दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

हनुमंत उपरे उर्फ काका : ओबीसींचा लढवय्या धम्मनायक

 हनुमंत उपरे उर्फ काका : ओबीसींचा लढवय्या धम्मनायक

दहा कोटी ओबीसींना बुद्ध धम्माची दीक्षा देणार : दिवंगत हनुमंत उपरे काका स्मृतीदिन समारंभात मंत्री राजेंद्र पाल गौतम यांची घोषणा

उपरे काका
बीड : हनुमंत उपरे काका यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण भंते नागार्जुन सरेई ससाई यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवर.

भास्कर सरोदे, औरंगाबाद :
बोधिसत्व बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीने देशात मानवमुक्‍तीचा जागर सुरू झाला. या मानवमुक्‍तीच्या लढ्याने अनेकांना खुणावले. हनुमंत उपरे उर्फ काका हे त्यापैकीच एक. मानसिक आणि धार्मिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या ओबीसींना मुक्‍तीची पहाट दाखविणारा धम्मनायक असे सार्थ वर्णन काकांचे करता येईल. ओबीसींमधील सूक्ष्म ओबीसींना ‘चलो बुद्ध की ओर’ असे ललकारत ‘घरवापसी’चा मूलमंत्र त्यांनी दिला. उपरे काकांचे कार्य भारतीय इतिहासात सोनेरी पान ठरावं, इतकं तोलामोलाचे आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला खुले आव्हान देताना काकांनी ओबीसींतील ढोंगी नेत्यांना उघडे पाडण्याचे काम केले. अत्यंत चिकित्सक, तर्कशुद्ध मांडणी, परिवर्तनवादी तथा सत्यशोधकीय विचारांवर पकड, कृतीतून थेट भिडण्याची वृत्ती यामुळे उपरे काका सूक्ष्म ओबीसींच्या गळ्यातील ताईत बनले.
शनिवार, दि. 19 मार्च 2022 रोजी स्मृतिदिनानिमित्त हनुमंत उपरे काका यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि ओबीसी प्रबोधनकार हनुमंतराव उपरे (काका) गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांच्या विचारांचा वारसा त्यांचे कुटुंबीय चालवत असल्याचा प्रत्यय आला. सर्वार्थाने ऐतिहासिक ठरलेल्या या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते नागपूर दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई. त्यांच्या हस्ते काकांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनाकरण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाने पंचशिल ध्वज फडकवून काकांना मानवंदना दिली. त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. येत्या 2025 पर्यंत देशातील 10 कोटी ओबीसी बांधवांना बुद्ध धम्माची दीक्षा देणार, असा संकल्प दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी सोडला. टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी प्रतिसाद दिला.
राजेंद्र पाल गौतम म्हणाले, या देशात विषमतावादी विचारधारेचे लोक अनादी काळापासून षडयंत्र आखत आलेले आहेत. त्यामुळे माणसामाणसांत भेदाभेद करणारी ही विषमता मुळासकट उखडून टाकण्यासाठी एकत्रित येणे नितांत गरजेचे आहे. खरंतर आजही जी काही लोक विषमतेच्या गुलामीत आपले जीवन जगत आहेत. त्यांना मानवतेच्या बुद्ध धम्माची दीक्षा दिल्याशिवाय आता गत्यंतर नाही. त्या अनुषंगाने येत्या 2025 पर्यंत देशातील 10 कोटी ओबीसी, बहुजन बांधवांना बुद्ध धम्माची दीक्षा देण्याचा महत्वकांक्षी संकल्प हाती घेतला आहे.    
ओबीसींच्या प्रश्नांवर लढा देणारे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक स्मृतीशेष हनुमंतराव काका उपरे यांनी ओबीसींच्या ज्वलंत प्रश्नावर विधायक आणि रचनात्मक कार्ये केलेले आहे. ओबीसी बांधव बुद्ध धम्माच्या वाटेवर या अभियानाचे प्रणेते, दिवंगत हनुमंतराव उपरे काका यांचे कार्य प्रेरित आहे. या जगाला युद्धापासून थांबवायचे असेल आणि जगात शांतता व मैत्री निर्माण करावयाची असेल तर बुद्ध धम्म हाच एकमेव पर्याय आहे. बुद्ध धम्म हा विज्ञानावर अवलंबलेला असून बुद्ध धम्माची पायवाट मानवतेकडे जाणारी आहे. एवढेच नाही तर काकांनी उभा केलेल्या महान कार्याची इतिहास नक्कीच नोंद घेईल. काकांच्या निधनानंतर संतोष उपरे आणि संदीप उपरे हे धम्मपथाचा आणि विचारधारेचा रथ पुढे घेऊन जात आहेत, असे राजेंद्र पाल गौतम म्हणाले.

धम्म रॅलीने वेधले लक्ष

ओबीसी परिषदेचे संस्थापक स्मृतीशेष हनुमंतराव उपरे काका यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मान्यवराच्या हस्ते मोटारसायकल रॅलीला पंचशिल ध्वज दाखवून सुरुवात झाली. ही रॅली सुभाष रोड, आण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करत जालना रोड मार्गे कार्यक्रम स्थळाकडे मार्गस्थ झाली. या भव्य धम्म रॅलीने  सर्वांचेच लक्ष वेधले होते.
उपरे काका

ओबीसींमधील उपरेपण चव्हाट्यावर :

ओबीसी सत्यशोधकीय नेते हनुमंत उपरे काका यांनी ओबीसींमधील उपरेपण सत्यशोधकीय पद्धतीने मांडले. ओबीसींचे सूक्ष्म प्रश्‍न त्यांच्यामुळे चव्हाट्यावर आले. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता समाजात रूजविण्यासाठी काकांनी अहोरात्र प्रयत्न केले. ओबीसींमधील अठरापगड जातींना राष्ट्रीयत्वाच्या धाग्यात गुंफण्याचे कामही उपरे काकांनी केले, असे मत परभणीचे मुख्याधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्‍त केले.

उपरे काकांना फुलेंची प्रेरणा :

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. सी. एल. थूल यावेळी बोलताना म्हणाले, महात्मा जोतीराव फुले यांनी ‘वज्रसूची’चे मराठीत भाषांतर केले. या ग्रंथामुळे फुले यांना अत् दीप् भव् चा मूलमंत्र देणारा, तसेच समतेवर आधारलेला विज्ञाननिष्ठ  जगात एकमेव बुद्ध धम्म असल्याचे कळले. यावर चर्चासत्र घडवून आणून महात्मा फुले यांनी 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हीच प्रेरणा उपरे काकांनी घेतली आहे. आमची खरी ओळख पटली पाहिजे. हिंदू म्हणजे कोण? ओळख पटत नाही. कारण हिंदूंमधील जातीची ओळख दिल्याशिवाय माणसाची ओळख पटत नाही. मात्र बौद्ध आहे म्हटले की, ओळख पटते. हीच संकल्पना महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजातून स्पष्ट केली. त्यातून प्रेरणा घेऊन काकांनी बुद्ध धम्माची वाट धरली. ओबीसींची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक प्रगती करावयाची असेल तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. संदीप आणि संतोष यांच्या रक्‍तात उपरे काकांचे विचार भिनले आहेत. ते उपरे काकांचा वारसा चालवतील, असा विश्‍वास व्यक्‍त करताना बुद्ध धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय ओबीसींना गत्यंतर नसल्याचे न्या. थूल यांनी सांगितले.
या ऐतिहासिक सोहळ्याला नागपूर दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भंते धम्मशील यांच्यासह भिक्खु संघ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विशेष अतिथी म्हणून समाजकल्याण महिला तथा बालविकस विभाग दिल्ली सरकारमधील मंत्री राजेंद्र पाल गौतम, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. सी. एल. थूल, परभणीचे सीईओ शिवानंद टाकसाळे, बीडचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, कॅप्टन कुणाल गायकवाड आदी उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आ. राजेंद्र जगताप, युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे, सुशिलाताई मोराळे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त भगवान वीर, सेल्स टॅक्स उपयुक्त रवींद्र जोगदंड, प्रा. प्रदीप रोडे, उल्हास राठोड, एमएसईबी अधीक्षक अभियंता रवींद्र कोलप, सावता परिषद अध्यक्ष कल्याण आखाडे, कुंडलिक खांडे, धम्मानंद साळवे, दयानंद स्वामी, एस. के. जोगदंड, के. ई. हरिदास, ग. ह. राठोड, महेश निनाळे, सूर्यकांत खरात, कुणाल वराळे आदींची उपस्थिती होती.


डॉ. बोबडेंच्या धम्मकार्याचा गौरव

माजलगाव येथील डॉ. डिगांबर बोबडे यांच्या अविरत धम्मकार्याची दखल घेत, सत्यशोधक ओबीसी परिषदेकडून त्यांना स्मृतिशेष हनुमंत काका उपरे धम्मरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यापुढे प्रतिवर्षी राज्यातील धम्म चळवळीत असामान्य कार्य करणार्‍या व्यक्तीला स्मृतिशेष हनुमंत काका उपरे धम्मरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष संदीप उपरे यांनी दिली.
उपरे काका


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधक ओबीसी परिषदेचे सल्लागार संतोष उपरे यांनी केले. दरम्यान यावेळी सत्यशोधक ओबीसी परिषदेचे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप उपरे यांनी काकांच्या जुन्या आठवणींना उजाळा  दिला. कार्यक्रमाचे आभार सत्यशोधक ओबीसी परिषदेचे मराठवाडा संघटक अमरसिंह ढाका यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. मनोहर सिरसाट, श्रीराम जाधव यांनी केले.
यावेळी महेश निनाळे, सीमा पाटील, उल्हास राठोड, पप्पू कागदे, सुशिलाताई मोराळे, राजेंद्र जगताप, तुषार ठोंबरे यांनी उपरे काकांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
हा स्मृतिदिन सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सत्यशोधक ओबीसी परिषद तसेच आंबेडकरी जनतेने परिश्रम घेतले. यावेळी लक्ष्मण ढवळे, प्रा. लक्षण गुंजाळ, विशाल राऊत, राजेश शिंदे, संगमेश्वर आंधळकर, मनीषा तोकले, राजु जोगदंड, राजाभाऊ आठवले, अशोक गायकवाड, गजानन चित्रे, बी. के. माने, संतोष जोगदंड, अंकुश येळे, प्रा. स. रा. सुतार, अ‍ॅड. राजु शिंदे, एस. टी. गायकवाड, माणिक वाघमारे, प्रा. राम गायकवाड, विजयकुमार समुद्रे, तंबरे गुरुजी, दत्ता व्यवहारे, नारायण मरडेकर, टी. टी. तावरे, अशोक तांगडे, राजेश शिंदे आदींची उपस्थिती होती.

बीड :हनुमंत उपरे काका यांचा अर्धाकृती पुतळा बनवणारे औरंगाबाद येथील कला शिल्प आर्ट स्टूडियोचे विकास सरवदे यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री राजेंद्र पाल गौतम, न्या. सी. एल. थूल, संदीप आणि संतोष उपरे आदी.

या कार्यक्रमाचे वैशिष्टे असे की, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. शेवटच्या सत्रात भिक्खू संघाने धम्मदेसना दिली. यावेळी ओबीसी प्रबोधनकार हनुमंतराव उपरे (काका) गौरव विशेषांकाचे उपस्थितांना वाटप करण्यात आले. या विशेषांकाच्या माध्यमातून हनुमंत उपरे काका यांच्या संघर्षमय जीवनाचा वेध  घेण्यात आला. त्यातील संपादित अंश वाचकांसाठी खालीलप्रमाणे देत आहोत.


धर्मांतर अभियान ही धम्मक्रांती!
मी स्वत: हनुमंत उपरे यांना कधी भेटू शकलो नाही; परंतु त्यांच्या कार्याची मला फार जवळून प्रचिती आली. 25 डिसेंबर 2016 रोजी मनुस्मृती दहन दिनाला स्मृतिशेष हनुमंत उपरे काका यांच्या प्रेरणेने सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या हजारो बांधवांनी हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धम्म स्वीकारला. ती ऐतिहासिक धम्मदीक्षा माझ्या हस्ते पार पडली, याचे मला समाधान आहे. ती धम्मक्रांती परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मचक्र परिवर्तनाच्या हीरक महोत्सवी वर्षात झाली आणि पूर्णपणे विकसित झालेल्या दीक्षाभूमी परिसरात झाली. ज्याचे प्रणेने हनुमंतकाका उपरे होते. मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की, मी एक सामान्य भिक्खू या ऐतिहासिक धम्मदीक्षा कार्याचा प्रमुख भिक्खू होऊ शकलो. उपरे काका यांच्या कुशल कर्माचे फळ माझ्या पदरी पडले. मी धन्य झालो. कारण उपरे काकांनी आरंभिलेले धर्मांतर अभियान ही धम्मक्रांती घडवेल, असा माझा विश्‍वास आहे.
-भंते सुरेई ससाई, नागपूर

 

ओबीसींना दिले राजकीय आत्मभान!
हनुमंत उपरे ज्या समाजातून आले, तो क्षत्रिय भावसार समाज. हा समाज तसा पाहिले तर बराचसा परंपरावादी आणि कर्मठ विचारांशी जोडला गेलेला आहे. खंर तर हा कर्मठपणा काकांना घरापासून अनुभवायला आला होता. मात्र, काकांनी आधी घर बदलले, नंतर समाज बदलण्यासाठी कष्ट उपसले. फुले-शाहु-आंबेडकरी विचारधारा अशी घरात रूजवून त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवला. त्यामुळेच ते सामाजिक क्रांतीचे दूत बनू शकले. ओबीसीतील बड्या नेत्यांनी ओबीसीतील बहुसंख्य छोट्या छोट्या जातींना राजकीयदृष्ट्या गृहितच धरले नाही. माळी समाजाच्या नेत्यांनी माळी, वंजारी समाजाच्या नेत्यांनी वंजारी, अशा आपापल्या समाजापुरत्याच भूमिका घेण्यात रस दाखविला. हनुमंत उपरे यांनी ओबीसीतील सूक्ष्म ओबीसींना संघटीत करून त्यांच्यात राजकीयदृष्ट्या आत्मभान निर्माण केले. त्यांचे हे कार्य वेगळेपण चळवळीच्या सोनेरी इतिहासात लक्ष वेधून घेणारे आहे.
-अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, मुंबई


प्रबुद्ध भारताचा प्रबुद्ध यौद्धा
बीडचाच एक राष्ट्रीय ओबीसी नेता, गोपीनाथ मुंडे यांनी आरएसएस, हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला. त्याच बीडमधील हनुमंत उपरे या सुपुत्राने देशातील, राज्यातील ओबीसींचा ‘डीएनए’ हा हिंदुत्वाचा नसून बुद्ध विचारांचा आहे, त्याच मार्गाने आपला उद्धार होईल, हे ठासून सांगितले. काकांनी ओबीसी वर्गाला आपण ओबीसी म्हणजेच ‘ओरिजनल भारतीय कम्युनिटी’ आहोत, ‘ओरिजनल बुद्धिस्ट केडर’ आहोत, अशी नवीन; परंतु शास्त्रीय परिभाषा दिली. यातच त्यांचे वेगळेपण उठून दिसते. उपरे काकांकडे स्वतंत्र चिकित्सक दृष्टी होती. खर्‍या अर्थाने ते प्रबुद्ध भारताचा प्रबुद्ध यौद्धा होते.
-अ‍ॅड. डॉ. सुरेश माने, मुंबई

सताधिष्ठित समाजव्यवस्थेचा ध्यास

धर्मांतराच्या घोषणा अनेक नेत्यांनी केल्या. या घोषणांना राजकीय फायद्याचे अधिष्ठान होते. मात्र, धम्म चळवळ हे सामाजिक स्थित्यंतराचे द्योतक समजून बाबासाहेबांनी मळलेल्या वाटेने जायचे धाडस केले ते फक्‍त हनुमंतराव उपरे तथा उपरे काका यांनीच. त्यांना कोणताही राजकीय स्वार्थ अपेक्षित नव्हता. अपेक्षा होती ती समताधिष्ठित समाजव्यवस्थेची. या मळलेल्या वाटेने जाताना काकांनी जे धैर्य दाखविले ते आजोड आहे.
-ज. वि. पवार, मुंबई

शोषणकारी धर्मच झुगारला पाहिजे

साठ वर्षात म्हणजे सुमारे दोन-अडीच पिढ्यांच्या कालावधीतच बौद्ध समाज हा हजारो वर्षे प्रस्थापित ब्राह्मणांच्या तुलनेत येऊन बसला, हे उपरे काकांनी आकड्यांनिशी पटवून द्यायला सुरूवात केली. हेही स्पष्ट केले की, बौद्ध झालेल्या महार समाजाची ही प्रगती सवलतींमुळे नव्हे, तर केवळ धम्मामुळे शक्य झाली. कारण सवलती इतर जातींनाही होत्या. मात्र, त्यांचा तसा उत्कर्ष झाला नाही. ओबीसी तर त्यांच्या तुलनेत अत्यंत मागे आहेत. ओबीसींनाही उत्तुंग जीवनाची मूल्ये संविधानाने दिलीत खरी; पण आपला धर्मच ते हिरावून घेतो. एकीकडे आपला धर्म, आपली जात आणि दुसरीकडे संविधान संमत समानता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व यात मोठा विरोधाभास उभा झालेला आहे. म्हणून जो धर्म आपले शोषण करतो, तो धर्मच आता झुगारून फेकला पाहिजे, असा आग्रह उपरे काकांनी ओबीसींपुढे धरला.
-हरिश्‍चंद सुखदेवे, नागपूर

‘चलो बुद्ध की ओर...’

प्रस्थापित व्यवस्था तुमची जगण्याची सुरक्षितता धोक्यात आणत असते. अशा स्थितीत सुरक्षेचे कवच तोडून धोका पत्करण्याची तयारी असेल, तर परिवर्तनासाठीची भूमिका अधिक निर्भयपणे मांडता येते. हेच नेमके हनुमंत उपरे काकांनी केले. ओबीसींमध्ये अत्यल्प लोकसंख्या असलेल्या अनेक जाती आहेत. त्या तशाच राहिल्या. आपल्या देशाचे सरकार ओबीसींचे अस्तित्व मान्य करीत नाही, त्यांच्या न्यायासाठी विशेष काही करीत नाही. त्यामुळे आपल्याला कोण ओळखतो, असा न्यूनगंड ओबीसींमध्ये आजही आहे. हा न्यूनगंड गेला पाहिजे, म्हणून हनुमंत उपरे काका यांनी लक्षणीय स्वरूपाच्या चळवळी केल्या. या सार्‍या चळवळी परिवर्तनासाठी होत्या. जातीनिहाय जनगणना अशी मागणी त्यांनी 20 वर्षांपूर्वी केली होती. ओबीसीचे स्वरूप, त्यांच्या समस्या आग्रहीपणे मांडताना उपरे काकांनी ‘चलो बुद्ध की ओर...’, हा ओबीसीच्या उत्कर्षाचा मार्गही दाखवला.
-प्रा. प्रल्हाद लुलेकर, औरंगाबाद.

...तो मार्ग आपोआपच बुद्ध धम्माकडे जातो

स्वकर्तृत्वावर आर्थिक प्रतिष्ठा मिळविल्यावरसुद्धा सामाजिक प्रतिष्ठा मिळणार नसेल, आणि ती फक्‍त एका विशिष्ट धर्मातील जातीतच जन्मलेल्यांना मिळणार असेल तर तो धर्मच मला मान्य नाही, ही हनुमंतराव उपरे काकांनी केलेली सिंहगर्जना होती. त्यांनी नेहमी व्यवस्थेच्याविरोधात जाऊन काम केले. सत्यासाठी लढत राहिले. अनंत संघर्षातून त्यांनी स्वत:चे आयुष्य शून्यातून सजविले. तरीही त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला जातीच्या कुंपणाने रोखायचा प्रयत्न केला. तेव्हा समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण देणार्‍या विश्‍वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेल्या बुद्ध धम्माच्या मार्गाने जाण्याचा त्यांनी ठाम निर्णय घेतला. ते म्हणत, सत्य बोलण्याला कृतीची जोड असल्याशिवाय सत्याचे शोधन होत नाही. त्यामुळे आधी कृती आणि नंतर शोधन होते. घरातून नुसती लेखणी चालवून सत्याचे शोधन होत नसते. त्याच्या लेखणीला धार तेव्हाच येते, जेव्हा त्यांनी भोगलेले असते. त्याला झालेल्या सामाजिक अन्याय अत्याचाराचे चटके लागल्यावरच माणूस मुक्‍तीच्या मार्गाने चालण्याचे ठरवितो. तो मार्ग आपोआप बुद्ध धम्माकडे जातो.
-संतोष उपरे, बीड.

सत्यशोधक ओबीसी
ओबीसींच्या दु:खाचे राजकारण वैयक्‍तिक लाभासाठी त्यांना सहजपणे करता आले असते. अनेकजण तसे आजही करीतच आहेत; पण उपरे काका हे खरे सत्यशोधक होते. त्यांनी व्यक्‍तीगत स्वार्थ आणि व्यक्‍तीगत मुक्‍तीचे स्वप्न पाहिले नाही. बुद्धांचा मार्ग हेच त्यांनी ओबीसी मुक्‍तीचे आंदोलन केले.
-कॉ. धनाजी गुरव, इस्लामपूर, सांगली.

‘नाही रे’ वर्गाचा लोकनेता
महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव उपरे काकांवर होता. ते बंडखोरवृत्तीचे होते. डॉ. बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे काकांनीही वाघिणीचे दूध पिले होते. उपरे काका म्हणजे चळवळीचे मूर्तरूप. त्यांचा जीवनप्रवास खडतर, संघर्षमय झाला. त्यांच्या राजकारणाला समाजकारणाची बैठक होती. त्यांचे राजकारण खुर्ची आणि सत्तेच्या मांडवात पिंगा घालणारे नव्हते, तर झोपडीतील दु:खाच्या निवारणाचा उपाय शोधणारे होते. खर्‍या अर्थाने ते ‘नाही रे’ वर्गाचे लोकनेता होते.
-उषा दराडे, बीड.

बुद्ध धम्माला स्वगृह मानणारे
हनुमंत उपरे काका नाव घेतले की, डोळ्यासमोर येते ती म्हणजे ओबीसी चळवळ. एकनाथ आव्हाड यांच्याकडून काकांचे ओबीसी समाजासाठीचे कार्य कळत गेले. मात्र, मला खरे काका कळले ते तासगाव येथील सचिन माळी मुक्‍ती परिषदेच्या निमित्ताने. माझी व उपरे काकांची भेट 2014 ला तासगावात भरलेल्या मुक्‍ती परिषदेतच झाली. त्यांच्या विचारांनी मी प्रभावीत झाले. त्यांनी माझ्या व सचिनच्या अटकेचा निषेध करताना सरकारचा चांगलाच समाचार घेतला होता. बुद्ध धम्माला ते आपलं स्वगृह मानत होते, हे मला खूपच भावलेलं होतं. बुद्ध धम्मात जाताना आम्ही आमच्या स्वत:च्या घरी चाललोय, हाच त्यांनी आत्मभाव बाळगला आहे. या देशातल्या बहुजनांनाच नव्हे तर ज्या ज्या माणसांना नीतीच्या मार्गाने जगायचे आहे, त्या सर्वांसाठी बुद्ध धम्मच एक सक्षम पर्याय आहे.
-शीतल साठे, पुणे.

मी उद्योगिनी सावित्री अन् ते माझे मार्गदाते ज्योतिबा!

दि. 23 मार्च 1976 ला लग्‍न होऊन बीडला आहे. मराठवाड्यातील भाषा, राहणी व बोली फारच वेगळी होती. त्याहून अडचण म्हणजे अत्यंत धार्मिक घरातून, मी बंडखोर आणि विद्रोही घरात आले होते. आमच्या 42 वर्षाच्या संसारात उंबर्‍याच्या बाहेर न पडलेल्या माझ्यासारख्या लाजाळू मुलीला ताठ मानेची उद्योजक बनविण्यापासून ते विद्रोही व बंडखोर अशा फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीची कट्टर कार्यकर्ती बनविण्यापर्यंत माझे ज्योतिबा बनून त्यांनी मला घडविलं. त्यांनी आमचं संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित बनविलं. अचानक एक दिवस ते आम्हाला म्हणाले की, मी धर्मांतर करून बाबासाहेबांनी स्वीकारलेला बुद्धाचा धम्म स्वीकारणार आहे. मला हे ऐकून धक्‍काच बसला. मी त्यांना म्हणाले, ‘धम्म न स्वीकारताही आपण त्यांचे पंचशील व प्रतिज्ञा तर पाळतोच ना, मग धम्म न स्वीकारला तर चालेल’. ते म्हणाले, ‘तसे चालत नाही. दोन्ही तळ्यात पाय ठेवता येत नाही. आपल्याला एकच कोणता तरी मार्ग स्वीकारावा लागेल. तुमची इच्छा नसेल, तर तुम्ही येऊ नका, माझा तुम्हाला आग्रह नाही’. त्यांच्या विचारावर आमची श्रद्धा बसली. आम्ही सर्वांनी धर्मांतर करण्याची तयारी दाखविली. त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, ‘प्रथम मी माझ्या घरातील सर्वांचे मत परिवर्तन करू शकलो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे’.
-श्रीमती कमलताई उपरे, बीड.

ओबीसींचा मार्गदाता

भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षापेक्षा अधिक काळ झाला असला तरी सर्वसामान्य ओबीसी समाज अजूनही भ्रामक कल्पनांमध्ये रमलेला दिसतो. ओबीसींना सर्वार्थान उद्धार करून घ्यायचा असेल तर त्यांना बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. बुद्ध धम्म हाच ओबीसींच्या कल्याणाचा मार्ग असू शकतो, हेच ओळखून हनुमंत उपरे काका यांनी ओबीसी परिषदेच्या माध्यमातून त्यांचे कार्य केले. जातीचा व धर्माचा प्रचंड पगडा असलेल्या या व्यवस्थेत धर्मांतराची चळवळ सुरू करून ती अंतिम ध्येयापर्यंत नेणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही. काका फक्‍त भाषणातून बोलत नव्हते, तर त्यांचा प्रत्यक्ष कृतीवर भर असायचा. काकांनी जे काही विचार विचारपीठावरील भाषणातून मांडले ते विचार प्रत्यक्ष कृतीमध्येही आणलेले आहेत. उक्‍तीतून आणि कृतीतून काका, खर्‍या अर्थाने ओबीसींचे मार्गदाता ठरले.
-प्रा. प्रदीप रोडे, बीड.

लढवय्या कार्यकर्ता
आपल्या देशात हजारो वर्षाची परंपरा आहे की, बुद्ध असतील, कबीर, संत रविदास, संत तुकाराम असतील, अगदी संत गाडगेबाबापर्यंतचा इतिहास घेतला, तर ज्यांनी ज्यांनी मनुवाद्यांच्या विरोधात पंगा घेतला त्यांना त्यांनी थेट संपविलेले आहे. हे माहीत असूनही जो संघाशी पंगा घेतो तो माणूस मोठाच असतो, धाडसीच असतो. तुम्ही आम्हाला 21 व्या शतकातही रामायण, महाभारताच्या नियमावर चालायला सांगता, हे आमच्या बुद्धीला पटत नाही. म्हणून हनुमंत उपरे कायम संघाशी पंगा घेत आले. संघाशी पंगा घेतल्यावर काय होते, हे 1976 पासून मीसुद्धा भोगतोच आहे. त्यामुळे मला उपरे यांचा मृत्यू कसा झाला, हे सुद्धा एक गूढच वाटते. ज्यांनी ज्यांनी संघाशी पंगा घेतला त्यांचा जसा गूढ मृत्यू झाला, अगदी तसाच हनुमंतराव उपरे यांचा झालेला मला दिसतोय. मात्र, हा विचारांचा लढा आहे. थांबणारा नाही. हनुमंत उपरे यांची दुसरी पिढी या लढ्यात सक्रीय आहे. हेच आमचे मनुवाद्यांना जालीम उत्तर असेल, यात शंका नाही.
-माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील, पुणे.

सत्तेपेक्षा चळवळ प्रमुख मानणारा नेता
कार्यकर्ता म्हणून हनुमंतराव उपरे अत्यंत विनम्र होते. मोठ्या समूहाचे नेते असूनही त्यांचे पाय जमिनीवर होते. विशेष म्हणजे सत्ता मिळविण्यासाठी ते कधीच आसुसलेले नव्हते. त्यांच्यासाठी चळवळ प्रमुख होती. चळवळीसाठी सत्तेत जाणं गरजेचं असेल तर ते त्यांना महत्त्वाचं होतं. मात्र, चळवळ सोडून सत्तेसाठी ते कधीच हपापलेले नव्हते. हे चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांपेक्षा मला त्यांच्यात जाणवलेलं मोठं वेगळेपण वाटतं. असा हा कार्यकर्ता अत्यंत आकस्मिकपणे आपल्याला सोडून गेला. खरेतर त्यांचे अचानक जाणे अजिबात अपेक्षित नव्हते. उपरे काकांनी एकदा टीव्हीवरील महाचर्चेत आरएसएसच्या घरपापसी मोहिमेची खिल्‍ली उडविली. ते म्हणाले, ‘तुम्ही हजारो वर्षे ज्या माणसांचे शोषण केले त्यांनी धर्म सोडला; पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे आता घरवापसीचे ढोंग रचताय, तेच मुळात खोटे आहे. इ.स. पूर्व 500-600 च्या नंतर भारतात बौद्ध, जैन आणि ब्राह्मण यांचीच लोकसंख्या जास्त होती. यात बौद्ध हे बहुसंख्येने होते. तुम्ही त्यांना छल, कपटाने पराभूत करून तुमच्या धर्मात गुलाम बनवून ठेवले. ही हजारो वर्षाची गुलामीची परंपरा तोडून आता आम्ही आमच्या मूळ घरात घरवापसी करीत आहोत, ही खरी घरवापसी आहे’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. काकांकडे तर्कनिष्ठता होती. वाचनाने त्यांचा मेंदू समृद्ध झाला होता. त्यामुळे ते बौद्धिक पातळीवर भल्या-भल्यांची भंबेरी उडवित असत.
-डॉ. भारत पाटणकर, इस्लामपूर.

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?