दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

‘अ’ अदानीचा, आर्यन आणि अंमलीपदार्थाचाही!

 ‘दानीचा, र्यन आणि अंमलीपदार्थाचाही!

-विश्‍वगुरू भारतात ‘राई’चा पर्वत होतो; मात्र ‘पर्वता’ची राईएवढीही चर्चा होत नाही; हाच का बदलता भारत ?

‘अ’ अदानीचा, आर्यन आणि अंमलीपदार्थाचाही!

भास्कर सरोदे, औरंगाबाद (शनिवारी, 9 ऑक्टोबर 2021) :

देश सध्या दोन घटनांनी ढवळून निघालाय. खरं तर चार घटना म्हणा. दोन घटनांवर जाणीवपूर्वक पांघरून घातले गेले. तिसरी घटना झाकण्यासाठी चौथ्या घटनेला फारच महत्व दिले गेले. माध्यमांनी दोन घटनांकडे हेतूत: कानाडोळा केला. एक असे की, ‘टाइम’ मॅगेझिनने घेतलेली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नकारात्मक दखल आणि दुसरी म्हणजे गुजरातेतील मुंद्रा अर्थात अदानी पोर्टवर पकडलेला ड्रग्जने भरलेला कंटेनर. तर लखीमपूर खिरीत केंद्रिय गृहराज्य मंत्र्याच्या मुलाने भरधाव जीपच्या सहाय्याने नि:शस्त्र, निरपराध आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना चिरडले. हा आरएसएस प्रणित भाजप सरकारचा स्वभाव आहे आणि बदलता भारतही! ही घटना दडपण्यासाठी अथवा तिच्यावरील लक्ष दुसरीकडे हटविण्यासाठी उत्तर प्रदेशपासून दूर महाराष्ट्रात श्रीमंतीचा माज चढलेल्या बिघडलेल्या औलादींच्या रेव्ह पार्टीला खूप हवा दिली जातीय. या घटनेत बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानचा मुलगा आर्यन रेव्ह पार्टीत ड्रग्ज घेतल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आला. राईच्या दाण्याऐवढ्या ड्रग्जवरून देशभर हल्‍लकल्‍लोळ माजविणार्‍या मीडियाने गुजरातेत गौतम अदानीच्या नियंत्रणातील मुंद्रा बंदरावर ड्रग्जने भरलेला कंटेनर पकडला, त्याविषयी गुळणी का धरली आहे? एकानंतर एक घडलेल्या या घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, हे तपासण्याचे सूज्ञ वाचकांवर सोडलेले बरे!

घटना क्र. 1 :

अमेरिकेतील ‘टाइम’ मॅगेझनने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा ‘2021 मधील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्ती’ या यादीमध्ये ‘भारताला धर्मनिरपेक्षतेपासून दूर लोटणारे आणि हिंदू राष्ट्रवादाकडे ढकलणारे नेते’ असा उल्‍लेख केलाय. तसेच मोदींच्या नेतृत्वाखालील राजवटीमध्ये ‘भारतामधील मुस्लिमांच्या अधिकारांमध्ये कपात करण्यात आली’ असा आरोपही या लेखात करण्यात आलाय. भारतीय वंशाचे पत्रकार फरीद झकरिया यांनी प्रधानमंत्री मोदींच्या कार्याचा आढावा घेणारा लेख लिहिला आहे. यामध्ये ते लिहितात, ‘प्रधानमंत्री मोदींनी पत्रकारांना घाबरवलं, धमकावलं आणि तुरुंगांमध्ये टाकलं. त्यांनी असे कायदे आणले ज्यामुळे भारतामधील हजारो बिगर सरकारी संस्था आणि गट कमकुवत झाले’. भारतीय गोदी मीडियाला मोदी आणि सरकारचे कारनामे दिसो वा न दिसो मात्र विदेशी मीडियाची नजर भारताकडे आहे. विदेशी तिसर्‍या डोळ्यामुळे मोदींच्या प्रतिमेला तडे गेले आहेत.

घटना क्र. 2 :

रविवार, दि. 3 ऑक्टोबर 2021. लखीमपूर खिरीच्या तिकुनिया गावात शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत होते. 3 ऑक्टोबरला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आधी ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे लखीमपूरच्या दौर्‍यावर होते. इथल्या वंदन गार्डनमध्ये त्यांना सरकारी योजनांच्या कोनशिलांचे अनावरण करायचे होते. संयुक्त किसान मोर्च्याने उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र यांच्या ताफ्याला घेराव घालण्याची हाक दिली होती. यात लखीमपूर आणि उत्तर प्रदेशातल्या इतर जिल्ह्यांमधल्या शेतकर्‍यांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तत्पूर्वी केंद्रिय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी संपूर्णानगरमधल्या एका शेतकरी संमेलनात आंदोलक शेतकर्‍यांना धमकी देताना सुधारण्याचा इशारा दिला होता. असे असले तरी हातात काळे झेंडे घेऊन शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. शांततेने आंदोलन करण्याची त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती. मात्र, केंद्रिय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी शेतकर्‍यांना दिलेली धमकी प्रत्यक्षात उतरवली. त्यांचा पूत्र आशिष मिश्राने भरधाव गाड्यांच्या सहाय्याने शेतकर्‍यांना चिरडले. शेतकर्‍यांवर गोळीबार केला. गोळीबार करताना पत्रकाराने कॅमेराबद्ध केल्याने त्या पत्रकारालाही ठार मारले. या हत्याकांडात आठ जणांचा समावेश आहे. हा पूर्वनियोजित हल्‍ला होता. इतका नरसंहार होऊनही शेतकर्‍यांनी संयम ढळू दिला नाही, हे विशेष. हत्याकांडाला लोकशाही मार्गाने दिलेले उत्तर आहे. ही घटना जालीयनवाला बाग हत्याकांडापेक्षा कमी नाही. मात्र, गोदीमीडियाने नेहमीप्रमाणे मंत्र्याच्या मुलाला वाचविण्याहेतूने शेतकर्‍यांवर दोषारोप केले, त्यांच्यावर बबर खालसासारखे आरोप लावले. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून गृहराज्यमंत्री आणि त्याचा मुलगा आशिष मिश्राचे बिंग फुटले. त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. अद्यापही तो फरार आहे.

घटना क्र. 3 :

शनिवार, दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान मित्राच्या सांगण्यावरून एका कार्यक्रमाला गेला होता. मात्र, ड्रग्ज घेतल्याच्या कारणावरून मुंबईतल्या एका क्रूझवरून एनसीबीने त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली. मात्र, आर्यनने हे आरोप फेटाळले आहेत. त्याच्यासोबत अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सतिजा, इशमीत सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा यांनाही अटक केली आहे. या सगळ्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली. आश्‍चर्याची बाब म्हणजे आर्यन आणि अरबाज मर्चंडला घेऊन जाणारे केपी गोसावी आणि मनीष भानुशाली हे भाजपशी संबंधित आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत हे गंभीर आरोप केले आहेत. पुरावा म्हणून मनीष भानुशालीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या इतर पदाधिकार्‍यांबरोबरचे छायाचित्र सादर केले. लखीमपूरमध्ये शेतकर्‍यांना चिरडल्याची घटना आणि आर्यनला पकडून त्याला हवा देण्याची घटना रविवारची. न्यायालयात आर्यनने आपली बाजू मांडताना आपणास कसे फसविण्यात आले, याचा घटनाक्रम सविस्तर मांडला आहे. न केलेल्या गुन्ह्यासाठी आर्यनला आरोपी ठरवून त्याविषयीचे मीडियामध्ये चर्वित चर्वण सुरू आहे. त्याउलट गुजरातमधील गौतम अदानी चालवत असलेल्या मुंद्रा बंदरावरून ड्रग्जने भरलेला कंटेनर पकडला, त्याची चर्चा का नाही? आरएसएसच्या राजवटीत देश विषारी नशेमध्ये डूबला आहे. वस्त्या-वस्त्यांमध्ये, शाळा-महाविद्यालयात गेल्यावर याची प्रचिती येईल. या ‘ड्रग्जमाफिया राज’विषयी सविस्तर माहिती बहुजन शासकच्या 24 सप्टेंबरच्या अंकात विशेष संपादकीय म्हणून प्रसिद्ध झाली आहे. वाचकांच्या सोयीसाठी येथे ‘घटना क्र. 4’ म्हणून देत आहोत...

‘हेरॉईन ड्रग्ज’माफिया राज :

‘56 इंच’ छाती असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नाकाखाली ड्रग्जमाफिया राज देशात सुरू आहे. तेही मोदींचे लाडके उद्योजक गौतम अदानी यांच्या अखत्यारितील मुंद्रा बंदरातून. अदानी उद्योग समुहाची मालकी असलेल्या अदानी पोर्टस् अँड स्पेशल इकोनॉमिक झोनमध्ये कोट्यवधींच्या हेरॉईन ड्रग्जची तस्करी सुरू आहे. ड्रग्जच्या माध्यमातून संपूर्ण देशाला पोखरले जात आहे. देशातील तरूणाईविरोधात हा हल्‍ला नाही का? देशाविरुद्ध महायुद्ध म्हणा! अदानीविरोधात कारवाई झाली पाहिजे. कारवाई कोण करणार? ड्रग्जमाफिया राज मोदी-शाह यांच्या आशीवार्दानेच सुरू असेल तर! अफगाणिस्तानातून आयात केलेले हेरॉईन पाहता भक्‍त तालिबानी...तालिबानी...करत ऊर का बडवतात, याचे गूढ यात आहे. मुंबई आणि बॉलिवूडमध्ये काही ग्रॅम ड्रग्ज सापडल्यानंतर दिवस-रात्र भूंकणारा मीडिया काही टन हेरॉईन सापडल्यानंतर निपचीत का पडला आहे? हा संकेत देश मोठ्या संकटातून जात असल्याचा आहे.

राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने प्रचारित केलेल्या तथाकथित ‘गुजरात मॉडेल’चा हा अस्ली चेहरा बघा. गुजरातमधील अदानी पोर्टस् अँड स्पेशल इकोनॉमिक झोनमध्ये (मुंद्रा बंदर) 21000 कोटी रूपयाच्या 2988.21 किलोग्रॅम हेरॉईनची तस्करी पकडण्यात आली. ही कारवाई महसूल गुप्‍तचर संचालयाने (DRI) 13 सप्टेंबर 2021 रोजी केली. गुजरातमधील मुंद्रा बंदरावरुन जप्त करण्यात आलेले हेरॉईन ड्रग्ज देशातील सर्वात मोठ्या हेरॉईन ड्रग्ज तस्करीपैकी एक. अफगाणिस्तानतून इराणच्या बंदर अब्बास पोर्टवरुन 2 कंटेनर भारतात पाठवण्यात आले. कागदोपत्री या कंटेनरमध्ये सेमी प्रोसेस्ड टाल्क स्टोन्स (Semi processed talk stones) असल्याचे भासवत ही मोठी ड्रग्ज तस्करी करण्यात आली. मात्र, महसूल गुप्तचर संचालनालयाने गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत या तस्करीवर कारवाई केली. ही खेप चेन्नईतील जोडप्याकडून चालवण्यात येणार्‍या अ‍ॅशी ट्रेडिंग कंपनीसाठी असल्याची नोंद होती. या कंपनीची नोंदणी मजवरम सुधाकर आणि वैशाली गोविंदराजू दुर्गा पूर्णा यांच्या नावे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे होती. ही तस्करी अदानी पोर्टस् अँड स्पेशल इकोनॉमिक झोनमध्ये झाली. मात्र, अदानी उद्योग समूहाकडून तस्करीशी आमचा काही संबंध नसल्याचा कांगावा केलाय. चोर कधी चोरी केल्याचे म्हणेल काय? ‘बंदर चालवणार्‍या कंपनीची भूमिका केवळ बंदरावरील वाहतुकीचे नियोजन करण्याची आहे. आम्ही केवळ जहाजांना बंदरावरील सेवा देतो. मुंद्रा बंदरावरुन वाहतूक होणार्‍या कंटेनर आणि कार्गो जहाजांची तपासणी करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत’, असे स्पष्टीकरण देऊन अदानी उद्योग समूहाने हात वर केेले आहेत. सत्य काय आहे? गुजरातच्या सार्‍या बंदरावर अदानींचे नियंत्रण आहे, विशेषत: मुंद्रा बंदरावर. बंदरावर काय उतरणार, किती उतरणार, कधी उतरणार, उतरणार्‍या मालाची बाजारात किंमत काय असणार, हे सगळे अदानी उद्योगच निश्‍चित करतो. असे असूनही अदानीवर कारवाई का नाही? या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आलीय. कदाचित दिशाभूल करण्यासाठी!

देशात ड्रग्जचे जाळे :

एनडीटीव्हीचे वरिष्ठ संपादक रविशकुमार यांनी प्राईम टाईममध्ये दिलेल्या माहितीनुसार हेरॉईन ड्रग्जची तस्करी ही काही पहिलीच नाही. जुलै महिन्यात 2500 कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आले, जे मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे नेले जात होते. जुलै महिन्यात महाराष्ट्रात 879 कोटींचे ड्रग्ज पकडण्यात येवून एकाला अटक करण्यात आली होती. मे महिन्यात दिल्‍लीत 20 किलोग्रॅम ड्रग्ज सुमारे 250 कोटींचे पकडण्यात आले. 31 ऑगस्ट रोजी पंजाबमध्ये 100 कोटींचे 20 किलो ड्रग्जसह दोघे पकडले. हा मुद्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. देशात ड्रग्जचे जाळे कसे विणले गेले, यासाठी वरील उदाहरणे पुरेशी आहेत.

हिमनगाचे टोक :

डेक्‍कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार गुजरातमधील अदानी पोर्टस् अँड स्पेशल इकोनॉमिक झोनमध्ये पकडण्यात आलेले ड्रग्ज सुमारे 9000 कोटींचे असल्याचे महसूल गुप्‍तचर संचालयाने (DRI) मान्य केले असून ते केवळ हिमनगाचे टोक आहे. ड्रग्ज माफियांनी याआधीच 24 टन ड्रग्ज देशाच्या विविध भागात वितरीत केले आहे. महसूल गुप्‍तचर संचालयानुसार (DRI) 24 टनाची किंमत 70,000 हजार कोटी होते. विजयवाडातील अ‍ॅशी ट्रेडिंग कंपनीनेच यावर्षीच्या जूनमध्ये 25 टन ड्रग्ज बूक केले होते. टाल्कम पॉवडरच्या नावाखाली हा गोरखधंदा फारच जोमात सुरू आहे. डेक्‍कन क्रॉनिकलच्या दाव्यानुसार राजस्थानातील जयदीप लॉजिस्टिकच्या मालकीचा RJ01GB8328 क्रमांकाचा कंटेनर मुंद्रा पोर्ट ते दिल्‍ली असा 1176 किलोमीटरचा प्रवास करूनही कुठेही टोलनाक्यावर अडवला नाही. अशी बिनदिक्‍कतपणे ड्रग्जची वाहतूक होत असेल तर यामागे निश्‍चित कुणाचा हात आहे, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. गुजरातमधील बंदरांतून ड्रग्जची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. यावरून बंदरांवर येणारे ड्रग्ज गुजरातमध्येच कुठेतरी साठवले जात असावे आणि नंतर त्यांची देशात इतरत्र वाहतूक केली जाते. हे कसे काय शक्य आहे, असा सवाल डेक्‍कन क्रॉनिकलने केला आहे. डेक्‍कन क्रॉनिकलचा इशारा देशाच्या सुरक्षा यंत्रणांकडे आहे. देशातील तरूणाईविरोधात छेडलेले हे युद्ध आहे. दुर्दैवाने त्यात आमच्याच सरकार आणि उद्योगपतींची मिलीभगत आहे. प्रत्येकवेळेला युद्ध रणांगणावरच छेडावे असे काही गरजेचे नाही. देशांतर्गत अर्थव्यवस्था, देशांतर्गत सुरक्षा, देशातील तरूण यांना देशोधडीला लावूनही युद्ध जिंकता येते. जिथे पुलवामा घडवून निवडणुका जिंकता येते, सद्यभारतात असे छुपे युद्धही जिंकणे सहज शक्य आहे.

पुढे काय होणार?

आरएसएस प्रणित मोदी सरकारचा इतिहास आहे की, ते पुरावे नष्ट करण्यात माहीर आहेत. जस्टीस लोया हत्या, हेमंत करकरे हत्या, संजय भट आदींचे काय झाले? अदानी पोर्टवर ड्रग्ज पकडणारा अधिकारी सुखरूप असावा, ही संबंध भारतवासीयांची आशा आहे. नोटाबंदीत महेश शाहकडे 13500 कोटींचे काळेधन आढळले होते. त्यानंतर महेश शाह आणि काळेधन दोन्हीही गायब आहेत. अदानी पोर्टस्वर पकडण्यात आलेले ड्रग्स असेच जिरवले जाणार..! तिरस्कारानंतर आता युवकांच्या रक्‍तात ड्रग्जचे विष भरले जात आहे. गेल्या काही वर्षात प्रत्येक विरोधकावर राष्ट्रीय सुरक्षा, देशद्रोहाच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे लावले. 80 वर्षाच्या वयोवृद्धांनाही जेलमध्ये सडवले; परंतु त्यांच्यावर उपचार नाही केले. तेव्हा अदानीवर कोणतीच चौकशी का नाही? निर्दोष असेल तर त्याच्याबरोबर सरकारचीही प्रतिमा उजळून निघेल!

तपास एनआयएकडे :

गुजरातमधील मुंद्रा बंदरावर सापडलेल्या 2,988 कि.ग्रॅ. वजनाच्या अमली पदार्थ प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आपल्या ताब्यात घेतला आहे. बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात एक आदेश जाहीर करत मुंद्रा बंदरात तस्करीतून पकडलेला अंमली पदार्थाचा तपास एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत एनआयएकडे तपासासाठी देत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले माछावरम सुधाकरन, दुर्गा पीव्ही गोविंदराजू, राजकुमार पी. व अन्य काहींवर यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंद्रा बंदरात सापडलेल्या 2,988.21 किलो ग्रॅम अंमली पदार्थाचा साठा अफगाणिस्तानातून तस्करी करत इराणच्या बंदर अब्बास बंदरातून गुजरातमध्ये आल्याचे गृहखात्याचे म्हणणे आहे. मुंद्रा बंदर कोण चालविते, त्यांची जबाबदारी काय, याविषयी गृहखाते चकार शब्द काढत नाही, हे विशेष.

आर्यनच्या प्रकरणात राईचा पर्वत करणारा मीडिया अदानी चालवित असलेल्या मुंद्रा बंदरातून कोट्यवधींच्या ड्रग्ज तस्करीबाबत मुग गिळून गप्प आहे, असे का? वरील चारही घटना देशाचे चारित्र्य निर्धारित करीत असताना भाजप सरकार आणि गोदीमीडिया असंवेदनशील असल्याने देशापुढील चिंतेत आणखी भर पडली आहे.

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासक' नियमित वाचा) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?