दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

विद्यापीठं आरएसएसच्या शाखा!

 विद्यापीठं आरएसएसच्या शाखा!

‘बशा’ एक्सक्ल्युझिव्ह : मुंबई विद्यापीठातील घृणास्पद प्रकार

मुंबई, नागपूर : लोकशाही भारतात परवानगीशिवाय कुणालाही शस्त्र बाळगण्याचा अधिकार नाही. मग दसर्‍याच्या दिवशी आरएसएसकडून ज्या अत्याधुनिक शस्त्रांची पूजा केली जाते, त्याची परवानगी आहे का? हा प्रश्‍न आजपर्यंत शासन वा प्रशासनाला पडू नये, याचेच आश्‍चर्य वाटते. लोकशाही आणि सहिष्णू भारतात असे शस्त्रांचे प्रदर्शन कशासाठी? असाही प्रश्‍न कुणी विचारत नाही. आजतर तसे विचारण्याची सोयच नाही! नागपूरच्या रेशीम बागेतील संघ मुख्यालयातील ही शस्त्रे उद्या विद्यापीठातील वाचनालयात दिसली तर नवल वाटू नये! कारण देशातील विद्यापीठंच आता आरएसएसच्या शाखा म्हणून वर्तन करू लागल्या आहेत!
भास्कर सरोदे, औरंगाबाद (शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021) :
तर्कशास्त्र, मानववंशशास्त्र, पदार्थविज्ञान आदी विषयांत संशोधन, विचार कौशल्य प्रवीण विद्यार्थी बनावेत, त्याद्वारे सर्जनशील पीढी घडावी, समताधारित समाजाचा विकास व्हावा, यासाठी विद्यापीठांची निर्मिती झालीय. स्वातंत्र्यानंतर यादृष्टीने थोडेफार प्रयत्नही झाले. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. मात्र, विज्ञानवादी, मानवतावादी, लोकशाहीवादी विचार रूजण्याआधीच विद्यापीठांमध्ये पुराणमतवादी, अवैज्ञानिक विचारांची नियोजनबद्ध पेरणी संस्थात्मक पातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय स्वयं सेवक संघ (आरएसएस) पूरक वा समर्थक कुलगुरूंमुळे विज्ञानवादी, लोकशाहीवादी, समतावादी, मानवतावादी तथा परिवर्तनवादी विचारांची गळचेपी सुरू आहे. विद्यापीठांमध्ये आरएसएस हितचिंतकांनाच आमंत्रणं दिली जाताहेत. परिवर्तनवादी विचारवंतांना शक्यतोवर टाळले जात असून चुकून एखादा परिवर्तनवादी वक्‍ता वा प्रमुख पाहुणा आमंत्रित केलाच तर त्याला आमंत्रित करणार्‍या संबंधितांना प्रचंड प्रमाणात टॉर्चर केले जात आहे. मुंबई विद्यापीठात एप्रिल 2021 मध्ये असाच प्रकार घडला. ओबीसी विचारवंत प्रा. श्रावण देवरे यांच्या भाषणामुळे कुलगुरूंचे पित्त खळवले आणि संबंधित निमंत्रक प्राध्यापकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. प्रा. श्रावण देवरे यांना हा प्रकार समजताच त्यांनी कुलगुरूंच्या नावे स्पष्टीकरण देताना ‘माझ्या भाषणामुळे कुणाची मनं दुखावली असतील तर शिक्षा मला व्हावी, संबंधित प्राध्यापकांना नाही’ असे दीर्घ पत्र लिहिले असून ते बहुजन शासकसाठी खास उपलब्ध झाले आहे. या पत्रातील मजकूर वाचला असता हा प्रकार केवळ मुंबई विद्यापीठातच घडला असे नाही तर देशातील बहुतांश विद्यापीठांत तो सुरू असून आरएसएसची ती अड्डे बनली आहेत. मुंबई विद्यापीठात घडलेला प्रकार जशाच्या तशा प्रा. श्रावण देवरे यांच्याच शब्दात प्रातिनिधीक स्वरूपात देत आहोत.
माननीय प्रा. सुहास पेडणेकर
महोदय,
मुंबई विद्यापीठाच्या दूर शिक्षण (IDOL) विभागातर्फे या वर्षी फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने 14 एप्रिल 2021 रोजी डॉ. पी.जी. जोगदंड व माझे (श्रावण देवरे) अशा दोन वक्त्यांची अनुक्रमे फुले व आंबेडकर यांच्या विचारांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात आपण स्वतः (प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात
प्र. कुलगुरू रवींद्र कुळकर्णी, प्र. कुलसचिव डॉ. बलीराम गायकवाड, IDOL विभागाचे संचालक प्रा. प्रकाश महान्वर, उपसंचालकांसह अनेक विभागप्रमुख व प्राध्यापक-प्राध्यापिका उपस्थित होते. जोगदंड सर व माझे व्याख्यान झाल्यानंतर आमच्या वैचारिक मांडणीबद्दल आभार व्यक्त करण्यात आलेत. सर्वांनी आमच्या व्याख्यानांचे कौतुक केले.
त्यानंतर दुसर्‍या दिवशी (15 एप्रिल रोजी) ट्वीटरवरून (सोशल मीडियाकडून) मला असे समजले की, Legal Rights Observatory - LRO या खोट्या नावाने कुणीतरी संयोजकांविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. ट्वीटरवरील पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, हिंदूधर्माचा द्वेष करणार्‍या श्रावण देवरेंच्या भाषणात हिंदूंना शिव्या देण्यात आलेल्या असल्याने कार्यक्रमाच्या संयोजकांची चौकशी व्हावी व त्यांचेवर गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणीही ट्वीटरवरील पोस्टमध्ये करण्यात आलेली आहे. 
त्यानंतर संयोजक प्राध्यापकांचा मला फोन आला असता मी त्यांना स्टष्टपणे सांगितले की, माझ्या व्याख्यानात मी जे काही बोललो आहे, त्याची जबाबदारी माझीच आहे. त्यामुळे कुणाला पोलिसात गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यांनी माझ्यावर (प्रा. श्रावण देवरेंवर) गुन्हा दाखल केला पाहिजे, संयोजकांवर नाही. वक्त्याने काय बोलावे व काय बोलू नये हे संयोजक ठरवत नसतात. त्यामुळे संयोजकांवर गुन्हा दाखल करणे म्हणजे वडाचे तेल वांग्यावर टाकणे होय. ज्या मुर्खांना वड व वांग्यामधला फरक कळत नाही, अशा बालीश लोकांच्या सांगण्यावरून प्राध्यापकांसारख्या जबाबदार व्यक्तींवर कारवाई करणे फारच दुःखदायक आहे. मात्र, निर्णायक व मोठ्या पदांवर बसलेल्या काही पक्षपाती लोकांमुळे हे बालीश लोक शेफारतात व चांगल्या संस्थेचा सत्यानाश घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. 
यात महत्वाचा; परंतु वादाचा मुद्दा करण्यात आला आहे तो हिंदू धर्माचा! मला ट्विटरमधील पोस्टमध्ये ‘‘हिंदू-द्वेष्टा’’ म्हटलेले आहे. मी माझ्या व्याख्यानात हिंदूंना शिव्या दिल्या आहेत, असेही पोस्टमध्ये म्हटलेले आहे. वास्तविक माझ्या 40 वर्षांच्या कारकीर्दीतील लेख, पुस्तके, व्याख्याने व भाषणे पाहिलीत तर असे दिसून येईल की, माझ्यासारखा ‘‘हिंदू-अभिमानी’’ बोटावर मोजण्याइतकेच सापडतील. मी ज्यांना गुरू मानतो, ते तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेसुद्धा हिंदूअभिमानीच होते. त्यांनी हिंदू धर्मातील आदर्श राजा बळीराजा आम्हाला पुनर्परीचित करून दिला. भाद्रपदातील पितृपक्ष वा श्राद्धपक्ष हा हिंदू धर्माचा अखिल भारतीय सण-महोत्सव आहे. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी संशोधन करून या हिंदू सणाचे महत्व पटवून दिले आहे. या सणाला खान्देशात भालदेवाचा सण म्हणजे बळीराजाचा सण म्हणतात. मात्र कारस्थानी आर्यांनी आपल्या वैदिक धर्माच्या प्रेमापोटी हिंदूंच्या बळीराजाला पाताळात घातले. त्या क्रांतीकारक हिंदू बळीराजाची बदनामी करण्यासाठी वैदिक-ब्राह्मणांनी अनेक पोथ्या-पुराणे व भाकडकथा लिहिल्यात. हिंदूअभिमानी असलेल्या तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंनी हिंदूंच्या बळीराजाला पाताळातून वर काढले व त्याचा क्रांतीकारक इतिहास लिहून जगासमोर मांडला. छत्रपती शिवाजी हे सुद्धा हिंदूच होते. मात्र परकीय आक्रमक असलेल्या वैदिक पेशव्यांनी शिवरायांचे हिंदू-स्वराज्य बुडवले व त्यावर वैदिक धर्माचा झेंडा लावला. शिवरायांची समाधी विस्मृतीत ढकलली. तात्यासाहेबांनीच ती समाधी शोधून काढली. 35 पानांचा दीर्घ पोवाडा लिहून छत्रपती शिवाजी राजाचा क्रांतीकारक इतिहास जगासमोर मांडला. अशाप्रकारे बळीराजाप्रमाणेच शिवाजी राज्यालाही पाताळातून वर काढण्याचे पवित्र कार्य तात्यासाहेब जोतीराव फुलेंनी केले. हिंदू धर्मातील खंडोबा, म्हसोबा, जोतिबा, कुलमाता, गणमाता या सर्व पवित्र देवी-देवतांचा गौरवशाली इतिहास तात्यासाहेबांनीच लिहिलेला आहे (वाचाः महात्मा फुले समग्र वाडःमय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे प्रकाशन, संपादक डॉ. य. दि. फडके, सुधारित सहावी आवृत्ती, नोव्हेंबर 2006). यावरून सिद्ध होते की, तात्यासाहेब महात्मा फुले हेच खरे हिंदू संस्कृतीचे अभिमानी होते. मी त्यांचाच कृतीशील शिष्य असल्याने माझे हिंदू संस्कृतीबद्दलचे प्रेम काया-वाचा-मनी व लेखनीतून भरभरून वाहत असते. मात्र आमच्या सिंधू-हिंदू संस्कृतीला विद्रुप व विकृत करून हिंदू धर्मात चोर मार्गाने घुसखोरी करणार्‍या वैदिक धर्माच्या लोकांबद्दल तात्यासाहेब महात्मा फुलेंना प्रचंड चीड होती. आजही हे परकीय वैदिक धर्माचे लोक जेम्सलेनसारख्या तथाकथित संशोधकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या हिंदू-राजांची बदनामी करीतच असतात. त्यामुळे सच्च्या राष्ट्रप्रेमी माणसाचे हे प्राथमिक कर्तव्य आहे की त्याने वैदिक धर्माच्या आर्य-भटांची हिंदूविरोधी षडयंत्रे उघडकीस आणली पाहिजेत व त्यांना वठणीवर आणले पाहिजे. याच राष्ट्रप्रेमापोटी तात्यासाहेबांचे शिष्य असलेल्या बाबासाहेबांना ‘रिडल्स इन ब्राह्मिनिझम’ लिहून आर्यभटांचे कारस्थान उघड करावे लागले (वाचाः Dr. Babasaheb ­Ambedkar Writings and Speeches, Education Department, Government of Maharashtra Publication, Vol-4, The Riddles of Vedas, page-128).
काही संघीस्ट वैदिकांची पिलावळ माझ्या व्याख्यानातील काही मुद्दे तोडमोड करून अपप्रचार करीत आहेत व संयोजक प्राध्यापकांवर कारवाईची मागणी करीत आहेत. आधी त्यांनी ट्वीटरवरून पोलीस कारवाईचा धाक दाखविला. मात्र, अशा पोलीस कारवाईला IDOL च्या संयोजकांनी भीख घातली नाही. व्याख्याता म्हणून माझ्यावर पोलीस कारवाई करा, असे मी स्वतःच जाहीर केले. त्यामुळे पोलीस कारवाईला घाबरून संयोजक व वक्ते शरण येतील व माफी मागतील, हा त्यांचा अंदाज खोटा ठरला. या छुप्या संघी-वैदिकांचा हा बार फुसका ठरल्यानंतर आता त्यांनी दुसरी शक्कल शोधून काढली. आता ते तुमच्यावर (म्हणजे कुलगुरूंवर) दबाव आणून संयोजक प्राध्यापकांवर कारवाई करण्याचा बालीश-हट्ट धरीत आहेत. कुलगुरूंवर दबाव आणणारे हे लोक नेमके कोण आहेत, त्यांची नेमकी तक्रार काय आहे व विद्यापीठाशी त्यांचा काय संबंध आहे, याबाबतीत कुलगुरू म्हणून आपण खुलासा केला पाहिजे. संघी-वैदिकांनी माझ्या व्याख्यानावर आक्षेप घेणारी लेखी तक्रार केली असल्यास त्याची एक झेरॉक्स प्रत संयोजकांना नोटीस पाठवितांना दिली पाहिजे होती; परंतु आपण त्यांची नावे उघड करीत नाहीत व त्यांनी केलेली लेखी तक्रारही आपण कोणाला दाखवीत नाहीत, यामुळे कुलगुरू म्हणून तुमच्या विश्वासार्हतेला व एकूणच तुमच्या नैतिकतेला तडा जातो आहे, असे आम्हाला वाटते.
विद्यापीठाला बदनाम करणार्‍या या संघी-वैदिकांची नावे लपवून आपण त्यांना प्रोत्साहन देत असल्यामुळे या चोरांची आता हिंमत वाढली आहे. आता त्यांनी नवाच नीच-प्रकार सुरू केलेला आहे. या संघी-वैदिकांनी माझ्या व्याख्यानातून 2-2 मिनिटांच्या छोट्या क्लीफ तयार करून, त्यात तोड-मोड करून त्या क्लीफ सोशल मीडियातून व्हायरल केल्या जात आहेत. त्यांच्यात थोडाजरी प्रामाणिकपणा असता तर तरी त्यांनी माझे संपूर्ण व्याख्यान जसेच्या तसे व्हायरल केले असते. संपूर्ण याख्यान सलगपणे ऐकल्यानंतर कोणालाही ते आक्षेपार्ह वाटणारच नाही. 14 एप्रिल रोजीच्या कार्यक्रमात लाईव्ह टेलिकास्ट होत असताना माझे व्याख्यान अनेकांनी ऐकले आहे. माझ्या व्याख्यानाबद्दल अनेकांनी स्तुती केली, चांगली वैचारिक मांडणी केल्याबद्दल माझे कौतुकही झाले. ऑयडॉल विभागाकडून मला तशा आशयाचे आभारपत्रही प्राप्त झाले आहे.
माझ्या 40 वर्षांच्या सामाजिक कारकिर्दीत अनेक नामवंत विद्यापीठांमध्ये अनेकवेळा माझी व्याख्याने, पेपरवाचन झालेले आहेत. सूरत विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, पुणे विद्यापीठ अशी बरीच मोठी नामावली होऊ शकते. मुंबई विद्यापीठातही यापूर्वी माझी अनेक व्याख्याने झालेली आहेत. माझ्या व्याख्यानातील अनेक मुद्यांवर खडाजंगी चर्चा व वाद झालेले आहेत; परंतु त्यातून कधीही कटूता निर्माण झाली नाही व विद्यापीठातील वातावरण गढूळही झाले नाही. सर्व कार्यक्रम अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नैतिकतेला धरूनच झाले आहेत. प्रत्येक संस्थेत संघी-वैदिक धर्माचे लोक असतातच, त्याप्रमाणे या सर्व उपरोक्त विद्यापीठांमध्ये संघी-वैदिक असतीलच! त्यांनीही त्या त्या विद्यापीठांमध्ये माझ्या व्याख्यानांबद्दल तक्रारी केल्या असतीलच! मात्र त्या विद्यापीठांचे कुलगुरू शैक्षणिक व विद्यापीठीय नीतीमत्तेला जागून कामकाज करीत असल्यामुळे त्यांनी अशा ऐर्‍या-गैर्‍या लोकांचे तक्रारअर्ज कचर्‍याच्या डब्ब्यात फेकून दिले असणार! या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी जर सोम्या-गोम्या संघीवैदिकांचे ऐकूण काही कारवाई केली असती तर ‘‘हलक्या कानाचा कुलगुरू’’ म्हणून त्यांची निर्भत्सना झाली असती; परंतू हे सर्व कुलगुरू जड कानांचे असल्यामुळे तेथील ऐर्‍या-गैर्‍या संघीवैदिकांची तोंडे त्यांनी तेथल्या तेथे दाबून टाकली असणार! त्यामुळे त्या विद्यापीठांचा नैतिक व शैक्षणिक दर्जा निश्चितच उंचावला आहे.
मात्र, आपण मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पदावर बसलेले असताना या संघी-वैदिकांना पाठीशी का म्हणून घालत आहात? जे लोक आपली नावे उघड करायलाही घाबरतात अशा भेकड लोकांचे ऐकूण आपण जबाबादार प्राध्यापकांवर कारवाई का करीत आहात? आपण या सोम्या-गोम्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांची हिंमत वाढली व ते आता माझ्या व्याख्यानाचे सुटे-सुटे तुकडे करून त्यात तोडमोड करून त्यांच्या क्लीफ बनवीत आहेत व त्या सोशल मीडियावरून व्हायरल करीत आहेत. या भेकड संघी-वैदिकांमध्ये थोडी जरी हिंमत असती, तर त्यांनी माझे पूर्ण व्याख्यान सलगपणे व्हायरल केले असते. मात्र संघीवैदिकांमध्ये तेवढी हिंमत व तेवढी नैतिकता यायला अनेक युगे खर्ची जाणार आहेत. या भेकड वैदिकांनी माझ्या व्याख्यानातील मुख्य मुद्दा ‘‘विद्यापीठ जाळण्याचा’’ केला आहे. माझे व्याख्यान सलगपणे ऐकले तर हा जाळण्याचा मुद्दा नीटपणे समजून घेता येईल; पण ज्याला वेड घेऊन पेड गावाला जायचेच आहे, त्यांना काय समजून सांगणार? पण सूज्ञ लोकांसाठी मला हा मुद्दा विषद करावा लागेल.
तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाची जी व्याख्या केली आहे, ती मी माझ्या व्याख्यानात विस्ताराने मांडली आहे. जेव्हा तात्यासाहेब महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंनी त्यांनी सुरू केलेल्या शाळेत अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून ‘‘ब्राह्मणांचे कसब’’, ‘‘ब्राह्मणांची लबाडी’’ ‘‘धर्माच्या पडद्याआड ब्राह्मणांनी लादलेली गुलामगिरी’’ आदी विषय शिकवायला लागलेत, तेव्हा त्यांच्या ब्राह्मण मित्रांनी विरोध करताना सांगितले की, ‘या शूद्रादि अतिशूद्र मुलांना बाराखडी ती काय शिकवायची! ब्राह्मणांच्या लबाड्या वगैरे शिकवण्याची गरज नाही. तेव्हा तात्यासाहेब स्पष्टपणे म्हणतात की,‘‘ --- परंतु पुढे जेव्हा मी त्या शाळांत भटांच्या पूर्वजांच्या कृत्रिमी पुस्तकातील लबाड्या उघड्या करून मुलांस दाखवू लागलो, तेव्हा त्यांचा (म्हणजे माझ्या भट मित्रांचा) माझा आंतल्या आंत बोलण्या-चालण्यामध्यें बेबनाव होऊं लागला. त्यांचे (म्हणजे माझ्या भट मित्रांचे) म्हणण्याचा कल असा दिसून आला कीं, या अतिशूद्रांच्या मुलांस विद्या मुळींच देऊं नये. जर कदाचित त्यांस शिकवणेंच भाग पडले, तर त्यांची साधारण अक्षरओळख मात्र करून द्यावी. माझे म्हणणे असें होतें कीं, त्यांना चागले प्रतीची विद्या देऊन तिजपासून त्यांस आपले बरे वाईट समजण्याची शक्ति यावी,---’’(महात्मा फुले समग्र वाडःमय, उक्त, पान-193, कंसातील शब्द व जाड ठसा माझा).
तात्यासाहेब महात्मा फुलेंचा शिक्षणाविषयीचा हा सिद्धांत विषद केल्यानंतर मी माझ्या व्याख्यानात प्रश्न विचारला की, ‘‘आजही शाळा, कॉलेजात व विद्यापीठातून आपले बरे-वाईट समजण्यास शक्ती देणारे शिक्षण मिळते काय? बालवाडी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊनही ती व्यक्ती जर सत्यनारायनाची पूजा करीत असेल तर त्यास मिळालेले शिक्षण कुचकामी म्हटले पाहिजे. ज्या विद्यापीठांमधून अधिकृतपणे सत्यनारायणाची पूजा घातली जाते, त्या विद्यापीठांमध्ये कोणत्या लायकीचे शिक्षण दिले जात असेल, याची कल्पनाच केलेली बरी! आज जर तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले जिवंत राहिले असते, तर त्यांनी सत्यनारायणाची पूजा घालणार्‍या विद्यापीठांना त्यातील कुलगुरु-प्राध्यापकांसकट पेट्रोल टाकून जाळले असते…’’.
विद्यापीठ जाळण्याचा आणखी एक संदर्भ माझ्या भाषणात आहे. याच कार्यक्रमात माझ्याआधी डॉ. प्रा. पी. जी. जोगदंड यांचे व्याख्यान बाबासाहेबांच्या विचार-कार्यावर झाले. डॉ. जोगदंड यांनी अनेक नामवंत विद्यापीठांमध्ये जबाबदार पदांवर काम केले असून अनेक विद्यापीठीय कमिट्यांमध्ये त्यांनी नेतृत्व केले आहे. जोगदंड सरांनी त्यांच्या व्याख्यानात खंत व्यक्त करताना म्हटले की, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना आपण नेशन बिल्डर म्हणतो, ज्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो, त्या बाबासाहेबांचे ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ हे पुस्तक विद्यापीठात अभ्यासक्रमाला लावण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेत. मात्र हे पुस्तक आजही विद्यापीठात अभ्यासक्रमाला लावले गेले नाही.
जोगदंड सरांच्या व्याख्यानातील हा मुद्दा मी उचलून धरला व सांगितले की, ‘बाबासाहेबांची पुस्तके अभ्यासक्रमात लावायला जी विद्यापीठे नकार देत असतील, ती विद्यापीठे जाळून टाकण्याच्या लायकीची आहेत’. जाळ-पोळ करणे, तोड-फोड करणे, विनाश घडवणे, उध्वस्त करणे, खून, दंगली, चोर्‍या करणे आदी हिंसात्मक कामे आपल्या भारतीय इतिहासात फार मोठ्याप्रमाणात झालेली आहेत व आजही ही कामे उजळमाथ्याने केली जात आहेत. भारताचा इतिहास या रक्तबंबाळ पानांनी भरून पडलेला आहे. त्यातील पहिले उदाहरण खुद्द तात्यासाहेबांनीच आपल्या ग्रंथात लिहून ठेवले आहे. वैदिक धर्माचा अभिमानी असलेल्या परशरामाने हिंदू धर्माच्या क्षत्रियांचा 21 वेळा समूळ नाश केला आहे. हिंदू क्षत्रियांच्या गरभार स्त्रीयांचा पाठलाग करून खून केला आहे. या क्रूरकर्मा परशूरामाचा इतिहास वैदिकधर्मियांनी आपल्या ग्रंथात मोठ्या गर्वाने लिहून ठेवलेला आहे. तात्यासाहेब महात्मा फुले यांनी ‘गुलामगिरी’ ग्रंथात याचे सविस्तर विवेचन केलेले आहे (महात्मा फुले समग्र वडःमय, उक्त, पानः 42-43, 129, 168-171, 295-296, 393, 489, 550, 568, 598, 608, 614).
जाळपोळ, खून, विध्वंस, सत्यानाश, उध्वस्त अशी सर्व हिंसक व क्रूर कार्यांचे रेकॉर्ड एकट्या परशूरामाच्या नावाने झालेले आहे. आणि ह्या क्रूरकार्यांची नोंद करण्याचे काम खुद्द वैदिकधर्माच्या साहित्यिकांनीच आपल्या पुराण ग्रंथात करून ठेवलेली आहे. जगात असा एकही पुत्र नाही की जो आपल्या जन्मदात्या आईचा खून करेल; परंतु वैदिकधर्मी असलेल्या परशूरामाने तेही रेकॉर्ड आपल्या नावे करून ठेवलेले आहे. जे लोक ‘जन्मदात्या आईचा खून करणार्‍या परशूरामाला ‘देव’ मानीत असतील, ते लोक कीती नीच प्रवृत्तीचे असतील, याची कल्पना येते.
वैदिक धर्मियांचा दुसरा मोठा आदर्श महापुरूष इंद्र आहे. तो देवांचा म्हणजे आर्यवैदिकांचा राजा आहे. त्याचे दुसरे नाव ‘पुरंदर’ असे आहे. वैदिक ग्रंथांमध्ये ‘पुरंदर’ या शब्दाचा अर्थ दिलेला आहे… धरणे फोडणारा, विनाश घडवून आणणारा! सुजलाम् सुफलाम् व सुखी संपन्न असलेल्या प्रगत सिंधू संस्कृतीचा विनाश घडवून आणण्याचे काम या वैदिक धर्माच्या इंद्राने केलेले आहे. सिंधू खोर्‍यात राहणार्‍या हिंदू शेतकर्‍यानी शेतीला बारमाही पाणी मिळावे म्हणून अनेक नद्यांवर बांध बांधलेले होते. बांध म्हणजे मोठमोठी धरणेच होती ती. ही सर्व धरणे फोडून सिंधू संस्कृतीच्या हिंदू शेतकर्‍यांचा व शेतीचा विनाश या वैदिक धर्माच्या इंद्राने केला. या सर्व विनाशकारी कृत्याची नोंद खुद्द वैदिकांनीच आपल्या वेद वाडःमयात करून ठेवलेली आहे.
तिसरे उदाहरण वैदिक धर्माच्या लोकांनी केलेल्या जाळपोळीचे आहे. पुष्यमित्र शृंग नावाचा वैदिकधर्माचा ब्राह्मण हा बृहद्रथ राजाच्या (सम्राट अशोकाचा नातू) दरबारात सेनापती होता. या ब्राह्मण सेनापतीने आपल्या भारत राष्ट्राशी गद्दारी करीत बृहद्रथ राजाचा खून केला व स्वतःच राजा झाला. वैदिक धर्माच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या राष्ट्रद्रोही पुष्यमित्र शृंगाचा गौरव करताना एक सोनेरी पान लिहून ठेवले आहे (भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने, सावरकर समग्र वाडःमय, नवी आवृत्ती- 8-4-1997, पानः 630-651). इतिहासाचार्य राजवाडेंनी पुष्यमित्र शृंगाच्या या देशद्रोही कृत्याला ‘ब्राह्मणी प्रतिचढाई’ म्हणून गौरवितात, तर पा. वा. काणे या घटनेचा उल्लेख ‘ब्राह्मण-साम्राज्य-स्थापना’ असा करतात (वि. का. राजवाडे, ‘राधामाधवविलासचंपू’, प्रस्तावना, पानः 155 व पा. वा. काणे, ‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र’, खंड-3, पाः 32). याच घटनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ब्राह्मणी प्रतिक्रांती’ म्हणून निर्भत्सना करतात. कारण या प्रतिक्रांतीमुळे मुजोर झालेल्या वैदिक ब्राह्मणांनी शूद्रादि अतिशूद्रांच्या पायात गुलामगिरीच्या बेड्या ठोकण्यासाठी ‘मनुस्मृती’ सारखे अनेक ग्रंथ लिहिलेत व भाकड कथांची पुराणे लिहून या देशाला अंधारयुगात ढकलले (Dr. Babasaheb writings and speeches, Vol-3, Part-II, chapter-11, page: 266-288). 
या शृंग नावाच्या वैदिक ब्राह्मणाने लाखो बौद्ध भिक्खूंची कत्तल केल्याची नोंद इतिहासात आहे. त्याचेच अनुकरण करीत सहाव्या शतकातील दुसरा एक वैदिक-ब्राह्मण राजा शशांकाने बौद्ध भिक्खूंची मुंडकी कापून आणणार्‍यांना एका मुंडक्यामागे 100 दिनार बक्षीस जाहीर करून नरसंहार घडवून आणला. (Sharad Patil, Caste Feudal Servitude, Vol- II, Pt-I, Chapter-5, Page- 194).
संघी-वैदिकांच्या क्रूर विनाशाचे सर्वात मोठे जगप्रसिद्ध उदाहरण आहे बौद्ध विद्यापीठे जाळण्याचे! या वैदिक-ब्राह्मणांनी केवळ बौद्ध विद्यापीठेच जाळली नाहीत, तर अखिल जगतातील बौद्धांना प्रेरणादायी व पवित्र असलेला बोधीवृक्षही जाळून खाक केला. मिहिरकुला (455 .A.D.) या क्रूर वैदिक-ब्राह्मणराजाने अत्यंत निर्दयपणे बौद्धस्तुप व बौद्धमठ कसे उद्वस्त केलेत याबद्दल लिहिताना विन्सेंट स्मीथ आपल्या संशोधन ग्रंथात नोंद करतो..
‘‘Mihirkula., exhibited ferocious hostility against the peaceful Buddhist cult, and remorselessly overthrew the stupas and monasteries, which he plundered of their treasures.'' (Vincent Smith, "Early History of India, 1924, Page-336 and Babasaheb 
A­mbedkar Writings and Speeches, Vol-3, Page-237, जाड ठसा माझा)
जाळपोळ करून विनाश घडविणार्‍या आणखी एका वैदिक-ब्राह्मण राजाबद्दल विन्सेंट स्मिथ लिहितो...‘‘Sansanka, Who has been mentioned as the treacherous murderer of Harsha's brother,... hating Buddhism, which he did his best to extirpate. He dug up and burnt the holy Bodhi tree at Buddha Gaya..'' (Vincent Smith, "Early History of India, 1924, Page-360 and Babasaheb ­Ambedkar Writings and Speeches, Vol-3, Page-237, जाड ठसा माझा)
पुराणकाळातील रावण, बळीराजा, शंबुक, एकलव्य, कर्ण यासारख्या असंख्य हिंदू-महानायकांवर वैदिकांनी केलेल्या अन्याय-अत्याचाराच्या कथा वैदिकांनीच आपल्या धर्मग्रंथात लिहून ठेवलेल्या आहेत. हे सर्व हिंदू-सिंधू संस्कृतीचे महानायक आहेत. रावणाला एकदाच जाळून वैदिकांचे समाधान होत नाही. दरवर्षी रावणाला जाळण्याचा महोत्सव साजरा केला जातो. बळीराजाला दरवर्षी दसर्‍याच्या दिवशी ठार मारण्याचा सण प्रत्येक वैदिकब्राह्मणांच्या घरात साजरा होतो. मृत्युचे सण साजरा करणारे, मेल्यानंतरही जाळण्याचा उत्सव साजरा करणारे हे वैदिक-ब्राह्मण ‘माणूस’ म्हणून घ्यायला लायक आहेत का? मध्ययुगीन काळातील संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखोबा, छत्रपती शिवराय, संभाजी यांचा वैदिक-ब्राह्मणांनी केलेला छळ व खून यावर बरेच संशोधन झालेले आहे. महात्मा बसवण्णांच्या जात्यंतक लिंगायत धर्माच्या अनुनयायांची निर्घृण कत्तल वैदिकब्राह्मणांनी कशी केली, याचा संपूर्ण इतिहास सुप्रसिद्ध सिनेमा ऍक्टर, डिरेक्टर, इतिहासतज्ञ व साहित्यिक असलेल्या डॉ. गिरीश कर्नाड यांनी आपल्या ‘तलेदंड’ नावाच्या नाटकात लिहून ठेवलेला आहे. मच्छरांचीही हत्या आपल्याकडून होणार नाही, याची जीवापाड काळजी घेणार्‍या जैनांचा कत्लेआम वैदिक ब्राह्मणांनी केलेला आहे. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई या दोघांचा खून करण्याची सुपारी देणारे पुण्याचे सनातनी ब्राह्मणच होते. ब्राह्मणेतरांसाठी प्रशासनात 50 टक्के राखीच जागा ठेवल्याबद्दल व वेदोक्त विधीचा आग्रह धरल्यबद्दल छत्रपती शाहू राजेंना खूनाची धमकी देणारे बाळ गंगाधर टिळक हे वैदिक धर्माचे अभिमानी होते. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारत असताना, त्यांना अत्यंत खालच्या पातळीवरच्या शिव्या देणारे विनायक दामोदर सावरकर हे वैदिक धर्मीच होते. 
हा झाला वैदिक ब्राह्मणांचा इतिहास! ही सर्व लुटालुटीची, खून, मारामारीची, जाळ-पोळीची व विनाश घडविण्याची ऐतिहासिक उदाहरणे मी का देत आहे? कारण ज्या सोम्या-गोम्या लोकांनी जयंतीदिनीच्या माझ्या व्याख्यानातील ‘विद्यापीठ जाळण्याच्या मुद्यावर आक्षेप’ घेतला आहे, त्यांची स्वतःची वैदिक-ब्राह्मणी परंपरा कोणत्या नीच परंपरेतील आहे, याची त्यांना आठवण करून देणे आवश्यक आहे. जाळपोळ करण्यात, क्रूरपणे विनाश घडविण्यात वैदिकांची परंपरा किती कुप्रसिद्ध होती, हे लक्षात यावे, यासाठी मी ही ऐतिहासिक उदाहरणे दिली आहेत. बरे, हा केवळ त्यांचा इतिहास नव्हे, तर हे त्यांचे वर्तमानही आहे. याच वैदिक-ब्राह्मणांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना उभारली आहे. संघटना स्थापन होताच या संघी-ब्राह्मणांनी महात्मा गांधींवर बॉम्ब फेकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
1934 पासून त्यांनी 4 वेळा महात्मा गांधींचा खून करण्याचा प्रयत्न केला, शेवटी 30 जानेवारी 1948 रोजी संघी ब्राह्मण असलेल्या नथुराम गोडसेने मुसलमानाच्या पेहेरावात पिस्तूलने गोळ्या झाडून गांधीजींचा खून केला. (तुषार कुळकर्णी, बी.बी.सी. मराठी प्रतिनिधी https://www.bbc.com/marathi/india-42746077 updated on 27 Jan 2020).
मुसलमानांना शत्रू ठरवून त्यांच्याविरोधात भोळ्या हिंदू तरूणांना चिथावणी देणार्‍या संघी ब्राह्मणांनी स्वतंत्र भारतात असंख्य दंगली व बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. बाबरी मस्जिद उध्वस्त करून त्या ढिगार्‍याखाली हिंदूधर्मातील करोडो ओबीसी तरूणांचे भवितव्य असलेला मंडल आयोग कोणी गाडून टाकला? अर्थातच वैदिक धर्माच्या संघी-ब्राह्मणांनी! शंबुक एकलव्यापासून ते फुले-शाहू व आंबेडकर-गांधी यासारख्या हिंदूधर्म सुधारकांना जीवे मारण्याचे षडयंत्र कोणी रचले? याच खूनी परंपरेत दाभोळकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी, गौरी शंकर या पुरोगाम्यांना गोळ्या घालून कोणी ठार मारले? याच वैदिक-ब्राह्मणी परंपरेतले संघी लोक माझ्या व्याख्यानावर आक्षेप घेत आहेत. उद्या हे लोक माझाही खून करण्याची दाट शक्यता आहे.
वैदिकांच्या या हिंसक कृत्यांना कोणीच विरोध केला नाही का? सिंधू-हिंदू संस्कृतीत जन्म घेतलेल्या मुळ भारतीय विद्वानांनी क्रूर व विषमतावादी वैदिक धर्माला समोरासमोर भिडणे टाळले. ‘‘जळो तुमचे दर्शन, तुमच्या वाटेला जाणेच नको!’’ असे म्हणत या महापुरूषांनी आपली स्वतःची वेगळी वाट धरली व पर्यायी धर्म उभे केले. जैन, बौद्ध, शिख, लिंगायत, शाक्त, नाथ, तंत्र, सार्वजनिक सत्यधर्म आदी धर्म स्थापन केलेत. काहींनी तुलनेने समतावादी व मानवतावादी असलेल्या मुसलमान, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. सम्राट चंद्रगुप्त मौर्याने चाणक्याच्या ब्राह्मणी-वैदिक छळाला कंटाळून जैन धर्म स्वीकारला. सम्राट अशोकाने बुद्ध धम्म स्वीकारला. काश्मिरचा राजा चक्रवर्मा याने पाशुपत धर्माचा स्वीकार केला. संत ज्ञानेश्वरांनी वैदिक-ब्राह्मणांच्या छळाला कंटाळून नाथधर्म स्वीकारला, छत्रपती शिवाजी राजाने पेशव्यांच्या छळाला कंटाळून शाक्त धर्म स्वीकारला, छत्रपती शाहू महाराजांनी तुलनेने पुरोगामी असलेल्या आर्य समाजाचा स्वीकार केला व सत्यशोधक समाजाची धोरणे राबवीली. वैदिक-ब्राह्मण हे सुधारण्याच्या पलिकडचे आहेत, अशी खात्री झाल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारला. मूळ हिंदू-सिंधू संस्कृतीच्या या सर्व महापुरूषांनी वैदिक-ब्राह्मणी धर्माला टाळण्यासाठी आपापली वेगळी वाट धरली. या महापुरूषांनी व त्यांच्या अनुयायांनी वैदिकांच्या हिंसेला हिंसेने उत्तर दिले नाही. ‘खून का बदला खून’, असेही कधी बोलले नाहीत. वैदिक धर्माला त्यांनी केलेला विरोध हा लोकशाहीवादी, सहिष्णूतावादी व मानवतावादी होता. त्यांनी व्यक्त केलेला निषेध हा शाब्दिक स्वरूपातील ‘प्रतिकात्मक’ होता. एकदोन उदाहरण दिले तर समजेल. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी मनुस्मृतीसारखे विषमतावादी ‘आर्यग्रंथ जाळण्याची भाषा’ केली आहे (मांगम्हार-निंदा ठावी नाही व्यथा !! जाळी आर्यग्रंथा !! अग्नीमध्यें !!2!!, महात्मा फुले समग्र वाडःमय, उक्त, पान- 572). डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तात्यासाहेब महात्मा जोतीरावांचे शिष्य असल्याने त्यांनी आपल्या गुरूचा आदेश शिरसावंद्य मानीत 25 डिसेंबर 1927 रोजी ‘मनुस्मृती दहन’ केले. याला म्हणतात प्रतिकात्मक निषेध!
माझ्या भाषणातील ‘विद्यापीठ जाळण्याचा’ मुद्दा याच फुले-आंबेडकरी परंपरेतील आहे. 500 वर्षांपूर्वी युरोपातील विद्यापीठांनी प्रबोधनाच्या क्रांतीची (Renaissance Movement) कास धरून विद्यार्थ्यांना धार्मिक कर्मकांडातून मुक्त केले. अंधश्रद्धा व धार्मिक गुलामगिरीतून त्यांचा मेंदू मुक्त होताच त्या मेंदूतून अनेक नवनवे शोध बाहेर पडू लागलेत, त्यातून मोठमोठी यंत्रे निर्माण झालीत, त्यातून औद्योगिक क्रांती झाली व भांडवली लोकशाही क्रांतीची वाट मोकळी झाली. विद्यापीठांनी केलेल्या या प्रबोधन क्रांतीमुळे संपूर्ण युरोपात ‘स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा उद्घोष सुरू झाला. मात्र, भारतातील विद्यापीठे आजही एकविसाव्या शतकात कुलगुरूंच्या परवानगीने ‘सत्यनारायणाची पूजा’ घालीत असतील, तर अशी विद्यापीठे जाळण्याच्याच लायकीची आहेत, हा होता माझ्या व्याख्यानातील मुद्दा! माझी ही जाळण्याची भाषा शाब्दिक प्रतिकात्मक होती. मात्र, माझ्या शाब्दिक इशार्‍यावरून ही विद्यापीठे जर सुधारली नाहीत, तर मात्र पुढच्या पिढीत कुणीतरी माझा शिष्य जन्म घेईल व तो खरोखरच या विद्यापीठांवर पेट्रोल टाकून आग लावेल, त्या दिवशी कुणी कुलगुरू व प्राध्यापक पेट्रोलच्या आगीत जळत असताना मला दोष देणार नाही, याची मला खात्री आहे. भविष्यातील त्या विद्यापीठ दहन दिनाची वाट पाहण्यापेक्षा आजच ताबडतोब सर्व विद्यापीठांमध्ये फुले-आंबेडकरांचे ग्रंथ अभ्यासक्रमाला लावा, 
बहिःशाल व्याख्यानासारख्या कार्यक्रमांची व्याप्ती ग्रामीण-खेड्यांपर्यंत व आदिवासी पाड्यांपर्यंत जाऊ द्या. चार्वाक, बौद्ध, जैन, लिंगायत, शाक्त यासारख्या समतावादी धर्मांच्या अभ्यासशाखा काढा, राम-कृष्णांच्या भाकड-लीला शिकविण्याएवजी स्वातंत्र्य, समता व मित्रत्वाची स्थापना करणारी निर्ऋती, शेतकर्‍यांचा राजा बळीराजा, सम्राट अशोक, कुळवाडी कुळभूषण शिवाजी राजा, आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांचा इतिहास शिकवा. दाभोळकर, कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी, गौरी शंकर यांच्यासारखे असंख्य विद्वान आज काम करीत आहेत, त्यांना विद्यापीठात सन्मानाने बोलवा, त्यांची व्याख्याने, पुस्तके भारतभरच्या विद्यापीठात पोहोचली पाहिजेत. असे अनेक कार्यक्रम राबवून आपल्या भारतात प्रबोधनाची अपूर्ण राहिलेली क्रांती पूर्णपणे घडवून आणा, त्यातून भारतात जात्यंतक भांडवली लोकशाही क्रांती होईल व देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करू होऊ शकेल. भविष्यातील संभाव्य ‘‘विद्यापीठ-दहन’’ टाळण्याचा हाच एकमेव मार्ग असू शकतो.
आपण हे प्रदीर्घ पत्र वाचत असताना काही महत्वाचे मुद्दे मागे पडू शकतात, त्यांची पुन्हा आठवण करून देतो...
  1. माझ्या व्याख्यानाचा विषय जर "Thoughts of Mahatma Phule ­And its Relevance to Contemporary Situation of India'' असा असेल तर काय मी व्याख्यानात ‘फुलेंनी शाळा काढल्या व हौद खुला केला’’ यासारख्या घटना सांगत बसायच्या का?
  2. तात्यासाहेब महात्मा फुले यांचा मुख्य उद्देश ‘या देशाला अंधारयुगात ढकलणार्‍या वैदिक-ब्राह्मणांचे षडयंत्र उघड करणे’ हाच आहे. त्यांची आक्रमक परंतु अभ्यासपूर्ण वैचारिक शैली पाहता, माझे या विषयावरील व्याख्यान त्याच पद्धतीने होणे स्वाभाविक आहे.
  3. मी दिलेल्या व्याख्यानाची संपूर्ण जबाबदारी माझीच आहे, संयोजकांची नाही.
  4. त्यामुळे माझे व्याख्यान आयोजित करणार्‍या संयोजक-प्राध्यापकांना आपण जी नोटीस बजावली आहे, ती चुकीची आहे.
  5. या कार्यक्रमात आपण स्वतः कुलगुरू, प्र. कुलगुरू व इतर सर्व जबाबदार पदाधिकारी ऑनलाइन उपस्थित होते, माझ्या व्याख्यानानंतर कोणीही आक्षेप नोंदविला नाही. कारण त्यात आक्षेपार्ह काहीच नव्हते. या उलट माझे आभार मानण्यात आले व माझे कौतुकही करण्यात आले.
  6. दुसर्‍या दिवशी कुणीतरी बेजबाबदार सोम्या-गोम्यांनी आपणावर ‘दडपण’ आणले व आपण संयोजकांना नोटीस दिली, हे आपल्यासारख्या जबाबदार व्यक्तीला शोभत नाही.
  7. तुमच्यावर ‘दडपण’ आणणारे हे बेजबाबदार सोमे-गोमे कोण आहेत, त्यांची नावे, पत्ते, फोन नंबर उघड करा व त्यांनी आपल्याकडे काही लेखी तक्रार दाखल केली असल्यास, त्याची झेरॉक्स प्रत आम्हाला मिळावी. (ईमेलने पाठविली तरी चालेल)
  8. या बेजबाबदार सोम्या-गोम्यांना आपण पाठीशी घालत असल्याने ते अधिकच माजले आहेत, परिणामी ते माझ्या व्याख्यानाच्या तोडमोड केलेल्या संदर्भहीन क्लीफ सोशल मीडियावरून व्हायरल करीत आहेत. त्यामुळे समाजात माझ्याबद्दल काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने नाइलाजास्तव मला हे पत्र लिहावे लागते आहे.
  9. माझ्या या पत्राला आपण 8 दिवसाच्या आत योग्य ते उत्तर द्यावे, ही नम्र विनंती.
  10. आपणाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर, हे पत्र सर्व दैनिके, साप्ताहिके, मासिके, सोशल मीडिया व ईलेक्ट्रॉनिक्स (टि.व्ही.) मीडियाकडे पाठविण्यात येईल.
  11. आपण संयोजकांना दिलेली नोटीस मागे घेतल्यास व खोटे आक्षेप घेऊन विद्यापीठाची बदनामी करणार्‍या (वैदिक) सोम्यागोम्यांनी लेखी माफी मागितल्यास हे पत्र मी मागे घेण्याचा विचार करू शकेल!
धन्यवाद...
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासक' नियमित वाचा) 

तुम्हाला हा ब्लॉग आवडला का? आम्ही एक विना-नफा संस्था आहोत. आमची पत्रकारिता सरकारी आणि कॉर्पोरेट दबावापासून मुक्त ठेवण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?