दहन : पार्थिवाचं अन्…जातीचं!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दहन : पार्थिवाचं अन्…जातीचं!

1. पुरोगामी म्हणविणार्या महाराष्ट्राचा मनुवादी चेहरा पुन्हा एकदा दिसून आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असलेलं माळवाडी बोरगाव हे छोटंस गाव. गावचे सरपंच मातंग समाजाचे! त्यांच्याच भावाचे निधन झालं; परंतु गावातील काही टगे स्मशानात अंत्यसंस्कार करू देईनात. पार्थिव 18 तास तसंच होतं. सोलापूर जिल्ह्याचे कर्तेधर्ते म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील. सध्या ते भाजपात आहेत. माळवाडी बोरगावचे आमदार सातपुते म्हणून आहेत. तेदेखील भाजपाचे आहेत. त्यामुळं भाजपाच्या हिंदू राष्ट्रानुसार हे सारं घडत आहे, असं म्हणायला हवं. म्हणून एका औषध कारखानादारासाठी विलेपार्ले पोलिस स्टेशन गाठणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही सोलापूरची वाट धरलेली नाही. विशेष म्हणजे ‘राष्ट्रवादी’ वळसे पाटलांचे पोलिसही कायद्याचं पालन करण्यास या मातंग कुटुंबाला सहकार्य करीनात. ते तरी काय करणार! त्यांच्या लेखी ‘राष्ट्रवादाची व्याख्या काय, तर आमची जात’! मातंग, चर्मकार, भटके विमुक्त, ओबीसी, यांना त्यांच्या राष्ट्रवादात स्थान कुठाय? ते असतं तर पोलिसांनी हे दहन प्रकरण खर्याखुर्या राष्ट्रवादी दृष्टीकोनातून हाताळलं असत; परंतु तसं होणं नव्हतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तर कथाच वेगळी. मागासवर्गीयांचे प्रश्न समोर आले की त्यांची पंचेंद्रिये थेट समाधी अवस्थेत जातात. या उच्च आध्यात्मिक अवस्थेत माणसाला भौतिक जगातील प्रश्न छळत नाहीत, असं आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार सांगतात. त्यामुळं अजित पवारांना हा प्रश्न समजणं शक्यच नाही. आपले मुख्यमंत्री देखील फार कार्यक्षम आहेत. महाराष्ट्राचा एवढा मोठा गाडा हाकताना अशा क्षुल्लक प्रश्नांकडे बघायला तरी त्यांना वेळ कुठून भेटणार? सोनिया गांधी आणि शरद पवार या दोन दरडींवर दोन पाय असताना एका मातंगाच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न त्यांना कसा काय दिसणार? शेवटी पीडित कुटुंबियांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोरच पार्थिवाला अग्निडाग दिला. एवढ्या थराला प्रकरण चिघळल्यानंतर आता पोलिस यंत्रणा जागी झाली असून काही आरोपींना पकडलं आहे, असं सांगण्यात येतंय. परंतु या निमित्तानं महाराष्ट्राचा पुरोगामी मुखवटा किती नकली आहे, हे पुन्हा एकवार दिसून आलं आहे.
2. खरं तर महाराष्ट्र हा पुरोगामी वगैरे कधीही नव्हता. जिथं भारतीय संविधान निर्मात्याचं नाव एका विद्यापीठाला देण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो, तो महाराष्ट्र पुरोगामी कसा असू शकतो? अहमदनगर जिल्ह्यातील सोनई या गावात कडबा कापण्याच्या यंत्रात टाकून मेहेतर मुलांना चराचरा कापलं जातं, तो महाराष्ट्र पुरोगामी कसा? खर्डा, जिल्हा अहमदनगर इथं आमच्या जातीच्या मुलीशी बोलला म्हणून नितीन आगे या मातंग समाजाच्या शाळकरी मुलाला हाल हाल करून मारण्यात आलं, असा महाराष्ट्र पुरोगामी कसा? आता तर गावात नमून वागणार्या चर्मकार समाजावरदेखील अन्याय अत्याचाराचा मनुवादी वरंवटा फिरू लागला आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी कसा? जिथं जयभीमची रिंगटोन वाजली म्हणून हत्या केली जाते, तो महाराष्ट्र पुरोगामी कसा? जिथं खैरलांजी घडतं, तो महाराष्ट्र पुरोगामी कसा? जिथं दाभोलकर-पानसरे यांच्या हत्या केल्या जातात, तो महाराष्ट्र पुरोगामी कसा? जिथं मागासवर्गीयांचं पदोन्नतीतील आरक्षण रद्द केलं जातं, तो महाराष्ट्र पुरोगामी कसा? जिथं अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त, ओबीसी व धार्मिक अल्पसंख्य यांचं हक्काचं बजेट नाकारलं जातं, तो महाराष्ट्र पुरोगामी कसा? अस्वस्थ करणार्या प्रश्नांची यादी खूप मोठी आहे; पण उत्तर समान आहे, महाराष्ट्र पुरोगामी नाही!
