ऑटोरिक्षाचालक-मोलकरणीची मुलगी ‘एमपीएससी’ परीक्षेत राज्यात प्रथम
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ऑटोरिक्षाचालक-मोलकरणीची मुलगी ‘एमपीएससी’ परीक्षेत राज्यात प्रथम
भास्कर सरोदे, औरंगाबाद (28 ऑगस्ट 2021) :
आई मोलकरीण तर वडील ऑटोरिक्षाचालक. घरात अठराविश्व दारिद्र्य. दहा बाय दहा पत्र्याची खोली, शिक्षण आणि अभ्यासासाठी कुठेही अनुकूलता नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत श्यामल अंकुश बनकर, रा. महुनगर, औरंगाबाद हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (तांत्रिक) परीक्षेत राज्यातून पहिला येण्याचा मान मिळविला आहे. इतक्या विपरीत परिस्थितीत मिळालेल्या यशाने श्यामल, तिचे आई-वडील आणि कुटुंबीयांचे आभाळभर कौतुक होत आहे. आई-वडिलांचे मार्गदर्शन, त्याग, समर्पन आणि फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा हेच यशाचे गमक असल्याचे श्यामलने ‘बहुजन शासक’शी बोलताना सांगितले.
शुक्रवार, दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (तांत्रिक) अर्थात महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा-2019 चा निकाल जाहीर झाला. मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने हा निकाल दोन वर्षे उशिरा लावण्यात सरकारने आपले परमकर्तव्य बजावले आहे! श्यामल अंकुश बनकर हिने राज्यातून महिला खुल्या प्रवर्गातून प्रथम येण्याचा मान मिळवला. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकीच्या असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-2 पदी तिची निवड झाली आहे. तिने महाराष्ट्रात प्रथम येऊन आरक्षणाच्या नावाने खडे फोडणार्यांसाठी ही जोरदार चपराक समजली जात आहे. खरं तर त्यांना आरक्षणाचा अर्थ कळलेलाच नसतो; परंतु तरूणांची मने आरक्षणाच्या बाबतीत फारच विषाक्त बनली आहेत, हे देशाचे दुर्दैव मानावे लागेल.
महुनगरात श्यामलचे दहा बाय दहाचे पत्र्याचे घर आहे. वडील अंकुश बनकर ऑटोरिक्षा चालवून संसाराचा गाडा रेटतात. तर आई कल्पना अंकुश बनकर मोलकरणीचे काम करतात. जिथे खाण्याचीच भ्रांत तिथे शिक्षणाची काय गत! श्यामलला दोन भाऊ आहेत. मोठा भाऊ अजिंक्य हा पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातून यंत्र अभियांत्रिकीची पदवी घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करतोय. तर तिचा लहान भाऊ आशिष (तायक्वांदो ब्लॅक बेल्ट) हा आयटीआय झालेला असून एस. टी. महामंडळ, चिकलठाणा येथे इलक्ट्रीकल सहाय्यक म्हणून नोकरी करतोय. श्यामल दिल्लीला आयईएस (इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस) ची तयारी करतेय. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे ती सध्या औरंगाबादेत आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (तांत्रिक) निकालाने तिचा आणि तिच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. तथापि, श्यामलचा इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे, तो पुढीलप्रमाणे...
श्यामल गरिबीतच जन्मली आणि गरिबीतच लहानाची मोठी झाली. महुनगरातील कर्मविर शंकरसिंग नाईक विद्यालयात तिचे 10 वी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाले. दहावीला 93.9 टक्के गुण घेऊन ती शाळेतून प्रथम आली. विवेकानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. 11 वी, 12 वी इंग्रजीत असल्याने बरेच कठीण गेले. परिणामी 74 टक्के गुण घेत बारावी उत्तीर्ण झाली. मात्र, जेईई परीक्षेत तिने मराठवाड्यातून 7 वी रँक मिळवत आपल्यातील क्षमतांची चुणूक दाखवून दिली. त्या आधारावर तिला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद येथे विद्युत अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला. अभियांत्रिकीला चारही वर्षे ती विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली. इथपर्यंतचा तिचा प्रवास अत्यंत हलाखीचा आणि दारिद्र्याचा राहिला आहे. या 16 वर्षात वडील अंकुश बनकर आणि आई कल्पना यांनी हाडाचे काडं आणि रक्ताचे पाणी केले. एक एक दिवस घामाच्या धारांनी तर कधी अश्रूंच्या पाटांनी वाहून निघाला. आजही परिस्थिती तीच आहे. रस्त्यावरून ऑटोरिक्षाची चाके घासतात तेव्हा श्यामलला अभ्यासिकेला ये-जा करण्यासाठी 50 रूपये मिळतात. श्यामलनेही आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून यशाला गवसणी घातली.
चळवळीचे मोठे योगदान
मी साधा रिक्षाचालक. मुलां-मुलीला शिकविण्याची, त्यांना अधिकारी बनविण्याची प्रेरणा चळवळीतूनच मिळाली. प्रेरणा तर मिळालीच शिवाय साथही मोठी मिळाली. प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी चळवळ उभी राहते, याचा वारंवार प्रत्यय आला. माझ्या मुलीने यश मिळवले आहे, त्यात चळवळीचे मोठे योगदान आहे.
-अंकुश बनकर (श्यामलचे वडील)
![]() |
औरंगाबाद : अंकुश बनकर यांनी हाच ऑटोरिक्षा चालवून आपल्या घराचा उदरनिर्वाह भागवला आहे. |
परिवर्तनवादी वैचारिक चळवळीचा वारसा :
अंकुश बनकर यांचे फुलंब्री तालुक्यातील जातवा हे मूळगाव. ते बी.कॉम पदवीधर आहेत. रोजीरोटीसाठी औरंगाबादेतील महुनगरात अत्यंत साध्या पद्धतीने राहतात. रोज कमावले तरच घरची चूल पेटणार, इतकी बिकट परिस्थिती. रिक्षा चालवतानाच ते बहुजन समाज पार्टीत अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. मान्यवर कांशीरामजी यांची मिलिंद महाविद्यालयात पैशांनी तुला झाली तेव्हा ते साहेबांच्या सोबतच होते, इतकी त्यांची चळवळीशी जवळीक आणि बांधिलकी. बहुजन चळवळीत असल्याने सर्व महापुरूषांविषयी घरात चर्चा असत. या चर्चांमध्ये मुलांना सहभागी करत महापुरूषांचा संघर्ष, त्याग आणि बलिदानाविषयी अवगत करत. फुले-शाहू-आंबेडकर यांच्याविषयी कायम चर्चा असत. वास्तवातील घटना असल्याने मुलांनाही त्या खर्या वाटून ते त्यात रूची दाखवत. परिवर्तनवादी चळवळीचे बाळकडू घरातच मिळाल्याने माझी मुले चांगले शिक्षण घेऊ शकले, असे अंकुश बनकर सांगतात. यातूनच श्यामलने अधिकारी बनण्याची खूणगाठ बांधली आणि त्यात ती यशस्वीही झाली. मी दारिद्र्याने पिचलेला असतानाही चळवळीने मला फार मोठी साथ दिली, असे बनकर अभिमानाने सांगतात.
त्यागाचे फलित झाल्याचा आनंद
मुलां-मुलीच्या शिक्षणासाठी मोलकरणीचे काम केले. संसारात खूप यातना भोगावा लागल्या. आपल्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालावी लागली. त्याचे काही वाईट वाटत नाही. उलट त्यागाचे फलित झाल्यासारखे वाटतेय. श्यामल एक दिवस निश्चितच अधिकारी होईल, असा आत्मविश्वास होता. तिने तो आत्मविश्वास सार्थ ठरविला आहे. खूप आनंद झाला.
-कल्पना अंकुश बनकर (श्यामलची आई)
आधुनिक शाहू महाराज! :
श्यामल लहानपणापासूनच अष्ठावधानी आहे. शालेय गुणवत्तेबरोबरच तिला खेळातही रूची आहे. व्हॉलिबॉलची ती नॅशनल खेळाडू आहे. 2017 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठकडून नॅशनलसाठी तिने सहभाग नोंदविला आहे. याव्यतिरिक्त तिला डान्सचीही गोडी आहे. घरच्या गरिबीमुळे शिक्षण दुरापास्त असताना मावसकाका वामन दांडगे (निवृत्त सेल्स टॅक्स अधिकारी) आणि मावशी आशा दांडगे यांनी श्यामल आणि तिच्या भावांना अभ्यासासाठी त्यांची रूम उपलब्ध करून दिली. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यावर दिल्लीला युपीएससीच्या तयारीसाठी जायचे होते; परंतु जाणार कसे, हा यक्ष प्रश्न होता. यावेळी अॅड. के. डी. पगारे, डी. एस. थोरात यांनी मदतीचा हात दिला. मात्र, तेवढ्याने भागणार नव्हतेच. तेव्हा बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रभाकर पारधे यांनी अंकुश बनकर यांना ‘बहुजनांचे अनाथपिंडक’ तथा संत कबीर शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी कालवश माधवराव बोरडे यांची भेट घालून दिली. सर्व परिस्थिती कथन केल्यानंतर माधवराव बोर्डे यांनी श्यामलला मदतीचा शब्द दिला. नुसता शब्द देवूनच ते थांबले नाहीत, तर दिलेल्या शब्दाला जागलेही. श्यामलला दरमहा 10 हजार रूपये याप्रमाणे तब्बल 18 महिने दिले. मात्र, काळाची मर्यादा पडली. माधवरावजी बोरडे यांचे 3 जानेवारी 2021 रोजी निधन झाले. या बातमीने श्यामल धायमोकळून रडत होती. वडील अंकुश बनकर यांना हे दु:खद वृत्त सांगताना ‘आधुनिक शाहू महाराज गेले’, असे तिने आक्रंदुन सांगितले. यावरून माधवराव बोरडे यांची मदत श्यामलसाठी किती लाखमोलाची होती, हे लक्षात येते.
अधिकारी बनण्याचे होते स्वप्न :
बहुजन चळवळीच्या वातावरणाशी श्यामल परिचित होती. किंबहुना या चळवळीमुळेच तिची जडणघडण झाली, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळाला. विशेषत: ‘मायावतींना कलेक्टर व्हायचे होते’, याचे तिला फारच अप्रुप वाटत असे. त्यामुळे लहानपणीच आपल्याला अधिकारी व्हायचे, असे तिने ठरवून टाकले होते. शिवाय वडिलांनाही ती कलेक्टर बनावे, असे वाटायचे. ते वारंवार तिला त्याची जाणीव करून देत. ‘त्या’ स्वप्नांच्या वाटेतील एमपीएसीद्वारे झालेली निवड एक ठेपा असल्याचे श्यामल सांगते. निवड झाली असली तरी युपीएससी (इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस) करणारच, असा तिचा निर्धार आहे. शिकताना अनंत अडचणी आल्या; परंतु घरच्यांनी खूप साथ दिली. विशेषत: आई, वडील आणि अलीकडे माझा लहान भाऊ आशिष. बिकट परिस्थितीत ते साथ देतात. त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आले आहे. शिवाय समाजातूनही खूप मदत झाली, त्यांची मी ऋणी आहे. तेव्हा येथेच न थांबता युपीएससी (तांत्रिक) होण्याचे स्वप्न साकार करणारच, असे ती मोठ्या आत्मविश्वासाने सांगते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, यश-अपयशाने खचून न जाता संयमाने वाटचाल करावी, याबरोबरच स्मार्टवर्कचाही अवलंब करावा, असा संदेश श्यामलने दिला आहे. मी यापुढे समजतील होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना मदत करणार.
![]() |
औरंगाबाद : बहुजन शासकचे संपादक भास्कर सरोदे ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 : भारतीयांच्या गुलामीचा जाहीरनामा’ हा ग्रंथ भेट देऊन श्यामलचे अभिनंदन करताना. |
उच्चवर्णिय चष्मा बदलणार का?
शिकत असताना ‘तुझं काय, तुला आरक्षण आहे, तुझी निवड होणारच’, असे हीनवले जायचे. मात्र, जे कुणी हिनवायचे त्यांनी कधीच माझ्या परिस्थितीचा, माझ्यातील गुणवत्तेचा विचार केला नाही. किंवा ती जाणून घेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. उठसूट त्यांचा रोष आरक्षणावर असतो. समाज किती पूर्वग्रहदूषितपणे वागतो, याचेच आश्चर्य वाटते. आज मी राज्यात महिला प्रवर्गातून प्रथम आलीय, तरीही स्वत:ला उच्चवर्णिय समजणारे त्याच चष्म्यातून माझ्याकडे पाहणार, का चष्मा बदलणार?
-श्यामल बनकर
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक' नियमित वाचा)
तुम्हाला हा ब्लॉग आवडला का? आम्ही एक विना-नफा संस्था आहोत. आमची पत्रकारिता सरकारी आणि कॉर्पोरेट दबावापासून मुक्त ठेवण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत करा.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम ताई 👌👌👌👌💐💐💐अभिनंदन
उत्तर द्याहटवाअभिनंदन ताई - डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा वारसा चालवा .
उत्तर द्याहटवाअभिनंदन शामल पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐
उत्तर द्याहटवाWell done Shaman. Good achievement. Go ahead.
उत्तर द्याहटवाCongratulations Tai
उत्तर द्याहटवाआभिनंदन महाराष्ट्र लोक सेवा ओपन मधून पहिल्या नंबरने पास झाल्या बद्दल . केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परिक्षे साठी आनेक शुभेच्छा.
उत्तर द्याहटवाअभिनंदन !! अभिनंदन!!! तुला अजुन खूप पुढे जायचे आहे. थांबू नको तुझ्या मागे हजारो मुली येत आहेत.
उत्तर द्याहटवाHearty congratulations to you Shyamal, on your colourful success. Your success is indicating that you are indeed a painstaking girl. I wish you all success in your every walk of life. My Saprem Jaibheem to your parents, who are making efforts to bring you up with their sheer dint of hard work. Congratulations once again. - Advocate Damodar Dandge, Rasayani, Raigad.
उत्तर द्याहटवाHearty congratulations on success with flying colours. I wish you success in your every walk of life. Saprem Jaibheem to your parents who are helping you to come up in the life with their sheer dint of hard work.
उत्तर द्याहटवाCongratulation great achievement 👏
उत्तर द्याहटवाAbhinandan tai
उत्तर द्याहटवाCongratulations Didi 💐💐💐💐💐
उत्तर द्याहटवाआरक्षणाच्या नावे बोंब मारणारांसाठी जोरदार चपराक
उत्तर द्याहटवाअभिनंदन Best wishes
उत्तर द्याहटवाCongratulations n. Best wishes
उत्तर द्याहटवाCongratulations🎉🥳👏🥳🎉🥳🥳
उत्तर द्याहटवा