चिमुरड्यांच्या मदतीसाठी दात्यांची धाव!; बहुजन शासकच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चिमुरड्यांच्या मदतीसाठी दात्यांची धाव!; बहुजन शासकच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद
औरंगाबाद : भाग्यनगर झोपडपट्टीत शालेय साहित्याचे वाटप करताना कमलेश माधवराव बोरडे, प्रा. डॉ. मंजिरी कमलेश बोरडे, सोबत बहुजन शासकचे संपादक भास्कर सरोदे आणि शिक्षक भगवान सदावर्ते. |
‘दात्यांना आवाहन : वॉचमनकी करून विद्यार्थी देतोय झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे…विद्यार्थीही असे की ज्यांच्याकडे वह्या, पुस्तकं, शालेय साहित्याचा अभाव!’, या मथळ्याखाली बहुजन शासकने दिलेल्या वृत्ताला दात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. भाग्यनगर आणि शक्तीनगर झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दाते धावून आले. अनेकांनी फोन करून आम्ही मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. तथापि, गरजेपुरते दान स्वीकारून ज्यांनी तत्परता दाखविली त्यांच्याशी कृतज्ञता बाळगून मोफत शिक्षणाचा उपक्रम सिद्ध करण्यासाठी पुन्हा आवाहन करीत आहोत.
पाऊलखुणा! :
धम्मपारायण व्यक्ती जगाचा निरोप घेतात; परंतु आपल्या पाऊल खुणा तशाच सोडून जातात. माधवरावजी बोरडे हे आज आपल्यात नाहीत. त्यांच्या दानशूरतेबाबत आपण सर्वजण परिचित आहात. बहुजन शासकचे वृत्त वाचताच माधवराव बोरडे यांचे चिरंजीव कमलेश बोरडे सहपरिवार भाग्यनगर झोपडपट्टीत पोहोचले. वह्या, पुस्तकं, दफ्तरं, खाऊ आणि शालेय साहित्याचे वाटप केले. कोणताही गाजावाजा नाही. अत्यंत नम्रपणे आणि उदार मनाने दान करून निघून गेले. सोबत प्रा. डॉ. मंजिरी कमलेश बोरडे, कबीर धनंजय बोरडे होते. माधवराव बोरडे यांच्या ह्याच त्या पाऊलखुणा! वडिलांचा वारसा मुलांनी जपला. विद्यार्थ्यांची अडचण दूर झाली. ‘बिना छताच्या शाळे’ला बळ मिळाले.
प्राथमिक कामाची गरज :
संविधानतज्ज्ञ प्रा. डॉ. राजेंद्र शेजूळ यांनी विद्यार्थ्यांना मदतीचा मनोदय व्यक्त केला होता. भाग्यनगर झोपडपट्टीत भगवान सदावर्ते चालवत असलेली शाळा त्यांनी पाहिली. विद्यार्थ्यांचे प्राथमिक ज्ञान तपासले. सोबत मुलगा अमित होता. गरिबी काय असते याची जाणीव व्हावी म्हणून सरांनी त्याला मुद्दाम आणले होते. विद्यार्थ्यांना जुजबी ज्ञानही नसल्याचे निदर्शनास आले. सर्वसामान्यांसाठी शैक्षणिक दर्जा खालावल्याचे हे निदर्शक आहे. सरकारला त्याचे काय? या मुलांना वह्या आणि पेनचे वाटप करून ‘अशा मुलांमध्ये प्राथमिक काम करण्याची गरज आहे’, असे प्रा. शेजूळ म्हणाले.
भाग्यनगर झोपडपट्टीत विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करताना प्रा. डॉ. राजेंद्र शेजूळ, सोबत अमित राजेंद्र शेजूळ, पालक कमलाबाई शिंदे, शिक्षक भगवान सदावर्ते. |
शिक्षकाचे अभिनंदन :
कोरोना काळात शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिकविणारे भगवान सदावर्ते यांचे दात्यांनी अभिनंदन केले. बहुजन शासकमुळे सत्कर्म करण्याची संधी मिळाली, असे गौरवोद्गार कमलेश बोरडे आणि प्रा. राजेंद्र शेजूळ यांनी काढले. भाग्यनगर आणि शक्तीनगर झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांची गरज भागली. विद्यार्थी-पालक आनंदून गेले. छोट्याशा मदतीने विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरील हसू बरेच काही सांगून गेले. असेच उपक्रम इतर झोपडपट्टीत आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू केले तर..!
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक' नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा