईल. जो सर्व धर्मीयांचा असेल.

ओरिसातील लक्ष्मीनारायण साहूंनी अशोकचक्राची तुलना जगन्नाथाच्या ‘नीलचक्राशी’ केली होती. ते म्हणाले की, मला ध्वजातील अशोकचक्र हे पुरीतील जगन्नाथाच्या हजारों वर्षांपासून शाश्वत असलेल्या नीलचक्राची आठवण करून देते. ज्या सोबत ‘पतीत पावन ध्वज’ सुद्धा असतो. जो गरिबांचे आणि अस्पृश्यांचे प्रतिनिधीत्व करतो. मला या चक्रामुळे कलिंगा आणि मगध यांच्याशी संबंधित अनेक बाबींची आठवण येत आहे. अशोक मगध म्हणून कलिंगला जाऊन लढला होता. युद्धात अतोनात मानवी संहार झाल्यामुळे त्याचे हृदय परिवर्तन होऊन तो एक उद्दात मनुष्य बनला होता. एका अर्थाने कलिंगाने अशोकाला जिंकले होते. कलिंगाने अशोकाला अहिंसेचा मार्ग दाखविला होता. आजही ओरिसात असलेले अशोकाचे संदेशस्तंभ जगाला व संपूर्ण मानव जातीला सेवेचा संदेश देत आहेत. म्हणूनच मला वाटते, हा ध्वज केवळ राष्ट्रीय नाही, तर आंतरराष्ट्रीय आहे. कारण चक्र हे शाश्वतेचे प्रतीक आहे. ध्वजावर सर्वात शेवटी सरोजीनी नायडू बोलल्या. त्या ध्वज समितीतही होत्या. त्यांनी भारतीय ध्वज हा जागतिक शांतता, बंधुभाव आणि समता याचे प्रतीक असून ध्वजाखाली भारत मातेला तिची सर्व लेकरे सारखीच असल्याचे उद्गार काढले होते. अशोक चक्रातील आशय स्पष्ट करताना त्या म्हणाल्या होत्या की, ध्वजावर जे चक्र आहे, ते महान सम्राट अशोकाचे धर्मचक्र आहे. ज्याने जगभर शांती आणि बंधूभावाचा संदेश पाठविला होता. हे चक्र राष्ट्रहित व राष्ट्रकृतीचे प्रतीक आहे. चक्र हे गतीचे (समय) प्रतीक आहे. जे न थांबता निरंतर फिरत राहते. ते सूर्यकिरणांचे प्रतीक आहे. मानवी मन व शाश्वतेचे प्रतीक आहे. ते भारतातील सामान्य माणसाचेही प्रतीक आहे. ते भारताच्या ऐतिहासिक वारशाचे सुद्धा प्रतीक आहे. अशोक चक्र हे सुचित करते की, भारत आपले मित्र व शत्रूकडूनही ज्ञान प्राप्त करतो. इतकेच काय, भारताच्या समुद्रासमान संस्कृतीत जगातील सर्वच संस्कृतींनी भर घातलेली आहे. उदा. ईस्लामने भारतात लोकशाहीबंधूत्व आणले, पारशी समूदायाने भारताला निर्भीड धैर्य हा गुण दिला आहे, तर ख्रिश्चनांनी आपणास सेवेचा पाठ शिकविला आहे. अशोकचक्र आपणास विशाल दृष्टिकोन स्वीकारण्याची शिकवण देते. या ध्वजाखाली कोणी राजा नाही आणि कोणी रंक नाही, कोणी धनवान नाही आणि कोणी निर्धन नाही. कोणालाही खास अधिकार प्राप्त नाहीत. तर कर्तव्य, जबाबदारी आणि त्याग याचे निर्वहन करणे आहे.

परिपूर्ण शासक आणि सेवक निर्माण होवोत :

प्राचीन काळी ग्रीसमध्ये प्लेटोने आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी तत्त्वज्ञ शासकाची कल्पना मांडली होती. प्लेटोच्या कल्पनेप्रमाणे जगात कुठेही तत्त्वज्ञ शासकांचे राज्य निर्माण होऊ शकले नाही. स्वतः प्लेटोने करून पाहिलेला प्रयोग देखिल फसला होता. भारतात म. गांधींनी सुद्धा रामराज्याची संकल्पना मांडली होती. आणि घटना समितीत गांधीजींचे ग्रामस्वराज्याचे मॉडेल स्वीकारण्यात यावे यासाठी जोरदार प्रयत्न सुद्धा करण्यात आले होते. मात्र पाश्चात्य लोकशाही जवळून अनुभवलेल्या सुजान नेत्यांनी गांधीजींचे मॉडेल व त्यांचा हट्ट मान्य केला नाही. भारताला एक मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी त्यांनी प्राचीन काळी भारतात गणराज्यांच्या स्वरूपात अस्तित्वात असलेल्या आणि आधुनिक जगात काही पाश्चात्य देशात सुचारूपणे काम करीत असलेल्या लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केला. भारताला खरोखरचे आदर्श राज्य बनविण्यासाठी घटनाकारांनी प्राचीन भारतात आदर्श राज्य म्हणून अस्तित्वात असलेल्या सम्राट अशोकाच्या प्रतिकांचा स्वीकार केला. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र हे जाणीवपूर्वक निवडण्यात येऊन गांधीजींचा चरखा हटविण्यात आला. चक्रातील प्रत्येक आरे हे एका-एका गुणाचे प्रतीक आहे. हे गुण शासक व लोकसेवकांनी धारण करावेत म्हणून त्याची सतत आठवण राहण्यासाठी अशोकाने धर्मचक्राची निर्मिती केली असावी. सारनाथ मधील अशोकाचे चक्र हे शक्तिमान अशा चार सिंहाच्या मजबूत खांद्यावर स्थिरावलेले आहे. ते भौतिक शक्तीवरील अध्यात्मिक शक्तीच्या नियंत्रणाचे प्रतीक आहे.

घटनासमितीने जे चक्र स्वीकारले आहे, त्यात 24 आरे आहेत. मात्र, अशोकाच्या मूळ चक्रात 32 आरे होते. सारनाथमधील चक्राचा काही भाग पडझड झाल्याने नेमके किती आरे आहेत, हे समजू शकले नव्हते; परंतु सांचीतील चक्रात 32 आरे शाबूत आहेत. 1957 मध्ये काही नामांकित संसद सदस्यांनी ही बाब नेहरूंच्या लक्षात आणून देऊन झालेली चूक सुधारण्याची मागणी केली होती; परंतु नेहरुंनी आता तसे करणे योग्य होणार नाही, असे म्हटले होते. कारण चक्रातील आरे कमी अधिक झाले तरी अशोकाच्या मूळ संदेशात कोणताही फरक पडत नाही, असे त्यांचे मत होते, जे खरेच होते.

भारतीय पुरातत्व खात्याने अशोक चक्रातील प्रत्येक आर्‍याचा अर्थ स्पष्ट करताना त्याचे काही गटात विभाजन केले आहे. प्रत्येक गटातील आर्‍यांमध्ये बुद्धांची शिकवण समाविष्ट असून त्यात अष्टांगीक मार्गांचा समावेश करण्यात आलेला आहे. अशोकचक्र हे चार, आठ, सोळा, चोवीस आणि बत्तीस आर्‍यांचेही असू शकते.

पुरातत्व खात्याने अशोक चक्राचा स्पष्ट केलेला अर्थ पुढीलप्रमाणे आहे.

गट- अ:

1) सम्यक दृष्टी : यात चार दृष्टिकोनांचा समावेश आहे. उदा. जगात दुःख आहे. दु:खाचे कारण (उगमस्रोत) असते. दुःखातून मुक्ती मिळविता येते. अष्टांगीक मार्गांचा अवलंब केल्यास दुःखातून मुक्ती मिळविता येते.

2) सम्यक संकल्प: यात तीन दृष्टिकोन आहेत. उदा. योग्य मार्गक्रमण करण्यासाठी लोकसेवकांनी कामेच्छा, दूष्टभावना आणि क्रौर्य यापासून अलिप्त राहिले पाहिजे.

गट-ब:

3) सम्यक वाणी: यात चार दृष्टिकोनांचा समावेश आहे. उदा. लोकसेवकाने असत्य, वायफळ, कर्कश व मूर्खपणे बोलू नये.

4) सम्यक कर्म: यात चार दृष्टिकोन असून लोकसेवकांनी हिंसा, चोरी, अनैतिक संबंध व मादक द्रव्यांपासून प्रयत्नपूर्वक दूर राहिले पाहिजे, असे सांगितले आहे.

5) सम्यक उपजीविका: यात पाच दृष्टिकोन आहेत. राज्यात मानवी व्यापार, तसेच मादक पेये, विष, गुलाम आणि शस्त्रांचा व्यापार होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

गट : क

6) सम्यक व्यायाम: यात चार दृष्टिकोन आहेत. लोकसेवकांसह सर्वांनीच वाईट बाबींपासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोनाचा अवलंब केला पाहिजे.

7) सम्यक स्मृती: यात चार दृष्टिकोनांचा समावेश आहे. शरीर, भावना, मन आणि मनोव्यापार याबाबत लोकसेवकांनी योग्य दृष्टी स्वीकारल्याशिवाय ते योग्य कार्य करू शकत नाहीत, असे सुचविलेले आहे.

8) सम्यक समाधी: यात चार दृष्टिकोन आहेत. लोकसेवकांनी अंतरमनाच्या विकारातून मुक्ती मिळवून चित्ताचे स्थैर्य प्राप्त केले पाहिजे. जेणेकरून ते आपले कर्तव्य योग्यपणे पार पाडू शकतील.

तथागत बुद्धांच्या अष्टांगीक मार्गाचे प्रत्यक्ष जीवनात पालन करून आपले कर्तव्य पार पाडावे याची सतत आठवण व्हावी म्हणून अशोकाने अशोकचक्राची निर्मिती केली असावी. त्याने स्वतः या तत्त्वांचे पालन करून प्राचीन भारतात आदर्श राज्य प्रस्थापित केले होते. आणि आपण अंगिकारलेल्या मूल्यांचा संदेश जगभर प्रसारित केला होता. म्हणूनच घटनाकारांनी कोणत्याही काल्पनिक सिद्धांताच्या नादी न लागता प्राचीन भारताचा वैभवशाली वारसा म्हणून अशोकाच्या प्रतिकांचा स्वीकार करून शासक-प्रशासक व प्रजेला अशोकाच्या आदर्श राज्यासारखे राज्य पुन्हा निर्माण करण्याची प्रेरणा दिली.

राजमुद्रा : बुद्धाच्या विविध छटा :

देशासाठी जसा ध्वज महत्त्वाचा असतो. तसेच राजमुद्राही महत्त्वाची असते.त्यातून त्या देशाची ओळख होत असते. ध्वजसमितीने ध्वज निर्धारित करताना त्यावर अशोकाचे चक्र स्वीकारून अशोकाच्या आदर्श राज्यावर जसे शिक्कामोर्तब केले, तसे अशोकाच्या स्तंभावरील चार सिंहाचे शिल्प हे आपली राजमुद्रा म्हणून स्वीकारून प्राचीन काळी ज्या मूल्यांसाठी भारत जगात ओळखला जात असे, त्यास पुन्हा धारण केले. अशोकस्तंभावरील सिंह शिल्प स्वीकारताना ध्वज समितीने त्यात थोडेफार बदल केले आहेत. उदा. सिंहांच्या खांद्यावरील चक्र काढून ते ध्वजावर घेतले. तसेच ज्या कमळ फुलावर (जे आज राष्ट्रीय फूल आहे) अशोकस्तंभ उभा आहे, ते कमळ फुल देखील काढले आणि चार दिशांना तोंडे असलेले व खालच्या बाजूस विविध प्राण्यांच्या  प्रतिमा असलेले शिल्प जे बुद्धाच्या विविध छटांचे प्रतीक आहे स्वीकारले.  तसेच त्यावर मुंडक उपनिषदातील ‘सत्यमेव जयते’ ज्याचा अर्थ सत्याचा नेहमी विजय होतो. हे घोषवाक्य घेतले.

पुरातत्व खात्याने स्पष्ट केल्यानुसार अशोक स्तंभावरील चार दिशांना गर्जना करीत धावणारे सिंह हे प्रत्यक्षात बुद्धाचे प्रतीक आहे. ज्यास शाक्य सिंह म्हणून ओळखले जाते. स्तंभाच्या खालच्या बाजूस चार चक्रे आहेत, ती मध्यवर्ती प्रदेशांचे प्रतीक आहे. आणि त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी आहेत, ते बुद्धाचे प्रतीक आहे. अभ्यासकांनीही या प्रतिकांचा अर्थ स्पष्ट केलेला आहे.

राजमुद्रेवर असलेले व चारही दिशांना धावणारे सिंह हे धैर्य, स्वाभिमान, शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. हे चार सिंह बुद्धाच्या जीवनातील चार अवस्थांचे प्रतीक समजले जातात. बुद्धाला प्राप्त झालेल्या ज्ञानाचेही ते प्रतीक आहेत. राजमुद्रेवर सिंहाच्या खालच्या बाजूस असलेले वृषभ, हत्ती व घोडा हे प्राणी सुद्धा बुद्धाशी संबंधित आहेत. वृषभास इंग्रजीत Taurus the zodiac sign of Buddha असे म्हटले जाते. हत्ती हा प्रारंभ तर घोडा मार्गक्रमण याचे प्रतीक आहे. बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी सारनाथमध्ये जे पहिले प्रवचन दिले त्याचे प्रतीक हत्ती असून, प्रवचनानंतर बुद्धांनी सारनाथ सोडून जे मार्गक्रमण केले, त्याचे घोडा हे प्रतीक आहे. हे सर्व प्राणी धर्मचक्राने वेगवेगळे करण्यात आलेले आहेत.

घटनासमितीने या प्रतिकांची जाणीवपूर्वक निवड केली. कारण प्राचीन भारतात सर्वदूर अशोकाचे साम्राज्य असताना येथील प्रजाही बौद्ध धर्मीयच असणे सहाजिक आहे. बहुजनांची संस्कृती असलेल्या श्रमण संस्कृतीची ही प्रतीके आहेत. त्यांचे पुनर्जीवन करून घटनाकारांनी एका समृद्ध अशा प्राचीन वारशाची भेट देशवासीयांना दिली. तिरंग्यास (जो चौरंगी आहे) वंदन करताना ही मूल्ये व वारसा आपण सतत लक्षात ठेवणे आवश्यक आहे. खासकरून ही प्रतीके राज्यकर्त्यांसाठी आहेत. राज्य शकट चालविताना त्यांनी या प्रतिकांचे सतत स्मरण केले पाहिजे, ही त्यांची जबाबदारीच आहे. तरच ते भारतात कल्याणकारी राज्य निर्माण करू शकतील. या प्रतिकांच्या मागील तत्वज्ञानाच्या जाणिवेचा अभाव असल्यानेच राज्यकर्ते भरकटताना दिसून येतात, असे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू असताना खेदाने म्हणावे लागते. तत्कालीन सर्वोच्च विद्वानांचा समावेश असलेल्या ध्वज समिती आणि घटना समितीने विचारपूर्वक आणि जाणिवपूर्वक स्वीकारलेल्या राष्ट्रीय प्रतीकांची मोडतोड होत असताना वेदना मात्र निश्‍चितच होतात. भारत देश, भारतीय लोकशाही आणि भारतीय राज्यघटनेसाठी हा संक्रमणाचा काळ आहे. त्यातून निभावण्यासाठी देशातील विद्वानांनी पुढे आले पाहिजे. अन्यथा अनर्थ अटळ!

-प्रा. डॉ. राजेंद्र शेजूळऔरंगाबाद, मो. नं. : 9404614671

(लेखक संविधान तज्ज्ञ असून त्यांचा ‘भारतीय संविधान : तत्व आणि व्यवहार’ हा ग्रंथ लवकरच प्रकाशित होणार आहे.)

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?