फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा भाष्यकार हरपला
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा भाष्यकार हरपला : बहुजन शासकतर्फे प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भास्कर सरोदे, औरंगाबाद :
फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा भाष्यकार प्रा. हरी नरके यांचे आज 9 ऑगस्ट 2023 या क्रांतीदिनी र्हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बहुजन चळवळ, सत्यशोधक चळवळ आणि परिवर्तनवादी चळवळीचा अवकाश व्यापणारे हरी नरके यांच्या निधनाने मोठी हानी झाली. फुले-शाहू- आंबेडकर विचारांचा भाष्यकार, संशोधक, मार्गदर्शकाला बहुजन शासकतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
मुलगी प्रमितीचा संदेश :
‘माझे वडील हरी नरके यांचे आज दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वैकुंठ स्मशानभूमी, पुणे येथे सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेमध्ये ठेवण्यात येणार आहे. अंत्यविधीसुद्धा वैकुंठ स्मशानभूमी, पुणे मध्येच होणार आहे’. हरी नरके सरांची मुलगी प्रमितीचा हा संदेश सर्वाच्या माहितीस्तव.
अलीकडे होते अस्वस्थ! :
‘भास्करराव, माझ्या टेबलवर सध्या तीन-चार केसेस येऊन पडल्या आहेत, त्या निस्तारण्यात माझा बराचसा वेळ जात आहे. आपलीच माणसं अडचण निर्माण करतात, तेव्हा वेदना खूप होतात...’, ही त्यांची व्यथा बरेच काही सांगून जाते. समोरच्या शत्रूबरोबर वैचारिक लढाई लढताना आपली म्हणवणारी माणसं जेव्हा अविचाराने वागतात, तेव्हा होणारे दु:ख हिमालयाहून मोठे होते, हेच त्यांना मला सांगायचे होते. बहुजन शासकसाठी कोणताही, कुठलाही लेख पुनर्प्रकाशित करण्याची खुली सूट त्यांनी दिली होती. एका पुस्तकाच्या प्रस्तावनेसाठी मी त्यांना विचारणा केली, असता त्यांनी आपल्या मनातली अस्वस्थता बोलून दाखविली होती.
गेल्यावर्षी झाली धावती भेट :
प्रा. हरी नरके जेव्हा केव्हा औरंगाबादेत आले, तेव्हा त्यांनी माझी आठवण काढली, अनेकदा भेटी झाल्या. चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून ते माझा नेहमीच आदर करत आले. गेल्यावर्षी ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावरील व्याख्यानासाठी ते औरंगाबादेत आले होते. त्यावेळी झालेली धावती भेट ही माझ्यासाठी शेवटची ठरली. बाकी फोनवरून नेहमी बोलणं व्हायचं. मात्र, अलीकडे ते चळवळीच्या अंगाने अस्वस्थ वाटायचे.
नरके सरांमध्ये माणूस दिसला! :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख असताना मी व शुद्धोदन आहेर त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी आमचा केलेला आदरसत्कार अवर्णनीय होता. तीन ताट घेऊन स्वत: त्यांनीच जेवण वाढले. चळवळीच्या गप्पांच्या नादात, ‘आणखी घ्या...लाजू नका...’ असे ते म्हणत होते. किती हा साधेपणा...माणूस विचारांनी मोठा असला की, कसा जमिनीवर असतो, याचे हे उत्तम उदाहरण. अन्यथा आमच्याकडे चार पुस्तकं नाही वाचली की, साहित्यिक, लेखक जमीन सोडून वागायला लागतात...नरके सरांमध्ये येथे मला माणसातला माणूस दिसला!
कुठलाही गर्व नाही. ज्ञानाचा अभिमान नाही. अत्यंत साधेपणा, पुराव्यानिशी बोलणं आणि तत्वांसाठी कुणाशीही भिडणं, हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्ये होते.
परिवर्तनवादी आंदोलनात सक्रिय :
प्रा. हरी नरके हे नाव रिडल्स आंदोलनापासूनच जनमाणसात रुजायला सुरूवात झाली होती. त्यानंतर मंडल आयोग, नामांतर लढा यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सत्यशोधकीय आणि परिवर्तनवादी चळवळीत त्यांचा सहभाग नोंदला गेला आहे. ‘म. फुल्यांची बदनामी : एक सत्यशोधक’ हा ग्रंथ 4 मार्च 1981 रोजी प्रकाशित झाला. या अभ्यासपूर्ण सत्यशोधकी ग्रंथाने हरी नरके यांचे नाव सर्वदूर परिचित झाले. श्री शिवप्रतिष्ठाणचा संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ मनोहर भिडेने आणि ब्राह्मणमंडळींकडून महात्मा फुले यांची बदनाम चालवली होती, त्याला वरील ग्रंथाद्वारे हरी नरके यांनी सडेतोड उत्तर दिले होते. केंद्रात भाजपचे पहिल्यांदाच सरकार आले तेव्हा त्यांनी भारतीय संविधान बदलासाठी व्यंकटचैलय्या आयोग नेमला. त्यानंतर हरी नरके यांनी संविधान जागर अभियानांतर्गत अनेक व्याख्याने दिली. या व्याख्यानांनी हरी नरके यांची संविधानावरील निष्ठा सर्वपरिचित झाली. बहुजन विचारांच्या अंगाने लेखन आणि संशोधन ही त्यांची जमेची बाजू राहिली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस विशेषत: छगन भुजबळांशी वाढलेली जवळीक अनेकांना खटकणारी असली तरी सुखावणारीच होती!
संस्था, समित्यांवर नेमणूक :
प्रा. हरी नरके यांनी देश-विदेशात सुमारे 10 हजार व्याख्याने दिली आहेत. राज्य व राष्ट्रीय पातळीवर शंभरेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचे सदस्य सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांची कारकीर्द उजळ राहिली आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. जेम्स लेन प्रकरणात भांडारकर संस्थेवर हल्ला झाला तेव्हा त्यांनी समाजाचा रोष पत्करून भांडारकर संस्थेची पाठराखण केली होती. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे, भांडारकर संस्था हा माहितीचा सर्वात मोठा आणि विश्वासू स्त्रोत असून तो जपला पाहिजे, अशी त्यांनी भूमिका घेतली होती. त्यावरून बराच वादही झाला होता. राज्य मागासवर्ग आयोगाचे ते सदस्य होते. ओबीसी जनगणना झाली पाहिजे अशी त्यांची आग्रही भूमिका या आयोगात राहिली आहे. अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. नियोजन आयोगाच्या सल्लागार गटाचे ते माजी सदस्य होते. ओबीसींच्या वाट्याला येणारा तुटपुंजा निधी यावर आकडेवारीसह त्यांनी विश्लेषण करून ओबीसींचे डोळे उघडण्याचे काम केले होते. मराठी भाषा सल्लागार समिती, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, कामगार कल्याण मंडळ, रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, बालभारती, पुणे यांचे ते माजी सदस्य होत. महात्मा फुले समग्र वाङमय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याच्या खंड 17 ते 22 चे ते संपादक राहिले आहेत.
बहुजनांचा बुलंद आवाज बंद झाला!
बहुजन समाजाची खूप मोठी हानी झाली. ओबीसी आणि बहुजन चळवळीचा मोठा बुलंद आवाज बंद झाला. परिवर्तनवादी आणि पुरोगामी छावणीतला मोठा माणूस आपण गमावलाय. आणि वयही काही जास्त नव्हते, केवळ 60 वर्षे. आपल्याकडे हनुमंत उपरे, गोविंद पानसरे, हरी नरके अकाली जाताहेत. हरी नरके यांनी आपल्या अंगाने संशोधनात बर्यापैकी मजल मारली होती. अन्यथा सर्व संशोधने ब्राह्मणी अंगानेच झालेली आहेत. लेखन, संशोधनात मोठी हानी म्हणावी लागेल.
-राजाराम सूर्यवंशी, ज्येष्ठ सत्यशोधक, पालघर
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
विनम्र आदरंजली
उत्तर द्याहटवा