माणूस फसगतीचा शिकार!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
माणूस फसगतीचा शिकार!
-शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे व्याख्यानमाला : उद्घाटन प्रसंगी ज्ञानेश महाराव यांचे उद्गार
छत्रपती संभाजीनगर : ‘उठावा महाराष्ट्र देश’ या विषयावर मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, विचारमंचावर उपासिका विठाबाई माधवराव बोरडे, शिवव्याख्याते प्रदीप सोळुंके व उपासक मिलिंद दाभाडे.
भास्कर सरोदे, छत्रपती संभाजीनगर :
ज्ञान-विज्ञानाचा अभाव, समृद्ध संत परंपरेचा विसर, धर्म आणि जातीच्या फेर्यातून बाहेर काढण्यासाठी ‘उठावा महाराष्ट्र देश’ आहे. संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या विचारांनीच माणूस पुढे जाईल. धर्मग्रंथ, पोथ्या, पुराणं यांनी आमची फसवणूक केली आहे. मात्र, या सगळ्यांची तपासणी वा चिकित्सा करणारे एकमेव संविधान आहे. वेगवेगळ्या माध्यमातून माणसाची फसगत झालीय. त्यातून बाहेर पडण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची कास धरा, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी काढले.
शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे पहिल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवव्याख्याते प्रदीप सोळुंके, तर उपासिका विठाबाई माधवराव बोरडे व मिलिंद दाभाडे यांची विशेष उपस्थिती होती. प्रा. दिलीप महालिंग यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. प्रा. समाधान इंगळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्याख्यानमालेसाठी तापडिया नाट्यमंदिर तुडूंब भरले होते.
आज आपण सगळे झोपलेलो आहोत. समाजात छोटी छोटी माणसं असतात, त्यांच्या माध्यमातून मोठ मोठी कामं होत असतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे होत. माधवरावांनी संत कबीर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मोठं काम केलं आहे. त्याचा समाजाला विसर पडणार नाही, असा विश्वास वाटतो. कारण त्यांनी घेतलेले खोलवर कष्ट पाहता, हे त्यांचे कार्य चिरंतर चालत राहणार आहे. त्यांची वृत्ती घेण्याची नव्हती, तर देण्याची होती. त्यांच्या माध्यमातून हजारो शिक्षक-कर्मचारी आपला उदरनिर्वाह करत आहेत. प्रश्न असा आहे की, ते सगळेजण माधवरावांच्या विचाराने वागतात का, हा प्रश्न आहे. माधवराव आयुष्यभर फुलपाखरासारखे झिजले. जातानाही फुलपाखरासारखे रंग देऊन गेले. म्हणून व्याख्यानमालेचा रंग आता उठणार नाही, असा विश्वास ज्ञानेश महाराव यांनी व्याख्यानाच्या सुरुवातीलाच दिला.
आमचा पुराणातला दृष्टिकोन :
महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं. माती आणि मतीशी नातं जोडणारं ‘ग’ गवताचा तर ‘ज्ञ’ ज्ञानाचा शिकवला. त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्या पहिल्या शिक्षिका बनल्या. मुलींना शिकवलं. म्हणून त्यांचं नाव अजरामर आहे. तुम्हीही शिकता. मोठ मोठ्या पदांवर जाता. मात्र, तुमचा दृष्टिकोन आजही पुराणातला आहे. शिकून स्वत: विचार करणे गरजेचे असते; परंतु तुम्ही काय करताय? त्यांनी सांगितलं म्हणून नऊ वाराच्या नऊ रंगाच्या साड्या नेसता. ही गुलामगिरी आहे. तुम्ही कोणती साडी नेसावी, तुम्ही काय खावे, तुम्ही काय करावे, हे सांगणारे ते कोण? असा प्रश्न तुम्हाला कधी पडत नाही. कारण आमचा दृष्टिकोन आजही पुराणातला आहे. सावित्रीबाई समजली असती, तर नवरात्रीला आजच्या शिक्षिका नऊ रंगाच्या साड्या घालून आल्या नसत्या. तुमची एबीसीडी पुराणातली असून तुम्हाला कायम गुलाम बनवणारी आहे. सावित्रीबाईंनी गुलामीची साखळदंड तोडले. तुम्ही कधी तोडणार आहात? त्यासाठी सावित्रीबाई फुले समजून घ्यावी लागेल. थोतांडाच्या मागे धावणे सोडावे लागेल. पुराणातल्या भाकडकथा सगळ्या खोट्या आहेत. मात्र, तुम्ही वटसावित्रीच्या बाहेर यायलाच तयार नाहीत, हेच आजचे वास्तव असल्याचे महाराव म्हणाले.
आण्णाभाऊंनी झिटकारली गुलामी :
आपली नेहमी फसगत होत असते. म्हणून आण्णाभाऊ साठे सांगतात,
‘गुलामगिरीच्या या चिखलात। रुतून बसला का ऐरावत।
अंग झाडुनी निघ बाहेरी। घे बिनीवरती धाव॥
जग बदल घालुनी घाव। सांगून गेले मला भीमराव॥’
हे तत्त्वज्ञान आम्ही अंगीकारतो का? आण्णाभाऊ साठेंची शाळा फक्त दीड दिवसाची. त्यांनी जीवनाच्या शाळेत प्रचंड काम केलं. त्यांच्या 38 कादंबर्यांपैकी सुमारे 25 कादंबर्यांवर चित्रपट निघाले आहेत. शेकडोंच्या वरती त्यांच्या पुस्तकांवर पीएच. डी. झाल्या आहेत. असं एकही शहर नाही जिथं आण्णाभाऊ साठे चौक नाही. हे कसं झालं? कारण त्यांनी गुलामी झटकली. आपण गुलामी झटकतो काय? देव, धर्म, धर्मग्रंथाच्याआडून गुलामीला चिकटून राहतो, अशा या समाजाच्या वागण्यावर त्यांनी बोट ठेवले.
‘जैसे थे’वादी सिद्धांताने फसवणूक :
माणसाच्या जीवनामध्ये कायम अस्वस्थता असली पाहिजे. महापुरूषांच्या जीवनात प्रचंड अस्वस्थता होती, म्हणून ते या जगाची पुनर्रचना करू शकले. माणसाचं जीवन कसं खळखळणार्या पाण्यासारखं असलं पाहिजे. समुद्राच्या लाटांवर लाटा येतात तसं असलं पाहिजे. पाणी स्थिर राहिलं की त्याचं डबकं होतं आणि तिथं फक्त कमळच उगवतं. आपली प्रचंड फसवणूक होते. आरएसएस आणि भाजपच्या पुराणवादी, स्थितीवादी विचारांना भाळल्यानेच लोकांची फसवणूक झाली, असे अप्रत्यक्ष ज्ञानेश महाराव यांना सुचवायचे होते.
शिवरायांनी स्थापन केलं समतेचं स्वराज्य :
छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची संकल्पना घेऊन आले. वडील आदिलशाहाच्या दरबारात सरदार होते. मात्र, स्वराज्याचं स्वप्न लोकांना आपलं वाटलं. स्वराज्याद्वारे जे निर्माण करायचे होते, ते जातीचा ताठा आणि धर्माचा अभिमान बाळगण्यासाठी नव्हतं. तर ते कशासाठी होतं? प्रबोधनकार ठाकरे लिहितात, ‘आदिलशाहीच्या दरबारातून साक्षात शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे जरी चालून आले असते, तर ते स्वराज्याच्या आड आले म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांचा कोथळा बाहेर काढला असता आणि त्या रक्ताने आपल्या आईचा मळवट भरला असता.’ हा विचार होता. तिथे धर्माचा अहंकार नव्हता. स्वराज्याच्या आड जो कोणी येईल, त्याला आडवं करण्याचं धोरण होतं. शिवाजी महाराजांच्या जयघोषांमध्ये 33 कोटी देवदेवतांची फलटण रिटायर्ड होते. मग त्या देवीदेवतांच्या फलटणीमध्ये भवानीमाता बसत नाही काय? तिला कधी रिटायर्ड करणार? जय जिजाऊ, जय शिवराय कधी बोलणार? असा सवाल महाराव यांनी केला.
स्वराज्यामध्ये समता नसेल, तर ते स्वराज्य काय कामाचे? म्हणून शिवाजी महाराजांनी समतेचं स्वराज्य निर्माण केलं. पुढे हेच स्वराज्य पेशव्यांच्या ताब्यात गेलं आणि समतेचं तत्त्व पेशव्यांच्या नाचगाण्यांमध्ये हरवत जाऊन अस्त पावले.
फुलेंनी मांडली एकमय समाजाची संकल्पना :
पुढे महात्मा जोतीराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहून शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आठवण करून दिली. महात्मा फुले यांनी एकमय समाजाची संकल्पना मांडली. तो विचार आपण विसरून गेलो आहोत.
राजर्षी शाहू महाराजांनी समता प्रत्यक्षात कशी आणता येेते, ते त्यांनी आरक्षणाच्या माध्यमातून करून दाखवलं. सर्व समाजाला समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी त्यांनी आरक्षणाचे धोरण राबविले. धर्माच्या नावाखाली जातीयतेच्या माध्यमातून माणसालाच कनिष्ठ ठरविण्याचा जो खिळा ठोकला आहे, तो खिळा मी पकडीने काढीन, असा त्यांनी संकल्प सोडला आणि प्रत्यक्षात उतरवून दाखवला. याला राजा म्हणतात.
भंतेशाही, पोपशाही व मुल्लाशाही म्हणजे फसवणूक :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समता प्रस्थापित केली. त्याचे आपण लाभार्थी आहोत. संविधानाचा अपमान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही संत कबीर कधी वाचला नाही. ते म्हणाले आपल्यामध्ये डोकावून बघा. आपल्यामध्येही काही चुका राहून जातात. त्या देव, धर्म, संस्कृतीच्या नावाने आपल्यावर बिंबवल्या जातात. त्या ओळखल्या पाहिजे. धर्म कुठलाही असो, आम्ही भटशाहीविषयी बोलतो. मात्र, आता भंतेशाही, पोपशाही आणि मुल्लाशाही चांगली आहे, असे समजू नका. सगळीकडे ऐतखाना आहे. सगळीकडे फसवणूक आहे. सगळीकडे गुलामी आहे, हे कायम लक्षात ठेवा. हे चांगलं, ते वाईट असं काही नसतं. ते धर्म सगळे असतील; पण त्या सगळ्या धर्माना तपासण्यासाठी आणि त्यातील चुका सुधारण्यासाठी शेवटी संविधानच एक आहे. शंकराचार्याला खूनाच्या आरोपात अटक झाली. कुठल्या वेदांचे पठण करून तो सुटला नाही. त्याला जामीनच घ्यावा लागला. शाही इमाम पण सुटला नाही. त्याला वाचवायला कुराण आले नाही. त्यालाही जामीनच घ्यावा लागला. संविधान महत्त्वाचे आहे. बायबल, कुराण काहीही महत्त्वाचं नाही. हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे फलित आहे. म्हणून ते जपलं पाहिजे, असे आवाहन महाराव यांनी केले.
म्हणून ‘उठावा महाराष्ट्र देश’ :
आपल्याला हे सगळं कळत नाही म्हणून ‘उठावा महाराष्ट्र देश’ आहे.
महाराष्ट्राला एवढी संत परंपरा असताना आपली फसगत का झाली? कारण आपण मूळ विचारापासून दूर गेलो. खोट्या संस्कृतीच्या फटक्यामध्ये सापडलो. समाज हा हत्तीसारखा असतो. लोकसभा निवडणुकीत आपण दाखवून दिलं. कुणाच्या प्रचारामुळे वा यात्रेमुळे हे घडलं नाही. अहंकाराची 240 वर घसरण झाली, उगाचच नाही. इथल्या जनतेनं ठरवलं. या जनतेनं लढाई केली, निश्चय केला, म्हणून खाली आले. त्यामुळे कोणी सांगू नये की, माझ्यामुळं झालं. लोकांच्या मनामध्ये असतं, तेच घडत असतं. समाज हा हत्तीसारखा आहे. मात्र, हत्तीवर लहानपणी संस्कार केला जातो की, साखळदंड आपण तोडू शकत नाही. आपल्याही समाजाचं असच झालं. ते साखळदंड तोडण्याचं काम हे महापुरुषांनी केलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षण महर्षी माधवराव बोरडे यांच्यासारख्यांनी केलं. ही माणसं छोटी छोटी होती; पण त्यांनी विचारांची कुठेही गद्दारी न करता, विचारांशी प्रामाणिक राहून, महापुरुषांचा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवला. त्यांच्याही कार्याचं विस्मरण होता कामा नये.
आम्हाला विज्ञान कळलंच नाही! :
एक शास्त्रज्ञ होता. त्याने 1921 मध्ये विज्ञान कथा लिहिल्या. त्यात त्याने म्हटले आहे की, हा अवकाश आहे, त्यापलीकडे नक्षत्र आहेत. ती नक्षत्र तुम्हाला त्रास द्यायला कशाला येतील हो, अशी कोपरखळी मारताना महाराव म्हणाले, कायम लक्षात ठेवा आकाशातल्या ग्रहापेक्षा आणि पुस्तकातल्या ग्रहापेक्षा तुमच्या मनाचा निग्रह सर्वश्रेष्ठ असतो. चंद्रावर माणूस गेला. तिथे खड्डेच खड्डे. तेथील भूपृष्ठाचं संशोधन झालं. पाणी सापडलं. इतकं सारं होऊनही चंद्र पाहिल्यानंतर आमच्या संकष्टी आणि रोजे सुटतातच कसे? आपल्याला विज्ञान कधीच कळलं नाही. जेव्हा भारताने 2019 साली चंद्रायान पाठवलं, तेव्हा इस्त्रोचा प्रमुख सेल्वम होता. त्यानं काय केलं? चांद्रयानाची प्रतिकृती बनवली आणि इथल्या मठाधिपतींच्या हस्ते त्याचे पूजन केलं. आमचे प्रधानमंत्री प्रात:काळापासून बघत बसले होते की, ते पोहोंचते की नाही म्हणून. सगळं फुकट गेलं, 30 हजार कोटींची माती झाली. आपण कुठे आहोत?
पाकीट पत्रकारितेचे वस्त्रहरण! :
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, शाहीर साबळे, शाहीर अमर शेख, शाहीर आत्माराम पाटील ही माणसं कमी शिकलेली होती; परंतु ज्ञानाने संपन्न आणि विचाराने परिपक्व होती. त्यांच्या ज्ञानाची खोली शिकलेल्यांनाही नतमस्तक व्हायला लावणारी होती. नील ऑर्मस्ट्रॉग चंद्रावर गेला, तेव्हा आत्माराम पाटील यांनी शाहिरी केली. ती शाहिरी समजली असती, तर ‘उठावा महाराष्ट्र देश’चा अर्थ कळला असता. सातवी शिकलेल्या माणसाची कल्पनाशक्ती बघा...चंद्रावरती माणूस गेला, तेव्हा देव लोकांचे संमेलन भरले होते. ब्रह्मा, महेश, विष्णू म्हणायला लागले की, ‘हाय हाय माणसा, पाय चंद्राला लागला...!’ अनेक कोट्यांतून शाहिरांनी चंद्रावरील ब्रह्मा, महेश, विष्णू कसे चिंताक्रांत झाले, याचे अफलातून वर्णन केलेले आहे. या देवांचे थोतांड त्यांनी कसे उघडे पाडले याचे अचूक निरीक्षण शाहीर करतो. नारदाच्या रुपकाने शाहिराने आजच्या पाकिट पत्रकारितेची वस्त्रहरण केले आहे. नारदाप्रमाणे पत्रकार कोणाच्याही मोहात न पडणारा उलट्या काळजाचा असला पाहिजे, जो मी होतो अशी कोटीही महाराव यांनी केली. ज्या नारदाने ब्रह्मा, विष्णू, महेशला लबाड ठरवताना घोटाळे करणारे म्हटल्याचे शाहिराने मांडले आहे. ते धाडस आजच्या पत्रकारांमध्ये नसल्याची खंत महाराव यांनी व्यक्त केली.
कमी उंचीची माणसं जेव्हा मोठी झालेली दिसतात...:
आम्ही गणेशोत्सवात गणपतीची उंची वाढवतो. गणपतीची उंची वाढवून काय होणार आहे, तुमच्या बुद्धीची उंची कधी वाढणार, असा सवाल करताना महाराव म्हणतात, दगडाची उंची वाढवून समाजाची संस्कृती मोठी होत नाही. माणसं जेव्हा मोठी होतात, तेव्हा आपली संस्कृती आणि देश मोठा होतो. हा पराक्रम या महापुरुषांनी केला. तथापि, कमी उंचीची माणसं जेव्हा मोठी झालेली दिसतात, तेव्हा समजायचं संध्याकाळ झालीय! कारण संध्याकाळच्या सावल्या मोठ्या दिसतात. हे कायम लक्षात ठेवा की, जीवनात काही साध्य करायचे असेल, तर या महापुरुषांचा (संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर) आदर्श ध्यानात असू द्या.
निर्मिती मूल्यांचा शोध घ्या :
शाहीर आत्माराम पाटील यांची कल्पनाशक्ती किती आचाट. 1969 ची शाहिरी किती आशयपूर्ण आहे. तुम्ही तर आयटीच्या जगात वावरता. मात्र, आकाशवाणी होण्याची भ्रामक कल्पना तुमच्या डोक्यात असते. एक गोष्ट कायम लक्षात असू द्या की, ‘जे आज नव्हतं ते उद्या राहील; पण आज नाही, ते उद्या कधीच असणार नाही’, असं सांगणारी माणसं होती. म्हणून महापुरुषांनी उद्याचा दिवस निर्माण केला. तुम्ही निर्मितीच्या मूल्यांचा शोध घेतला पाहिजे. तथापि, आम्ही तो घेत नाही, म्हणून आमची फसगत होते.
ध्येय निश्चित करा :
माणसाला बुद्धी आहे, तो विचार करू शकतो. तो नवनिर्माण करू शकतो. प्राण्यांना ते शक्य नाही. तुमचं ध्येय ठरलं पाहिजे. तथागत बुद्ध, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ध्येय ठरवलं होतं. ध्येय ठरवण्यासाठी बुद्धी शाबूत असावी लागते. आपण बुद्धी चालवतो का? तर नाही.
‘जे पायाने चालतात, ते अंतर कापतात
जे बुद्धीने चालतात, ते ध्येय गाठतात’
महापुरुषांनी बुद्धी चालवली, म्हणून ते ध्येय गाठू शकले. त्यासाठी होणार्या त्रासाची तमा बाळगली नाही. आयुष्याचं गाणं चांगलं व्हावं, असे वाटत असेल तर त्रास सहन केला पाहिजे. शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे यांनी तो त्रास सहन केला. हे सगळं उभं करताना विठाबाई बोरडे यांनाही किती यातनाचा सामना करावा लागला असेल, याची कल्पनाही करवत नाही.
हा पुरोगामी महाराष्ट्र आहे का? :
महाराष्ट्र संत महात्म्याची भूमी आहे. यामुळे या भूमीला पुरोगामी महाराष्ट्र म्हटले जाते; परंतु खरंच पुरोगामी महाराष्ट्र आहे का, असा जळजळीत सवाल ज्ञानेश महाराव यांनी केला. तो असता तर येथे देव-देवळे मोठी झाली नसती, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. यासाठी त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ या ग्रंथाचा संदर्भ दिला. आम्ही कुणाचेतरी गुलाम झालो आहोत. आपलं सोडून भलत्याच्याच मागे लागल्याने आमची फसगत होते आहे. त्रिभूवन अर्थात काल, आज आणि उद्या असणार्या महामानवांच्या विचारांवर चालावे लागणार आहे. तो आत्मविश्वास तुम्हाला दुसरा कोणी देणार नाही, तर तो स्वत:च शोधावा लागेल, असेही ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रदीप सोळुंके यांनी केला. आभार प्रा. समाधान इंगळे यांनी मानून माधवराव बोरडे व्याख्यान मालेच्या पहिल्या पुष्पाचा समारोप केला.
(बहुजन शासकमध्ये वाचा संपूर्ण व्याख्यानमाला)
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
Very excellent analysis sir, Maharao sir is explaining Buddhas Right view ,one of the eight noble path. Great...
उत्तर द्याहटवा