3. त्यामुळं सोलापूरला जे घडलं त्याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आश्चर्य आहे ते मनुवाद्यांच्या डावपेचांना बळी पडणार्यांचं! एवढं सारं उघड्या डोळ्यानं बघूनही यांचे डोळे अद्यापही उघडले नाहीत. ते कधी उघडतील? खुलेआम मनुस्मृतीचा अंमल चालू झाल्यावर? काही दशकांपूर्वी महाराष्ट्रात जातीय अन्याय अत्याचार झाला की त्यात बहुधा ‘बौद्ध विरुद्ध मराठा’ असा जातीसंघर्ष असायचा. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्त्वांनी प्रेरित झालेला बौद्ध समाज आणि ‘मी गावाचा मालक’ या मनुवादी भावनेने इरेला पेटलेला मराठा समाज असा हा संघर्ष होता. बौद्ध समाजाची जागृती हा सर्व जातीच्या मनुवाद्यांपुढील मोठा जटिल प्रश्न आहे. या जागृतीला पायबंद घालण्यासाठी प्रथम ‘बौद्ध विरुद्ध चर्मकार’ असा झगडा लावण्याचा प्रयत्न झाला. यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पर्याय म्हणून जगजीवनराम यांना उभे करण्याचा डाव होता. त्यामुळं महाराष्ट्रात ‘काँग्रेसी चर्मकार विरुद्ध रिपब्लिकन बौद्ध’ असं राजकीय द्वैत उभं राहिलं. नंतर रिपब्लिकन काँग्रेस युती झाल्यानं हे द्वैत संपलं. पुढे मातंग समाजाला बौद्ध समाजाविरुद्ध उकसविण्याचे प्रयत्न झाले. ‘उपेक्षितांचे अंतरंग’ लिहिणारे कालवश श्री. म. माटे यांनी त्यांच्या हयातीत हा उपाय वापरून पाहिला होता. ग्रामीण भागातील मनुवादी मराठ्यांना हा उपाय फारच आवडला. त्यातूनच मग मातंगांना फूस देऊन स्वतंत्र आरक्षणाची मागणी पुढे आणण्यात आली.
4. खरं तर संविधानानुसार प्रवर्गाला आरक्षण आहे, वैयक्तिक जातीला नाही. मनुवाद्यांना देखील हे माहित आहे. मात्र, ‘बौद्ध विरुद्ध मातंग’ असा संघर्ष उभा करू पाहणार्यांना सत्याचं काहीच देणंघेणं नव्हतं. खोटंनाटं बोलून का होईना; परंतु बौद्धांच्या विरोधात मातंगांना उभं करता येतंय ना, या हिशेबाने हा डाव टाकण्यात आला. हल्ली महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविणार्या उद्धव ठाकरे यांच्या पिताश्रींनी तर शिवाजी पार्कवर ‘हिंदू दलितांचे संमेलन’ भरवलं होतं! एकीकडं ‘हिंदू सगळे एक’ असं बोलायचं व दुसरीकडं ‘हिंदू दलितांचे संमेलन’ भरवून हिंदू धर्मात दलित आहेत याची स्वमुखानेच हाकाटी पिटवायची, यांतील विसंगती सुस्पष्ट आहे. आपल्या संवैधानिक अधिकारांबाबत जागृत असलेल्या बौद्धांच्या जागृतीचं लोण शेजारपाजारच्या जातींपर्यंत जायला नको व बौद्धांना वेगळं पाडण्याचा डाव म्हणून हे ‘हिंदू दलितांचे संमेलन’ फार गाजावाजा करून भरवलं गेलं. त्यासाठी मातंग व चर्मकार समाजातील हुजर्यांचा मनसोक्त वापर केला गेला. मात्र एवढं करूनही महात्मा फुले, शाहू राजे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर अढळ विश्वास असणारे हजारो मातंग-चर्मकार तसेच सर्व जातीचे लाखो विवेकी नागरीक या डावपेचांना बळी पडले नाहीत, असं अभिमानानं नमूद करायला हवं. अर्थात, बौद्ध समाजातही सर्वांना सामावून घेऊ शकेल, अशा प्रगल्भ व सक्षम नेतृत्त्वाचा अभाव असल्यानं हे डावपेच अल्प प्रमाणात यशस्वी झाले, ही वस्तुस्थिती आहे.
5. अशा डावपेचाचा एक भाग म्हणून मातंग व चर्मकार समाजाला हिंदूत्ववादी परीघात प्रवेश मिळाला. तथापि, त्यातून या समाजाचे प्रश्न मार्गी लागल्याचं दिसून येत नाही. आजही मुंबईसारख्या शहरात गटई कामगारांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. मागील अनेक दशकं मुंबई महापालिकेवर ‘शिवसेना’ असूनही चर्मकार समाजाची ही अशी दुरावस्था! मातंग समाजाचंही तसंच. हिंदुत्ववादी टिळा लावूनही हा समाज आजही दारिद्र्यात खितपत पडला आहे. मुळात मातंग चर्मकार समाजाची प्रगती व्हावी, मराठा-ब्राह्मण कायस्थांच्या मांडीला मांडी लावून हा समाज बसावा, या शुद्ध हेतूने ‘हिंदू दलितांना’ एकत्र आणलंच नव्हतं! हिंदू लोकसंख्येच्या सुमारे 80 टक्के लोकसंख्या असलेल्या अनुसूचित जाती- जमाती, भटके विमुक्त, ओबीसी या मागासवर्गीय हिंदूंच्या भल्यासाठी हिंदुत्ववाद नाहीच मुळी! हिंदुत्ववादानुसार ‘स्वातंत्र्याच्या फळावर केवळ तथाकथित उच्च जातीयांचा अधिकार आहे’. उरलेल्या हिंदूंनी म्हणजे अनुसूचित जाती- जमाती, भटके विमुक्त, ओबीसी यांनी ‘फळाची अपेक्षा न करता केवळ गुलामीचे कर्म करीत राहावे’! मग आम्ही ‘फळाचे मालक’ कधीमधी एखादं शोभेचं महापौरपद, कधीमधी एखादा आमदारकीचा तुकडा, कधीमधी एखादं महामंडळ देऊन या ‘कर्मयोगी’ मागास जाती- जमातींना त्यांच्या पायरीप्रमाणे वागवू. म्हणून बौद्धांच्या विरोधातील हुकूमी पान एवढीच या ‘हिंदू दलितांची’ उपयुक्तता होती. ही उपयुक्तता संपल्यावर त्यांना त्यांच्या पायरीनेच बसवण्यात आलंय! भरीस भर म्हणून हे ‘हिंदू दलित’ देखील आपली पायरी सांभाळूनच वागत आहेत. ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण व मनुवादी मराठे यांच्या विरोधात हे ‘हिंदू दलित’ कधी अवाक्षरदेखील काढीत नाहीत; परंतु असं पायरी सांभाळून राहिले तरी त्यांच्यावर देखील बौद्धांसारखेच अन्याय अत्याचार भोगण्याची पाळी आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील विचाराधीन प्रकरण हा त्याचाच एक नमुना आहे!
6. यांवर उपाय काय? उपाय जुनाच आहे. सर्व मागास जातींचं ऐक्य करण्याचा. जोपर्यंत कांशीराम जिवंत होते, तोपर्यंत तो उपाय संभाव्य देखील वाटत होता. अर्थात, महाराष्ट्रातील राजकीय धुरंधरांनी त्यावेळी कांशीराम यांचे महाराष्ट्रातील कार्यकर्तेच गळाला लावले होते! आता तर कांशीरामही नाहीत. म्हणून तो उपाय नजरेच्या टप्प्यात सुद्धा दिसत नाही. मराठ्यांनी केलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध ‘मूलनिवासी’ चकार शब्दही बोलत नाहीत. आठवले साहेबांची प्रतिभा नवनवीन चारोळ्या करण्यात मग्न झाली आहे. राहता राहिले बाळासाहेब आंबेडकर. त्यांना तर मराठा आरक्षणाची व हिंदू देवळे बंद असल्याची घोर चिंता पडली आहे. अशा परिस्थितीत ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण व मनुवादी मराठे यांनी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती- जमाती, भटके विमुक्त, ओबीसी या हिंदूंना व मुस्लीम बौद्ध आदी धार्मिक अल्पसंख्य यांना जातीयवादी चरख्यात पिळून त्यांचं पार चिपाड करायचं ठरवलंय. या चरख्यात पिळून घ्यायचं की भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्त्वांना प्रमाणभूत मानून स्वाभिमानानं जगायचं, याचा निर्णय या समाजाला आज ना उद्या घ्यावा लागणार आहे. हा निर्णय झाला की मग जातीचं दहन व्हायला वेळ लागणार नाही. तोपर्यंत पार्थिवाचं दहन करण्यासाठी वळसे पाटलांच्या ‘राष्ट्रवादी’ पोलिसांचे बूट चाटण्याचं कर्म समस्त मागासवर्गीयांनी करणं भाग आहे.
(अग्रलेख : बहुजन शासक, 27 ऑगस्टए 2021)
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक' नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
आपणास माझा त्रिवार सॅल्युट सर,
उत्तर द्याहटवावेदनेच वास्तव अजुनही आम्हाला नाही समजले हीच मोठी विलक्षण शोकांतिका आहे
दिवसेनदिवस असे अन्याय अत्याचार सहन करत जिवन जगण्याची आम्हाला सवय झाली आहे, सवलत घेण्यासाठी सगळेच रांगेत उभे राहतात पण संकट काळात सगळे आपली तोंड लपवून बसतात करणं कुणीतरी कुणाच्या दावनीला बांधलेला आहे,तोंड उघडले तर मुंडीवर पाय बसणार हे मात्र नक्की च त्या पेक्षा गपगुमान चपला उचलत बाहेर बसन उत्तम.
जेव्हा स्वताच्या घराला आग लागली तेव्हा अशा ना बाबा साहेब आठवतात.. सर्व बहुजन समाज एकता ही काळाची गरज आहे यासाठी एकता अभियान राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे माझे मत आहे.
Reality based editorial ,which shows us our society's mind darkness and government's unexpected response. Most need of social awareness.🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा