लोकशाहीचा विजय असो...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकशाहीचा विजय असो...
भास्कर सरोदे, छत्रपती संभाजीनगर :
विधानसभा निवडणूक मतदानाला तीन-चार दिवस बाकी... पाचवेळा निवडणूक जिंकलेला आणि सहाव्यांदा निवडणुकीला उभा राहिलेला ‘पाटील’ उबदार गालिच्च्यावर लोळत पडलेला होता. गेल्या वर्षभरापासून एक पाय घरात, तर एक पाय दारात आणि सदा चिंतातूर असलेले कारभारी असे बेफिकीर लोळताना पाहून पाटलीण आचंबित होऊन कोड्यात पडली की,
‘यासणी इतकी सवड कशी मिळाली म्हणायची!’
कासराभर दिवस डोक्यावर आला तरी कारभारी काही उठेना म्हणून पाटलीणने हटकले,
‘अहो, तुम्हासणी झोप कशी काय येतीया म्हणायची? मतदानाला मोजून चार दिस राहिल्यात अन् तुम्ही बिनघोर लोळत्यात, हे काही समजत नाही बघा!’
‘अहो, आम्ही आहोत म्हणलं! अशानं कसं चालायचं? कार्यकर्ते, पाठीराखे, समर्थक, तुमच्या आशीर्वादाने नुकतेच पक्षात आलेल उपरे, तुमची वाट पाहाताहेत म्हणलं.’
झोपेचं सोंग घेतलेला पाटील काही हूं का चूं करेना. (पाटलीण मनातल्या मनात ‘रातभर ढोसल्याली दिसतीया... अजून उतरलीच नाही की काय?’ असे म्हणून वाड्याबाहेर डोकावून पाहातात, तर काय सगळे कार्यकर्ते ताटकळलेले, पाटलाच्या आदेशाची वाट पाहात रेंगाळलेले, तर काहींच्या चेहर्यांवर उदासी दिसून येत होती. तेवढ्यात विरोधी पक्ष उमेदवाराच्या रॅलीचा गोंगाट आणि डीजेचा दणदणाट कानावर पडतो.)
‘औंदा पाटील लोळवायचाच, असा चंग बांधून विरोधी पक्ष जोरदार तयारीत दिसतुया आणि यासणी कस्ली झोप लागलीया कुणास ठाऊक?’ पाटलीण पुटपुटली.
पाटलीणची घालमेल पाहूण पाटलानं हळूचकून जांभाळी देत आळस झटकला...
‘काय बाई, दाड झोप ही! अहो, बाहीर उठून बघा तरी किती दिस वर आलाय? अन् सगळे कार्यकर्ते निघून गेल्येती...’ पाटलीण काताऊन बोलली.
‘जाऊ द्या त्यांना, कुठवर जातील आणि तुम्ही काय बी चिंताबिंता करू नगा बघा, ह्यो पाटील हाय पाटील! उगाच नाय ईस वर्षापासणं राज करीत!! ह्यो पिढीजात धंदा हाय आपला!!!’, पाटलानं मौन तोडत पाटलीणची समजूत घातली.
‘अत्ता बाई, दारावर एक कार्यकर्ता नाय अन् राज करणार म्हणे... कस्लं हो राज? तुम्ही काय शिवाजी महाराज हाय व्हयं, राज करायला? त्येंनी लोकांच्या मनावर राज केलं, तवा कुठं रयतेचं राजं म्हणून अजरामर झालं! आणि आता ही लोकशाही हाय...’, पाटलीणने सूर चढवला.
‘अवो, ही लोकशाही हाय म्हणूनच आमचं चालतया, शिवाजी राजंच्या जमान्यात अस्ली थेरं करायची काय कोणाची बिछाद!’, पाटलानं समजावण्याचा प्रयत्न केला.
पाटलीण : म्हण्जी! आम्ही समजलो नाही.
पाटील : तुम्हास्नी न समजलेलंच बरं!
पाटलीण : ते कस्सं म्हणायचं?
पाटील : अवो, शिवाजी राजंच्या काळात आमच्यासारख्या सरंजामदारांची जागा रायगडावरील टक्मक् टोकावर होती. राजंचा आदेश निघाला की कडेलोट ठरलेलाच...
पाटलीण : टक्मक् टोक, कडेलोट, हा तर गद्दारांसीनी... अन् तुम्ही तर...
पाटील : येगळं काय करतोय... लोकशाही आहे म्हणून...
पाटलीण : म्हण्जी?
पाटील : तुम्ही जास्त डोकं नका लावू... आपल्या चहाचं बघा... आता गेलं पायजेत... आम्ही चूळ भरून आंघोळ करून हे आलोच...
पाटलीण : (चहाचा कप पुढं करत) हं आता सांगा... लोकशाही असूनही कडेलोट कशापायी म्हणायचा?
पाटील : कारभारीण तुम्ही खरंच फार भोळ्या आहात... राजंच्या काळात गुन्हा सिद्ध झाला की, कडेलोट ठरलेलाच, पळवाट नाही. हीथं लोकशाहीत पळवाटाच पळवाटा... (हां हां हसतात)
पाटलीण : कस्ला गुन्हा अन् कोणत्या पळवाटा?
पाटील : बरं, आम्ही निघतो, प्रचार केला पाहिजे... आल्यावर बोलू...
आपल्या खास मर्जीतल्या कार्यकर्त्यांना घेऊन पाटील प्रचाराला निघून गेले. इकडे पाटलीणच्या मनात कडेलोट, पळवाटा चांगल्याच घिरट्या घालत होत्या. धनी याआधी असं कधीच बोलल्याचं आठवत नाही. अलीकडे अधूनमधून ते म्हणायचे की, ‘राजकारण बास्स करावा म्हणतोय. ही शेवटची येळ! यापुढे भैय्यासाहेब आणि ताईसाहेबांच्या हवाली हा राजपाट करून उर्वरित आयुष्य राजकारणमुक्त जगावं’, अशी इच्छा व्यक्त करत होते. मात्र, आज त्यांच्या चेहर्यावर काहीतरी अपराधीपणाचा भाव होता, तो त्यांना व्यक्त करायचा असावा...
रात्री जेवताना पाटलाचा मूड चांगला असल्याचे पाहून पाटलीणने सकाळी अर्धवट राहिलेला विषय छेडला.
पाटलीण : स्वारी फारच बिन्धास्त दिसतीया... बिनीचे कार्यकर्ते सोडून गेले, उजवा, डावा हात म्हणवणारेही विरोधी गटात सामील झाले, तरीही बिन्धास्त कसे म्हणायचं?
पाटील : काय बी फरक पडणार नाही. कोणाच्या असण्यावर आणि नसण्यावर ईलेक्शन जिंकता थोडेच येतात. तो काळ गेला, जेव्हा खरंच कार्यकर्त्यांची आणि मतदारांची गरज पडत होती! आता कसं सगळं झाकून जातयं. निवडणुकीचा निकाल आधीच ठरलेला असतोय. तो निकाल लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून कोंबड्याच्या झुंजी लागाव्यात तसं आम्ही केवळ दाखवण्यासाठी झुंजतो. वास्तव फार येगळं हाय... ते खोलात जाऊन न सांगितलेलं बरं...
पाटलीण : आता तर सांगावाच लागेल, त्याशिवाय आम्हास्णी चैन पडणारच नाय बघा!
पाटील : कारभारीण कसं सांगावा, लोकशाही म्हण्जी चोरांचा बाजार! हीथं आडवं-उभं सगळं जळतंय; पण खंर सांगू, लोकशाहीत मतदारच खरा राजा. मात्र, त्याला त्याच्या अधिकाराची कधी आम्ही जाणीवच होऊ दिली नाही. लोकशाहीत त्याची भूमिका कशी निर्णायक आहे, हेच त्यास्णी माहीत नाय!
पाटलीण : ते कसं?
पाटील : अवो, पूर्वी आम्ही मतपेट्या पळवून निवडूण यायचो. बोगस मतदान केल्याशिवाय तर आमची निवडणूकच साजरी होत नव्हती. ह्या गोष्टी मतदारांच्या लक्षात येताच ईव्हिएम आली. त्याने तर मतदारांना थांगच लागत नाही. मतदार हक्क बजावतात; परंतु निवडून दुसरेच येतात. आम्हीही त्यातलेच..., हे बाहीर कुणास्णी सांगू नगा, नाय तर म्हातारपणी जेलची हवा खावी लागेल, सगळा इज्जतीचा कचरा होईल, जीवनाचा इस्कोट होईल.
पाटलीण : तरच म्हणते की, हे इतके बिनघोर कसे?
पाटील : कसं हाय कारभारीण, गेल्या सहा महिण्यांपासून ह्याच भानगडीत होतो बघा... दिल्लीतले रंगा-बिल्ला ताकासतूर लागू द्येत नव्हतं. पूर्वी ही भानगड आमचा पक्ष फारच चलाखीने करायचा, कोणासही खबरबात व्हायची नाय. मात्र, ह्यांच कामच लय येगळं, कशालाच घाबरत नायत, उघड उघड करत्यात सगळं!! नाय तर निवडणुकीच्या आधीच यांना निवडूण येणार्यांचा ‘अब की बार 300 पार’, ‘अब की बार 400 पार’ हा आकडा कुठून कळतो? अज्ञानातून मतदारांना हा खेळ समजत नाय. तरीसुद्धा अधूनमधून बोंब होतीय; पण सगळी यंत्रणा (निवडणूक आयोग, न्यायसंस्था, पोलीस यंत्रणा) या रंगा-बिल्लाने आपल्या कब्ज्यात ठेवलीय, कोणाचचं काही चालत नाही.
पाटलीण : कोणाचंच नाही चालत...?
पाटील : कसं चालणार? ज्यांची जबाबदारी आहे, तेच ‘आमच्या काही, तर त्यांच्या काही’ गळाला लागलेत. जागृतीचा अग्नी कोण तेवत ठेवणार? हे जे जबाबदार बुद्धिजिवींनी ठरवलं, तर इकडली सत्ता तिकडं करू शकतात; पण त्यांच्या बुद्धीला भारी आमचं पाकीटं ठरलीयेत! अलीकडे संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांचे नातू अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी, त्यांना ‘पाकीट बुद्धिजिवी’ म्हटलंय. पूर्वी फक्त पत्रकारांनाच ‘पाकीट पत्रकार’ म्हटलं जायचं. आता त्यात या बुद्धिजिवींची भर पडलीय. वरून नको त्या योजनांचा भडीमार! त्यामुळं सर्वसामान्य मतदारांची मतीच गुंग झालीय बघा!
पाटलीण : बरं मग, यंदा काय?
पाटील : काय नाय, सगळं बेस हाय! ‘ईव्हिएम देवी’च्या नावानं सगळं बेस होईल. यावेळेला ते रंगा-बिल्ला जवळ फिरकूबी देत नव्हते. खूप हातापाया पडलो, गयावया केली, खोक्यांची संख्या दुप्पट केली, तवा कुठं सेटिंग झाली! म्हणूनच इतके कार्यकर्ते गेले, सख्खे गेले, नेते गेले, तरीही आम्ही बिनघोर!
बरं, झोप येतीया, उद्या लवकर उठावं लागेल, तव्हा आपल्या घरातल्या गोष्टी जनात येऊ देऊ नका, म्हण्जी झालं!
असं म्हणून पाटील झोपी गेले. पाटलीण रात्रभर जागीच होत्या. आजपर्यंत आपल्या धन्याचं त्यांना खूप कौतुक वाटायचं, अभिमान आणि आदर वाटायचा. त्यांची कीर्ती सर्वदूर आहे म्हणूनच त्यांना मतदार निवडून देतात, एकदा नाही पाच-पाच वेळा. त्यांचा जेवढा डामडौल मोठा, तेवढा आपला मान मोठा. तथापि, हे सगळं खोटं आहे, हे कसं त्यांनी एका फटक्यात सांगून टाकलं...
पाटलाकडं नांदायला आले तेव्हा खूप जाळ सहन केला. सासू-सासरे, नंदा-दीर यांचा छळ शोषला. या छळ-छावणीतच दोन मुलांना जन्म दिला. दोघांनाही उच्च शिक्षण दिलं. दोघेही आता फॉरेन रिटर्न आहेत. एकदा भैय्यासाहेबाने बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांनी महिलांसाठी काय काय केले, हिंदू कोड बिल लागू केलं नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला, यासंबंधीची पुस्तकं वाचायला दिली, तर ताईसाहेबांनी करारी जिजाऊ आणि सावित्रीबाई यांची चरित्र आणून दिली. माहेरी सत्यशोधकीय वारसा असल्याने हे साहित्य खूप जवळचं वाटलं. सासरकडील मंडळींच्या चोरून हे साहित्य वाचून काढलं आणि स्वत्वाची जाणीव झाली. नेहमी पायाजवळ असणारी नजर, आज धन्याच्या नजरेत भिडवण्याचे बळ आलय. आता आकाश मोकळं वाटतयं. भैय्यासाहेब आणि ताईसाहेब दोघेही फॉरेनच्या विद्यापीठांत लेक्चरर आहेत. त्यांना ह्यांच्या राजकारणाचे धडे दिले नाहीत, ते बरेच झाले. सगळा भूतकाळ, वर्तमानकाळ आठवत आठवत पाटलीणला कधी सकाळ झाली ते कळलेच नाही.
निवडणूक झाली. मतदान योजनेनुसार झाल्याचे पाटलाच्या देहबोलीतून दिसत होते. त्यांचा आनंद आकाशाला गवसणी घालत होता...
मतमोजणीचा दिवस उजाडला... पाटील सहाव्यांदा निवडणूक जिंकले. विजयी मिरवणुकीची तयार सुरू असतानाच पुनर्मतमोजणीची तक्रार आली. ईव्हिएममध्ये पडलेली मतं आणि व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या यांची पडताळणी करण्यासाठी तक्रार होती. जिल्हाधिकारी भैय्यासाहेबांचाच आयआयटी, मुंबई येथील वर्गमित्र होते. जिल्हाधिकार्याचे वडील उत्तर प्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री मायावतीच्या मर्जीतील अधिकारी होते. त्यामुळे घरातच आंबेडकरवादाचे बाळकडू मिळालेल्या जिल्हाधिकार्यांनी तक्रार दाखल करून घेण्यास क्षणाचाही विलंब लावला नाही.
बरं, तक्रार कुणाची, तर खुद्द विजेत्या उमेदवार पाटील यांच्याच सहचारिणीची! विजयी उन्मादात पाटलाला याची खबरही नव्हती. जेव्हा माहिती मिळाली तेव्हा वेळ निघून गेली होती. त्यांनी पाटलीणवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, भैय्यासाहेब आणि ताईसाहेब दोघेही आईच्या बाजूने उभे राहिले. पाटलाचा नाईलाज झाला. फेरमतमोजणी होऊन पाटलाचे पितळ उघडं पडलं. ईव्हिएममध्ये छेडछाड केल्याच्या आरोपाखाली पाटलाला अटक करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले.
आता, पाटील तुरुंगाची हवा खात आहेत, तर पाटलीण आपल्या मुलांबरोबर विदेशातून भारतीय लोकशाहीचा खून करणार्या रंगा-बिल्ला प्रवृत्तीच्या विरोधात जनआंदोलन करण्याची तयारी करत आहेत!
टीप : पाटलीणसोबत कोणी ‘पाकीट बुद्धिजीवी’ वा ‘पाकीट पत्रकार’ नाहीत, हे विशेष.
तळटीप : पाटलाला जेल झाल्याने पत्रकार व बुद्धिजीवी कोमात गेले.
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा