‘निवडुंग : आठवणींचे सोनेरी पान’मधील व्यक्तिरेखा चित्ररूपात साकारताना चित्रकार तथा शिल्पकार नि:शब्द का झाला?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
‘निवडुंग : आठवणींचे सोनेरी पान’मधील व्यक्तिरेखा चित्ररूपात साकारताना चित्रकार तथा शिल्पकार नि:शब्द का झाला?
वाचा : चित्रकार तथा शिल्पकार विकास सरवदे यांच्या भावना
छत्रपती संभाजीनगर :
‘निवडुंग : आठवणींचे सोनेरी पान’ हा एक सत्यघटना संग्रह आहे. यामध्ये बहुविध व्यक्तीमत्व असणार्या व्यक्तींच्या समृद्ध जीवनाचा संघर्षमय जीवनपट मांडण्यात आला आहे. या सर्व व्यक्तींच्या जीवनाचा प्रवास मला चित्ररूपात मांडण्याची संधी प्राप्त झाली, हे मी माझे भाग्य समजतो. अशी जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल या ग्रंथाचे लेखक तथा बहुजन शासकचे संपादक भास्कर सरोदे यांचे खूप खूप आभार मानतो. लिखाण झालेल्या व्यक्तिरेखांवर चित्रांची निर्मिती करण्या संदर्भात
सरोदे सरांसोबत चर्चा झाली, तेव्हा मी सहज हे काम पूर्ण करेल असा माझा प्राथमिक अंदाज होता. मात्र, तो अल्पावधीतच फोल ठरला. व्यक्तिरेखा वाचनासाठी घेतल्या तेव्हा लिखाणाची शैली खूप गहन असल्याने माझ्यासाठी ते एक आव्हानात्मक काम होते. ग्रंथातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील चांगले आणि वाईट अनुभव, जीवनात घडलेल्या अनेक संघर्षमय घटनांचे सरांनी खूप आत्मीयतेने व अत्यंत बारकाव्यांनीशी त्यांचे निरीक्षण करून लेखन केले आहे. हे वाचन करत असताना आपण एक लिखाण वाचतो आहे याचे थोडेही भान राहत नाही, ही सर्व त्या लिखाणाच्या ताकतीची प्रचिती देते. मला समजले की या लिखाणाला साजेसे असे या कथांचे चित्ररूप तयार होणे अभिप्रेत आहे.
या ग्रंथातील व्यक्तिरेखा वाचन करत असताना मी स्वतःला पूर्णतः विसरून गेलो. मनाला अस्वस्थ करणारे क्षण, कित्येक प्रसंग असे की ज्याने मन थक्क करून सोडले. अनेक वेळा मी माझे अश्रू थांबवू शकलो नाही आणि काही वेळा तर मी वसतिगृहाचा एक विद्यार्थी म्हणून जगलो, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मी प्रवास करू लागलो, त्यांचा सोबती बनून त्या घटनांचा भाग होत गेलो. मग चित्रकाराच्या दृष्टिकोनातून त्या त्या जीवनातील एक एक घटना, त्याचे रूप आणि असंख्य आकार समोर उभे होत गेले, मी त्या आकरांना रेखाटण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि व्यक्तिरेखा चित्ररूपात साकारत गेल्या.
निवडुंगाच्या रोपाचे एक एक पान मोठे होत त्याचे झाड तयार होते. जेव्हा जवळ जाऊन पाहतो तेव्हा त्या निवडुंगाच्या झाडाची पाने ही सोनेरी दिसतात. या व्यक्तिरेखाही त्याप्रमाणेच आहेत. या सर्व आदर्श व्यक्तिरेखांमधील एक महत्त्वाचा दुवा अथवा एक केंद्रबिंदू आहे संत तुकाराम-मिलिंद मुलांचे शासकीय वसतिगृह. प्रत्येकाच्या जीवनरेषेतील वसतिगृह म्हणजे एक मध्यबिंदू आहे. या बिंदूपासून भूतकाळात जाणारी रेषा आणि या बिंदूपासून पुढे उज्ज्वल भविष्यात जाणारी रेषा, जी सुवर्णरेषा ठरते. वसतिगृह हे मला एक वास्तू न वाटता ते एक महाकाय वटवृक्ष जाणवला, जो की अनेक पक्षांना तिथे घडवून उंच भरारी घेण्यासाठी बळ देतो. म्हणूनच मी प्रत्येक कथेच्या चित्ररूपात एका वटवृक्षाचा आकार वारंवार रेखाटला आहे. जीवन जगणे किती सोपे आणि किती अवघड असते, हे त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हेच या ग्रंथातून प्रतीत होते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तिरेखेच्या रेखाटनामध्ये एक डोळा हा आकार येतो. तो डोळा म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा प्रतिकात्मक दृष्टिकोन आहे. तो दृष्टिकोन जीवन जगण्याची प्रेरणा देतो, ध्येय देतो, जीवनाला खरा अर्थ देतो. प्रत्येकाच्या जीवनात इच्छा आणि अपेक्षांची रांग लागलेली असते, ध्येयरूपी अपेक्षांचे मनोरे सर करण्याचा प्रयत्न आपण करत असतो, म्हणूनच रेखाचित्रांमध्ये छोटे-मोठे मनोरे रेखाटले गेले आहेत, जे की काही पांढरे तर काही काळ्या रंगाची आहेत. त्याचा सांकेतिक अर्थ काही अपेक्षा पूर्ण झाल्या, तर काही अपूर्ण राहिल्या हे दर्शवतात. चित्रातली रेषा ही एक विशिष्ट अवस्था दर्शवते. काही आकार हे अर्थरूप अर्थ घेऊन समोर येतात, तर काही भाव प्रकट करतात. ज्याप्रमाणे व्यक्ती किंवा एखादी वस्तू विविध ठिकाणी
आपणास पाहावयास मिळते, त्यानुसार त्याचा अर्थबोध होतो. तसेच काही चित्ररचनेत प्रत्येक आकार हा त्याच्या केलेल्या विशिष्ट रचनेनुसार त्याचा अर्थ व्यक्त करत
असतो. अनेक प्रकारच्या रेषा व त्यांची विविध प्रकारे केलेली मांडणी, वेगवेगळे आकार व त्यांची
केलेली रचना, या सर्वांच्या संकल्पनातून एक चित्ररूप आपणांसमोर तयार होते, त्या पूर्ण चित्ररूपाचा आपण एक अर्थबोध घेत असतो. ही स्वतंत्र चित्र भाषा आहे, जी शब्दांच्या अर्थाला व्यक्त न करता नि:शब्द भावनेला व्यक्त करत असते.
या व्यक्तिरेखांना चित्ररूप देताना, हृदयाला पिळवटून टाकणार्या भावनांनाही रेखाटण्याचा प्रयत्न करत गेलो, त्यानुसार आकार निर्मिती होत गेली. दुःख हे किती टोकाचे असावे, संघर्ष हा किती वेदनादायी असावा किंवा असू शकतो, प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा एकमेव मार्ग आहे, उच्च विचार आणि आदर्श जीवनशैली हेच जीवनाला समृद्ध करू शकते, हेच या व्यक्तिरेखांमधून निष्पन्न होते. तथागत भगवान बुद्ध आणि महामानव बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांचा आदर्श घेऊन समता, न्याय, बंधुता, प्रेम या मूल्यांना आपण प्रेरणा मानून अथवा आदर्श मानून आपले जीवन जगण्याचा प्रयत्न केला व करत आहात, हा एक सामान्य विचारसरणीच्या समाजासाठी खूप मोलाचा ठेवा आहे, असे मी मानतो. आपल्या अर्थपूर्ण जगण्याला नि:शब्द चित्ररूपी सदिच्छा देऊन थांबतो!
विकास आबासाहेब सरवदे
चित्रकार तथा शिल्पकार
GDrt, Dep.Ed, MF Painting
कलाशिल्प आर्ट स्टुडीओ, छत्रपती संभाजीनगर.
मो. नं. : 7447353777, 7875809154
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा