ईव्हिएमविरोधात आक्रोश! : आमरण उपोषण, स्वाक्षरी मोहीम, याचिका, पदयात्रा, अभियानाद्वारे जनजागृती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ईव्हिएमविरोधात आक्रोश! : आमरण उपोषण, स्वाक्षरी मोहीम, याचिका, पदयात्रा, अभियानाद्वारे जनजागृती
-निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, सत्ताधारी ऐकताय ना!
भास्कर सरोदे, औरंगाबाद :
2024 च्या निवडणुकीच्या तोंडावर ईव्हिएमविरोधात आक्रोश तीव्र झालाय. ‘ईव्हिएम हटाओ, देश बचाओ’चे नारे गुंजताहेत. ‘ईव्हिएम हटाओ, बॅलेट पेपर लाओ’चे आर्त आवाज ऐकायला मिळताहेत. त्यासाठी आमरण उपोषण, स्वाक्षरी मोहिमा, सर्वोच्च न्यायालयात याचिका, पदयात्रा, जनजागृती अभियानाद्वारे ईव्हिएमला विरोध दर्शविला जात आहे. पृथ्वीवर बसून चांद्रयान मोहीम नियंत्रित करता येऊ शकते तर ईव्हिएम का नाही, असा सवाल उपस्थित करताना बॅलेट पेपरद्वारा निवडणुका घेण्याची मागणी जोर धरत आहे. तथापि, लोकशाहीतील हा आवाज निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, सत्ताधारी पक्षाच्या कानावर आदळून त्यांना जाग येते का, हाच खरा प्रश्न आहे.
नुकत्याच पाच राज्यातील निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय झाला. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगढ मध्ये भाजपाने ईव्हिएमची जननी काँग्रेसचे त्यांच्याच शस्त्राने (ईव्हिएम) पानिपत केले. हा पराभव जिव्हारी लागल्याने काँग्रेसबरोबरच ‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य टांगणीला लागले. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच काँग्रेसने ईव्हिएमवर प्रश्न उपस्थित केले.
1. काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनी, ‘चीपवाली कोणतीही मशीन हॅक करता येऊ शकते. मी 2003 पासून ईव्हिएमद्वारा मतदानाला विरोध करतो आहे. माझा ईव्हिएमवर विश्वास नाही असे म्हणतानाच माननीय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय आमच्या भारतीय लोकशाहीचे रक्षण करतील काय?’, असा प्रश्न केला आहे.
2. दुसरीकडे बहुजन समाज पार्टीच्या सर्वोसर्वा बहन मायावती म्हणाल्या, ‘ये जीत उनके गले मे नहीं उतर रहीं।’
3. पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएमबाबत सर्वप्रथम भाजपानेच शंका उपस्थित केली होती. काँग्रेस राजवटीच्या काळात हा मुद्दा सगळ्यात आधी सुब्रमण्यम स्वामी, किरीट सोमय्या यांनीच कोर्टात नेला होता. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात याकरता याचिका केली होती. यावर शिवसेनेने आवाज उठवावा म्हणून सोमय्या प्रेझेंटेन्शन घेऊन शिवसेना भवनात डॉ. स्वामी आले होते. डॉ. स्वामींचं यावरचं पुस्तक वाचा.
तसंच, उद्धव ठाकरे म्हणाले की, शंकांचं निरसन करायचं असेल तर देशातील कोणतीही एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. पोस्टल वोटिंग बॅलेट पेपरवर येतात. त्यामध्ये 199 जागांवर काँग्रेस आघाडीवर होती. मग आमचा ईव्हीएमवर विश्वास कसा बसेल?
4. पाच राज्यांच्या निवडणुकाआधी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील ईव्हीएम निवडणुकांवरून मोठं विधान केले होते. ईव्हीएमवर निवडणुका घेणारा भारतानंतर बांगलादेश शेवटचा देश आहे. आता बांगलादेशनेही ईव्हीएम निवडणुका बंद केल्या आहेत. त्यामुळे भारतातही ईव्हीएमवर बंदी घालावी, अशी मागणी संजय राऊतांनी केली. ते शुक्रवारी (7 एप्रिल 2023) पुण्यात मराठी पत्रकार परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
देशातील निवडणूक प्रक्रियेवर लोकांना संशय :
संजय राऊत म्हणाले, देशाची लोकशाही टिकवायची असेल, तर कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएमला विरोध झाला पाहिजे आणि निवडणुका मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) झाल्या पाहिजे. या देशातील निवडणूक प्रक्रियेवर लोकांना संशय आहे. आपला शेजारी देश बांगलादेश आहे. ईव्हीएमवर निवडणुका होणारा बांगलादेश भारतानंतर शेवटचा देश होता. त्या बांगलादेशच्या प्रमुख शेख हसिना यांनी ईव्हीएम निवडणुका रद्द करून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची घोषणा केली.
ईव्हिएमविरोधात मोहीम :
मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने आपल्या घटनात्मक आदेशाची अंमलबजावणी करावी, यासाठी देशातील सामाजिक कार्यकर्ते, वकील, प्राध्यापक, माजी आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस यांनी पीटीशन दाखल करण्याहेतूने स्वाक्षरी मोहीम राबविली. यामध्ये मेधा पाटकरसह प्रशांत भूषण यांचाही सहभाग होता.
या पीटीशनमध्ये ‘आधुनिक भारताचा सर्वात मोठा अभिमान म्हणजे जगातील सर्वात मोठी आणि चैतन्यशील लोकशाही होय. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये ईव्हिएम/व्हीव्हीपॅट मतदानावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. मतदारयाद्यांमधील नावे अनियंत्रितपणे हटविण्यात आल्याच्या बातम्या आणि राजकीय पक्षांच्या निधीमध्ये वाढलेली गुप्तता, यामुळे देशाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे’, असे म्हटले आहे.
देशातील मोठा वर्ग ईव्हिएमच्या विरोधात आहे, याची जाणीव सरकारला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
क्यों की गोदी मीडिया....
‘क्यों की गोदी मीडिया सो रहा हैं’ या माध्यम गटाच्या माध्यमातून ईव्हिएम हटवून मतपत्रिकेद्वारा सर्व निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या स्वाक्षरींचे निवेदन निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती यांना पाठविण्यात येणार आहे.
ईव्हिएम हटाओ,...
सामाजिक क्रांती अभियानतर्फे ‘ईव्हिएम हटाओ, संविधान बचाओ’ अभियान राबविण्यात येणार आहे. औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय ते भीमा कोरेगाव शौर्यस्तंभ असे हे अभियान असेल. हे अभियान दि. 17 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 च्या दरम्यान राबविले जाणार आहे. ईव्हिएमविरोधात जनजागृती करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
ईव्हिएमविरोधात आमरण उपोषण :
औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर संविधान विश्लेषक अनंत केरबाजी भवरे आमरण उपोषणाला बसले आहेत. राष्ट्रनिर्माते महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनापासून (28 नोव्हेंबर 2023) ते आमरण उपोषण करत आहेत. आज 15 डिसेंबर रोजी त्यांच्या उपोषणाचा 18 वा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाला राज्यातून विविध पक्ष, संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
अनंत भवरे यांनी खालील मागण्या केलेल्या आहेत...
1. जगातील सर्वच लोकशाहीवादी इतर देशांनी (ज्यांनी ईव्हीएम बनविल्या त्यांनीसुद्धा) ईव्हिएम ऐवजी बॅलेट पेपरचा स्वीकार केला आहे.
2. बॅलेट पेपरवरच सर्व निवडणुका घ्याव्यात अशी जनतेची मागणी आहे.
3. ‘चंद्रयान-3’ पृथ्वीवरून नियंत्रित करता येऊ शकते, तर ईव्हिएमला नियंत्रित करून विशिष्ट राजकीय पक्षाला लाभ मिळवून दिला जावू शकतो. ही शंका सर्व भारतीय जनतेला असल्यामुळे एका यंत्रात जनतेचे सार्वभौमत्व बंदिस्त राहू शकत नाही. अशी भीती जनतेत निर्माण झाली आहे.
4. लोकशाही देशात शेवटी ‘जनता’ हीच सार्वभौम असते. कारण जनतेसाठीच जबाबदार संस्था निर्माण होतात. जनतेची इच्छा हीच सार्वभौम असते. म्हणूनच ईव्हिएमद्वारे निवडणुका न घेता मुख्य निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवरच निवडणुका घेऊन लोकशाहीला बळकटी आणण्याचे काम करावे.
5. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याबरोबरच निवडणूक आयोगाने कोणत्याही गुन्हेगाराला, न्यायालयाने शिक्षादेश दिलेल्या, आरोप सिद्ध झालेल्या, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या, संविधानाशी निष्ठा न बाळगणार्यांना, पाच वर्षापूर्वीच्या शपथपत्रातील संपत्तीच्या आकडेवारीतील आणि आताच्या आकडेवारीतील तफावत याचे योग्य ऑडिट दाखल केल्याशिवाय कोणत्याही उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेऊ नये.
आदी मागण्याचा समावेश आहे.
ईव्हिएमची होळी करणार...
ईव्हिएम/व्हीव्हीपॅट ऐवजी देशातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी हे आमरण उपोषण सुरू केले होते. याद्वारे समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. अनेक पक्ष, संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा देऊन ईव्हिएमचा निषेध नोंदवला आहे. सोमवार, दि.18 डिसेंबर 2023 रोजी आंदोलनाद्वारे ईव्हिएमची जाहीर होळी करून उपोषण सोडणार आहे. तथापि, ईव्हिएमविरोधातील हा लढा अधिक व्यापक प्रमाणात सुरूच राहील.
-अनंत केरबाजी भवरे (उपोषणकर्ते)
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा